कपालभातीचं विज्ञान

प्राणायामातला प्रमुख व्यायामप्रकार म्हणजे कपालभाती. तो करणारी व्यक्ती अतिशय वेगानं आणि झटपट उच्छ्वास सोडत असते.
Kapalbhati Yoga
Kapalbhati YogaSakal

- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com

प्राणायामातला प्रमुख व्यायामप्रकार म्हणजे कपालभाती. तो करणारी व्यक्ती अतिशय वेगानं आणि झटपट उच्छ्वास सोडत असते. ‘या व्यायामामुळे फुफ्फुसं स्वच्छ आणि बळकट होतात, पोटाच्या स्नायूंना त्यामुळे व्यायाम घडतो,’ असं कपालभाती नित्यनियमानं करणारे आवर्जून सांगतात.

म्हणूनच, ‘पोटावरची चरबी घटवण्यासाठी आणि फुफ्फुसांची लवचीकता वाढवण्यासाठी कपालभाती करा,’ असं सुचवलं जातं. दम्याचा विकार व कोरोनासारख्या साथीच्या आजारांना तोंड देण्यासाठी फुफ्फुसं बळकट, तसंच लवचीकही असणं आवश्यकच!

जमिनीवर मांडी घालून बसून किंवा अगदी खुर्चीवर बसूनही उच्छ्वासाचा हा व्यायाम करता येतो. यामध्ये अगदी छोट्या छोट्या फरकाच्या वेळेत मोठ्या ताकदीनं उच्छ्वास सोडला जातो. उच्छ्वास सोडताना आपण प्रदूषण दूर करून मेंदू स्वच्छ करत आहोत, असाही विचार पुढच्या पायरीवर करता येतो. जोरजोरात उच्छ्वास सोडण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेत पोटाचे स्नायू कार्यक्षम आणि फुफ्फुसंही निर्मळ होतात. सर्वसाधारणपणे एका बैठकीत ३० ते ५० वेळा असे झटपट उच्छ्वास सोडल्यास चांगल्यापैकी व्यायाम होतो.

‘कपालभाती’ हा संस्कृत शब्द आहे. त्याचा सर्वसाधारणपणे प्रचलित असलेला अर्थ कपाळ आहे. कपाल म्हणजे कवटी हा मूळ अर्थ. ती प्रकाशित होणं म्हणजे कपालभाती! योगसाधना करणाऱ्या योगीमंडळींच्या म्हणण्यानुसार, नियमितपणे कपालभाती केल्यानं मेंदू अगदी साफ होतो. त्यातली सारी जाळी-जळमटं, विषारी-विषयुक्त द्रव्यं निघून जातात. व्यक्तिमत्त्वाला आगळी झळाळी प्राप्त होते. हा दावा आधुनिक विज्ञानालाही मान्य होण्यासारखा आहे.

संशोधकांनी नुकतंच असं दाखवून दिलं आहे की, साध्या श्वसनाच्या क्रियेतून नॅनो-कण (नॅनोपार्टिकल) नाकामार्गे थेट मेंदूपर्यंत जाण्याची शक्यता असते (हे कण १० ते ३० नॅनोमीटर आकाराचे असतात. म्हणजे, हवेत सोडल्या जाणाऱ्या सिगारेटच्या धुरातल्या कणांहून दहा-वीस पटींनी सूक्ष्म). नकोसे पदार्थ वा कण मेंदूत रक्ताद्वारे प्रवेशण्यापासून रोखणाऱ्या यंत्रणेलाही (ब्लड-ब्रेन-बॅरिअर) ते सहज चकवा देतात.

रक्त आणि मेंदू यांच्यामधल्या आयन, रेणू व पेशी यांच्या हालचालींचं अगदी काटेकोर नियमन करण्याचं काम ‘ब्लड-ब्रेन-बॅरिअर’ यंत्रणा करते. रक्तप्रवाहातून धोकादायक रेणूंचा मेंदूवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी निसर्गानंच शोधून आखलेला हा मार्ग आहे.

नाकानं घेतलेल्या श्वासातून काही सूक्ष्म कण नैसर्गिक अडथळा (‘ब्लड-ब्रेन-बॅरिअर’) सहजगत्या ओलांडून मेंदूमध्ये शिरकाव करण्याची शक्यता असते, हे वैद्यकीय संशोधकांना १९४१ पासून ज्ञात आहे. तथापि, याबाबतचं संशोधन अगदी नव्वदच्या दशकापर्यंत सुप्तावस्थेतच राहिलं. पर्यावरणातल्या वाढत्या प्रदूषणाच्या धोक्याची घंटा ठणठण वाजू लागली आणि त्यामुळे १९९० च्या सुमारास शास्त्रज्ञ ताडकन् जागे झाले.

पाच दशकांपूर्वी झालेल्या या संशोधनाचा त्यांनी अभ्यास केला. श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून मेंदूवर कोणत्या विषाचं आक्रमण होत आहे आणि त्यानं किती धोकादायक परिणाम होत आहेत, हे शोधणं त्यांनी सुरू केलं.

या संशोधनानं सध्या झपाट्यानं वेग पकडला आहे. त्यातून असं दिसून आलं की, आपण नाकपुडीतून श्वास घेतो तेव्हा प्रदूषित असलेल्या हवेचा छोटा भाग घ्राणेंद्रियामधून थेट मेंदूत शिरकाव करतो. (हे घ्राणेंद्रियच आपल्याला वासाची जाणीव करून देत असतं). उर्वरित मुख्य भाग फुफ्फुसांकडे जातो. त्यातूनच रक्ताला आवश्यक तो प्राणवायूचा पुरवठा होत असतो. अशा प्रकारे श्वसनक्रियेचा मन आणि शरीर या दोहोंवरही थेट परिणाम होतो.

वैद्यकीय संशोधकांनी असंही दाखवून दिलं आहे की, आपल्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती फुफ्फुसातले प्रदूषणकारी घटक बहुतेक वेळा दूर लोटत असते. त्यांना मज्जाव करत असते. असं असलं तरी मेंदूमध्ये काही विषारी कण जमा होत राहतात.

आधुनिक जीवनशैलीत आपण श्वासाद्वारे फुफ्फुसांना प्रदूषणाचाच पुरवठा करत असतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. याचा परिणाम अत्यंत भयावह आहे. श्वासाद्वारे घेतल्या जाणाऱ्या हवेत घरातले प्रदूषणकारी घटक, तसंच बाहेरच्या वाहनांचा धूर, धूळ, उद्योगांद्वारे सोडले जाणारे प्रदूषणकारी घटक, हवेतले विषाणू असतात. थेट मज्जासंस्थेवर आघात करण्याची परिणामकारकता या घटकांमध्ये आहे.

कर्करोग, स्मृतिभ्रंश, पक्षाघात, विसरभोळेपणा आदी विकारांमध्ये वाढ होण्यास काही प्रमाणात या प्रदूषित हवेतल्या विषारी- विषयुक्त घटकांचं मेंदूवरचं आक्रमणच कारणीभूत असल्याचं शास्त्रज्ञांनी अलीकडे केलेल्या अभ्यासातून दिसून आलं.

कोरानाचा विषाणू घ्राणेंद्रियाच्या साह्यानं घुसखोरी करून मेंदूवर थेट हल्ला करण्याचीही भीती आहे. त्या माध्यमातून हा विषाणू शरीरातल्या विविध अवयवांना लक्ष्य बनवण्याची शक्यताही आहे. घुसखोर विषाणूमुळे मेंदू झपाटल्यागत कार्यप्रवण होतो. या उन्मादी अवस्थेत त्याच्याकडून येणाऱ्या संदेशामुळे ‘सायकोटाईन स्टॉर्म’ला (रोगप्रतिकारकप्रणालीचं खवळणं) निमंत्रण मिळतं. परिणामी मूत्रपिंडे, हृदय, आतडं आदी अवयव या रोगाला बळी पडण्याची भीती असते.

मेंदू ‘सेरेब्रोस्पायनल फ्लुईड’ या द्रवामध्ये असतो. या द्रवाद्वारे यातले काही लहान कण बाहेर फेकले जाऊ शकतात. अनावश्यक आणि नको ते फेकून देण्याची ही प्रक्रिया स्वप्नावस्थेत अधिक कार्यप्रवण असते. असं असलं तरी सर्वच कण काही मेंदूपासून दूर फेकले जात नाहीत. असे राहिलेले कण मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात.

घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून हे लहान कण मेंदूमध्ये जातात. कपालभाती करताना झपाट्यानं उच्छ्वास सोडले जात असल्यामुळे हे कण बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. यातून ‘समतुल्यतासिद्धान्ता’चं पालन होतं.

वेगानं आणि जोरजोरानं श्वासोच्छ्वास घेण्याच्या प्रक्रियेनं नासिकामार्गात ‘वेंचुरी इफेक्ट’ तयार होतो. (दाब आणि वेग याच्या संदर्भातला हा सिद्धान्त आहे...द्रव पदार्थ आकुंचित भागातून वाहतो तेव्हा त्याचा वेग वाढलेला असतो आणि परिणामी त्यावरील दाब कमी होतो). या प्रक्रियेत तात्पुरती पोकळी तयार होते आणि त्यामुळे हे कण घ्राणेंद्रियातून बाहेर पडू शकतात. (आपल्या शरीराची) नैसर्गिक रचना अतिशय कार्यक्षम आहे.

निर्णय घेताना सर्व मार्ग आणि आवेग यांचा विचार केला जातो. अशा पद्धतीनं उच्छ्वास जोरात सोडल्यानं केवळ पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो असं नव्हे तर, फुफ्फुसं आणि मेंदू यांची स्वच्छता होते. मेंदूतल्या विषद्रव्यांची स्वच्छता हाच कपालभातीचा खरा अर्थ होय.

सध्याच्या प्रदूषित वातावरणात राहणाऱ्या लोकांसाठी एक चांगला उपाय म्हणजे, कामासाठी बाहेर वावरताना ‘मास्क’ वापरणं. बाहेर काही काम करत असताना, फिरताना तोंडाला मास्क असल्यास त्याद्वारे प्रदूषणकारी घटक अडवले जातात. त्यातूनही काही विघातक, हानिकारक कण शरीरात शिरकाव करतात. ते बाहेर काढण्यासाठी रोज कपालभाती करणं हा उत्तम मार्ग आहे.

नाकपुड्या पाण्यानं स्वच्छ (जलनेती) केल्यानंतर कपालभाती करावी. श्वसनमार्ग (नासिका) निरोगी ठेवण्यासाठी ‘नेती’ हा उत्तम उपाय आहे. त्याचप्रमाणे फ्लू रोखण्यासाठीही ती रामबाण म्हणता येईल. आपापल्या शहरातलं प्रदूषण कमी करून हवा स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करणं यालाच प्राधान्य असणं खरं तर अधिक स्वाभाविक ठरावं.

त्याच वेळी सार्वजनिक जागी वावरताना दोन व्यक्तींमध्ये पुरेसं अंतर राखणं, मास्कचा उपयोग करणं, हात स्वच्छ धुणं यांसारखी सर्व ती खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मेंदूवर होणारा प्रदूषणकारी घटकांचा हल्ला मोठ्या प्रमाणात कमी करता येईल.

(अनुवाद : सतीश स. कुलकर्णी)

shabdkul@outlook.com

(लेखक हे फलटण येथील ‘निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इनस्टिट्यूट’ चे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com