

हर्ष काबरा - saptrang@esakal.com
बेबंद सत्ता, फसलेली आश्वासने, अहंकार, अरेरावी आणि स्वार्थ यांच्या कात्रीत ट्रम्प अडकले आहेत. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका त्यांच्या राजकीय भवितव्याचीही कसोटी ठरणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प उलटा नकाशा हातात धरलेल्या पर्यटकासारखे वागत आहेत. ३ नोव्हेंबरच्या मध्यावधी निवडणुका तोंडावर असताना घसरलेल्या लोकप्रियतेमुळे ते कमालीचे अस्वस्थ आहेत. अमेरिकेत सततच्या भाववाढीने त्यांच्या महागाई नियंत्रणाच्या निवडणूक वल्गनांची हवाच काढली आहे. डिझेलचे दर भडकताच त्यांनी थेट रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी हातमिळवणी करून पाश्चात्त्य लोकशाही मूल्यांचा उघड सौदा करत युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे स्वतःचेच धोरण मोडीत काढले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या खेपेतले डिझेल अवघ्या दहा दिवस पुरेल इतकेच आहे.
ट्रम्प यांच्या मनमानी कारभारामुळे संतप्त जगाचे कधी नव्हे एवढे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. ट्रम्प या निवडणुकीकडे आपल्या अध्यक्षपदावरील जनमताचा कौल म्हणून पाहत आहेत. तर दुसरीकडे, या निकालांमुळे अमेरिकी संसदेतील सत्तेचे समीकरण कसे बदलते, याची उत्सुकता सर्वत्र शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत लोकप्रतिनिधी गृहाच्या सर्व ४३५ जागा, सिनेटच्या ३५ जागा, ३६ राज्यांचे राज्यपाल आणि इतर अनेक पदांसाठी मतदान होणार आहे. सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहांवर रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व असल्याने ट्रम्प यांना अडवणारे कोणीही नाही. मात्र, ताज्या पाहणीनुसार अर्ध्याहून अधिक नागरिक कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅट पक्षाचे बहुमत इच्छितात, जेणेकरून नवे कायदे रोखणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावणे, संसदीय सुनावणी घेणे आणि संरक्षण खर्चावर नियंत्रण मिळवणे, अशा मार्गांनी ट्रम्प यांच्या एकतर्फी कारभाराला चाप लावणे शक्य होईल. अमेरिकेची धुळीस गेलेली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता पुन्हा मिळवणे, मित्रदेशांशी बिघडलेले संबंध सुधारणे आणि ट्रम्प यांनी केलेले नुकसान भरून काढणे हे डेमोक्रॅट पक्षाचे मुख्य ध्येय असेल.