आधार कुटुंबाचा

आपले जगणे हा घरातल्यांवर भार आहे, त्यांच्यासाठी अडचण आहे हे वाटणे रुग्णाचे मानसिक खच्चीकरण करते.
आधार कुटुंबाचा
Summary

आपले जगणे हा घरातल्यांवर भार आहे, त्यांच्यासाठी अडचण आहे हे वाटणे रुग्णाचे मानसिक खच्चीकरण करते.

- डॉ. अविनाश सुपे

आपले जगणे हा घरातल्यांवर भार आहे, त्यांच्यासाठी अडचण आहे हे वाटणे रुग्णाचे मानसिक खच्चीकरण करते. त्याऐवजी रुग्ण जसा आहे तसे कुटुंबाने स्वीकारणे, त्याचे असणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवणे, रुग्णाला सर्व अडचणींवर मात करायला ताकद देते. जगण्याला नवी उमेद देते. त्या बळावर रुग्ण शारीरिक वेदना, अडचणींवर सहज मात कसा करतो, याची जाणीव करून देणारी गोष्ट...

एक अत्यंत सुखवस्तू असे मध्यमवर्गीय कुटुंब होतं. त्या जोडप्याचे नाव होते दिलीपभाई आणि निर्मलाबेन. निर्मलाबेन या साधारण पस्तीस वर्षांच्या. ते बोरिवलीमध्ये त्यांच्या दोन मुलांबरोबर फ्लॅटमध्ये सुखाने राहत होते. एक दिवस निर्मलाबेन दादर स्टेशनवर गाडीची वाट बघत उभ्या होत्या. त्या वेळी गाडी पकडत असताना खूप गर्दी झाली आणि गर्दीच्या वेळी निर्मलाबेनना कुणी तरी ढकललं आणि त्या गाडीखाली पडल्या. त्यांचे पाय गाडीखाली गेले. त्या पडल्या हे लक्षात आल्यावर पटकन लोकांनी गाडी थांबवली आणि त्यांना बाहेर काढलं. लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. त्या वेळी त्यांच्या लक्षात आलं, की एका पायाला खूप इजा झाली आहे. गुडघ्याच्या वरपर्यंत पाय काढावा लागेल. त्यांच्या मणक्यालासुद्धा इजा झाली होती. त्यामुळे त्यांच्या पायाखालची संवेदना नष्ट झाली होती. त्यांचे गुदद्वार आणि लघवीवरचे नियंत्रणही गेले होते. कालांतराने त्यांच्या जखमा भरल्या, लघवी करण्याबाबत थोडे नियंत्रण आले; परंतु गुदद्वारावरचं नियंत्रण काही आलं नाही. त्यांना वारंवार शौचाला होत असे. त्यामुळे त्यांना बेडसोर म्हणजे पाठीवर जखम झाली. अशीच चार वर्षे गेली. त्यांनी सर्व प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही.

१९९६ च्या सुमारास माझे शिक्षक डॉक्टर कोठारी माझ्याकडे निर्मलाबाईंची व्यथा घेऊन आले. म्हणाले, ‘आपण यांची कोलोस्टोमी करू.’ कोलोस्टोमी म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणची शौचाची जागा आपल्या पोटावर आणायची. त्याचा फायदा असा, की एखाद्याला गुदद्वाराचे नियंत्रण नसेल आणि पुढच्या काही काळामध्ये नियंत्रण येण्याची शक्यताही नसेल, त्या वेळी रुग्णाला कधीही शौचाला होणे, समाजात वावर करायला बंधने येतात. त्याच्यापेक्षा आपण पोटावर शौचाचा मार्ग आणून त्याला पिशवी लावू शकतो, त्यामुळे खूप नियंत्रण आणि चांगली सुविधा होते. रुग्णाला एक प्रकारचे सामाजिक स्वास्थ्य मिळते. काही दिवसांनी आतड्यालादेखील सवय होते. रुग्ण समाजामध्ये मोकळेपणे फिरू शकतो. बेड सोर म्हणजे जखमा होण्याची शक्यता कमी होते. या अनुषंगाने आम्ही एक ऑपरेशन करून त्यांना कोलोस्टोमी करून दिली आणि त्याचा त्यांना फायदा झाला. पुढे त्यांनी मोटर असलेली व्हील चेअर घेतली व त्यांचे आयुष्य खूप सुकर झाले.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्या सर्व अडचणीवेळी त्यांच्या कुटुंबाने त्यांना दिलेला आधार. सर्व कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दिलेला मानसिक आधार आणि घरामध्ये व राहणीमान यामध्ये इतका बदल करून टाकला, की त्यांनी त्यांच्या घरांमध्ये एक स्पेशल कॉट, मोटर असलेली व्हील चेअर, स्वयंपाकघरात, टॉयलेटमध्ये आवश्यक बदल अशी सगळी व्यवस्था करून त्यांचे जगणे सुसह्यच नव्हे, तर सुखाचे केले. घरामध्ये त्यांनी जे फरक केले आणि केलेल्या आधुनिक व्यवस्थापनामुळे आजही जवळजवळ २५ वर्षांनंतर निर्मलादेवी अत्यंत आनंदी आयुष्य जगते. तिला काहीही मोठ्या अडचणी आल्या नाहीत. एकदोन वेळा बेडसोर झाले होते, पण आम्ही शस्त्रक्रिया करून तेही बरे केले. ती घरात सगळीकडे व्यवस्थित फिरू शकते. त्यांच्या या आनंदी राहण्यामागे त्यांच्या कुटुंबाने तिला दिलेला मानसिक आधार हा सर्वांत महत्त्वाचा आहे.

आपले जगणे हा घरातल्यांवर भार आहे, त्यांना अडचण आहे हे वाटणे रुग्णाचे मानसिक खच्चीकरण करते. त्याऐवजी रुग्ण जसा आहे तसे कुटुंबाने स्वीकारणे, त्याचे असणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवणे, रुग्णाला सर्व अडचणींवर मात करायला ताकद देते. जगण्याला नवी उमेद देते. त्या बळावर तो शारीरिक वेदना, अडचणींवर सहज मात करतो. निर्मलाबेन यांचे एक अत्यंत आनंदी सुखी कुटुंब म्हणून आज आपण त्यांच्याकडे बघू शकतो. तिचा एक मुलगा अमेरिकेत आहे आणि निर्मलाबेन अमेरिकावारी करून आलेली आहे.

जेव्हा एखाद्याला अशाप्रकारचा मोठा अपघात होतो जो अनपेक्षित असतो, त्यात अशा प्रकारचा आजार होतो, की ज्यामधून धडधाकट किंवा पूर्वस्थितीवर येणार नाही हे रुग्णाला कळते. आयुष्याचे गणित वेगळ्या पद्धतीने सोडवावे लागणार आहे हेही रुग्णाला कळते. त्या वेळी कुटुंबाचा किंवा जवळच्या स्वकीयांचा असलेला आधार फार महत्त्वाचा असतो. केवळ रुग्णाची काळजी घेणे, शुश्रूषा करणे हा एकच भाग नसतो; तर रुग्णाची मनाची तयारी करण्याला मदत करणे हेही महत्त्वाचे ठरते. कुटुंबाने योग्य परिश्रमाने, आधुनिक उपकरणांच्या मदतीने रुग्णाच्या राहणीमानात कुवतीनुसार किंवा बाहेरून मदत घेऊन ताबडतोब बदल करून आपल्यामध्ये आणि आपल्या सगळ्या सिस्टीममध्ये बदल करून ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे. याचबरोबर मानसिकदृष्ट्या अशा रुग्णाला त्याचे कुटुंब सोबत आहे, याची जाणीव करून देणे फार महत्त्वाचे असते. झालेल्या अपघाताची कारणमीमांसा करीत बसून, कोणाला दोष देण्यापेक्षा आलेल्या संकटावर मात करून चांगले भविष्य घडवण्याचा प्रयत्न करता येतो, याची जाणीव निर्मलाबेन यांच्या कुटुंबीयांनी करून दिली.

महाराष्ट्रात, मुंबईत अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्या कशा मदत करतात हे बघता येते. त्या आर्थिक मदतीपासून शिकवण्यापर्यंत सर्व मदत करतात. कदाचित श्रीमंतांना याचा फार प्रश्न नसतो; पण तरीसुद्धा एक घरची बाई सर्वांना महत्त्वाची असते. ती सगळं करते. घराचा आधार असते. जर तिला अपंगत्व आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांनी आधार देऊन, यावर मात करता येते हे सांगणे महत्त्वाचे आहे. दैवाला दोष देत बसण्यापेक्षा अशी संकटे एक आव्हान म्हणून स्वीकारून जिंकणे हे रुग्णांसाठी आणि कुटुंबासाठी आवश्यक असते.

निर्मलाबेनकडे कधीही तुम्ही गेलात तरी ती अत्यंत आनंदी असते. आता ती सुना, नातवंडांबरोबर चांगल्या पद्धतीने आयुष्य जगते आहे. त्यांना बघितले की एका रुग्णाला आणि कुटुंबाला मदत केल्याचा मला आनंद होतो. त्या कुटुंबाचा संकटाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com