

Dr. Alexander Gibson
esakal
काही काही माणसे ही नुसतेच ध्येय घेऊन जगत नसतात, तर ध्येयासाठी ते जीवाचे रान करतात. अशी माणसे केवळ भारतातच सापडत नाहीत किंवा जन्मत नाहीत, तर भारताबाहेर जन्म घेऊनसुद्धा या भूमीत ते अलौकिक कार्याने ओळखले जातात. असेच एक झपाटलेले व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यातलेच एक डॉ. अलेक्झांडर गिब्सन. जन्माने परदेशी; त्यांची कर्मभूमी मात्र महाराष्ट्रातील जुन्नरचा परिसर.
पुणे जिल्ह्यातील उत्तरेला असणाऱ्या जुन्नर तालुक्याच्या हिवरे गावात प्रवास करत आलो की स्थानिक लोकांना डॉ. अलेक्झांडर गिब्सन स्मारक किंवा गिब्सन उद्यान कोठे आहे, असे विचारले की हमखास वाट दाखवली जाते. येडगाव धरणाच्या कडेला अगदी निसर्गरम्य वातावरणात एका दगडी कंपाउंडने बंदिस्त असलेल्या जागेत आपला प्रवेश होतो. आतले छोटेखानी विश्व पाहून चकित व्हायला होते. तिथे आहे एक वनउद्यान. तिथल्या आखीव रेखीव दगडी वास्तूकडे आपले लक्ष जाते. ब्रिटिशकालीन असलेली ही वास्तू कौलांमुळे आणखीनच सुंदर दिसते. ही जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. इथेच काम करणारा एक कर्मचारी आपल्याला माहिती देतो की, ‘‘ही वास्तू म्हणजे गिब्सन यांचे राहते घर; पण आता तिथे एक छोटेखानी संग्रहालाय उभारले आहे.’’