गिरिभ्रमणाची निसर्गसूते...

पन्हाळगड पावनखिंड संग्राम शौर्य यात्रेच्या निमित्यानं शनिवारची भर जंगलातली रात्र, विशाळगडाच्या वाटेवर सह्याद्रीच्या अंतरंगातल्या घनदाट अरण्यातल्या.
Panhalgad Pavankhind
Panhalgad Pavankhindsakal

पन्हाळगड पावनखिंड संग्राम शौर्य यात्रेच्या निमित्यानं शनिवारची भर जंगलातली रात्र, विशाळगडाच्या वाटेवर सह्याद्रीच्या अंतरंगातल्या घनदाट अरण्यातल्या, कडेकपारीतल्या, ओढ्या नाल्यांच्या, दगडा- धोंड्यांच्या, चिखलाच्या, निसरड्या वाटेवर होतो, खरंतर भर पावसाच्या या रात्री, पाऊस उभा कोसळतो, पण आज इतका जोर नव्हता, चार दशकांहूनही अधिक काळाची या वाटांची ओळख या वाटांचा एक गंध असतो, स्वभाव असतो, एक आतली ओळख असते.

या वाटांचं एक बोलावणं असतं, त्यांची उराउरी भेट असते, त्यांची विलक्षण ओढ असते, त्यांचा लळा असतो. त्या आपल्याला कुरुवाळतातही आणि रागावतात ही. त्यांचं स्वतःच विश्व असतं आणि आपण त्यात पाहुणे असतो. आज या वाटेवर नेहमीची, ओळखीची अनेक झाडं उन्मळून पडलीत. वाटा त्याखाली दबल्या गेल्यात.

जागोजागची ही झाडं ओलांडतांना सर्वांच्या नकळत त्यांना स्पर्श करावासा वाटतोय, असं काय नातं या वाटांशी, या अरण्यांशी, या झाडांशी, या दऱ्या डोंगरांशी जुळलयं कोणास ठाऊक? चार दशकं झाली त्यांच्यात रमलोय,पण अजूनही या नात्याचा उलगडा झालेला नाही. एक नक्की आपल्याला सांभाळणारा, जपणारा, मार्ग दाखवणारा संजीवन श्वास त्यांच्यात आहे. हा आश्वासक श्वास गेली चार दशकं मी केवळ अनुभवतच नाही तर जगतो आहे.

अरण्याचा श्वास आमुचा,

गंध आमचा या मातीचा,

गडकोटांच्या वाटांवरले

जगणे आमुचे हे असले

जगणे आमुचे हे असले,,,,,

हेच खरं,,,

पावनखिंडीच्या अरण्य वाटेवर आज हे सगळं मनात का ऊफाळून येतय कुणास ठाऊक? खर तर फारसं कुणीच येत नव्हतं. तेव्हापासून आज जो तो येतो एवढया प्रदीर्घ काळचा या वाटेवरचा मी वाटसरू. गेल्या चार दशकांतील या वाटेवरच्या साऱ्या घडामोडींचा साक्षीदार. या वाटेचा चार दशकांचा ध्यास आणि सहवास आयुष्याचा तीन चतुर्थांश काळ या वाटेच्या ध्यासातच गेला.

स्फूर्तीदायी इतिहासानं प्रेरित होऊन भक्तिभावानं येणाऱ्या पिढीपासून ते आजच्या एका वेगळ्या मानसिकतेच्या ट्रेकर्सपर्यंत तीन पिढ्यांना या वाटेवरून मी नेलं आहे.

घरोघरी जाऊन आईवडिलांना विनंती करून, समजावून सांगून त्यांच्या मुलांना हाताला धरून या वाटेवरून नेण्यापासून ते ढासळलेले कडे, हरवलेल्या वाटा, रात्रीची चाल, अरण्य वाट यांच्यातले धोके समजावून सांगून वेडं अनैसर्गिक धाडस करू नका असं वेळप्रसंगी अपमान देखील सहन करून कळकळीनं सांगण्यापर्यंत या वाटेवरच्या मानसिकतेतील बदल मी अनुभवलेले आहेत. हे सारं मी अनुभवलं तरीही या वाटेवरच नव्हे तर सह्याद्रीतल्या अशा अनेक वाटांवर मी माझ्या सहकाऱ्यांसह चालतोच आहे.

पुन्हा तोच प्रश्न! मग आज हे सगळं असं साठून का यायला लागलयं? आज मला इतकं अस्वस्थ का वाटतयं? रांगण्याच्या जंगलात रात्रभर कुणीतरी भरकटलं, रांगणा बंद! राजगडावरून पडून पर्यटकाचा मृत्यू , हरिश्चंद्रावर परतीचे ट्रॅफिक जाम, हरिश्चंद्राच्या वाटेवर पर्यटक (?) भरकटले, रात्रभर थंडीने काकडून मृत्यू अस्वस्थता यामुळेच का? म्हणूनच सगळं साठून आलयं का? म्हणूनच का किल्ल्यांवर जाणारी सगळी मुलं - माणसं कालची आणि आजची ही डोळ्यासमोर येताहेत?

मग गेल्या चार दशकांमधली गडकोट जपणारी. गडकोट -अरण्ये-डोंगरांच्या वाटांना जपणारी, या वाटांवरच्या माणसांना जपणारी या अरण्य डोंगरातली माणसं एकेक करून सामोरी यायला लागली आणि हरिश्चंद्रगड. तारामती, रोहीदास, नाफ्था शिखरे,बालेकिल्ला आणि अफाट कोकण कड्यासह सारखा नजरेसमोर तरळू लागला.

तीन तपांपूर्वीचा मोकळ्या श्वासाचा, भन्नाट वाऱ्याचा, रात्रीच्या थंडीत लहान मुलाला घ्यावं तसं आम्हांला कुशीत घेणारा आम्हाला एकटेपणा जाणवू नये म्हणून वाऱ्याच रौद्र संगीत रात्रभर चालू ठेवणारा हरिश्चंद्रगड आठवू लागला. आठवू लागला, त्यावेळच्या निर्जन खुबी फाट्यावरचा ‘अप्पा ’. लोक त्याला वेगळ्याच नावानं ओळखायचे.

मी मात्र अप्पाच म्हणायचो. त्यावेळी खुबी फाटा - खिरेश्वर -टोलारखिंड - वाघजाई -हरिश्चंद्रपठार हाच प्रचलित मार्ग होता आणि जाणारे तरी किती सहजपणे मोजता येतील येवढेच आणि तेही अंधाराच्या आत माथ्यावर पोचायची लगबग करणारे. या सगळ्यांवर नजर असायची ती अप्पाची! त्याला टाळून कुणालाही जाता येतच नसे, किंबहुना कोणी जातच नसे, दिवस कलतीकडे झुकला की अप्पा वर जाऊ द्यायचा नाही.

म्हणायचा, उद्या सकाळी जा. मग खुबीच्या खालच्या किंवा वरच्या वस्तीत मुक्काम व्हायचा. हा अप्पा कोण? खुबी फाट्यावर याची साधी चहाची गाडी! पण हरिश्चंद्रगडावर आल्या गेलेल्या प्रत्येकावर याची नजर असायची, नुसती नजरच काय, हा आल्या गेल्या प्रत्येकाची नोंदच ठेवायचा. एका जीर्ण वहीत वर जाणाऱ्या प्रत्येकाला त्याच्याच हस्ताक्षरात नावं लिहायला सांगायचा, वर गेलेला प्रत्येक जण खाली आल्याची खात्री करायचा.

कोणी पाचनईच्या बाजूने, सादडे घाटातून, इंदोरीच्या बाजूने किंवा अन्य कोणत्या वाटेने गेले असल्यास त्याची ही येणाऱ्यांकडे नीट चौकशी करायचा. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षिततेची याला काळजी! हा हरिश्चंद्राचा अप्पा आज खुबी फाट्यावर नाही. अप्पा इतकी काळजी का करायचा?आणि कोणत्या अधिकारात? याचा विचारही मनाला कधी शिवला नाही, निसर्गानंच तो अधिकार त्याला दिला आहे आणि त्याच्या अनुभवानं तो त्याला प्राप्त झालेला आहे असं आम्ही समजायचो.

अप्पासारखी अनेक माणसं अरण्य, डोंगर आणि किल्ल्यांवर जागोजागी असतात. महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोल्हापूर जिल्ह्यातला भुदरगड तालुका, त्याच्या पश्चिमेला कड्या खाली कोकण, त्या कड्यावरची छोटीशी वाडी नाईकवडी, तिथल्या रानातला आमचा संजू. कड्यावर उगम पावून कोकणात उतरणाऱ्या गडनदीच्या उगमाकडे जाताना, जंगलात शिरताना हा माझा हात धरून थांबवतो आणि म्हणतो, ‘‘ सायेब, येकदा डोकं मातीला टेकवून जंगलाला नमस्कार करूया"

मी त्याचं मनोभावे ऐकलं त्या मातीला साष्टांग नमस्कार केला. त्याच्याकडे पाहिलं, तसा तो सहज उद्‍गारला ‘‘सायेब, जंगलाची इच्छा असंल तरच ते पार करता येतं, अन् डोंगराची इच्छा असंल तरच त्यो अंगाखांद्यावर वावरू देतो! ’’

या दोनच वाक्यांत निसर्गाचं सारं विज्ञान आणि अध्यात्म त्यांनं मला शिकवलं.

गडकोट, अरण्य भटकंतीच एक शास्त्र असतं खरंतर निसर्गाचं अध्यात्मच असतं. किल्ले पहाणं म्हणजे तरातरा डोंगर वाटांवरून चालणे नव्हे त्या कातळकड्यांशी एकरूप होऊन त्यांचे अंतरंग जाणून घेणं होय. गडकोटांची भटकंती हे एक नियमबद्ध शास्त्र आहे आणि हे आव्हान पेलायचे असेल तर निसर्गाचे नियम पाळावेच लागतात.

खरंतरं दुर्ग भटकंती हे तीनशेपासष्ठ दिवसांचं आव्हान आहे. परंतु कोणत्या किल्ल्यावर कोणत्या ऋतूत जायचं, कोणत्या डोंगरावर कोणत्या दिवशी चढायचं, कोणत्या अरण्यात दिवसाच्या कोणत्या वेळी शिरायचं हे निसर्गानं आधीच ठरवून टाकलेलं आहे. त्यांच्या निसर्गानुभूतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर तो शांतपणे घ्यावा लागतो.या निसर्गाला गर्दी आणि गोंगाट मान्य नाही. हेच पहिले निसर्गसूक्त!

वाड्या वस्त्यांवरचे मुक्काम, गडकोटांची भल्या पहाटेची चढाई, ऐन उन्हाळ्यातली विशेषतः पौर्णिमेच्या रात्रीची घाट वाटांची चाल, अरण्य भटकंती या साऱ्यांची एक सुंदर संस्कृती आहे. तिला स्वतःच्या चौकटी आणि दिशा आहेत. गडकोटांच्या भटकंतीत ही चौकट ओलांडता कामा नये, दिशा सोडता कामा नये मग सुरक्षेची ही संस्कृती आपोआपच जपली जाते.

आपल्या महाराष्ट्रभूवर त्यांच्या भौगोलिक स्थान आणि रचनेनुसार दुर्गांचे प्रकार आणि शृंखला आहेत. भर समुद्रातले जलदुर्ग - किनारी दुर्ग सह्याद्रीच्या पूर्व पाश्चिम उतारावरचे, माथ्यावरचे आणि पूर्व पश्चिम डोंगररांगांवरचे गिरिदुर्ग - वनदुर्ग, देशावरचे स्थलदुर्ग अशा पश्चिम पूर्व आणि उत्तर दक्षिण दुर्ग शृंखला आहेत. त्यांच्या मधून जाणाऱ्या घाट वाटांची एक सुंदर नक्षी आहे. या साऱ्या रचनेमध्ये एक लय आहे, शिस्तबद्धता आहे. या सुंदर रांगोळी वरची लयबद्ध भटकंती हे एक सुरक्षासूक्त आहे!

सामान्यतः दुर्गमोहीम आखतांना पूर्व अभ्यास आणि नियोजन आवश्यकच. आपल्या देशाचे हवामान तीन ऋतूत विभागले गेले आहे. या तीनही ऋतूत दुर्गभटकंती करता येते, परंतु दुर्गभटकंतीसाठी हिवाळा हा सर्वोत्तम ऋतु. पावसाळ्यात दुर्गम वनदुर्ग आणि गिरिदुर्गांवर जाणे जोखमीचे असते. आणि उन्हाळ्यात सुद्धा खड्या चढाईचे, रणरणत्या पठारांचे किल्ले भर उन्हात चढणे टाळलेच पाहिजे.

आपल्याकडे मोसमी वारे पाश्चिमेकडून समुद्रावरून पाऊस घेऊन येतात. कोसळणारा पाऊस, वाऱ्याचा वेग, अशांत समुद्र यामुळे या ऋतुत जलदुर्ग जसे टाळावेत तसेच पूर्व - पश्चिम उतारावरच्या डोंगरमाथ्यांवरच्या, कडे ढासळण्याचा धोका असणाऱ्या गिरिदुर्गांवरही सुरक्षेचा अभ्यास करूनच जावे.

पावसाळ्यात गिरिदुर्गावर मुक्काम योग्य जागा कमी असतात म्हणूनच विचारपूर्वक मुक्कामी मोहिमा आखाव्यात. सारांशतः ऋतू आणि दुर्गाचे भौगोलिक स्थान यांचा पूर्ण अभ्यास करूनच दुर्गम किल्ल्यांच्या मोहिमा आखाव्यात.

ऋतूनुसार दुर्गभटकंतीचे जसे शास्त्र आहे तसेच कोणत्या ऋतूत बरोबर कोणते साहित्य असावे आणि पोषाख असावा याचेही काही नियम आहेत. पाठपिशवी(Haversack) ही पुरेशी- मोठी,अनेक लहान मोठ्या कप्प्यांची असावी, उन्हाळ्यात आवश्यक तेवढेच हलके कपडे घ्यावेत.

पूर्ण बाह्यांचा शर्ट अथवा टी शर्ट, हलकीफुलकी पँट उन्हाळा- हिवाळ्यात गरजेची, सर्व बाजूंनी गोल टोपी या ऋतूत वापरावी, हिवाळ्यात स्वेटर, कान टोपी तर पावसाळ्यात हलका रेनकोट आवश्यक, मुक्कामी मोहिमांसाठी स्लीपिंग बॅग - कॅरिमॅट हवी, उघड्या डोंगर पठारांवर मुक्काम असेल तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका आणि गार वारा टाळण्यासाठी तंबू आवश्यक.

अनेक दिवसांच्या मोहिमांसाठी योग्य ठिकाणी स्वतःच अन्न शिजवावे लागते त्यासाठीचा शिधा बरोबर असावा दीर्घकाळ टिकणारे पौष्टिक पदार्थ उदा. शेंगदाण्याचे लाडू, खजूर, गूळ बरोबर घ्यावेत. लिंबू, साखर, मीठ अथवा ग्लुकोज पावडर,ORS तसेच वैयक्तिक वापराची औषधे स्वतःकडे असावीत. अवघड आणि दुर्गम मोहिमांमध्ये संख्येवर मर्यादा असावी. जास्तीत जास्त बारा ते पंधरा सदस्यसंख्या उत्तम. मोहीम नियोजनाचा लेखी तपशील प्रत्येकाकडे असावा. अनुभवी आणि वाटा - खडतरता यासह मोहिमेची पूर्ण माहिती असणारा आणि मोहीम पूर्वी केलेलाच मोहिमेचा नेता असावा.

कोणत्याही भटकंती मोहिमेपूर्वी स्थानिक माहीतगार लोकांशी पूर्वसंपर्क ठेवावा. त्यांच्याशी संवाद साधावा, परिसराची पूर्ण माहिती करून घ्यावी. किल्ल्यांवर जाणाऱ्या अनेक वाटा असतात, कोणत्या वाटेने जावे हे स्थानिकांशी बोलून निश्चित करावे. कारण ताजी परिस्थिती त्यांना माहीत असते.

आपण कितीही वेळा पूर्वी गेलो असलो तरी दुर्गम दुर्गांवर जाताना स्थानिक वाटाड्या बरोबर घ्यावाच हे महत्त्वाचे निसर्ग सूक्त आहे. अशा वाटाड्यांना स्थानिक परिस्थितीचे उत्तम ज्ञान असते म्हणूनच त्यांच्या ज्ञान आणि अनुभवाचा आदर करावा.

दुर्ग चढाईसाठी पहाटेचा काळ सर्वोत्तम. काही प्रसंगोपात्त अनिवार्यतेशिवाय वाटांची पक्की माहिती असल्याखेरीज निबिड अंधारात गड चढू अथवा उतरू नये. कलत्या दुपारनंतर दुर्गम किल्ल्यांची अरण्यातील दीर्घ चढाई टाळावी आणि मुक्काम नसेल तर गडावरून लवकर निघावे आणि अंधारापूर्वीच सुरक्षित गडपायथा गाठावा.

ऐन उन्हाळ्यात सुध्दा उंच डोंगरमाथ्यावर मध्यरात्रीनंतर गार वारा असतो हे ध्यानात ठेवावे. किल्ल्यांवरचे पिण्यायोग्य पाण्याचे टाके स्वच्छ ठेवणे - जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जंगलातल्या वाटा अत्यंत फसव्या असतात, मानवी वर्दळीच्या कमी आणि वन्यप्राण्यांच्या वावराच्या जास्त, या पाऊलवाटांच्या जंजाळातून अचूक मार्गक्रमणा करणे हे एक आव्हान असते.

आपण उताराला लागलो, दाट झाडीत शिरू लागलो, काटेरी झुडुपांचे, वेलींचे अडथळे जास्त येऊ लागले. न तुटलेली कोळयांची मोठ्ठाली जाळी आडवी येऊ लागली, डोक्यावरचा सूर्य सापडेनासा झाला, जंगल हिरव्याचं काळ होऊ लागलं, की पायाखाली पहावं. पाऊलवाटच नसते, मग आपण एखाद्या दरीकडे, कड्याकडे किंवा खोल जंगलात चुकत चाललो आहोत असे समजावे.

अशावेळी दिवस असेल तर सूर्यकिरणांची तिरीप ज्या दिशेने येते त्यावरून दिशेचा अंदाज घेऊन शक्यतो मोकळ्या पठारावर पोचण्याचा प्रयत्न करावा अशा वेळी कोरडा ओढा आपल्याला फार मार्गदर्शक ठरतो. त्याच्या प्रवाहाची विरुद्ध दिशा आपल्याला पठाराजवळ घेऊन जाते.

पण शेवटी कमी जास्त उंचीचा सड्याचा उभा कडा असतोच तेव्हा ओढ्याचा डावा किंवा उजवा काठ पकडून तिरके वर चढू लागावे..उंच मोकळ्या पठारावरून पोचायचे ठिकाण व दिशा निश्चित करावी हे अनुभूत निसर्गसूक्त आहे.

दुर्गांची भटकंती म्हणजे इतिहास, निसर्ग आणि आरोग्य यांची विधायक गुंफण. भटकणाऱ्या नव्या पिढीशी आज थोडं बोलावं वाटलं,, मन मोकळं करावं वाटलं. नवी पिढी तर दुर्गभटकंती, दुर्गांची टिपणं, नवनव्या वाटा धुंडाळणे यांबाबत एक पाऊल पुढेच आहे. अनेक तरूण ध्यासपूर्वक दुर्ग भटकत आहेत. भटक्यांची हरवत चाललेली निसर्गानुकूल संस्कृती जपण्याची जबाबदारी आमची आणि नवी पिढी या सर्वांचीच आहे.

पण या साऱ्यात एक सूत्र, एक नियम जाणवला तो या साऱ्यांशी एकरूपतेचा म्हणूनच दुर्ग, डोंगर, कातळकडे,अरण्य, सुळके, दऱ्या, पठारे या साऱ्यांचं स्वतःच एक जिवंतपण असतं संवेदना असतात. या जाणीवा ओळखल्या, त्यांचं शास्त्र ओळखलं, त्यांच्या नियमाबरहुकूम चाललं तर हे दुर्ग स्वतःहून दर्शन देतात! नाही तर दुर्गभटकंती हे केवळ आव्हान आणि आव्हानच बनतं.

(लेखक गिर्यारोहण क्षेत्रातल्या ‘मैत्रेय प्रतिष्ठान’ या संस्थेचे अध्यक्ष आणि दुर्ग मोहिमांच्या चळवळीतले अग्रेसर कार्यकर्ते आहेत )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com