Vidhan Sabha 2019 : भाजपकडून मेगाभरतीचा गाजावाजा पण बंडखोर आमदारांचे काय

BJP
BJP

'मेगा भरती' इव्हेंट साजरा करीत अन्य पक्षांतील आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देत असताना, भाजपमध्येही सर्व काही अलबेल नसल्याचे दिसून येते. भाजपच्या काही आमदारांनी यंदा थेट भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. यावेळी पक्षात आलेल्या आयाराम आमदारांइतकेच भाजपचे बंडखोर आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. भाजपचा गड मानल्या गेलेल्या विदर्भात आणि त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रात ही बंडाची झळ मोठ्या प्रमाणात बसली आहे.

काँग्रेसच्या सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपची मिळाली. या प्रत्येक प्रवेशाचा भाजपने मोठे कार्यक्रम करीत गाजावाजा केला. मात्र, भाजपमधील सात विद्यमान आमदारांनीही पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर बंडाचा झेंडा उभारला आहे. त्यांच्यासोबत पक्षाच्या एका माजी खासदाराचाही समावेश आहे. भाजपचे अनेक पदाधिकारीही पक्षादेश धुडकावित मित्र पक्षांच्या उमेदवारांना आव्हान देत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपने या बंडखोर आमदारांसह पदाधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला असला, तरी त्याचा निवडणुकीवर होणारा परिणाम टाळता येणार नाही.

विदर्भात जास्त बंडखोरी
विदर्भात बंडखोरीची सुरवात केली ती भाजपचे खासदार नाना पटोले यांनी. भंडारा लोकसभा मतदारसंघातील खासदार पदाचा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, पोटनिवडणिकीत त्यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये त्यांनी नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढत दिली. आता ते भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वासू सहकारी डॉ. परिणय फुके त्यांच्याविरुद्ध उभे आहेत. भाजपने भंडारा जिल्ह्यातील त्यांच्या तिन्ही आमदारांना पुन्हा उमेदवारी नाकारली. त्यांच्यापैकी तुमसरचे भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे भाजपची ही जागा धोक्‍यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात आर्णी मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राजू तोडसाम यांना डच्चू देत, उमेदवारीची माळ त्यांच्याविरुद्ध गेल्या निवडणुकीत लढलेले शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार संदीप धुर्वे यांच्या गळ्यात टाकली. तोडसाम यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपचेच माजी आमदार
काटोल मतदारसंघात 1914 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले आशिष देशमुख निवडून आले होते. या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे युतीला विजय मिळाला नव्हता. मात्र, भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्याच्या कारणाने देशमुखांनी आमदार पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काटोलची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने, काँग्रेसने आशिष देशमुख यांना आता नागपूर दक्षिण पश्‍चिम मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पडझड
शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते अनिल गोटे 2014 मध्ये भाजपतर्फे धुळे शहरातून निवडून आले. मात्र, त्यांचे व तत्कालिन संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचे वाद रंगले. धुळे महापालिका निवडणुकीत भाजपचे "संकटमोचक' मंत्री गिरीश महाजन यांनी सुत्रे हाती घेत गोटे यांच्या गटाचा पराभव केला. आता गोटे निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत. भाजपने हा मतदारसंघही शिवसेनेला सोडून दिला आहे.

नंदूरबार जिल्ह्यात शहादा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उदेसिंग पाडवी यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे पाडवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंदूरबारचे भाजपचे आमदार डॉ. विजय गावीत यांच्याविरुद्ध कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून उदेसिंग पाडवी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. स्थानिक राजकारणामुळे ही लढत अटीतटीची ठरणार आहे.

नाशिकला भाजपला शिवसेनेचे डोकेदुखी
नाशिक पूर्वचे भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. त्यांच्याजागी मनसेचे नेते राहूल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली. मनसेचे माजी आमदार व शिवसेनेचे माजी खासदार उत्तम ढिकले यांचे ते पूत्र आहेत. राजकीय सोय पहात भाजपने मनसेच्या राहूल ढिकले यांना उमेदवारी दिली. सानप हे भाजपचे शहराध्यक्षही होते. या राजकीय घडामोडीने अस्वस्थ झालेल्या सानप यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी स्विकारीत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली. त्यातच नाशिक पश्‍चिममध्ये भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्याविरुद्ध शिवसेनेने बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिवसेना व मनसे कार्यकर्त्यांच्या भुमिकेवर नाशिकमधील निवडणुकीचा रंग बदलत जाणार आहे.

कल्याणमध्येही कलगीतुरा
कल्याणमध्ये अपक्ष आमदाराला सामावून घेण्यासाठी भाजपला त्याग करावा लागला. मात्र, त्यामुळे कल्याणमधील दोन्ही मतदारसंघांतील अडचणीत भर पडली. कल्याण पूर्व मतदारसंघातील अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांना भाजपची उमेदवारी देताना भाजपने कल्याण पश्‍चिम मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला दिला. त्यामुळे कल्याण पश्‍चिम मतदारसंघातील भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांनी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. दुसऱ्या बाजूला गायकवाड यांना विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या तीस नगरसेवकांना पदाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठविला आहे. त्यामुळे कल्याणमध्ये युतीतील दोन्ही पक्षांत कलगीतुरा रंगला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com