उत्सव... सर्जनाचा, चैतन्याचा !

डॉ. आशुतोष जावडेकर
रविवार, 18 मार्च 2018

...एक हक्काची गुढी असू शकेल आपल्या आत सोबतीला. मनातच घट्ट रोवलेली. तेजाची, प्रज्ञेची, विश्‍वासाची गुढी. माणसंच आहोत आपण अखेर; पण स्नेहाची, प्रेमाची, आपली हक्काची गुढी मात्र आत रोवू शकतो आपण. ती फ्लॅट-स्क्रीनशेजारच्या पाच-सात इंची रेडीमेड गुढीपेक्षाही लहान असेल; इंचातही मोजता येणार नाही तिला. मात्र, ती ‘सेल्फमेड’ असेल आणि ती धीर देत अख्ख्या जगण्यालाच तोलून धरेल... 

...एक हक्काची गुढी असू शकेल आपल्या आत सोबतीला. मनातच घट्ट रोवलेली. तेजाची, प्रज्ञेची, विश्‍वासाची गुढी. माणसंच आहोत आपण अखेर; पण स्नेहाची, प्रेमाची, आपली हक्काची गुढी मात्र आत रोवू शकतो आपण. ती फ्लॅट-स्क्रीनशेजारच्या पाच-सात इंची रेडीमेड गुढीपेक्षाही लहान असेल; इंचातही मोजता येणार नाही तिला. मात्र, ती ‘सेल्फमेड’ असेल आणि ती धीर देत अख्ख्या जगण्यालाच तोलून धरेल... 

कोणे एके काळी पंचांग किंवा झालंच तर ‘कालनिर्णय’ सणावारांची आठवण करून देत असे. आता सणाआधी चार दिवस फोनवर येणारे जाहिरात-कम-शुभेच्छा संदेश सणाची सुवार्ता सांगतात. (...आणि फोनची मेमरीही सण जवळ आला की भरते!). माझ्या फोनवर हा आत्ताच संदेश आलाय ः ‘गुढी पाडवा ऑफर. नो स्टॅंप ड्युटी. नो जीएसटी. फर्निश्‍ड फ्लॅट.’ मी ‘डिलिट’तोय तोवर हा पुढचा संदेश गुढीपाडव्याला मी बाइक घेतली, तर मला सवलत मिळेल हे सांगणारा. असे अनेक जाहिरातीचे संकेत मी नाकारतोय, तोवर व्हॉट्‌सॲपवर धडाधड मेसेज येतातच आहेत. मित्रांचे, ओळखीच्यांचे, अनोळखी माणसांचे, जेमतेम ओळखीच्या माणसांचे हे संदेश मला सांगताहेत गुढीपाडव्याचं महत्त्व. नववर्षाचे संकेत. सोबत गुढीची चित्रं नाहीतर फोटो. काही काव्यात्मक संदेश यमकामध्येही चुकलेले. काही साधे, सोपे, सरळ. काही थेट इंग्लिश ः ‘हॅपी न्यू इयर!’ काही जाज्वल्य हिंदू अभिमानीदेखील. आजकाल हे सगळे संदेश आदल्या सायंकाळीच यायला सुरवात होते. हे मी लिहिलेलं वाचतानाही तुम्ही दोनदा व्हॉट्‌सॲपवर निदान कुणाचा संदेश आलाय हे फोनमध्ये डोकावून पाहिलं असणार. आता हे जमतं आपल्याला लीलया. दोन-तीन जगांत आपण एकाच वेळी वावरतो. ताण येतो; पण नाइलाजही असतो. आताही बघा ना, ही गुढी उभारायची आहे. काठी, आंब्याची पानं, रेशमी वस्त्र, साखरेच्या गाठी, बत्तासे, हळद- कुंकू, गडू नाहीतर चांदीचा पेला... सगळं खिडकीपाशी किंवा गॅलरीत किंवा गच्चीत आपली वाट बघतंय. आपण करतोच आहोत क्रमानं गुढीची कामं आणि मग एकीकडं मार्च एंडिंग जवळ आल्याचं ध्यानात येतंय. टॅक्‍स रिटर्नचं काम राहिलंय. आज रविवार आहे- करावं! पोरांच्या परीक्षा चालू आहेत. नाहीतर काठावर आहेत. बायको घेते आहे अभ्यास; पण आपणही मध्ये डोकावायला हवं. ऑफिसमधल्या प्रशांतचा पोरगा कसा इंग्लिशमध्ये नेहमी पहिला येतो! तितक्‍यात आठवतंय, की मे महिन्यात गावाला जायचंय. त्याची तिकिटं काढणं वगैरे कामं रेंगाळलीच आहेत. त्या अजून न उभारलेल्या गुढीसमोर हातात चहा घेऊन मनात कामांचे असे डोंगर रचत तुम्ही-आम्ही बसलेलो असतो! आणि चैत्राची नवी पालवी आपल्यापर्यंत पोचतच नाही. गेला महिना, दीड महिना पानगळ होत होती. आता सगळीकडे फुलं फुलायला लागली आहेत. परवा सिग्नलला थांबलेलो असताना निळसर फुलांचा बहर- सिग्नल मिनिटाचा असल्याने चाळीस सेकंद तरी- बघितला होता आणि छान वाटलं होतं. 

...आणि असं वाटलं, की मन बालपणात जातं. सगळ्याच सणांच्या बालपणाच्या आठवणी वेगळ्या असतात. खास असतात. हलाखीचं ज्यांचं बालपण असतं, त्यांच्याकडेही बहिणीनं दिवाळीला भावाला ओवाळावं तशी निरंजन आठवण एखादी तरी असते. आताही हे लिहितालिहिता आठवते आहे माझ्या लहानपणीची गुढी. माझ्या घराच्या छोट्या गॅलरीत आईनं श्रद्धापूर्वक उभारलेली, सजवलेली गुढी. मी आणि माझा लहान भाऊ तिथंच उभं राहून लुडबुड, दंगामस्ती करतोय. मागं डोंगर होता आमच्या त्या घराच्या. तो हिरवा नाहीये. झाडांची सगळी पानं गळली आहेत. दगडाचा राखाडी रंगच जणू टेकडीलाही माखला गेलाय. त्या राखाडी पार्श्‍वभूमीवर छान हिरवंकंच किंवा अबोली रंगाचं रेशमीवस्त्र गुढीला दिमाखदार बनवतंय. वर नजर टाकली, तर स्वच्छ निळं आकाश आहे. उन्ह वर यायला लागलंय. आई पूजा करते आहे. ते वर ठेवलेलं भांडं पूजा करताना चुकून पडणार तर नाही ना, अशी गंमतिशीर भीती आम्हाला वाटते आहे. मला माहितीय, की हे वाचतावाचता तुमच्याही मनात नकळत तुमच्या बालपणीची गुढी आठवली असणार. स्वाभाविकच आहे ते. सण आपल्याला लहान करतात पुन्हा. सण मोठेही करतात एकेकदा आपल्याला.

माझा एक ठार नास्तिक मित्र आहे. समाजप्रथा म्हणून किंवा निखळ मजा म्हणूनही तो कुठले सणवार करत नाही... पण मागच्या गुढीपाडव्याच्या वेळेस त्याचे वडील अतिशय आजारी होते. कधीही जातील अशा स्थितीत होते. त्यावेळी त्यानं गुढी उभारली. फोटो मला व्हॉट्‌सअप केले. म्हणाला ः ‘आशू, यावेळी बाबा गुढी उभारू शकणार नाहीत. आजारी आहेत. मी उभारली आहे मग.’’ खरंच, त्यानं मायेनं वडिलांसाठी तर ते केलं असणार; पण नकळत त्यानं त्याच्या शाळकरी मुलासाठीही ते केलं असणार. तुम्ही आस्तिक-नास्तिक-काठावरचे कसेही असा, तुम्ही भारतीय असलात की सण तुमच्या आत असतात. तुम्ही उत्सवप्रिय असताच. तुम्ही सणाच्या निमित्तानं संस्काराची, सातत्याची गुढी वडिलांपासून मुलापर्यंत पोचवण्याचं निमित्त असता. सर्जनाची जी एक निरंतर साखळी असते, त्यातला तुम्ही एक दुवा असता आणि गुढी त्या सर्जनाच्या उत्सवालाच आपल्यासमोर आणत असते. निसर्गातले बदल टिपत. ती पानगळ संपली, आता फुलांचा मोहोर सुरू झाला. इथंतिथं वसंताचं वैभव दाखवणारी रंगीबेरंगी फुलं आता फुलतील. उन्ह खरं वाढत जातंय; पण त्या स्वच्छ, थेट, पिवळ्या, प्रखर सूर्यप्रकाशात ही सारी फुलं डोक्‍याला शांत करतात. त्यांचे रती-गंध हवेत उन्माद पसरवतात. रती-मदनाचे वसंतपंचमीचे संकेत मग बुजुर्गांना स्मरतात. अख्या हवेत आकर्षण असतं, ओढ असते. प्रणयाचं आणि प्रणयापलीकडचं केवढं तरी नाट्य प्राणिसृष्टी, वनस्पतिसृष्टी आणि आपण मर्त्य माणसं गुढीच्या पुढच्या काळात अनुभवतो. 

गुढीपाडव्याचा दिवस - चैत्राचा कोरा करकरीत पहिला दिवस बदलाचं आश्‍वासन घेऊन येतो. बदलाइतकं शाश्‍वत काही नसतं हे आपल्या पूर्वजांना माहीत असणार. ऋतूबदल दाखवणारा, ऋतूंचं फिरून नवं आवर्तन सुरू झालं हे दाखवणारा हा चैत्राचा शुद्ध प्रतिपदेचा लखलखीत दिवस. त्या दिवशी गुढी उभारायची नाही तर कधी! माझ्या ‘मुळारंभ’ या कादंबरीतला ओम म्हणतो ः ‘‘कुणावरच भरवसा ठेवता येत नाही. सगळे जण सतत त्यांचे बेत बदलत आहेत. मग आपणच जिथल्या तिथं आहोत ते कसं? हे नक्षत्र पश्‍चिमेकडे सरकलं. हा चंद्र सारखा फिरतोय. मग त्याला कळलं, की आपणही फिरतच आहोत. ही अख्खी पृथ्वी फिरतीय; पण आपल्याला ते कळत नाहीये इतकंच. बदल अपरिहार्य असतो. एक तर जग तुम्हाला बदलवतं किंवा तुम्ही ताकदीचे असाल, तर तुम्ही जगाला बदलवता; पण बदल मला नकोच, असं म्हणायची मुभा नियतीनं ठेवलेली नाही.’’ कटकट न करता, न करून घेता बदलांना सन्मुख जायला शिकवणारी गुढी ओमला पुढं भेटली असेल का?

गुढी जितकी नाजूक, दिमाखदार वर दिसते तितकी ती भक्कमही असते. आता शहरात काठीच आपण वापरतो. अनेकदा महिला बाकी सर्व गुढी-पूर्व कामं आदल्या सायंकाळपासूनच अवधानपूर्वक करतात आणि अनेकदा पुरुष ते शेवटचं, मानाचं काठी ग्रिलला नाहीतर कठड्याला बांधण्याचं काम करतो. तशी तिरकी काठी वर सरकवून, पडू न देता घट्ट बांधताना माफक थ्रिलही अनुभवतो. नाहीतर आपण जेम्स बाँड नसतोच! मध्यमवर्गीय शहरी पौरुष अशाच छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये वाट शोधत असतं! पण गावाकडे अनेकदा अजूनही गुढी उभारण्यासाठी उसाचा दांडाच वापरतात. काही ठिकाणी तोच भुईत थेट पक्का करून गुढी उभारलेली असते. मला आठवतंय, तीनेक वर्षांपूर्वी पाडव्याच्या दिवशी कोल्हापूर बाजूला हायवेलगत असताना बाइकवर हातात दोन-दोन उंचच उंच उसाचे दांडे घेऊन बसलेले तरुण सारखे दिसत होते. कितीतरी बाइक्‍स आणि कितीतरी उसाचे दांडे. ते दृश्‍यच रोचक होतं. मोर्चा निघालाय का काय असंही वाटत होतं. आता शहरातही ते दांडे विकत मिळतात. आणि उत्साहात लोक ते विकत आणून घराच्या दहा फूट फ्लॅट उंचीत त्याला उभं करतात. एरवी तो दांडा किंवा काठीच राहायची; पण घरची बाई कधी श्रद्धेनं, कधी सवयीनं बघताबघता त्याचं रूपांतर गुढीत करते. आता हे सगळं करत बसायचा अनेकांना कंटाळाही येतो. ते बाजारात मिळणारी छोटी पाच-सात इंचांची गुढी आणून फ्लॅट स्क्रीनच्या शेजारी उभारतात. मी त्यांना समजू शकतो. मला त्यांचंही काही चूक वाटत नाही. थकतोच आहोत आपण सारेच एकेकदा! आणि सगळ्यांना त्या आंब्याच्या डहाळीच्या स्पर्शातून नवा तजेला मिळेल असंही नाहीच!

मीही थकतो एकेकदा. तशी निव्वळ श्रद्धाही नसतेच; पण तरी गुढी म्हटलं, की मग चैत्र डोळ्यासमोर येतो. पहिलं आठवतं पन्हं! कैरीचं जिभेवरचं सुख मग आठवतं. सोबत आंब्यांची, कैरीची डाळही जिभेला स्मरते. कधी काळी शाळेच्या सुटीत वाचलेली ‘गोट्या चैत्रचतुर’ ही कथाही एकदम स्मरते! ताम्हणकरांचा तो गोट्या आणि चैत्राच्या सुटीच्या दिवसांमधल्या करामती! मध्येच ढग येतात, मध्येच उन्ह येतं आणि आठवणींच्या पडद्यामागून सपक्‌न जाणवतं, की ते सगळं वेल्हाळं जग मागे पडलं आता. आता बालपणीसारखा कुणी गोष्टीवेल्हाळ सवंगडी सोबत असणार नाही. सगळे ‘कलिग्ज’ आहेत आता. नाहीतर ‘फेसबुकी’ भाषेत ‘ॲक्वेंट्‌स’ फक्त! लंपना सुमी भेटली, तशी कुणी मैत्रीण सोबत नसणार आता. आपले सगळ्यांचे वसंतही एवढे निखळ आणि समृद्ध राहिले नाहीयेत. तो ओम म्हणतो तसं ः ‘‘अखेर या बाकड्यावर आपण एकटेच!’’

... पण त्यावेळी फिरून जाणवतं, की एक आपली हक्काची गुढी असू शकेल आपल्या आत सोबतीला. मनातच घट्ट रोवलेली असेल ती! तेजाची, प्रज्ञेची , विश्‍वासाची गुढी. ज्ञानेश्‍वर माऊलींनी म्हटलं आहे ः ‘जे सरे न मरे, जे चळे न ढळे, ते आपुलेचेनि बळे, आंगवावे.’ तितकं बळ नाही कदाचित मिळणार. माणसंच आहोत आपण अखेर! पण स्नेहाची, प्रेमाची, आपली हक्काची एक गुढी मात्र आत रोवू शकतो आपण. ती त्या फ्लॅट-स्क्रीनशेजारच्या पाच-सात इंची रेडीमेड गुढीपेक्षाही लहान असेल; इंचातही मोजता येणार नाही तिला. मात्र, ती ‘सेल्फमेड’ असेल आणि ती धीर देत अख्ख्या जगण्यालाच तोलून धरेल. मला ते श्‍लोक वगैरे येत नाहीत... पण आज हीच इच्छा प्रार्थना बनून मनात गंभीरपणे घुमते आहे!

सगळ्याच  सणांच्या बालपणाच्या आठवणी वेगळ्या असतात. खास असतात. सण आपल्याला लहान करतात पुन्हा. ते मोठेही करतात एकेकदा.

तुम्ही आस्तिक-नास्तिक-काठावरचे कसेही असा, तुम्ही भारतीय असलात की सण तुमच्या आत असतात. तुम्ही उत्सवप्रिय असताच. तुम्ही सणाच्या निमित्तानं संस्काराची, सातत्याची गुढी वडिलांपासून मुलापर्यंत पोचवण्याचं निमित्त असता. सर्जनाची जी एक निरंतर साखळी असते, त्यातला तुम्ही एक दुवा असता.

गुढी म्हटलं, की मग चैत्र डोळ्यासमोर येतो. पहिलं आठवतं पन्हं! कैरीचं जिभेवरचं सुख मग आठवतं. सोबत आंब्यांची, कैरीची डाळही जिभेला स्मरते. कधी काळी शाळेच्या सुटीत वाचलेली ‘गोट्या चैत्रचतुर’ ही कथाही एकदम स्मरते!

गुढीपाडव्याचा दिवस हा चैत्राचा कोरा करकरीत पहिला दिवस. बदलाचं आश्‍वासन घेऊन येतो. त्या दिवशी गुढी उभारायची नाही तर कधी?

माणसंच आहोत आपण अखेर; पण स्नेहाची, प्रेमाची, आपली हक्काची गुढी मात्र आत रोवू शकतो आपण.

Web Title: Dr. Ashutosh Javadekar article saptrang