‘प्रकाश’ किल्ले हडसर पायथ्याचा !

काही किल्ल्यांच्या माथ्यावर विस्तीर्ण - उजाड पठारं, काही किल्ल्यांच्या उतारावर गच्च झाडी, तर काही किल्ले चहूबाजूंनी उघडेबोडके. पावसाळ्यात मात्र त्यांच्यावर हिरवाईचा देखणा साज चढतो.
Hadsar Fort
Hadsar FortSakal
Summary

काही किल्ल्यांच्या माथ्यावर विस्तीर्ण - उजाड पठारं, काही किल्ल्यांच्या उतारावर गच्च झाडी, तर काही किल्ले चहूबाजूंनी उघडेबोडके. पावसाळ्यात मात्र त्यांच्यावर हिरवाईचा देखणा साज चढतो.

महाराष्ट्रातला सह्याद्री जसा घनदाट अरण्यांचा, खोल दऱ्यांचा, कोसळणाऱ्या जलप्रपातांचा आहे, तसाच तो अजस्र उघड्या डोंगरांचा, गवताचं पातंही न उगवणाऱ्या सरळसोट कातळकड्यांचा, मैलोगणती वैराण दऱ्यांचा, प्रचंड उघड्याबोडक्‍या पठारांचाही आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीला अनेक पूर्व-पश्‍चिम डोंगररांगांचे फाटे आहेत. उत्तरेकडे या डोंगररांगांची उंची जास्त, दक्षिणेकडे त्यामानानं कमी. उत्तर सह्याद्रीत या डोंगररांगांची पूर्वेकडील टोकं काही ठिकाणी उंच, अजस्र आणि उघडीबोडकी आहेत. या पश्‍चिम-पूर्व डोंगररांगांवर अनेक उत्तुंग किल्लेही वसले आहेत.

काही किल्ल्यांच्या माथ्यावर विस्तीर्ण - उजाड पठारं, काही किल्ल्यांच्या उतारावर गच्च झाडी, तर काही किल्ले चहूबाजूंनी उघडेबोडके. पावसाळ्यात मात्र त्यांच्यावर हिरवाईचा देखणा साज चढतो. साल्हेर, मुल्हेर, घोडप, हडसर, चावंड, जीवधन, दातेगड, गुणवंतगड, कमळगड, केंजळगड, वर्धनगड, महिमानगड हे त्यांपैकीच काही किल्ले. अजस्र पायतळी आणि माथ्यावर विस्तीर्ण पठारं.

प्राचीन नाणेघाट त्याच्या मुखाशी उभा असणारा किल्ले जीवधन याच्यासह हडसर, चावंड आणि शिवनेरी हे नाणेघाटाचे संरक्षक दुर्ग म्हणजे सह्याद्रीतील अजोड शिल्पं आहेत. प्रचंड कातळ, कातळातच कोरलेले किल्ल्यावर जायचे मार्ग, कातळातीलच महाद्वारं आणि कोरून काढलेल्या अनेक वास्तू. ही या किल्ल्यांची स्थापत्य वैशिष्ट्यं. शिवनेरी वगळता या किल्ल्यांवर चढायचे मार्गही अवघड. कातळात फोडून काढलेले हे मार्ग काही ठिकाणी तर खाली आणि वर सरळ उभ्या कड्यांमधूनच जातात. कठीण खडकातले हे बलदंड प्राचीन किल्ले इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत.

या आडवाटांवरच्या दुर्गम किल्ल्यांवर राबताही तसा फारसा नसतो, त्यामुळे ते गूढही वाटतात. अशा आडवळणाच्या किल्ल्यांवर जाताना पायथ्याचं छोटंसं गाव हाच आधार असतो. अशा अनेक किल्ल्यांचे आमचे वाटाडे म्हणजे या गावांतली लहान पोरं. ती उत्साहाने येतात, आपलेपणानं सगळं दाखवतात. तुम्ही दमलात, तुम्हाला कंटाळा आला तरी, अजून इकडं जाऊ या, तिकडं जाऊ या असं म्हणतात. कधी डोक्‍याला टोपी, पायात बूट असतात-नसतात; कधी पायात स्लीपर, तर कधी अनवाणी; पण निम्मा महाराष्ट्र मला याच गडपायथ्याच्या मुलांनी दाखविला. ऊन-पाऊस झेलून, वारा पिऊन ही मुलं इतकी टवटवीत असतात, की उभाच्या उभा कडा टणाटणा चढून जातात. नेहमी माझं लक्ष त्यांच्या पावलांकडे असतं. रुंद चवडे, भक्कम टाचा, जमिनीवर, दगडावर रुतणारी मजबूत पावलं आणि बेदरकार मन हे यांचं भांडवल. रानावनांतली अशी अनेक पावलं आजवर मी कौतुकानं पाहिली आहेत.

आमच्या भटकणाऱ्या टोळीचा हडसर - चावंड- कुकडेश्‍वर- जीवधन असा बेत ठरला. नाणेघाटातून वैशाखरे या घाटाखालच्या कोकणातल्या वाडीपर्यंत, तर कधी माळशेज घाटातून नाणेघाट, जीवधन, कुकडेश्‍वर, दऱ्याचा घाट, चावंड असं वेळोवेळी झालं होतं; पण हडसरने मात्र अनेक वेळेला हुलकावणी दिली होती. म्हणून या वेळेला हडसरपासूनच सुरुवात करायची असं ठरलं.

सगळी जमवाजमव करून कोल्हापुरातून निघायला नेहमीप्रमाणे तसा उशीरच झाला. जुन्नरला पोचेपर्यंत जवळजवळ बारा वाजले. हातात फक्त शनिवार-रविवार दोनच दिवस, त्यामुळे वेळ वाया घालवणं परवडणारं नव्हतं. ऊन झेलावंच लागणार होतं. हडसर आणि चावंड करून मुक्काम कुकडेश्‍वराच्या मंदिरात करायचा असं ठरलं. खरंतर हडसर आणि चावंड दोन विरुद्ध दिशांना, मधला रस्ताही खराब; पण निर्णय घेतला.

महिना एप्रिलचा, कळाकळा तापणारं ऊन, साऱ्या दिशा वाळलेल्या. जुन्नरहून नाणेघाटाच्या दिशेनं निघालो की पहिल्यांदा लागतो हडसर. गडपायथ्याचं गावही ‘हडसर’च. पायथ्याशी पोचलो, समोर चोहोबाजूंनी तापणारा हडसर. माथ्याकडे पाहतानाच डोळे दिपायला लागले. आता भर उन्हात गड चढायचा ! किल्ल्यावर जायचे रस्ते दोन. एक जवळचा, पण अवघड; उभ्या कातळात मारलेल्या पहारीसारख्या मोठ्या लोखंडी कांबींच्या आधारानं उभा कडा चढून किल्ल्यावर प्रवेशणं आणि दुसरा मार्ग म्हणजे पायऱ्यांची वाट किंवा राजमार्ग. कातळकड्यावरून चढायचं आणि पायऱ्यांवरून उतरायचं असं ठरलं.

भरदुपारी, तापत्या उन्हात, काळ्याकभिन्न तप्त किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही उभे. कुणीतरी वाटाड्या बरोबर हवा. एवढ्या भरदुपारी कोण येणार? सारं गाव शांत. एका उंचवट्यावर एका घराचं रंगकाम सुरू होतं. बाप्ये रंगवत होते, पोरं त्यांना मदत करत होती. एवढ्यात एक आइस्क्रीमवाला पिपाणी वाजवत आला. पोरं धावत त्याच्याभोवती गोळा झाली. पोरांसकट आम्हीही आइस्क्रीम खाल्लं. त्यांच्याबरोबरच रंगवत्या घरापर्यंत गेलो. बाप्यांना आमचा बेत सांगितला. त्यांनी फारसं मनावर घेतलं नाही. आम्ही अधिकच विनवणी केल्यावर अंगावर - कपड्यांवर रंगाचे शिंतोडे उडालेल्या एका उंचपुऱ्या काळ्या पोराला आमच्याबरोबर जा म्हणून फर्मावलं. पोरगं असेल तेरा-चौदा वर्षांचं; पण हाडापेरानं मजबूत. यायला तयार झालं. प्रकाश त्याचं नाव, पण सगळे ‘पक्‍या’ म्हणत होते. भरउन्हात आमची वरात त्याच्यामागे. त्याच्या पायात ना बूट, ना डोक्‍याला टोपी. उष्ण मातीवरून, तापलेल्या दगडांवरून हा पक्‍या सहज किल्ल्याची चढण चढू लागला. आमचा घसा कोरडा पडू लागला.

जागोजागी लागलेल्या वणव्यांच्या काळ्या राखेतून, प्रचंड शिळांमधून आम्ही किल्ल्याच्या चढतीला लागलो. उभ्या चढणीनं किल्ल्याच्या प्रचंड कड्याला भिडलो. कड्याच्या उभ्या सावलीत मिळेल तसं दाटीवाटीनं बसलो. प्रकाश उन्हात उभाच. समोरचा उभा कडा चढून वर जायचा ! कसा, तर ठोकलेल्या लोखंडी कांबींना धरून. जवळची वाट! प्रकाश सर-सर चढू लागला. पाठोपाठ शेखर आणि मी कड्याला भिडलो. घोरपडीसारखं कड्याला चिकटून, कांबीला लटकत सगळे वर आले. तुटलेल्या तटबंदीमधून गडाच्या प्राकारात प्रवेश केला.

विस्तीर्ण पठार, त्याच्याभोवतीची उद्‌ध्वस्त तटबंदी, भग्न वास्तूंचे अनेक चौथरे, जागोजागच्या पाण्याच्या प्रचंड टाक्‍या असं गडाचं प्राचीनत्व समोर उभं होतं. समोरच वीरमारुतीची दगडी मूर्ती एका जोत्यावर उभी होती. जणू त्याच्याच सामर्थ्याने इथवर पोचलो. तळपणाऱ्या त्या उन्हात खड्या आवाजात मारुती स्तोत्र म्हटलं. प्रकाश सराईतपणे किल्ला दाखवत होता. किल्ल्यावरची बरीचशी बांधकामं कातळाच्या पोटात होती. उद्‌ध्वस्त चिरेबंदी अवशेषांमधून वाट काढत किल्ला फिरत होतो. हडसर ऊर्फ पर्वतगड हे किती देखणं दुर्गशिल्प आहे याचा विचार करत होतो. या विचारातच एका गोल तळ्याजवळ पोचलो. सुंदर खोदीव तळं. या उन्हाळ्यातही पाण्याने भरलेलं. उपशाअभावी पाणवनस्पतींनी घेरलेलं. शेजारीच महादेवाचं चिरेबंदी मंदिर, त्यात गणपती, मारुती आणि गरुड यांच्या सुंदर दगडी मूर्ती; पण दुर्दैवानं शेंदूर फासलेल्या. मंदिरासमोरचा घडीव नंदी तर अप्रतिम. मंदिरामागे गोल टेकडी, हा बालेकिल्ला. मंदिरापुढे गडाची पश्‍चिम उतरण. या बाजूला मुख्य प्रवेशमार्ग.

या उतरणीच्या सुरुवातीला कातळात खोदून काढलेल्या चौकोनी आकाराच्या गुहा म्हणजे किल्ल्याचं स्थापत्यवैभव. मध्यभागी एक, त्याच्या नव्वद अंशांच्या कोनात आणखी दोन. प्रत्येकीला गणेशपट्टीचा एक दरवाजा. गुहांपर्यंत जायचा मार्गही कातळात खोदून काढलेला. कदाचित या धान्य साठवणुकीच्या कोठ्या असाव्यात. याच्या पुढच्या बाजूस आहे गडावर प्रवेशणारा राजमार्ग. इतका देखणा राजमार्ग फार थोड्या किल्ल्यांवर आहे. हा राजमार्ग आणि त्यातली महाद्वारं केवळ अतुलनीय आहेत. हडसरला लागूनच एक उंच डोंगर आहे. त्याचा आणि किल्ल्याचा कातळ कडा यांमधून जाणारा हा पायऱ्यांचा अप्रतिम प्रवेशमार्ग. खडकात खोदून काढलेली सौंदर्यपूर्ण महाद्वारं, काही बांधीव, काही कोरीव पायऱ्यांचा हा अप्रतिम प्रवेशमार्ग म्हणजे प्राचीन स्थापत्य आणि भव्यता यांचा अद्वितीय नमुना, तो पाहून आश्‍चर्यमुग्ध झालो. या दुर्लक्षित हडसरवर किती पाहण्यासारखं आहे!

प्रकाश माहीतगार. त्याने सारा किल्ला तन्मयतेनं दाखविला. आता दुपार टळायला लागली होती. माथ्यावरून पाहिलेले निमगिरी, चावंड, जीवधन खुणावत होते. कोरीव महाद्वारातून आणि पायऱ्यांवरून पश्‍चिमेच्या बाजूनं किल्ला उतरत होतो; एक-एक उद्‌ध्वस्त अवशेष मनात साठवत.

दुपारपासून प्रकाश किल्ल्याविषयी त्याला माहिती असलेलं सारं सांगत होता. मनात आलं, असे अप्रतिम बांधणीचे कितीतरी किल्ले महाराष्ट्रभर विखुरलेत; पण दुर्लक्षित. प्रकाशसारखी गडपायथ्यांची पोरं असे किल्ले भटकत असतात, नव्हे राखत असतात. उन्हाळ्यातल्या अशा भरदुपारी हा पक्‍या आमच्याबरोबर अवघड वाटेनं किल्ल्यावर आला. गडाचा कोपरान्‌ कोपरा आपलेपणानं दाखविला. माझं सारं लक्ष त्याची तडफेची चाल, भर उन्हातला त्याचा दम, त्याचा किल्ल्याविषयीचा आपलेपणा याकडे होतं.

भरउन्हातली त्याची उघडी पावलं चालण्याचा नवा आत्मविश्‍वास देत होती. एक हडसर किल्ला आयुष्याची काही नवी जाणीव करून देत होता. माहिती नव्हतं, प्रकाश पुन्हा आयुष्यात भेटेल की नाही! पण त्या वेळेपुरता तरी तो आमचं सर्वकाही होता. या विचारातच पायथ्याशी आलो. हडसर, प्रकाशचं गाव. आता त्याचा निरोप घेण्याची वेळ आली. त्याला सोडून जावंसं वाटेना. त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला; पण त्याने हात मागे घेतला. डोळ्यात खोल बघत ‘पुन्हा या’ म्हणाला. खूप जड गेलं त्याचा निरोप घेताना. पण, चावंडच्या ओढीनं पुढं लवकर जाणं भाग होतं. रात्री मुक्कामाला कुकडेश्‍वर गाठायचं होतं. आमच्याकडे बघत प्रकाश टेकाडावर उभा होता. लगबगीत निघालो; पण प्रकाशची ती उघडी पावलं डोळ्यांसमोरून हलेनात. प्रकाशसारख्या अनेक निरागस पोरांनी मला खूप किल्ले दाखविले, ही पोरं पुन्हा कधीही भेटली नाहीत; पण त्यांच्या आठवणी मात्र मनात कायमच्या घर करून बसल्या आहेत.

(सदराचे लेखक दुर्ग -गडांचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com