'शोनार बांगला' साठी

डॉ. अनिर्बान गांगुली  (anirbangan@gmail.com)
Sunday, 17 January 2021

देश२०२२मध्ये पंच्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे,की हा पश्चिम बंगालचाही७५वा स्थापना दिन आहे.मोदी यांचं ‘शोनार बांगला’बद्दल नेमकं तेच उद्दिष्ट आहे

पश्चिम बंगालमध्ये गेली पाच दशकं जाणवलेली सर्वांत मोठी कमतरता म्हणजे दूरदृष्टीची. यामध्ये चौतीस वर्षांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीत समाजातल्या गरिबांच्या कैवाराचा आव आणला गेला, त्यानंतरची गेली नऊ वर्षे परिवर्तनाच्या केवळ गप्पा मारल्या गेल्या तसेच ‘मॉं-माटी-मनुष’ यांना दूर लोटलं गेलं, त्यांचं शोषण केलं गेलं. यामुळं राज्याच्या भविष्यावर विपरीत परिणाम झाला. या काळात नकारात्मक राजकारण, हिंसाचार आणि शोषणाचं वर्चस्व होतं. राज्यातील कुठलाही पक्ष अथवा नेता राज्याला दूरगामी परिणाम घडवणारं धोरण देण्याच्या योग्यतेचा नव्हता. 

पश्चिम बंगाल खूप मोठ्या क्षमता आणि शक्यता असलेलं राज्य असलं, तरी ते कायमच विकासाच्या निर्देशांकामध्ये तळालाच राहिले. कुठलीही विकासाची दृष्टी नसलेली कम्युनिस्ट राजवट, कॉंग्रेस पक्षाची द्विधा मनःस्थिती आणि कम्युनिस्टांबरोबरची त्यांची हातमिळवणी, त्याचवेळी तृणमूल कॉंग्रेसचं दिशाहीन आणि विरोधासाठी विरोधाचं राजकारण यामुळं गेल्या काही दशकांत राज्य विकासाच्या वाटेवरून खूप मागं लोटलं गेलं. या सर्वांनी राज्याची शक्ती शोषून घेतली व राज्याच्या विकासाच्या सर्व शक्यता मिटवल्या.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बंगाल आणि भरभराट
देश २०२२ मध्ये पंच्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या तयारीत असताना आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, की हा पश्चिम बंगालचाही ७५ वा स्थापना दिन आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री म्हणून काम पाहताना पश्चिम बंगालच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून धोरण आखलं होतं व त्यासाठी अविश्रांत मेहनतही घेतली होती. डॉ. मुखर्जी हे स्वातंत्र्योत्तर काळातले पश्चिम बंगालमधील सर्वोच्च नेते होते, त्यांनी देशाच्या विकासाबरोबरच राज्याच्या विकासाचंही स्वप्न पाहिलं. राज्य प्रगतिपथावर राहावं व राज्याचं देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असावं अशी त्यांची इच्छा होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ‘शोनार बांगला’बद्दल नेमकं तेच उद्दिष्ट आहे. देशात आघाडीवर असलेला, देश मोठ्या अपेक्षेने पाहत असलेला, उच्च सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा असलेला, उद्योग व अर्थविषयक भरभराट असलेला, देशाची बौद्धिक राजधानी असलेला, तसेच देश व जगावर आपला ठसा उमटवणाऱ्या बंगालच्या निर्मितीचं पंतप्रधानांचं उद्दिष्ट आहे. हाच दृष्टिकोन एकेकाळी बंगालच्या तरुण मनावर व कृतीत झिरपलेला होता, याच दृष्टिकोनानं एकेकाळी बंगालच्या विचारवंतांना नवनवीन बदल घडविण्याची प्रेरणा दिली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बंगालमधील नेत्यांनी त्याकाळी बंगालची यशोगाथा वैश्विक व्यासपीठावर मांडली होती, त्यांनी बंगालला जगात स्थान मिळवून दिले, राज्याचं विविधांगी माहात्म्य पटवून दिलं, ‘शोनार बांगला’च्या उद्दिष्टावर शिक्कामोर्तब करण्यासाठी व राज्याला उगवत्या भारताशी जोडण्यासाठी ते झगडले. हे सगळे नेते व विचारवंतांनी भविष्यातल्या बंगालचं स्वप्न आपल्या मनात जोपासलं, त्यांचं ध्येय ‘शोनार बांगला’ हेच होतं.

हेही वाचा : कोरोनायुद्धात भारताची जगाला दिशा !

पंतप्रधान मोदी ‘शोनार बांगला’चा संदर्भ देतात, गृहमंत्री अमित शहा ‘शोनार बांगला’बद्दल बोलतात, तेव्हा ते  ही समृद्ध परंपरा व घेतलेल्या परिश्रमांचा उल्लेख करतात. या सर्व गोष्टी काळाच्या ओघात मागे पडल्या आहेत, विसरल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण जेव्हा ‘शोनार बांगला’बद्दल बोलतो, तेव्हा आम्ही राज्याला त्याचे गतवैभव पुन्हा मिळवून देण्याची महत्त्वाकांक्षा ठेवतो. आम्ही बंगालच्या वैभवाची, सांस्कृतिक व आध्यात्मिक बैठकीची, त्याच्या भौतिक व आर्थिक स्थितीची पुनर्स्थापना करण्यासाठी कष्ट व प्रयत्न करण्याची महत्त्वाकांक्षा  ठेवतो. आमचे ध्येय नकारात्मक व विरोधासाठी विरोध असलेले राजकारण संपविण्याचे आहे. ‘न्यू इंडिया’च्या स्वप्नामध्ये बंगालच्या बहुआयामी व बहुरंगी लोकांचा सहभाग व योगदान असावे, असे आमचे मनोरथ आहे. पश्चिम बंगालला पूर्वोदयातील आघाडीचे राज्य, पूर्व भारतातील एक उगवते राज्य बनविण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालचे संरक्षण विषयक स्थान महत्त्वाचे असून, हे राज्य भारत, भारतीय समुद्र, ‘आशियान’ व सुदूर पूर्वेकडील देशांमधील आदर्श पूल बनू शकते. देशातील विचारवंतांचे हेच स्वप्न होते, त्यांनी राज्याच्या क्षमता ओळखल्या होत्या व हे धागे प्रस्थापित करण्यासाठी सातत्यानं पाठपुरावाही केला होता. हे सर्व धागे जोडले गेल्यास पश्चिम बंगालच्या भरभराटीचे द्वारही खुले होईल...

‘शोनार बांगला’ पुनर्स्थापित करणं म्हणजेच पश्चिम बंगालची देश व जगासाठी सांस्कृतिक आणि वैचारिक भूमिका पुनर्स्थापित करणं आहे. सुशासन, वेगवान व शाश्वत आर्थिक आणि सांस्कृतिक विकास, युवकांचे भविष्य सुरक्षित करणे, महिला सबलीकरण, सर्वांसाठी दर्जेदार व परवडणाऱ्या आरोग्य सुविधा, गरिबी निर्मूलन, शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठीचा सर्वसमावेशक आराखडा व ग्रामीण विकास, राज्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती, भेदभाव न करता प्रत्येकाचा विकास, तुष्टीकरण टाळून प्रत्येकाला समान न्याय, या आणि आणखी बऱ्याच गोष्टींचा या पुनर्स्थापनेत समावेश आहे. आम्हाला ‘शोनार बांगला’ची निर्मिती बंगालमधील विचारवंत, प्रभावशाली व्यक्ती व सामान्य नागरिकांबरोबरच्या सच्च्या आणि शाश्वत भागीदारीतून करायची आहे. गेल्या ७५ वर्षांत पश्चिम बंगालने काय प्रगती केली व शंभरीकडे जाताना राज्य कोणत्या दिशेनं जाणार आहे? देशाच्या प्रगतीमध्ये राज्याचे योगदान काय ? राज्याची स्थापना झाल्यापासूनच्या ७५ वर्षांत जनतेनं काय साध्य केलं किंवा त्यांना काय मिळालं? हे आमचे मूलभूत प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे आणि त्यांच्या उत्तरांतूनच ‘ शोनार बांगला’चा मार्ग सापडणार आहे.  

तृणमूल कॉंग्रेसची राजवट व तिच्या मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना आणि सल्लागारांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे आणि त्यांच्यात राज्याला महान बनवण्याची इच्छाशक्तीही नाही. हिंसाचार, भेदाभेद, उचलेगिरी आणि सूडबुद्धीचे राजकारण करताना त्यांनी नावीन्याचा किंवा राज्यातील जनतेसाठी काही भव्य करण्याचा विचार केलेला नाही. त्यांच्या राजकारणाची आता डबल एक्स्पायरी डेट आली आहे. पश्चिम बंगालचे भविष्य  काम करून दाखवणे, लोकांची सेवा करण्याच्या राजकारणावर अवलंबून आहे. यातूनच शेवटी `शोनार बांगला’चे ध्येय साध्य होणार आहे.

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

सप्तरंग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr Anirban ganguly write article about West Bengal politics