डॉ. आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून राज्यघटना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

मूळ राज्यघटनेची वैशिष्ट्ये

 • जगातील सर्वांत अधिक लांबीची हाताने लिहिलेली राज्यघटना
 • राज्यघटना हिंदी आणि इंग्रजीमध्ये लिहिली गेली. घटना समितीच्या सदस्यांनी या दोन्ही भाषांमधील प्रतींवर मान्यतेसाठी सही केली. 
 • प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी अत्यंत सुबक अक्षरात मूळ राज्यघटना लिहिली. डेहराडून येथे राज्यघटना प्रसिद्ध करण्यात आली, तर भारतीय सर्वेक्षण मंडळाने त्याच्या प्रतींवर प्रक्रिया केली. यासाठी रायजादा यांनी २५४ पेनहोल्डर नीब वापरल्या. सर्व लिखाण पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा महिने लागले. हे काम करण्यासाठी भारत सरकारने त्यांना कॉन्स्टिट्यूशन हाउसमध्ये विशेष खोली दिली होती. या कामासाठी कोणतेही पैसे न आकारता रायजादा यांनी त्याऐवजी राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर स्वत:चे नाव आणि अखेरच्या पानावर आजोबांचेही नाव लिहिण्याची परवानगी मागितली होती.
 • मूळ राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर शांतिनिकेतनमधील आचार्य नंदलाल बोस आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी चित्रे काढली आहेत.
 • हिंदी आणि इंग्रजी भाषांतील या मूळ प्रती संसदेच्या वाचनालयात हेलियम वायूने भरलेल्या विशेष पेट्यांमध्ये जतन करून ठेवल्या आहेत.

प्रजासत्ताक (२५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटनासमितीसमोर केलेल्या भाषणातील मुद्दे)

 • २६ जानेवारी १९५० रोजी भारत हे लोकशाही राष्ट्र होणार असून, देशाचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आता आपल्या हाती आहे. 
 • सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी घटनात्मक मार्गांचाच कायम अवलंब करायला हवा.
 • राज्यघटना कितीही चांगली असली तरी अंमलबजावणी करणाऱ्यांवर तिचे यश अवलंबून आहे.
 • लोकशाही कायम राखण्याची इच्छा असलेल्यांनी व्यक्तिमहात्म्याला शरण जाऊ नये.
 • धर्मातील भक्तिमार्गामुळे आत्म्याला मोक्ष मिळण्याचा मार्ग उपलब्ध होऊ शकतो, मात्र राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्म्यामुळे अधोगती येऊन अंतिमतः हुकूमशाही अवतरते.
 • सामाजिक लोकशाहीच्या पायावरच राजकीय लोकशाही टिकून राहू शकते. त्यामुळे राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीमध्ये परावर्तीत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.
 • सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीचा अंगिकार करावा लागेल, अन्यथा लोकशाहीचा उद्देशच लोप पावेल.
 • स्वातंत्र्याबरोबर अनेक जबाबदाऱ्याही येतात.   
 • आपल्या राजघटनेचे संरक्षण करायचे असेल तर ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांमार्फत चालविलेले सरकार’ ही संकल्पना भारतात प्रत्यक्षात यायला हवी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय; विचार, अभिव्यक्ती, विश्‍वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता निश्‍चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून; आमच्या संविधानसभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण करत आहोत.

मूळ राज्यघटना
१२ परिशिष्ट
२२ भाग
३९५ कलमे

 • दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवस - राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यास लागलेला कालावधी 
 • १६५ दिवस - राज्यघटनेच्या मसुद्यावर झालेली चर्चा
 • २९९ - चर्चेमधील सहभागी सदस्य
 • १,१७,३६९ - राज्यघटनेच्या मूळ इंग्रजी प्रतीत असलेली शब्दसंख्या
 • २००० - मसुदा अंतिम होण्यापूर्वी त्यावर सविस्तर चर्चा होऊन केलेल्या दुरुस्त्या

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr ambedkar's view on constitution of india information marathi