सुदृढ मत्स्यपालनाला मित्रजैविकांची मात्रा!

भारतातून अमेरिकेत निर्यात झालेल्या कोळंबीत प्रतिजैविके आढळल्याने नुकताच अन्नसुरक्षेचा मुद्दा नव्याने उपस्थित झाला.
Shrimp Food
Shrimp Foodsakal

- डॉ. प्रकाश शिनगारे, भालचंद्र नाईक, केतन चौधरी

भारतातून अमेरिकेत निर्यात झालेल्या कोळंबीत प्रतिजैविके आढळल्याने नुकताच अन्नसुरक्षेचा मुद्दा नव्याने उपस्थित झाला. मत्स्यपालनाचे आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिजैविकांची भूमिका महत्त्वाची असली तरी त्यांचा अतिवापर गंभीर परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. सुदृढ मत्स्यपालनासाठी प्रतिजैविकांऐवजी मित्रजैविकांचा वापर व्हायला हवा.

भारत कृषिप्रधान देश आहे. कृषी आणि कृषिपूरक व्यवसाय समृद्ध शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यात प्रामुख्याने मत्स्यशेतीचा समावेश होतो. भारताला तब्बल ८११८ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. देशातून प्रामुख्याने समुद्रात मासेमारी करून व त्यावर प्रक्रिया करून उत्पादित मत्स्यपदार्थ निर्यात केले जातात. नुकताच भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कोळंबीत प्रतिजैविके आढळल्याने अन्नसुरक्षेच्या मुद्द्यावरून तिथे रोष निर्माण झाला होता.

त्याबाबत अमेरिकेतील एका संस्थेने सावधानतेचा इशारा देणारा अहवाल दिल्याने काही दिवस त्याचीच चर्चा रंगली होती. कोळंबी किंवा मासळीच्या ऊतींमध्ये प्रतिजैविके साठून राहिल्यास असे पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीकरिता मोठा धोका निर्माण करतात. सर्व मत्स्य संवर्धक आणि कोळंबी-मत्स्य बीज उत्पादकांनी मत्स्यशेती करताना प्रतिजैविकांच्या वापरापासून लांबच राहणे अतिशय महत्त्वाचे आहे.

भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवरील किनारपट्टी भागात उपलब्ध निमखाऱ्या पाण्याचा आणि खार जमिनीचा वापर करून मत्स्यशेती केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने निमखाऱ्या पाण्यातील टायगर कोळंबी आणि सफेद रंगाच्या पायाच्या कोळंबीचा (व्हेनामी) समावेश होतो. मत्स्यशेतीतून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होते.

आजमितीस विचार केल्यास भारतातून सुमारे ८,४३,६३३ टन इतकी निमखाऱ्या पाण्यात संवर्धित केलेली कोळंबी निर्यात केली जाते. त्यात प्रामुख्याने सफेद रंगाच्या पायाच्या कोळंबीचा वाटा ८,१५,५४५ मेट्रिक टन इतका आहे. टायगर जातीच्या कोळंबीचा वाटा २७,६१६ मेट्रिक टन आहे. मत्स्य उत्पादनाच्या निर्यातीतून भारताला ६३,९६९.१४ कोटी रुपये परकीय चलन उपलब्ध झाले आहे.

भारताने २०२२-२३ मध्ये मत्स्यपदार्थ निर्यातीत वजन आणि मूल्य अशा दोन्ही बाबतींत सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेतील आव्हाने असूनही, भारताने १७,३५,२८६ मेट्रिक टन सागरी मत्स्यपदार्थ निर्यात केले. ते वजनामध्ये २६.७३ टक्के, रुपयाच्या बाबतीत ११.०८ टक्के आणि अमेरिकन डॉलरच्या बाबतीत मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४.३१ टक्के वाढ दर्शवते.

समुद्री मासेमारी आणि निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीमध्ये मुख्यत्वे व्यवस्थापनात फरक आहे. सागरी मासेमारीदरम्यान समुद्रातील मासळीवर अधिक भर असतो; परंतु मत्स्यशेतीमध्ये संवर्धित माशांच्या अथवा कोळंबीच्या वाढीवर व त्यांच्या सुदृढ आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित केले जाते. म्हणजेच मत्स्यशेती नियंत्रित केली जाते. समुद्रातील मासेमारीवर आपले कोणतेही नियंत्रण नसते.

अशी होते मत्स्यशेती

मत्स्यशेती अथवा कोळंबी शेतीदरम्यान मत्स्यसंवर्धन तलाव तयार केले जातात. त्या तलावांत पाणी घेऊन ते निर्जंतुक केले जाते. त्यानंतर त्यात प्राणी प्लवंगाची निर्मिती केली जाते. त्यानंतर संवर्धन तलावामध्ये बीजाची साठवणूक केली जाते. कोळंबी योग्य आकाराची होईपर्यंत तिचे खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन असे दोन महत्त्वाचे घटक अतिशय कौशल्याने हाताळले जातात. बाजारात अनेक कंपन्यांचे विविध आकारांचे खाद्य उपलब्ध आहे.

कोळंबीच्या वाढीनुसार ते किती प्रमाणात व कोणत्या आकाराचे वापरायचे याचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. त्याचे प्रमाण छापील तक्त्याच्या स्वरूपात कोळंबी शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे. त्याचा वापर करून खाद्य व्यवस्थापन केले जाते.

आरोग्य व्यवस्थापन मत्स्य संवर्धनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. संवर्धित माशांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. त्याची अनेक कारणे असू शकतात. पशुधनांप्रमाणेच मत्स्य शेतीत जिवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य रोगांनी संवर्धित मासे ग्रस्त होऊ शकतात. अशा संक्रमणांवर उपचार करण्यासाठी आणि रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिजैविकांचा वापर होण्याची शक्यता असते.

प्रतिजैविक नैसर्गिक किंवा कृत्रिमरीत्या तयार केलेली औषधे आहेत. ज्यात जिवाणू आणि विषाणूजन्य सूक्ष्म जीवांना मारण्याची क्षमता असते. असे औषध सूक्ष्म जीवांची वाढ प्रतिबंधित करू शकते. प्रतिजैविके पुरेशी गैरविषारी असतात. मानव, प्राणी आणि वनस्पतीच्या संसर्गजन्य रोगांच्या उपचारांमध्ये बाधित प्राणी अथवा वनस्पतीसाठी प्रतिजैविकांचा वापर केमोथेरपीटिक एजंट म्हणून केला जातो.

मत्स्य संवर्धनातून उत्पादन घेत असताना प्रतिजैविक आणि औषधांचा वापर अतिशय क्लिष्ट आहे. कारण प्रतिजैविकांमधील संयुगे थेट पाण्यात मिसळली जातात. त्यानंतर त्यावर मानवी नियंत्रण नसते. अशा वेळी अनेक घटकांचा विचार करून प्रतिजैविकांचा वापर करणे सयुक्तिक ठरेल. जसे की माशांची सुरक्षा, पर्यावरणाची शुद्धता, संवर्धित प्राण्यांची सुरक्षा इत्यादी बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

मत्स्यपालनातील पारंपरिक रोग व्यवस्थापन अनेक दशकांपासून प्रतिजैविकांवर अवलंबून आहे. अलीकडच्या वर्षांत मत्स्य संवर्धक शेतकऱ्यांनी विविध प्रतिजैविके वापरणे कमी केले आहे. प्रतिजैविकांचा अतिवापर आणि गैरवापरामुळे प्रतिजैविक-प्रतिरोधक जीवाणूंचा विकास होऊ शकतो. त्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणास धोका निर्माण होतो. प्रतिजैविक आजूबाजूच्या पाणवठ्यांमध्ये प्रवेश करू शकतात.

जलीय परिसंस्थांवर परिणाम करू शकतात आणि लक्ष्य नसलेल्या प्रजातींना संभाव्य हानी पोहोचवू शकतात. माशांमधील प्रतिजैविकांचे अवशेष जास्त प्रमाणात सेवन केल्यास ग्राहकांना धोका निर्माण होऊ शकतो. अनेक देशांमध्ये अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्यासाठी मत्स्यपालनामध्ये प्रतिजैविकांचा वापर नियंत्रित करणारे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.

प्रतिजैविकांवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रोबायोटिक्स आणि जैवसुरक्षा उपायांसारख्या प्रतिजैविकांना पर्याय शोधण्यासाठी संशोधन चालू आहे. उत्तम शेती व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता आणि जैवसुरक्षेद्वारे रोगप्रतिबंधकतेवर लक्ष केंद्रित करून प्रतिजैविकांची गरज कमी करण्यात मदत होऊ शकते. शेतकऱ्यांना जबाबदारीने प्रतिजैविक वापर आणि वैकल्पिक रोग व्यवस्थापन धोरणांचे प्रशिक्षण देऊन शाश्वत मत्स्यपालन पद्धतींमध्ये अधिक योगदान देता येऊ शकते.

मत्स्यपालनाचे आरोग्य आणि उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी प्रतिजैविकांची भूमिका महत्त्वाची असली तरी त्यांचा अतिवापर आणि गैरवापर गंभीर परिणामांना कारणीभूत ठरू शकतो. मत्स्यपालन उद्योगासाठी जबाबदार प्रतिजैविक वापराच्या पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. मत्स्यपालनाची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी पर्यायी रोग व्यवस्थापन धोरण शोधणे महत्त्वाचे आहे.

जीवाणू रोगास प्रतिबंध अथवा उपचार म्हणून वापरण्यात येणारी प्रतिजैविक मासळीच्या ऊतींमध्ये साठवली जातात. जलचर प्राणी असे खाद्य खातात तेव्हा ऊतीमधील प्रतिजैविकांमुळे विविध विषारी परिणाम दिसून येतात. त्यात रोगप्रवण, रोग संवेदनशीलता, जठरातील सूक्ष्म जीवांच्या प्रमाणातील बदल, प्रतिजैविकांबाबतची प्रतिरोधकता इत्यादींचा समावेश आहे.

ऊतींमध्ये क्लोरोफेनोकोल औषधी रसायन साठल्यास आणि त्यांचा मनुष्याच्या खाद्यात समावेश झाल्यास रक्तदोष निर्माण होऊन हाडाच्या मेरूचा गंभीर दोष निर्माण होऊ शकतो. नायट्रोफुरोन प्रतिजैविकामुळे कर्करोग आणि इतर गंभीर आजार होऊ शकतात.

परिणामी, मत्स्य पदार्थ आयात करणाऱ्या देशांनी प्रतिजैविकांच्या वापरावर संपूर्ण बंदी आणली आहे. त्याप्रमाणे भारतातही काही विशिष्ट प्रतिजैविकांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मत्स्य शेतकऱ्यांनी केवळ बंदी नसलेली प्रतिजैविके मत्स्यशेती क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच वापरणे अपेक्षित आहे.

सुरक्षित मत्स्य उत्पादन

कोळंबी किंवा मासळीच्या ऊतींमध्ये प्रतिजैविके साठून राहिल्यास असे पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीकरिता धोकादायक आहेत. सर्व मत्स्य संवर्धक आणि कोळंबी-मत्स्य बीज उत्पादकांनी प्रतिजैविकांच्या वापरापासून लांबच राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. रोग होऊ नये, याकरिता मत्स्यशेतीमध्ये दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले; तर संवर्धित मासळी वा कोळंबीवर कोणताही ताण निर्माण होत नाही आणि त्यामुळे रोग येत नाहीत.

प्रतिजैविकांचा वापर टाळून मित्रजैविकांचा अर्थात प्रो-बायोटिक्सचा वापर आवश्यकतेप्रमाणे करावा, मत्स्यशेतीमध्ये संवर्धकांनी आणि बीज उत्पादकांनी बीजोत्पादन केंद्रात प्रतिजैविकांच्या वापराविषयी सर्व कायदे अन् मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कठोरपणे करावे, कोणतेही औषधी रसायन खरेदी करण्यापूर्वी त्यात प्रतिजैविके नसल्याची खात्री करावी.

फक्त परवानगी असलेले पदार्थ किंवा रसायने मत्स्यशेतीमध्ये वापण्यास शिफारस करण्याविषयी तांत्रिक सल्लागारास सांगावे, बीज आणि मत्स्यखाद्यामध्ये प्रतिजैविक नसल्याबद्दल खात्री करण्याकरिता शास्त्रीयरीत्या चाचण्या कराव्यात, अशा चाचणी केलेल्या मत्स्यखाद्यास शासनाने विक्रीस परवानगी द्यावी, संवर्धित प्राण्यात जसे कोळंबी वा माशांत अविशिष्ठ/शेष/साठलेली प्रतिजैविके आढळून आल्यास नजीकच्या मत्स्य व्यवसाय विभागास किंवा निर्यात विकास प्राधिकरणास सूचित करावे आणि असे प्राणी निर्यातीत होणार नाही, याची खात्री करावी. प्रतिजैविकांस पर्याय म्हणून इतर; परंतु तितकेच प्रभावी पदार्थ उपयोगात आणण्याकरिता तांत्रिक विकासाच्या माहितीविषयी जागरूक असावे, इत्यादी उपाय प्रामुख्याने अवलंबण्याची गरज आहे.

(लेखक रत्नागिरी येथील शिरगावमधील मत्स्य महाविद्यालयात कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com