अवाजवी आत्मविश्‍वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Avinash Supe writes about Overconfidence

सुरस्ते अपघातासाठी अनेक कारणे सांगितली जात असली, तरी त्यात आपला हलगर्जीपणा कारणीभूत असतो. रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा मिळाला की भरधाव जाणे, हेल्मेट घालण्याचा आळस किंवा स्वतःचा वाहन चालवण्याबाबतचा अवाजवी आत्मविश्वास आपल्याला अपंग करतो.

अवाजवी आत्मविश्‍वास

- डॉ. अविनाश सुपे

मारे १० वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या ओळखीचे एक सुखवस्तू कुटुंब आहे. तिचे यजमान सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. मोठ्या मुलीचे लग्न झाले होते आणि मुलगा साधारण २८ वर्षांचा होता. त्याने एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता. कामानिमित्त पनवेलवरून बाईकने तो निघाला. पावसाळ्याचे दिवस होते. लवकर घरी जाण्याच्या घाईत होता. हेल्मेट बाईकला लावून ठेवले होते. पावसाळ्यात पडणाऱ्या एका खड्ड्यात बहुतेक सांडलेल्या तेलामुळे त्याची बाईक घसरली आणि त्याला अपघात झाला. वाशीच्या एका रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. तो कोमामध्ये होता. सुरुवातीला त्याच्यात थोडी सुधारणा दिसली; पण नंतर फारशी सुधारणा दिसत नव्हती म्हणून त्याला एका साधारण रुग्णालयात ठेवण्यात आले. त्याची आई त्याची पूर्ण काळजी घेत होती. तो मुलगा उठून बसू शकत होता; पण तो बोलू शकत नव्हता किंवा त्याला काही कळतही नव्हते. कुठलीही गोष्ट करण्यासाठी त्याला आईची मदत घ्यावी लागे. त्याची आधीची बौद्धिक आणि मानसिक क्षमता गेली होती. रुग्णालयातून शेवटी घरी आणले. मोठ्या शहरात मदतीला माणसे मिळत नाहीत म्हणून ती त्याला घेऊन एका छोट्याशा गावात जाऊन राहिली आहे.

गेल्या १० वर्षांत त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा झाली ती म्हणजे तो काठी किंवा कुबडी घेऊन थोडासा चालू शकतो. पायातील कमजोरीमुळे आता त्याला कृत्रिम आधार लागतो. बौद्धिक सुधारणा फार झाली नाही. तो स्वतःच्या पायावर उभा राहण्याची शक्यताच नाही. त्याची आई जिची भारत, जग बघणे आणि इतर सर्व स्वप्ने होती, ती विसरून आता तिला फक्त मुलाची देखभाल एवढेच आयुष्यभरासाठी काम करायचे आहे. यात मूळ कारण आहे हलगर्जीपणा. रस्त्यावरील खड्डे, सांडलेले तेल यांचा अपघातात मोठा सहभाग आहेच, पण आपले बार्इकवरील नियंत्रण, रात्रीच्या वेळी रस्ता मोकळा मिळाला की भरधाव वेगाने जाणे, हेल्मेट घालण्याचा आळस किंवा स्वतःचा वाहन चालवण्याबाबतचा अवाजवी आत्मविश्वास. असे कित्येक रुग्ण आमच्या रुग्णालयात येतात. दुचाकीच्या अपघातात हेल्मेटविना मेंदूला आघात होतो ते कोमामध्ये जातात. त्यामधून काही वाचतात. बऱ्याचदा मेंदूला दुखापत होते आणि जीवन परावलंबी होते. घरातल्यांना काळजी घ्यावी लागते. यात केवळ ती व्यक्ती अपंग होते असे नाही, तर एक पूर्ण घर उद्ध्वस्त होते. त्यांची नोकरी जाते, करिअर संपते.

कोणताही असा रुग्ण रुग्णालयात दाखल होतो तेव्हा सुरुवातीस त्याचे मित्र/कुटुंबीय चौकशी करण्यास येतात. काही रुग्णही दोनतीन महिन्यांमध्ये बरे होतात व काही कमजोरी घेऊन पुन्हा मार्गी लागतात. जेव्हा काही काळ जातो व रुग्णामध्ये काहीच सुधारणा होत नाही, तेव्हा ही कळकळ व गर्दी कमी होते व शेवटी सर्व भार त्याच्या वयस्कर आईवर किंवा बहिणीवर पडतो. तो एकटाच कमावता असेल तर आर्थिक विवंचनादेखील या सर्व अडचणींमध्ये भर घालतात.

आज भारतात दरवर्षी चारपाच लाख रस्ता अपघात होतात. त्यातील ४० टक्के अपघात दुचाकीमुळे/ बार्इकमुळे होतात. दीड लाख लोक दगावतात. साडेतीन लाख व्यक्ती आजारी होतात. भारत सरकारच्या अहवालाप्रमाणे हे आकडे आहेत. कदाचित यापेक्षा जास्तही असतील. मनुष्यहानी होते; पण या अपघातांचे मुख्य कारण हेल्मेट घातलेले नसणे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र अशा काही राज्यांत हे प्रमाण जास्त आहे. यात १८ ते ४५ असा हा तरुण वर्ग, जो राष्ट्राची मुख्य संपत्ती असतो तोच अपंग होतो किंवा प्राण गमावतो. यावर जनजागृती करणे आवश्यक आहे.

गाडीची वेळेवर तपासणी न करणे, वेगाने गाडी चालवणे, वेगात चुकीचे ओव्हरटेक करणे, धुके असतानाही वेगात गाडी चालवणे, दारू पिऊन चालवणे, गाडी किंवा बाईक चालवताना मोबाईलवर बोलणे ही अपघाताला कारणीभूत महत्त्वाची कारणे आहेत. गर्दीच्या रस्त्यावर अपघात झाले तर बऱ्याच वेळा अनेक निरपराध लोक जखमी होतात.

नवीन गाड्यांमध्ये एअर बॅग्स आल्या तरी अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही. त्यामुळे आपण जागरूक आणि सावध होणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारने चांगले रस्ते, सूचना फलक, संरक्षक कठडे इत्यादी पायाभूत सुविधा देणे जरुरीचे आहेच. शालेय विद्यार्थी जीवनापासून रस्ते अपघातांची कारणे, सुरक्षा नियमांचे पालन याचे शिक्षण देणे, ते पालकांनी मुलांच्या मनावर बिंबवणे गरजेचे आहे. जोपर्यंत या सावधानतेच्या सवयी सर्वांच्या अंगवळणी पडत नाहीत तोपर्यंत नाहक बळी व समाजावरील हा अतिरिक्त भार कमी होणार नाही.

Web Title: Dr Avinash Supe Writes About Overconfidence Road Development

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..