माणुसकी... लाल फुलीच्या झेंड्याखालची ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Avinash Bhondwe writes helping nature of human

देशादेशातील लढाया, बॉम्बस्फोट, मोठे अपघात अशा दुर्धर प्रसंगांची आपदादेखील ओढवत असते. या आपत्ती प्रसंगात संकटग्रस्त माणसांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणारी, त्यांची शुश्रूषा करणारी, प्रसंगी त्यांना निवारा देणारी आणि भुकेसाठी चार घास पुरवणारी माणसे, एका लाल रंगाच्या फुलीच्या झेंड्याखाली जिवावर उदार होऊन काम करताना दिसतात. हे असतात ‘रेडक्रॉस’ या जागतिक संस्थेचे स्वयंसेवक. येत्या ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन आहे, त्यानिमित्त...

माणुसकी... लाल फुलीच्या झेंड्याखालची !

इंडियन रेड क्रॉस ही एक स्वयंसेवी मानवतावादी संस्था आहे. देशभरात त्यांच्या ११०० पेक्षा जास्त शाखांचे जाळे आहे. अनेक प्रकारच्या नैसर्गिक, जैविक, मानवनिर्मित आपत्ती, तसेच आणीबाणीच्या काळात रेडक्रॉसचे स्वयंसेवक लोकांच्या मदतीला धावून जातात. वेगवेगळ्या कारणांनी विस्थापित झालेल्या, असुरक्षित लोकांचे आणि समाजातील अनेकविध गटांच्या आरोग्यासाठी झटणे आणि त्यांची विविध बाबतीत काळजी घेणे हे रेडक्रॉसचे इप्सित असते. भारतातील रेडक्रॉस सोसायटी ही आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळ या जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र मानवतावादी संघटनेची सदस्य आहे. रेडक्रॉस सोसायटी ही मानवता, निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वैच्छिक, एकता आणि वैश्विकता या सात तत्त्वांवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीची तत्त्वे साजरी करण्यासाठी दरवर्षी ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिवस साजरा केला जातो. या दिवशी गरजू लोकांना मदत करण्याबाबतच्या रेडक्रॉस सोसायटीच्या योगदानाबद्दल संस्थेच्या सदस्यांचा गौरव केला जातो आणि संस्थेच्या मानवतावादी कार्याबद्दल जनतेला माहिती दिली जाते.

पीडितांचे दुःख हलके करणाऱ्या, त्यांच्या समस्यांचे निवारण करणाऱ्या मानवतावादी उपक्रमांना प्रेरित करून, त्यातील विविध घटकांना प्रोत्साहित करणे आणि अशा उपक्रमांची सुरुवात करून त्यांना चालना देणे हे भारतीय रेडक्रॉसचे ब्रीद आहे. अशा उपक्रमांवर आधारलेली ही विश्वव्यापी चळवळ जागतिक शांततेसाठी अधिक अनुकूल वातावरण निर्माण करायला हातभार लावत असते.

अंतर्गत रचना आणि कार्य

भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या भारतातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राज्य शाखा आहेत. सुमारे ११००हून अधिक जिल्हा आणि तालुका शाखा आहेत. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय रेडक्रॉस सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हे सोसायटीचे पदसिद्ध चेअरमन असतात. उपाध्यक्षांची निवड व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाते. राष्ट्रीय व्यवस्थापकीय मंडळात १८ सदस्य असतात. संस्थेचे अध्यक्ष सोसायटीच्या चेअरमनची आणि सहा सदस्यांची नियुक्ती करतात. उर्वरित १२ सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेश शाखांद्वारे सदस्यांच्या मतदानातून निवडले जातात. रेडक्रॉसच्या विविध उपक्रमांचे, सामाजिक कार्याचे नियोजन आणि देखरेख राष्ट्रीय व्यवस्थापन संस्था आणि त्यांनी निर्माण केलेल्या अनेक समित्यांतर्फे केले जाते. रेडक्रॉसचे महासचिव हे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. प्रत्येक राज्याचे राज्यपाल हे राज्यशाखेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीचा इतिहास

१८५९ मध्ये झालेल्या फ्रॅन्को-ऑस्ट्रियन युद्धात असंख्य सैनिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. या दरम्यान सोल्फेरीनो या इटलीमधील शहराजवळ जायबंदी झालेल्या तब्बल ४० हजार सैनिकांची दुरवस्था पाहून झां आंरी द्युनां नावाच्या एका स्विस तरुण व्यापारी कमालीचा व्यथित झाला. द्युनांने तेथील स्थानिक समुदायाच्या मदतीने तातडीने वैद्यकीय व अन्य मदतकार्याची व्यवस्था केली. या अनुभवावर आधारित ‘मेमरी ऑफ सॉल्फेरिनो’ नावाचे एक पुस्तक लिहून युद्धाच्या वेळी जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी तटस्थ संघटना स्थापन करावी, असे सुचवले. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या अवघ्या एक वर्षानंतर, द्युनांच्या सूचनांवर विचार करण्यासाठी १८६४ मध्ये जीनिव्हा येथे एक आंतरराष्ट्रीय परिषद (जीनिव्हा कन्व्हेन्शन-१८६४) भरवण्यात आली. यामधूनच आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस सोसायटीचा जन्म झाला.

रेडक्रॉसचे चिन्ह

पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल रंगाची एक उभी आणि तिला छेदणारी एक आडवी पट्टी असे रेडक्रॉसचे चिन्ह आहे. ही संस्था स्वित्झर्लंडच्या पुढाकाराने त्याच देशामध्ये स्थापन झाली. त्यामुळे या देशाचा सन्मान म्हणून स्वित्झर्लंडच्या राष्ट्रीय ध्वजाची उलटी प्रतिमा म्हणून रेडक्रॉस हे चिन्ह आणि ते असलेला ध्वज हे रेडक्रॉसचे चिन्ह आणि ध्वज बनले. झां आंरी द्युनां यांना रेडक्रॉसचे जनक मानले गेले. १९०१ साली त्यांना अंतरराष्ट्रीय शांततेसाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्यांचा जन्मदिन ८ मे हा जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून मानला जातो. १८६४ मध्ये युद्धाच्या मैदानावरील वैद्यकीय मदत पथकांसाठी रेडक्रॉस हेच विशिष्ट चिन्ह म्हणून वापरले गेले होते.

रुसो-तुर्की युद्धात ऑटोमन साम्राज्याने रेडक्रॉसच्या जागी रेड क्रिसेंट वापरला. इजिप्तनेही रेड क्रिसेंटची निवड केली, तर पर्शियाने पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल सिंह निवडला. ही चिन्हे १९२९ च्या जीनिव्हा कन्व्हेन्शनमध्ये स्वीकारली गेली. जागतिक रेडक्रॉसने लाल फुलीचा (रेडक्रॉस) हे आपले चिन्ह म्हणून स्वीकार केला. नॅशनल सोसायटी शांततेच्या काळात आणि सशस्त्र संघर्षांदरम्यान राष्ट्रीय कायदे, विनियम आणि त्याचे कायदे, आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑफ रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंटने निर्धारित केलेल्या तत्त्वांशी सुसंगत कार्यासाठी या चिन्हाचा वापर सूचक साधन म्हणून करते. नोव्हेंबर २००५ मध्ये जीनिव्हा येथे झालेल्या महासभा आणि प्रतिनिधींच्या परिषदेदरम्यान, रेड क्रिस्टलला, रेडक्रॉस रेड क्रिसेंट चळवळीचे आणखी एक प्रतीक म्हणून स्वीकारण्यात आले. मध्यंतरीच्या काळात, सर्व डॉक्टर्स रेडक्रॉस हे आपले चिन्ह म्हणून वापरत असत, पण रेडक्रॉस सोसायटीचे हे रजिस्टर्ड चिन्ह असल्यामुळे भारतातील डॉक्टर्स २०१४ पासून रेडक्रॉसवर मध्यभागी डॉक्टर अशी इंग्रजी अक्षरे किंवा वेटोळे घातलेल्या दोन नागांचे चित्र असलेले चिन्ह वापरतात.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा उदय

१९१४ मधील पहिल्या महायुद्धादरम्यान, युद्धातील जखमी आणि दुर्घटनाग्रस्त भारतीय सैनिकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी, सेंट जॉन अॅम्ब्युलन्स असोसिएशनची भारतातील शाखा आणि ब्रिटिश रेडक्रॉसच्या संयुक्त समितीशिवाय भारताकडे स्वतःची अशी कोणतीही एतद्देशीय संस्था नव्हती. त्यामुळे या काळात ब्रिटिश रेडक्रॉसच्या समितीची एक शाखा सेंट जॉन अॅम्ब्युलन्स असोसिएशनच्या सहकार्याने भारतीय सैनिक, तसेच त्या महायुद्धाच्या भीषण आघातांना बळी पडलेल्या नागरिक यांच्या मदतीसाठी एक आवश्यक मदत सेवा सुरू करण्यात आली. महायुद्ध संपल्यावर ३ मार्च १९२० रोजी ब्रिटिश रेडक्रॉसपासून स्वतंत्र असलेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या स्थापनेचे विधेयक तत्कालीन इंडियन लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये सादर करण्यात आले. त्यावेळच्या व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य आणि भारतातील संयुक्त युद्ध समितीचे (जॉईन्ट वॉर कमिटी) अध्यक्ष आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, सर क्लॉड हिल यांनी हे विधेयक मांडले. १७ मार्च १९२० रोजी ते पारित झाले. त्यानंतर २० मार्च १९२० रोजी तत्कालीन गव्हर्नर जनरलच्या स्वाक्षरीने १९२० चा ACT XV हा कायदा बनला. ७ जून १९२० रोजी भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या स्थापनेसाठी पन्नास सदस्यांची औपचारिकपणे नियुक्ती करण्यात आली. सर माल्कम हेली यांची प्रथम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आणि पहिली व्यवस्थापकीय समिती कार्यान्वित झाली.१९९२ मध्ये या कायद्यात शेवटची सुधारणा करण्यात आली आणि १९९४ मध्ये त्याची सुधारित नियमावली तयार करण्यात आली. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीची सदस्य आहे. इंटरनॅशनल फेडरेशनमध्ये भारतीय प्रतिनिधी मंडळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

इंडियन रेडक्रॉस सोसायटीची नॅशनल रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज, सेंट जॉन अॅम्ब्युलन्स, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस व रेड क्रिसेंट मुव्हमेंट (आयएफआरसी), इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेडक्रॉस (आयसीआरसी) आणि अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांशी समन्वय आहे. भारतीय रेडक्रॉसचे भारत सरकार आणि युनायटेड नेशन्स, जागतिक आरोग्य संघटना यांच्याशीही समन्वय आहे.

रेडक्रॉसच्या महाराष्ट्रातील सर्व शाखांची नोंदणी, मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियमानुसार करण्यात येते. भारतातील कनिष्ठ रेडक्रॉसची सुरुवात १९२६ साली झाली आणि १९३० साली त्याची रितसर नोंदणी झाली. १९७६-७७ साली यात रेडक्रॉस युवक गटाची भर पडली.

१९४१ पासून रक्तपेढी व रक्तादान याविषयीचे काम अधिक पद्धतशीर करण्यात येऊ लागले आहे. याकरिता रक्त गोळा करणे, ते साठविणे आणि ते नाममात्र मोबदला घेऊन अथवा मोफत पुरविणे ही कामे केली जातात. शिवाय रक्तरस व रक्तविषयक संशोधन केंद्रही चालविण्यात येते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर व बारामती येथे रेडक्रॉसच्या रक्तपेढ्या आहेत. भूकंप, पूर, दुष्काळ, आग, अपघात, स्फोट, युद्ध यांसारख्या आपत्तींच्या वेळी देशातील व परदेशातील आपदग्रस्तांना, निराश्रितांना व जखमींना अन्न, वस्त्रे, औषधे, पाणी, पुस्तके, करमणुकीची आणि वैद्यकीय सेवा व साधने, भेटवस्तू इ. पुरविणे व आर्थिक साह्य देणे ही कामे रेडक्रॉसतर्फे केली जातात.

अमेरिकन रेडक्रॉसने युक्रेनमधील संकट निवारण प्रयत्नांसाठी एक कोटी तीन लाख डॉलर्सचे योगदान दिले आहे, यात इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीजच्या निधीचाही समावेश आहे. या युद्धात अन्न, निवारा, वैद्यकीय सेवा या क्षेत्रांवर युद्धग्रस्त युक्रेनियन जनतेला मदत करण्यात येत आहे. गंभीर जखमी रुग्णांवर, सैनिकांवर प्रथमोपचार, शस्त्रक्रिया, आयसीयूमधील उपचार यांचे नियोजन आणि कार्यवाही अथकपणे गेली तीन वर्षे सुरू आहे. युक्रेनमधील विस्थापित झालेल्या लोकांना अन्नपदार्थ, डबाबंद खाद्ये, प्रथमोपचार किट्स, ब्लँकेट्स, स्वच्छता किट्स दिले जात आहेत. याशिवाय युद्धात नातेवाईकांपासून दुरावलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, मृत सैनिक आणि नागरिकांचे अंत्यसंस्कार, बेवारस प्रेतांचा अंत्यसंस्कार अशा विविध कार्यांसाठी रेडक्रॉसने सुमारे साडेचार कोटी डॉलर्स आजपर्यंत खर्च केलेले आहेत. हे युद्ध आज बरेचसे एकतर्फी लढले जाते आहे. त्यामुळे असहाय्य जनतेला आणि जायबंदी सैनिकांना मदत करणे यासाठी रेडक्रॉसचे कार्य सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय शांतता

देशादेशातील तेढ, साम्राज्यवादी दृष्टिकोन आणि नेत्यांचा सत्तांधपणा यामुळे युद्धांच्या आपत्ती ओढवत असतात. रेडक्रॉसचे कार्य हे तटस्थपणे होत असल्याने या युद्धांना रोखणे हा त्यांचा कार्यभाग नाही. युद्ध न होता सामंजस्याने प्रश्न मिटवण्यासाठी युनोसारख्या संघटना याबाबत कार्य करत असतात, पण जागतिक पातळीवरील अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी अशा बड्या राष्ट्रांतील गटबाजीमुळे आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग आणि युद्धांच्या आपत्ती उद्भवत राहतात. त्यांना आवर घालणे हे रेडक्रॉसचे काम नाही. उलट ही युद्धे सुरू झाल्यावर त्यामुळे विस्थापित होणाऱ्या, जखमी होणाऱ्या आणि अन्न, निवारा अशा मूलभूत गरजांना पारख्या होणाऱ्या नागरिकांना मदत करणे हे त्यांचे कार्य आहे. शांततेच्या काळातही अशीच रचनात्मक कार्ये आणि नैसर्गिक, तशाच जैविक, पर्यावरण बाबतीत उद्भवणाऱ्या आपत्तींमध्ये होरपळणाऱ्या नागरिकांना मदत करणे हे रेडक्रॉसचे महद्कार्य आहे.

Web Title: Dr Avinash Bhondwe Writes Helping Nature Of Human

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top