जगण्याने छळले होते...

मृत्यू हे शाश्‍वत सत्य असले, तरी तो कधी होईल हे सांगता येत नाही. गंभीर आजाराशी लढत असणारा रुग्णही आशेवर जगत असतो. त्यासाठी उपचाराला सामोरे जात असतो.
Euthanasia Act
Euthanasia Actsakal
Summary

मृत्यू हे शाश्‍वत सत्य असले, तरी तो कधी होईल हे सांगता येत नाही. गंभीर आजाराशी लढत असणारा रुग्णही आशेवर जगत असतो. त्यासाठी उपचाराला सामोरे जात असतो.

- डॉ. अविनाश सुपे

मृत्यू हे शाश्‍वत सत्य असले, तरी तो कधी होईल हे सांगता येत नाही. गंभीर आजाराशी लढत असणारा रुग्णही आशेवर जगत असतो. त्यासाठी उपचाराला सामोरे जात असतो. काही प्रसंगी रुग्णाला कळलेलं असतं, की त्याचा मृत्यू आता अटळ आहे. आजारातील जीवघेण्या वेदनेपेक्षा आपला लवकर मृत्यू व्हावा, असंही त्याला वाटतं. अशाच एका व्यक्तीला आजारपणातील जगण्यानं छळलं होतं, तिची ही गोष्ट...

आपण काम करतो त्या वेळी आपली अनेक सहकाऱ्यांशी ओळख होते आणि ती ओळख दीर्घकाळ टिकून जीवाभावाचे नाते निर्माण करते. अशीच एक ओळखीची झालेली सहकारी, जी बंगळूरुमधल्या एका प्रख्यात संस्थेमध्ये कार्यरत होती. तिचे नाव चारुलता. चारू माझ्याच वयाची. साधारण माझ्यापेक्षा तीन-चार आठवडे मोठी. आम्ही जरी वेगळ्या शहरांत राहात असलो, तरी जवळजवळ बावीस वर्षे केवळ भारतातच नाही, तर जगभरात विविध ठिकाणी परिषदा, कार्यशाळांमध्ये एकत्र प्रकल्प सादर केले.

साधारणपणे २०१७ मध्ये आम्ही एक शेवटची कॉन्फरन्स केली. त्या वेळी सगळं व्यवस्थित होतं आणि २०१८ मध्ये एक दिवस मला फोन आला की, तिचं मेंदूचं ऑपरेशन झालं. माझ्या मनात काहूर माजलं, की अचानक काय झालं चारूला?

पुढच्या भेटीमध्ये तिने ती सगळी गोष्ट सांगितली. एक दिवस तिला चक्कर आली. थोडा तोल जातोय, असं वाटायला लागलं. सगळ्या तपासण्या केल्यानंतर एमआरआयमध्ये मेंदूमध्ये एक गाठ... ब्रेन ट्युमर सापडला.

तिच्या फॅमिलीत बहुतांश डॉक्टरच असल्यामुळे ताबडतोब तिच्यावर ऑपरेशन करून तो मेंदूचा भाग काढला; परंतु ती गाठ ब्रेन कॅन्सरची होती. रिपोर्ट वाचल्यानंतर लक्षात आलं की, गाठीची वाढ अत्यंत वेगाने होणार आहे आणि त्यामध्ये वाचण्याची शक्यता फार कमी आहे. मला हे सर्व ऐकून प्रचंड दुःख झालं.

रुग्णाशी बोलताना आम्ही अत्यंत धीराने बोलतो; पण चारूशी अशा परिस्थितीत बोलणं कठीण होतं. ती रुग्ण होती; पण तिलाही या आजाराची तेवढीच कल्पना होती. ती सुशिक्षितच नव्हे, तर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ होती. रिपोर्ट्स वाचलेले होते. त्यामुळे वरवरचा धीर देणंही मनाला वेदनादायी होतं. पुढे काही महिन्यांनंतर बंगळूरुला जायचा योग आला आणि तिला भेटायचं ठरवलं. तेव्हा तिची तब्येत थोडीशी खालावलेली दिसली. त्यानंतर बंगळूरुला जेव्हा जेव्हा गेलो, तिला भेटत होतो.

हळूहळू प्रत्येक भेटीत तिला खूप वेदना होत होत्या आणि चालतानाही त्रास होत असल्याचं जाणवायचं. तिचा काही भाग अधू झाला होता. आपल्यासोबत काम करणारी सहकारी, तिची ही अवस्था बघणं फार कष्टाचं होतं; पण आमच्यामध्ये अत्यंत मोकळा आणि पारदर्शक संवाद होता. साधारणतः सव्वा वर्षानंतर, इतरांशी जरी ती बोलली नाही तरी माझ्याशी बोलून गेली की, ‘‘मला वाटलं होतं की हा आजार वेगाने पसरणारा आहे. तो पटकन पसरेल आणि मग लवकर संपेल; पण तसं झालं नाही. हे आता खूप त्रासदायक होत आहे.’’ तिने मनाची तयारी केली होती; परंतु आता आजार लांबत राहिला. तिने सगळ्या केमोथेरपी, रेडिओथेरपी घेतल्या होत्या; परंतु तिलाही कल्पना होती की, आता आशा नाहीये. तिला प्रचंड शारीरिक आणि मानसिक दुःख सहन करावं लागत होतं. प्रत्येक क्षण, तास, दिवस आणि महिने ती एका दिव्यातून जात होती. तिने व्यक्त करून दाखवलं की, ‘‘मला हे काही आता सहन होत नाहीये, तर आपण काय करायला पाहिजे?’’ तिच्या या प्रश्‍नावर जाणवलं की, आपण तिला खूप धीर दिला; पण त्या व्यतिरिक्त काहीही करू शकलो नाही. नंतर साधारण अडीच वर्षांनंतर कोविड काळात तिचा कॅन्सरमुळेच मृत्यू झाला.

तिच्या मृत्यूने मनातील प्रश्न संपला नाही. मनामध्ये वादळ सुरू झालं. चारूसारखी सुशिक्षित, जिला या आजाराबद्दल सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना आहे, तीही आजार कळल्यापासून प्रत्येक क्षण मरण भोगत होती. मृत्यूची वाट बघत होती. ज्याला या रोगाची थोडीही कल्पना नसते, त्याला लोक सांगतही नाहीत, की त्याला कॅन्सर आहे किंवा थोडी कल्पना असते; पण वैद्यकीय ज्ञान नसते. अशा रुग्णाला थोडी आशा असते जगण्याची. या आजारातून बाहेर पडण्यासाठी ती व्यक्ती प्रयत्न करीत राहते. आशेवर जगत राहते. यात काही काळ तरी निघून जातो. पुढे भोगाव्या लागणाऱ्या यातनांची त्याला जाणीव नसते. त्यामुळे सुरुवातीपासूनच ती व्यक्ती मरणयातना भोगत नाही आणि कधीकधी त्यांच्या सुदैवाने त्यांना पटकन मृत्यू येऊनही जातो. चारूसारख्या रुग्णाला पूर्ण ज्ञान असते आणि पुढे हे सर्व भोग आपल्याला मृत्यूचा वसंत फुलेपर्यंत भोगायचे आहेत, याची पूर्ण जाणीव असते. अशा वेळी त्यांच्या मनामध्ये काय विचार येत असतील? किती यातनांमधून मन जात असेल? त्यांच्या वैद्यकीय ज्ञानामुळे त्यांना होणाऱ्या मनस्तापाची जाणीव होऊन माझे मन शहारले. मनात विचार आले की जसा लोकांना जगण्याचा अधिकार आहे, तसाच त्यांना मरण्याचा अधिकार का असू नये? त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना भोगण्याची सक्ती का असावी?

अनेक देशांमध्ये मरण्याचा अधिकारही लोकांना आहे. तिथे व्यक्ती ठरवू शकते की, त्याला मरणाला सामोरं जायचं आहे आणि इंजेक्शन घेऊन ते शांतपणे ते मृत होऊ शकतात. त्यांना एवढ्या सगळ्या वेदनांमधून जावं लागत नाही. आपल्या देशामध्ये असा सहज सोपा कायदा अजूनही नाही. जो आहे तो इतका किचकट आहे की, त्याचा योग्य उपयोग होत नाही. कदाचित आपल्या समाजामध्ये जर असा कायदा आणला, तर त्याचा वापर होण्यापेक्षा गैरवापरच जास्त होण्याचे भय असावे.

अंतर्मुख करणाऱ्या या रुग्णांच्या कथा ऐकून समाजाने याचा विचार करायला पाहिजे की एखाद्याला जर खरोखरच पुढचा मार्ग दिसत नसेल आणि दुःख, वेदना आणि असहायता होत असेल तर काही निवडक आणि निर्विवाद प्रकरणामध्ये स्वेच्छेने व आनंदाने मृत्यूला सामोरे जाण्याचा अधिकार का नसावा? कविवर्य सुरेश भट एका गझलेत म्हणाले आहेत, ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते’ त्याप्रमाणे काही आजारातील जगणे रुग्णाला छळणारेच असते, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com