भीमाशंकर पायथ्याचा हरिभाऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

haribhau vide

भीमाशंकरच्या पश्‍चिम बाजूच्या डोंगर चढाईने नागवळणी सुळक्‍याच्या बेचक्‍यातून भीमाशंकरच्या माथ्यावर येणं ही एक अनोखी डोंगरयात्रा आहे.

भीमाशंकर पायथ्याचा हरिभाऊ

भीमाशंकरच्या पश्‍चिम बाजूच्या डोंगर चढाईने नागवळणी सुळक्‍याच्या बेचक्‍यातून भीमाशंकरच्या माथ्यावर येणं ही एक अनोखी डोंगरयात्रा आहे. ही आव्हानात्मक डोंगरयात्रा डोंगराच्या खालील कोकणातल्या ‘खांडस’ गावापासून सुरू होते. खांडसपासून गणेश घाट, शिडीचा घाट, बैल घाट, वाजंत्री घाट अशा अनेक घाटवाटांनी भीमाशंकरपर्यंत पोचता येतं. आडवाटेवरच्या या आव्हानात्मक घाटवाटांनी मी अनेक वेळेला आणि अनेकांच्या सोबत भीमाशंकर चढलोय. प्रत्येक वेळेचा आनंद वेगळाच होता. स्थानिक अनेक माणसांच्या बरोबर या घाटवाटांसह पदरगडापासून ते साखरमाचीपर्यंत अनेक कडे-कपाऱ्या अक्षरशः पिंजून काढल्या; पण या साऱ्यात मनात घर करून बसला तो खांडसचा हरिभाऊ विदे.

हे सारं आता आठवायचं कारण म्हणजे... या हरिभाऊचे दिवसा, रात्री-अपरात्री सातत्याने येणारे फोन आणि त्यातून जाणवणारी त्याची किमान जगण्याची धडपड... परवा रात्री त्याचा असाच उशिरा फोन आला... ‘‘साहेब काहीतरी बघा...’’ एवढंच तो फोनवर बोलला. मग फोनही बंद झाला नाही... आणि पलीकडून त्याचं बोलणंही सुरू झालं नाही... असाच काही वेळ गेला आणि फोन बंद झाला. मी काय समजायचं ते समजलो... या राना-डोंगरांतल्या माणसांचे नेमके काय संबंध आहेत, माझं त्यांच्याशी काय नातं आहे, हे आजपर्यंत मला उमगलेलं नाही... त्या उर्वरित रात्री झोप मात्र लागली नाही...

काही वर्षांपूर्वीच खांडस गाव, ते पूर्ण संपल्यानंतर हरी विदेचं घर. त्या वेळी हे गावाच्या, भीमाशंकरच्या दिशेचं शेवटचं घर... इथून पुढे काही अंतर गेल्यावर ओढ्यावरचा छोटा पूल लागायचा. पुलाच्या उजवीकडून ‘गणेश घाटाची’ वाट, तर डावीकडून गेल्यास थेट कड्याला बिलगणारी ‘शिडीच्या घाटाची’ वाट सुरू होते. आता हरिभाऊ थकलाय. घरात फक्त तो आणि त्याची म्हातारी बायको... एक मुलगा होता; पण तो २००७ मध्ये अचानक गेला. त्या वेळी पडत्या पावसात जुलै महिन्यात हरिभाऊला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो, तेव्हा त्याने मारलेली घट्ट मिठी आजही गुदमरून टाकते. परवाच्या हरिमामाच्या फोनने हे सारं उफाळून आलं आणि त्याच्याबरोबरच्या एकेक मोहिमा डोळ्यांपुढून सरकू लागल्या...

बरेच दिवस कर्जत ते भीमाशंकर मोहीम खुणावत होती; पण बेत काही जुळून येत नव्हता. कित्येक वेळा या मोहिमेची तयारी केली आणि दुसऱ्याच मोहिमा करून आलो; पण ही मोहीम तशीच राहून गेली. पावसाळ्यात एकदा मनाने उचल खाल्ली, पण बेत पुढे ढकलावा लागला. कारण शिडीच्या घाटवाटेनेच वर चढायचं हा निर्णय पक्का होता. ऐन पावसाळ्यातला धोधो पाऊस, शेवाळलेले दगड आणि शिड्यांची अवस्था म्हणून पावसाळा जाऊ द्यावा आणि सारं काही वाळलं की मगच शिडीच्या वाटेने चढाई करायची असा बेत आखला. कड्याच्या पश्‍चिमेकडच्या अंगाने वर चढताना जरी शिड्यांचा आधार असला, तरी दोन शिड्यांच्या मधल्या भागातला कातळ कडा चढणं हे पावसाळ्यात फारच धोक्‍याचं.

कारण दगड शेवाळलेले आणि पश्‍चिमेकडे तुटलेले सरळसोट कडे... त्यातही दुसऱ्या शिडीकडून तिसऱ्या शिडीकडे जाताना कड्याला वळसा घालूनच शिडीच्या पायथ्याच्या बेचक्‍यात जावं लागते आणि या दोन्हीही शिड्यांच्या पोटातून पाणी खळाळत, खाली कोसळत असतं. या साऱ्या आव्हानांचा विचार करता निसर्गाला, त्या सह्याद्रीच्या रौद्रतेला सलाम करून, सह्याद्रीच्या कड्यांनी सौम्य होऊन आवताण धाडलं की जायचं असं ठरलं. पाऊस संपून आसमंत सुकायची वाट पाहता पाहता नोव्हेंबर महिना निम्मा सरला आणि अखेर भीमाशंकर आणि सह्याद्रीने निरोप पाठवला, ‘आता या गड्यांनो...’

मोहिमेची जुळवाजुळव सुरू झाली. तारखा नक्की झाल्या. माणसं निवडली. मोहिमेची आखणी झाली. हरिभाऊ वाटाड्याला निरोप गेला. पूर्वतयारीच्या बैठका झाल्या आणि शनिवारच्या भल्या पहाटे आम्ही सारे सवंगडी निघालो कर्जत आणि पुढे खांडसच्या दिशेने.

‘खांडस’ म्हणजे भीमाशंकरचा पश्‍चिम पायथा. सह्याद्रीच्या प्रचंड कड्याच्या पायाशी वसलेलं चिमुकलं गाव. इथूनच भीमाशंकरच्या बेलाग पहाडाचं छाती दडपून टाकणारं आव्हानात्मक दर्शन होतं. इथं आहे आमचा एक वाटाड्या, हरिश्‍चंद्र त्याचं नाव. आपलेपणाने आम्ही ‘हरिभाऊ’ असं त्याला म्हणतो. हा नुसता वाटाड्या नाही, तो आमचा जंगलमित्र आहे, सोबती आहे, किंबहुना कुटुंबातलाच एक आहे. पहिला विसावा त्याच्या घरी. हातपाय धुऊन, त्याच्या घरचा चहा पिऊन आम्ही ताजेतवाने झालो.

आता मोहिमेला सुरुवात. पाणी, जेवण, आवश्‍यक साहित्य पिशवीत घालून पिशवी पाठीवर लावली. सह्याद्रीच्या त्या उत्तुंग कड्याला मनोमन नमस्कार केला आणि भीमाशंकरच्या दिशेने चालू लागलो. खरंतर हरिभाऊंचं घर म्हणजे खांडसचं भीमाशंकरकडचं शेवटचंच घर. इथे गाव संपतंच... गाव ओलांडल्यावर मोठा ओढा लागला. त्यावरच्या पुलावरून पलीकडे गेलं की, डाव्या आणि उजव्या बाजूला अशा दोन वाटा फुटतात. उजवीकडची वाट म्हणजे गणेश घाटाची वाट. तुलनात्मकदृष्ट्या सोपी, राबता असलेली. डावीकडची वाट म्हणजे थेट कड्याला भिडणारी, जंगलातली, उभ्या चढावाची... अवघड अशी शिडीची वाट. या शिडीच्या वाटेने जायचं हा निश्‍चय, म्हणूनच पावसाळा जाऊ दिला होता. कारण शिडीच्या वाटेने तीन ठिकाणी उभा कडा शिडीच्या आधारानेच चढावा लागतो. दोन शिड्यांमधील उभा कातळ चढावा लागतो. त्यातही दुसऱ्या आणि तिसऱ्या शिडीमधला कातळ अंगावर येणारा, डावीकडे वळसा घेऊन वर चढावा लागणारा. पावसाळ्यात कातळ शेवाळतात, निसरडे होतात, वरून जलप्रपात कोसळत असतात, तेव्हा शिडीच्या वाटेने चढाई जिकिरीची असते. म्हणून पावसाळा जाऊ दिला. आता आसमंत वाळला होता, शेवाळ सुकलं होतं, कातळ पायाला थारा देत होते. म्हणून शिडीच्या वाटेनेच जायचं ठरलं...

ओढा ओलांडून डावीकडे वळलो. शिडीच्या वाटेकडे रुळलेला रस्ता संपला, उजवीकडे भातखाचरांत शिरलो. कापणी झालेली भातखाचरं घट्ट झाली होती. हळूहळू कड्याकडे सरकू लागलो. गाव मागे पडलं. भातखाचरं संपली. जंगल सुरू झालं. गर्द झाडांच्या सावलीतून जंगलामधली चढावाची पायवाट सुरू झाली. नागमोडी वळणं घेत ही वाट चढतचढत कड्याच्या दिशेने जाऊ लागलो. फुफ्फुसांचे भाते फुलू लागले. घाम निथळू लागला. दमछाक करणारा चढ शिडीकडे घेऊन जाऊ लागला. सहकारी मागेपुढे होऊ लागले. तसे थंडीचे दिवस, गर्द झाडी; पण कोकणातला उष्मा, खडी चढाई, नाकी दम येऊ लागला. थांबू नका, बसू नका असे हाकारे देत, उत्साह टिकवून ठेवत टप्प्या-टप्प्याने वर चढू लागलो आणि अखेरीस कड्याला बिलगलेल्या पहिल्या शिडीचं दर्शन झालं. आत्ता तर पहिला टप्पा पार केला.

आता या तीन शिड्या चढून, त्यांच्या मधल्या कातळांवरून कसोशीने वर चढून, कड्याच्या खांद्यावरच्या जंगलात शिरायचं. शिड्या कमकुवत. वरच्या दोन शिड्यांना कसलाच आधार नाही. उजव्या हाताला प्रचंड कातळ भिंत आणि डाव्या हाताला खोल दरी. उभी चढाई. सावकाश, आस्तेकदम प्रयत्नपूर्वक सारे वर चढलो. खाली दरीकडे पाहिलं, कुठून कसे चढत आलो ते.

समोर मावळतीकडे ‘पदरगड’ किल्ला उभा होता. खरंतर खांडसपासूनच महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या या पदरगडाचं विहंगम दर्शन होतं. गड तसा दुर्गम. पहिले दोन टप्पे कष्टपूर्वक चढता येतात; पण तिसरा अतिअवघड. ‘पदरगड’ चढाई ही एक स्वतंत्र मोहीमच होऊ शकते; परंतु आज त्याचं प्रयोजन नव्हतं. म्हणून नुसत्या दर्शनावरच समाधान मानलं. खांडसहून पदरगड आकाशात उंच घुसलेला दिसत होता. हळूहळू त्याच्या उंचीशी स्पर्धा करणारा कडा चढू लागलो, तसातसा तो नजरेत मावू लागला. आता तर जवळ-जवळ त्याच्या उंचीएवढ्या उंचीवर पोहोचलो. सातत्याने होणारं त्याचं दर्शन फारच विलोभनीय होतं.

थोडं पाणी, अल्पस्वल्प विसावा घेऊन, शिडीच्या वरच्या अंगाच्या जंगलात शिरलो; परंतु जंगल येण्यापूर्वी कड्याच्या कडेकडेने जाणारी वाट तापणाऱ्या उन्हातूनच जाणारी होती. भर उन्हातला तो चढ संपवून एकदाचं कड्याच्या खांद्यावरच्या जंगलात शिरलो. गर्द झाडीतल्या चढावाच्या नागमोडी वाटेने चालत चालत जंगलातल्याच एक झोपड्यापाशी थांबलो. पदरवाडीचा एक गडी इथं ताक विकण्यासाठी घेऊन आला होता. दमलेल्या पर्वतारोहीला ते ताक म्हणजे जणू अमृतच. त्या ताकाची चव वर्णन करणं शक्‍य नाही. याच्या किंचित पुढे गणे घाटाकडून येणारी वाट आणि शिडीची वाट एकत्र येतात. इथून पुढचा बहुतेक मार्ग जंगलातून, टप्प्या-टप्प्याने; पण तीव्र चढाचा, काहीसा रुंद असा, चढतचढत भीमाशंकराच्या माथ्याकडे घेऊन जातो. हा मोहिमेतला तिसरा टप्पा. दमलेले सहकारी पुन्हा नव्या जोमाने चढाईला सिद्ध झाले. जंगल मागे मागे सरकू लागलं. आता झाडीतून मधूनच उजव्या हाताला भीमाशंकरचा नागफणी सुळका, डाव्या हाताला पूर्वेकडचा लांबच लांब कडा, मधली दरी दिसू लागली आणि दूरवरच्या भीमाशंकराच्या घंटेचा घनगंभीर आवाजही येऊ लागला. आपसूकच पावलांची गती वाढली. जंगलाची सावली विरळ झाली. कारवीच्या गच्च रानातून पाऊलवाटेला लागलो.

(क्रमशः) पूर्वांध

(सदराचे लेखक दुर्ग आणि गडांचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Dr Amar Adake Writes Bhimashankar Haribhau Vide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :bhimashankarsaptarang