Dr. Ravindra Shobhane
Dr. Ravindra Shobhanesakal

‘संवादानं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न’

अंमळनेर इथं होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची नुकतीच निवड झाली. त्यानिमित्त महिमा ठोंबरे यांनी डॉ. शोभणे यांच्याशी साधलेला संवाद.

अंमळनेर इथं होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवींद्र शोभणे यांची नुकतीच निवड झाली. त्यानिमित्त महिमा ठोंबरे यांनी डॉ. शोभणे यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काय भावना आहेत?

उत्तर : संमेलनाध्यक्षपद हा मराठी साहित्यातील सर्वोच्च बहुमान समजला जातो. ही निवड होणं, हे अनेकांचं स्वप्न असतं. मला यंदा हा सन्मान मिळाला, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. गेली ४० ते ४२ वर्षं मी लेखन करतो आहे. कथा, कादंबरी, समीक्षा, ललित, व्यक्तिचित्रण, संपादन अशा सर्व वाङ्‍मय प्रकारांमध्ये मी मुशाफिरी केली.

अर्थात, यात कादंबरी या प्रकारात सर्वाधिक रमलो. माझ्या या संपूर्ण धडपडीची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने योग्य दखल घेतली, याचा आनंद आहे. अंमळनेर ही साने गुरुजींची भूमी आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजी अशी एक वैचारिक परंपरा आहे. त्या परंपरेशी यानिमित्तानं माझं नातं जुळतं आहे, याचं विशेष समाधान आहे.

प्रश्न : या टप्प्यावर आपल्या लेखन प्रवासाकडे मागे वळून पाहताना सर्वाधिक समाधान कशाचं वाटतं?

माझा लेखक म्हणून आणि मुख्यतः कादंबरीकार म्हणून झालेला प्रवास दोन-तीन पातळ्यांवरील आहे. एक म्हणजे, मी ग्रामीण जनजीवन अनुभवलं आहे. ते ‘कोंडी’ आणि ‘पांढर’ या कादंबऱ्यांमधून पूर्ण ताकदीने मांडण्याचा मी प्रयत्न केला. दुसरं म्हणजे, घरी असलेल्या वारकरी संप्रदायाच्या वातावरणातून मी रामायण-महाभारताकडे आकृष्ट झालो, त्यावर भरपूर वाचन केलं.

त्यातून ‘उत्तरायण’ ही दैवी चमत्कार, योगायोग यांना फाटा देत मानवी पातळीवरचं चित्रण असणारी कादंबरी लिहिली. अशा प्रकारची कादंबरी मराठीत नाही, हे मी अभिमानानं सांगू शकतो. तिसरं म्हणजे, १९७५ ते २००० या मोठ्या कालखंडाचं चित्रण मी ‘पडघम’, ‘अश्वमेध’ आणि ‘होळी’ या तीन कादंबऱ्यांमधून केलं. ही मराठीतील सर्वाधिक पृष्ठसंख्येची ‘कादंबरी त्रयी’ आहे. याशिवाय बऱ्याच कथा, व्यक्तिचित्रणात्मक लेखन केलं.

सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वास्तव लेखनात पकडण्याचा मी प्रयत्न केला, याचं समाधान आहे. सतत नवं काहीतरी काय करता येईल, याचा माझा शोध कायम सुरू असतो. संत नामदेव यांचं मराठीत योग्य मूल्यमापन झालं नाही, असं माझं मत आहे. त्यामुळे येत्या काळात समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक अंगाने त्यांचं मूल्यमापन माझ्या लेखनातून करण्याचा मानस आहे.

प्रश्न : संमेलनाध्यक्ष म्हणून कोणती उद्दिष्टं डोळ्यांसमोर आहेत? कोणत्या प्रश्नांवर तुमचा प्रामुख्याने भर असेल?

राज्यात आज मराठी शाळा धडाधड बंद होत आहेत, त्या वाचवण्याचं माझं प्रमुख उद्दिष्ट आहे. राज्य सरकारचं त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या शाळा का बंद होत आहेत, याच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच मी ही भूमिका मांडली, त्यावर ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी, ‘तू अतिशय चांगल्या मुद्द्याला हात घातला आहेस.

याकरिता तुला माझ्याकडून जी मदत हवी असेल, ती मी निश्चित करेन’, असं आवर्जून सांगितलं, त्यामुळे माझा हुरूप वाढला. अर्थात, यासाठी सध्या असलेली व्यवस्था मोडकळीस न आणता, त्याला नीटसपणे टेकू देऊन कसं उभं करता येईल, याचा विचार होणं गरजेचं आहे. याशिवाय मराठी भाषेसंबंधीचे इतरही प्रश्न आहेत. तसंच, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, त्यासाठी काम करणार आहे.

प्रश्न : तरुणाईची मराठी भाषेबरोबरची नाळ तुटत जाण्याचा धोका आहे, त्याबाबत काय सांगाल?

सरकार शैक्षणिक क्षेत्राबाबत अतिशय उदासीन आहे. २०१२ पासून प्राध्यापकांची भरती रखडली आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक नाहीत, शाळांमध्ये चार वर्गांमध्ये केवळ एक शिक्षक, अशी परिस्थिती आहे. मराठी समाजाच्या दृष्टीनं अतिशय अहितकारक आणि भीतिदायक अशी ही बाब आहे.

पुस्तकांमध्ये अगदी बालभारतीपासून जी रचना झाली आहे, ती अतिशय सुमार आहे. आम्ही मराठी शिकत असताना प्राचीन ते अर्वाचिन, असे मराठी भाषेचे सगळे टप्पे आम्ही शिकलो. अवांतर वाचन किंवा स्थूल वाचनासाठी दर्जेदार पुस्तकं होती. आता पाचवीतील विद्यार्थ्याला सामान्य दर्जाचं पुस्तक दिल्यावर तो पुन्हा मराठी साहित्याकडे वळेल, अशी अपेक्षा चुकीची आहे.

त्यात मराठीला इंग्रजी, हिंदी यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायावर आपण नेऊन ठेवलं आहे. पायाच असा ठिसूळ असेल, तर पक्की इमारत कशी उभी राहील? त्यामुळे मराठी शाळा वाचवणं, टिकवणं आणि मुलांना मराठीतून चांगल्या अभ्यासक्रमाचं शिक्षण देणं, हाच त्यावरील उपाय आहे. मराठीचं शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावं, यासाठी प्रयत्न करणंही गरजेचं आहे.

प्रश्न : मराठी साहित्य व्यवहाराच्या सद्यःस्थितीबाबत काय वाटतं?

आपल्याकडे काही लोकप्रिय लेखक आहेत, त्यांचा ठरलेला वाचकवर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या पुस्तकांची नेहमीच उत्तम विक्री होते. काही विशिष्ट साहित्य प्रकारांच्या पुस्तकांबाबतही हे होतं. आज मराठीत लेखन करणारी नवीन पिढी अतिशय सकस आणि कसदार लेखन करते आहे.

कलात्मकरीत्या आणि गंभीरपणे ही पिढी समाजातील वास्तवाकडं पाहते आहे, ते वेगळ्या पद्धतीनं आपल्या साहित्यातून मांडते आहे. पुण्या-मुंबईपुरतं केंद्रित झालेलं साहित्यविश्व आता राज्यभर विस्तारलं आहे. खेड्यापाड्यांतून अनेक लेखक पुढं येत आहेत. मध्यमवर्गीय ब्राह्मणी जीवनदर्शन घडवणाऱ्या लेखनापलीकडील विषय साहित्यात येत आहेत, हे आश्वासक चित्र आहे.

मात्र, वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांचं स्वरूप बदललं आहे. वाङ्‍मयीन व्यवहाराला त्यात मिळणारं स्थान आक्रसतं आहे. वाङ्‍मयीन नियतकालिकं बंद पडली आहेत, त्यामुळे चांगल्या पुस्तकांचा हवा तितका बोलबाला वाचकांपर्यंत पोहचत नाही. अर्थात, ही पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं समाजमाध्यम हे एक नवं माध्यम उपलब्ध झालं आहे. वाचकांची टक्केवारी पूर्वीइतकीच आहे, केवळ त्यावरील चर्चेचं स्वरूप बदलतं आहे.

प्रश्न : संमेलनाध्यक्षांची निवडणूक रद्द होऊन एकमताने निवड करण्याची पद्धत काही वर्षांपूर्वी सुरू झाली. मात्र, त्याला लागलेलं वादाचं ग्रहण सुटत नाही. त्याकडे तुम्ही कसं पाहता?

मला असं वाटत नाही. कारण निवडणूक पद्धत रद्द झाल्यानंतर संमेलनाध्यक्षपदी निवड झालेल्या प्रत्येक लेखकाचं आपापल्या क्षेत्रात लक्षणीय योगदान आहे. ही निवड होताना तो साहित्यिक कोणत्या गटा-तटाचा आहे, हे पाहिलं जात नाही. केवळ त्याची साहित्यिक गुणवत्ता पाहिली जाते, असं माझं अवलोकन आहे.

मुख्य म्हणजे, साहित्यिकांना असं प्रांतांमध्ये, गटांमध्ये, विचारसरणींमध्ये विभागणंच मला मान्य नाही. चांगल्या लेखकाला असं सीमित करणं योग्य नाही. मीदेखील स्वतःला केवळ विदर्भाचा लेखक मानत नाही. महाराष्ट्र आणि बृहन् महाराष्ट्राच्या वाचकांपर्यंत पोहोचलेला लेखक आहे, म्हणूनच ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आहे.

प्रश्न : आजवर अनेक दिग्गज साहित्यिकांनी संमेलनाध्यक्षपद भूषवलं आहे. या परंपरेचा भाग होताना काय जबाबदारी जाणवते?

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंपासून साहित्य संमेलनाची परंपरा सुरू झाली. वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, वि. वा. शिरवाडकर, नारायण सुर्वे, दुर्गाबाई भागवत अशी मोठी परंपरा संमेलनाध्यक्षपदाला लाभली आहे. या परंपरेचा मी एक भाग होत आहे, याचा निश्चित आनंद आहे.

पूर्वीचे राजकारणी साहित्यिकांचं ऐकायचे, आत्ताचे कितपत ऐकतील, याबाबत मला शंकाच आहे. परंतु, राजकारणी विरुद्ध साहित्यिक, असा संघर्ष मला चुकीचा वाटतो. कारण राजकारणी लोकांनाही साहित्य आवडतंच, तीदेखील आपल्यासारखी माणसंच असतात. आपल्या मागण्या त्यांना योग्य पद्धतीनं समजावून सांगितल्या, त्यामागील कारणं पटवून दिली, तर ते मागण्या नक्कीच मान्य करतात.

त्यामुळे याबाबतचे वाद टोकाला नेणं, समाजात द्वेष निर्माण करणं मला अयोग्य वाटतं. त्यातच ‘डावं-उजवं’ हे सध्या फार तीव्रतेनं सुरू आहे. मी अध्यक्ष झाल्यावर मला काहींनी विचारलं, ‘तुम्ही सरकारला काय जाब विचारणार?’ प्रत्येकवेळी जाब विचारण्याची गरज कशाला? आपण सहिष्णुतेनं त्यांना आवाहन करू शकतो, विनंती करू शकतो. संवादाने प्रश्न सुटू शकतात, असं मला वाटतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com