सर्वांत तरुण आमदार यंदा होणार उपमुख्यमंत्री?

ज्ञानेश्‍वर बिजले 
Saturday, 2 November 2019

विधानसभेत सध्या सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. आमदार म्हणून ते आठ वेळा निवडून आले. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आणि कालिदास कोळंबकर हे जेष्ठतेमध्ये त्यांच्या पाठोपाठ असलेले आमदार. थोरात 1985 पासून नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यातून सलग आठ वेळा निवडून आले.

आदित्य ठाकरे यांचे नाव शिवसेनेच्या एका नेत्याने निवडणूक प्रचाराच्या प्रारंभी मुख्यमंत्री पदासाठी घेतले होते. आता ते उपमुख्यमंत्री होणार का, याची चर्चा माध्यमातून सुरू आहे. मात्र, ठाकरे फॅमिलीतून निवडणुकीच्या माध्यमातून विधीमंडळात पोहोचलेला हा नेता विधानसभेतील सर्वांत तरुण आमदार ठरला आहे. 

आदित्य ठाकरे आणि कोल्हापूरचे कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यात केवळ दोन आठवड्याचा फरक. दोघांचा जन्म 1990 मध्ये झालेला. ठाकरे यांची जन्मतारीख 13 जून, तर पाटील जन्मले 31 मे रोजी. यांच्या जोडीला अनेक तरूण आमदार सभागृहात दाखल झाले आहेत. भाजपच्या मंत्र्यांना पराभूत करून आमदार झालेले राष्ट्रवादीचे रोहित पवार 34 वर्षाचे. विधीमंडळ कामकाजाचा अनुभव गाठी आल्यानंतर काही वर्षांतच ते राज्याचा कारभार चालविण्यासाठी सक्षम होतात. त्यामुळे, या तरुण नेत्यांकडे आपोआप लक्ष वेधले जाते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत आले, तेव्हा तेही 29 वर्षांचेच होते. 1999 मध्ये ते आमदार झाले. त्यापूर्वी त्यांच्या गाठीशी नागपूर महापालिकेतील कारभाराचा अनुभव होता. ते 1992मध्ये नगरसेवक झाले. 1997 मध्ये नागपूरचे महापौर झाले, तेव्हा त्यांचे वय होते, केवळ 27 वर्षे. ते सलग 2001 पर्यंत महापौर होते. 
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेला प्रचार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ते पहिल्यांदा आमदार झाले 1967 मध्ये. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे 27 वर्षे. 

विधानसभेत सध्या सर्वांत ज्येष्ठ आमदार आहेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. आमदार म्हणून ते आठ वेळा निवडून आले. भाजपचे आमदार बबनराव पाचपुते आणि कालिदास कोळंबकर हे जेष्ठतेमध्ये त्यांच्या पाठोपाठ असलेले आमदार. थोरात 1985 पासून नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्‍यातून सलग आठ वेळा निवडून आले. पाचपुते पहिल्यांदा 1980 मध्ये निवडून आले होते. मात्र, गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 

सभागृहात आमदारांचा शपथविधी होताना सर्वांत ज्येष्ठ आमदारांना हंगामी अध्यक्षपद भुषविण्याचा मान देण्याची प्रथा आहे. यावेळी, तो मान कोणाला देण्यात येणार, ते पुढील आठवड्यात स्पष्ट होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijale writes about youth MLA become deputy CM in Maharashtra