बागलवाडीचा ‘बच्चन’

मी कधी सिंधुदुर्गात राणीच्या वेळावर वाळूत पाय पसरून, तटबंदीला टेकून निवांत बसलेला असतो; तर कधी हरेरगडावर स्कॉटिश कड्याच्या वरच्या अंगाला दगडांच्या खोबणीत पाय सोडून बसलेला असतो.
Baban Bhutal
Baban BhutalSakal
Summary

मी कधी सिंधुदुर्गात राणीच्या वेळावर वाळूत पाय पसरून, तटबंदीला टेकून निवांत बसलेला असतो; तर कधी हरेरगडावर स्कॉटिश कड्याच्या वरच्या अंगाला दगडांच्या खोबणीत पाय सोडून बसलेला असतो.

मी कधी सिंधुदुर्गात राणीच्या वेळावर वाळूत पाय पसरून, तटबंदीला टेकून निवांत बसलेला असतो; तर कधी हरेरगडावर स्कॉटिश कड्याच्या वरच्या अंगाला दगडांच्या खोबणीत पाय सोडून बसलेला असतो, कधी मुल्हेरच्या वरच्या अंगाला मोरागडाच्या पायऱ्यांवर अंगाचं मुटकुळं करून झोपलेला असतो, तर कधी चकदेवच्या प्रशस्त मंदिरात, पर्वतच्या एकाकी मंदिराच्या ओसरीत माझी स्लिपिंग बॅग पसरलेली असते; कधी उन्हाच्या असह्य तळकीत बहादूरगडाच्या लक्ष्मी-नारायण मंदिरातील दगडांवरचा गारपणा शोधत असतो, तर कधी भर उन्हात प्रचितगडाच्या पायथ्याचा उघडा चढ चढताना किल्ल्यावरचं जमिनीच्या पोटातलं पाण्याचं टाकं आठवून लाही लाही होणारं माझं शरीर कसं थंड होतं कुणास ठाऊक!

भरपावसात मैमतगड चढून गेल्यावर तिन्ही बाजूंच्या दरीतून येणाऱ्या धुक्‍याच्या लोटांबरोबर उडणारे तुषार तोंडा-ओठांवर आपटून जिभेवर स्थिरावले की वाटतं, आपण न पाहिलेल्या आणि न चाखलेल्या अमृताची चव अशीच असते का? मोरोशीच्या भैरवगडाच्या छोटेखानी माथ्यावर उभं राहून दोन हात आकाशाकडे उंचावले, की सगळ्या अंगाला भिडणारा वारा, तोल सांभाळू न देणारा वारा जणू सारं आयुष्य हलकं करून टाकतोय असं वाटतं... रायरेश्‍वराच्या नाखिंद्याच्या खड्या उतारावरून काली अस्वल खिंडीत शिरताना पृथ्वीच्या गर्भात सुरक्षित असल्याची अनुभूती येते. साल्हेरवरून सालोटा पाहताना... आणि मग सालोट्यावरून साल्हेरचं परशुराम टोक पाहताना आपल्या आयुष्याच्या खुज्या उंचीचा अहंकार.... हो अहंकारच, गळून पडतो.

कधी कांचनबारीतून धोडप किल्ल्याकडे जाताना हंड्या शिखराखालीच हाळ मातीच्या पठारावर मुक्काम केला. मग रात्री कोमट असणारी माती पहाटे हुडहुडी भरवते हे अनुभवल्यावर भूगोलातली अनेक कोडी सुटली. या साऱ्या निसर्ग- भूगोल आणि इतिहासाच्या पायपिटीत असंख्य माणसं भेटली. काही अजून बरोबर आहेत, काही परत कधीच भेटली नाहीत... पण आमचं एक विशाल कुटुंब बनलं... नातं काय, तर डोंगर-दऱ्या-शिखरं आणि या साऱ्यांतले किल्ले...!!!

आजही अशी अनेक माणसं डोंगर-दऱ्यांच्या कुशीत फिरताना भेटतात. पण जग त्यांना ओळखत नाही आणि ते जगाला ओळखत नाहीत... डोंगर-दऱ्या हेच त्यांचं विश्‍व. डोंगर-दऱ्या आणि या माणसांत तब्बल चार दशकांहूनही अधिक काळ मी रमलो... आणि हेच माझं विश्‍व बनून गेलं. काही माणसं चटका लावून गेली, काहींच्यामुळे ऊर अभिमानाने भरून आला, काहींची हुरहूर मनात अजून तशीच आहे...

या माणसांविषयी कधी लिहीन किंवा कधी लिहावं लागेल असं वाटलं नव्हतं; परंतु त्यांच्याविषयी लिहिताना मुद्दाम लिहावं लागत नाही, आठवावंही लागत नाही; पण त्यांच्या उंचीपर्यंत माझे शब्द पोहोचू शकत नाहीत, हे सातत्याने जाणवत राहतं....

...बबन कृष्णा भूतल मु. बागलवाडी, पो. आडोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर. हे लांबलचक नाव कुण्या अशा असामीचं नाही की, जो जगाला माहिती असावा, किंवा ज्याला जग माहिती असावं. हे नाव... घनदाट अरण्याच्या गर्भात आणि हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत जन्मून, आपली वाडी-वस्ती सोडून केवळ जगण्यासाठी शहरी माणसांच्या गर्दीत बिनचेहऱ्याने धडपडणाऱ्या माझ्या एका जंगलमित्राचं आहे. शहरात राबराबून चार दाणे मिळाले की घरट्याकडे धाव घेणारा आणि दाणे संपले की पुन्हा दाणे शोधायला माणसांच्या गर्दीत मुकाट्याने शिरणारा. त्याचं हे असलं जगणं मी गेली कित्येक वर्षं जवळून पाहतोय.

कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी तालुका अतिशय निसर्गसंपन्न, घनदाट अरण्याचं आणि पाणीदार जलाशयाचं वरदान लाभलेला दूधगंगा नदीवरचा काळम्मावाडी जलप्रकल्प सर्वदूर परिचित. ही वरदायिनी दूधगंगा अरण्यप्रदेशी उगम पावते, त्या जंगल परिसरातच याची वाडी. दूधगंगा राधानगरीच्या पश्‍चिम बाजूच्या अरण्यप्रदेशातले खरंतर दोन प्रवाह एकत्र येऊन उगम पावते. एक म्हणजे जलाशयाच्या वरच्या अंगाला पाट पन्हाळा, इदरगंजच्या वरच्या अंगाला भांडण्याच्या डोंगर परिसरात हुड्याच्या कुशीतला प्रवाह; तर दुसरा बागलवाडीच्या जवळ मूळ काळम्मेच्या परिसरातून सुरू होणारा. पहिला प्रवाह आता थेट जलाशयाच्या पोटात शिरतो, तर दुसरा वाकीघोलाच्या वाकोबाला वळसा घालून जलाशयाच्या पोटातच पहिल्या प्रवाहाकडे ओढ घेतो. या दोन्ही प्रवाहांतूनच दूधगंगा जन्माला येते. ही काळम्मा आणि हा वाकोबा या परिसराच्या अधिष्ठात्री देवता. तशी काळम्मा पन्हाळा तालुक्‍यात म्हासुर्लीच्या परिसरात आणि शाहूवाडी तालुक्‍यात पावडाई देवीच्या अलीकडेही आहे; पण बागलवाडीजवळच्या मूळ काळम्मेचीच ही श्रद्धारूपं.

अरण्य संस्कृतीच्या अस्सल वारशातला आमचा हा बच्चन. खरंतर बबन हे त्याचं नाव; पण आम्ही प्रेमाने त्याला ‘बच्चन’ या टोपणनावानेच बोलावतो. त्याची उंची, केसांची ठेवण या सुप्रसिद्ध अभिनेत्याशी काही फार मिळतीजुळती नसली, तरी आम्हाला कधीकाळी ती तशी वाटली. मग आम्ही त्याला बच्चन म्हणू लागलो. मग सारेच त्याला त्या नावाने ओळखू लागले. मग ‘बागलवाडीचा बच्चन’ हेच त्याचं नाव सर्वत्र रूढ झालं. याची वाडी जरी राधानगरी तालुक्‍यात असली, तरी गारगोटीकडूनच जाणं सोपं आहे आणि हल्ली वाडीपर्यंत हा रस्ता चांगलाही झाला आहे. राधानगरीकडून जलाशयासमोरून येणारा कच्चा रस्ता बारमाही सोयीचा तर नाहीच आणि येतोही घनदाट जंगलातून. आमचा अरण्यमित्र आपल्या वाडीतून सग्या-सोयऱ्यांना सोडून पोटासाठी बाहेर पडला त्यालाही आता तीन दशकं झाली. सगळ्या कुटुंबाची मिळून दीड-पावणेदोन एकर जमीन. त्याकाळी भात हेच मुख्य पीक. त्यात जंगली श्‍वापदांचा उपद्रव. कसंबसं पोटापुरतं भातपीक प्रत्येकाच्या पदरात पडायचं. मग इतर गरजांचं काय? त्यासाठीच हा वाडीतून बाहेर पडला. शहरात पडेल ती कामं करू लागला. पडेल ती म्हणजे, अक्षरशः पडेल ती! पण शहरात रुजला मात्र नाही. वाडीची नाळ तुटली नाही. आई-वडील आणि आता बायको-पोरंही गावीच! म्हणूनच जरा सांधा मिळाला की गावी धावतो.

त्याचं वाडीतलं घर म्हणजे, लहानपणी आपण शाळेत असताना चित्रकलेच्या तासाला डोंगर, झाडी, नदी आणि लहानसं कौलारू घर काढायचो, अगदी तसंच आहे. कितीतरी वेळेला त्याच्या वाडीत गेलो, जेवलो, त्याला आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात मनमुराद भटकलो, अगदी खाली कोकणातही उतरलो. अनेक विस्मृतीत गेलेल्या घाटवाटा पुन्हा नव्याने फिरलो. एकदा भेर्दे घाटाच्या बाजूने कोकण कड्याच्या दिशेने घनदाट जंगलातून जाताना झाडांच्या शेंड्यावरच्या राक्षसी खारी (Giant Squrrel) अचानक दंगा करू लागल्या. झाडाझाडांवरचा चिकचिकाट टिपेला पोचला. त्यांचं या झाडावरून त्या झाडावर अस्वस्थ झेपावणं थोडं वेगळं वाटू लागलं. पाऊलवाटेवर अस्वलांचे उलटसुलट ठसे होते, त्यांची चकाकणारी विष्ठाही जागोजाग दिसत होती; पण जंगल भटकताना हे आम्हाला नित्याचंच होतं. मधमाश्याही घोंघावत होत्या; पण त्यांचा लयबद्ध काफिलाही पुतळ्यासारखं स्थिरावून आम्ही अनेक वेळेला अनुभवला होता. खारींची ही वर्तणूक आणि काही पावलं पुढं गेल्यानंतर मधमाश्यांचा उलटसुलट दिशेने घोंगावणारा आक्रमक थवा पाहून आम्हाला धोक्‍याची जाणीव झाली आणि तेवढीच कातर उत्सुकताही मनात उसळी घेऊ लागली.

जंगलात फिरताना अशा अनेक अरण्यनाट्यांना मी सामोरं गेलो आहे. अर्थात, त्यातला धोका कमी करण्याचा मार्ग एकच असतो, त्या नाट्याचाच एक भाग बनणं; त्यातलंच एक निःशब्द, अचेतन, हालचालविहीन पात्र बनणं. मग त्या अरण्यनाट्यात देह आणि अस्तित्व विसरून निःशब्द आणि निःस्तब्धपणे आम्ही सामील झालो. आमच्यापासून काही अंतरावरच्या एका झाडाच्या बळकट आडव्या फांदीवर हे जंगलातलं अस्सल नाट्य सुरू होतं. दोन आडव्या फांद्यांच्या आधाराने लगडलेल्या मधाच्या पोळ्यावर फांदीवर आडवं झोपून, बळकट बाहू आणि ताकदवान पंजाच्या आधाराने पोळं, त्यातला मध आणि मधमाश्यांवर यथेच्छ ताव मारणं सुरू होतं. घायाळ जखमी उडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मधमाश्या अगदी आमच्या पायापर्यंत विखुरल्या होत्या. पोळ्याचे तुकडे वाळलेल्या पाचोळ्यावर विखुरले होते.

मधमाश्यांच्या दंशाची भीती मनात होतीच; पण पुतळ्यासारखं निश्‍चल राहण्याशिवाय आम्ही करू तरी काय शकत होतो? अस्वलाची अशी नैसर्गिक वर्तणूक अनुभवण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं, असं मला नक्कीच वाटतं! आणि अक्षरशः अनेक दशकांची आमची तपश्‍चर्या अशी जंगलात कुठं न कुठं तरी फळाला येत होती, हेदेखील मला अनेक वेळेला अनुभवायला मिळालंय. आम्ही कितीही स्थिर असलो तरी आमचा देहगंध अस्वलापर्यंत पोचलाच! अस्वस्थ, रागीट, आमचं अस्तित्व न आवडलेली आक्रमक प्रतिक्रिया आम्ही अनुभवली, आमचा थरकाप उडाला. पुढं का आणि काय घडलं हे आम्हाला आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. काही वेळाने ते अस्वल पलीकडच्या झाडावरून उतरून खोल झाडीत दिसेनासं झालं, तरीही स्तब्धतेतून बाहेर पडायचं आमचं धाडस होईना!

असे अनेक आरपारचे अरण्यप्रसंग बच्चनसारख्या भूमिपुत्रांकडूनच आम्हाला पाहायला, अनुभवायला मिळाले. परंतु, त्यांना आपण अरण्यातच सोडून येतो आणि त्यांच्यापासून शिकलेलं अरण्य, डोंगर-दऱ्या, गडकोट लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करतो, याची मला विलक्षण खंत वाटायची. अरण्य, डोंगर-दऱ्या, गडकोट, गिरिशिखरं या साऱ्यांबरोबरच ही माणसंही साऱ्यांपर्यंत पोचली पाहिजेत.

कारण निसर्ग आणि आपल्यातला हा एक अस्सल दुवा आहे.

जंगल ऐकून समजत नाही, साधन-सुविधांनी युक्त अफाट चलत्‌चित्र पाहूनही समजत नाही, जंगल सफारी करूनही समजत नाही... जंगल पोशाख करून, गळ्यात भले महागडे कॅमेरे लटकावून, वाहनातून फेरफटका मारूनही समजत नाही. त्यासाठी अरण्याचाच एक भाग बनून मैलोगणती भटकावं लागतं. रात्रीचं जंगल वेगळं, पहाटेचं वेगळं, भरदुपारचं वेगळं आणि संध्याकाळचंही वेगळंच... प्रत्येक ऋतूतलंही आणखी वेगळं. झाडा-प्राण्यांचा हा संसार त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनून, त्यात बेमालूम मिसळून अनुभवावा लागतो. संध्याकाळी डोक्‍यावर वाळलेल्या लाकडांची मोळी घेऊन, हातातल्या काठीचा जमिनीवर लयबद्ध आवाज करत लगबगीने जाणाऱ्या वाडीवरच्या माणसाला जंगल, त्याचा गंध आणि अरण्यसंसार खरा कळतो. अशी अनेक माणसं माझ्या जीवनात आली, हे मी माझं भाग्य समजतो. आमच्या बच्चनच्या वाडीत हत्तीही आता पाहुणा म्हणून येतो, चांगला मुक्काम ठोकतो. हत्तीला जरा आमची माणसं नवखीच; सुरुवातीला आला तेव्हा ही माणसं गोंधळली. आता थोडी सरावलीत; पण या पाहुण्याशी अजून त्यांचं फारसं पटत नाही आणि पाहुणाही कधी कधी नीट वागत नाही, भरपिकात दंगा घालतो. मग हा पाहुणा नकोच, अशी त्यांची मानसिकता झालीय. मग कधी कधी संघर्ष होतो, या संघर्षात दोघंही भान विसरतात.

वाडीतला तुकाराम हा बच्चनच्या मावशीचा नवरा, त्याचा मुलगा सुनील असाच हत्तीच्या तावडीत सापडला. रानाकडून येताना खालच्या बाजूने धाड धाड करत हत्तीचं धूड त्याच्या अंगावर आलं. अचानक आलेल्या या जिवावरच्या प्रसंगाने तो गांगरून गेला. पळून पळून पळणार तरी किती? नशीब म्हणून वाचला. रानातून येताना त्याला कल्पनाच नव्हती की हत्ती पिकात शिरलाय. पिकांचं नुकसान होऊ नये म्हणून वाडीतली माणसं समजेल त्या मार्गांनी हत्तीला हुसकत होती. नेमका बिथरलेल्या हत्तीच्या आडवा हा आला, मग हत्तीने सगळा राग याच्यावरच काढला. अशा जीवन-मृत्यूच्या सीमेवरही माणसं जगत असतात. परवा त्याच्या बापाबरोबरच म्हणजे तुकारामबरोबर भरजंगलात कोकणाच्या तोंडावर भेर्दे घाटवाटेने जाऊन आलो. अशा मनस्वी माणसांत माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ गेला. त्यांच्यात रमलो.

आज दुपारीच बच्चन भेटला. खरंतर हे दिवाळीचे दिवस; सारी माणसं आपापल्या गावी पोराबाळांसह, सग्यासोयऱ्यांसह धाव घेत असतात.

नवे कपडे, झगमगाटी वस्तू, दागदागिने यांनी बाजारपेठा सजलेल्या असतात. आकाश आणि भूमी दिव्यांनी उजळलेली असते.

मी बच्चनला विचारलं, ‘तू कोल्हापुरात? गावी कधी जाणार?’ गप्प... त्याने नुसतं माझ्याकडे पाहिलं. तो व्यक्तही झाला नाही आणि भावनिकही झाला नाही. पण सहज उद्‌गारला, ‘जायाचं, दोन-तीन दिवसांत पाऊस उघडलाय, भात कापणीला आल्यात.’

त्याच्या या उत्तरात मला काय समजायचं ते समजलं. मी म्हटलं, ‘बच्चन, मी येऊ का रविवारी वाडीत?’

तो म्हणाला, ‘‘या, खळ्यात रात्री फर्मास जेवण करू या.’

अशी ही माणसं, त्यांची रानं, त्यांच्या रात्री, त्यांचं जंगल मला मनापासून बोलावतं...

आणि मग मी धावत त्यांच्याकडे जातो.

(सदराचे लेखक दुर्ग आणि गडांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com