Loksabha 2019 : वाराणसीत मोदींविरुद्ध मास्टरस्ट्रोक 

ज्ञानेश्‍वर बिजले 
Tuesday, 30 April 2019

राष्ट्रवाद हा असा मुद्दा आहे, की विरोधकांना त्याविरुद्ध फारसे काही बोलता येत नाही. पाकिस्तानच्या हद्दीत बालाकोट येथे हवाई हल्ला केल्यानंतर भाजप सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावली. त्यामुळे देशाचे संरक्षण मजबूत करण्याचा मुद्दा आपोआप आला. त्याचा निवडणूक प्रचारात वापर करू नये, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असले, तरी आडूनआडून तो मुद्दा येतच राहणार आहे. 

सत्ताधारी भाजपने राष्ट्रवाद हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा करीत देशाची सुरक्षितता राखण्यासाठी तो मजबूत हातात सोपविण्याचे आवाहन मतदारांना केले. निवडणूक होत असलेल्या उर्वरीत हिंदी पट्ट्यातील राज्यांत हा प्रचार आणखी तीव्र होण्याचा अंदाज असतानाच समाजवादी पक्षाने वाराणसी मतदारसंघातील उमेदवार शेवटच्या दिवशी बदलत बीएसएफमधील बडतर्फ जवान तेजबहादूर यादव यांना उमेदवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माजी जवानाची लढत होत असल्याने, राष्ट्रवादाच्या मुद्द्याला विरोधकांकडून आपोआपच ठोस उत्तर दिले गेले. 

मोदी यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. काँग्रेसनेही ती चर्चा सुरूच राहील, यासाठी खतपाणी घातले. त्यामुळे गुजरातेतील मतदान झाल्यानंतर मोदी यांचा दोन दिवसांचा दौरा वाराणसीत आखण्यात आला. भव्य रोड शो करून शक्तीप्रदर्शन केले. त्याच्या आदल्या दिवशी प्रियांका लढणार नसून, त्यांच्याऐवजी माजी आमदार अजय राय यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. सपनेही शालिनी यादव यांची उमेदवारी जाहीर केली होती. 
शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी पंतप्रधानांविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी वाराणसीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचे तेजबहादूर यादव गेले तीन-चार महिने सांगत होते. बेगुसराय येथील प्रचाराची सांगता करता सीपीआयचे उमेदवार व युवा नेता कन्हैय्या कुमार यांनीही शेतकऱ्यांपासून जवानांपर्यंत प्रत्येकजण पंतप्रधानांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे स्पष्ट केले होते. 

राष्ट्रवाद हा असा मुद्दा आहे, की विरोधकांना त्याविरुद्ध फारसे काही बोलता येत नाही. पाकिस्तानच्या हद्दीत बालाकोट येथे हवाई हल्ला केल्यानंतर भाजप सरकारची जनमानसातील प्रतिमा उंचावली. त्यामुळे देशाचे संरक्षण मजबूत करण्याचा मुद्दा आपोआप आला. त्याचा निवडणूक प्रचारात वापर करू नये, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असले, तरी आडूनआडून तो मुद्दा येतच राहणार आहे. 

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतात मतदान झाले. त्यापेक्षाही उत्तर भारतात राष्ट्रवाद, तसेच हिंदुत्ववादाचा मुद्दा प्रचारात जास्त चालतो. त्यामुळे अन्य मुद्दे आपोआपच मागे पडत जातात. तोच दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवत भाजपने भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी दिली. मात्र, शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी भाष्य करीत प्रज्ञासिंह यांनी भाजपलाच अडचणीत आणले. भाजपची ही चाल लक्षात घेत विरोधी पक्षांचे नेत्यांनी या दोन्ही मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी यासंदर्भात मोदी सरकारला घेरण्यावर त्यांनी भर दिला. 

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोदी यांच्यावर बालाकोट हवाई हल्ल्याचा संदर्भ देत टीका केली. तर, राष्ट्र म्हणजे तेथील जनता आणि त्यांचे प्रश्‍न सोडविणे म्हणजे राष्ट्रवाद अशी व्याख्या सांगत प्रियांका गांधी यांनी सत्ताधारी पक्षाच्या प्रचाराचा मारा बोथट केला. हिंदू,मुस्लिम ध्रुवीकरणाचा मुद्दा उत्तर प्रदेशात रंगतो. मात्र, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर तीन दिवसांची प्रचारबंदी घातल्याने, भाजपचा प्रचारातील एका मोहरा अडचणीत आला. 

मात्र, खरा दणका दिला तो समाजवादी पक्षाने. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, शालिनी यादव यांना दिलेली उमेदवारी रद्द करीत तेजबहादूर यादव या जवानाला उमेदवारी दिली. "असली चौकीदार' विरुद्ध "नकली चौकीदार' असा संघर्ष होणार असल्याचे तेजबहादूरने सांगितले. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्‌विट करीत तेजबहादूर यांना पाठिंबा दिला. ते गेल्यावेळी मोदी यांच्याविरुद्ध वाराणसीत लढले होते. 

जवानांना खराब अन्न पुरविले जाते, असा व्हिडिओ प्रसारीत केल्याने तेजबहादूर दोन वर्षांपूर्वी चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. मात्र, प्रचारात आता ते जवानांवर अन्याय होत असल्याचे मुद्देच उपस्थित करीत राहणार. मोदी मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतीलच. पण, वाराणसीतील समाजवादी पक्षाच्या प्रचारामुळे, भाजपने अन्य ठिकाणी प्रचारात राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर भर दिला, तरी त्याचा अपेक्षित परीणाम मिळण्याची शक्‍यता कमी आहे. त्याच वेळी समाजवादी पक्षांसह विरोधी पक्ष या मुद्द्यावर, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सत्ताधारी पक्षाला धारेवर धरतील. त्यामुळे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी तेजबहादूर यांना उमेदवारी देत, मोदींविरुद्ध जबरदस्त राजकीय खेळी खेळली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dnyaneshwar Bijle writes about Tejbahadur Yadav contest against PM Narendra Modi in Varanasi