आरोग्य सेवा आणि आर्थिक अडचणी

तरुण मुलगी आजारी होणे म्हणजे अस्मानी संकटच आहे. आईवडिलांच्या तुटपुंज्या शिलकेची ठिगळं कुठे पुरी पडणार? सर्वसाधारण माणसाचे पोट हातावर असते.
Health care and financial difficulties
Health care and financial difficultiessakal
Summary

तरुण मुलगी आजारी होणे म्हणजे अस्मानी संकटच आहे. आईवडिलांच्या तुटपुंज्या शिलकेची ठिगळं कुठे पुरी पडणार? सर्वसाधारण माणसाचे पोट हातावर असते.

- डॉ. अविनाश सुपे

तरुण मुलगी आजारी होणे म्हणजे अस्मानी संकटच आहे. आईवडिलांच्या तुटपुंज्या शिलकेची ठिगळं कुठे पुरी पडणार? सर्वसाधारण माणसाचे पोट हातावर असते. जेव्हा अनपेक्षित, अघटित असा २५-३० लाखांचा खर्च समोर उभा राहतो तेव्हा पैसे आणायचे कुठून, असाच प्रश्‍न पडला निर्मलाच्या आई-वडिलांना. सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी विमा योजना सुरू केली; पण फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी. निम्न मध्यमवर्ग या वर्गाचे काय?

ही कथा आहे निर्मलाच्या अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी पालकांची. स्वतःच्या पोटाच्या गोळ्याला गमावून पुढे उपासमार सहन करण्याची वेळ आलेल्या वयोवृद्ध माता-पित्यांची ही करुण कहाणी आहे, किंबहुना अनेक मूक कहाण्यांची ही प्रतिनिधित्व करणारी ठरणार आहे.

काही महिन्यांपूर्वी एक ८० वर्षांचे गृहस्थ आले. ते अत्यंत अगतिक, असहायपणे बोलत होते. त्यांनी त्यांच्या मुलीची फाईल दाखवली. निर्मला एक ४४ वर्षांची रुग्ण. तिच्या पित्ताशयामध्ये खडे झाले होते. साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी ते खडे लक्षात आले होते आणि एका हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून त्यांनी पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया ज्याला आपण लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टिक्टमी म्हणतो ती केली होती. दुर्दैवाने तिच्या पित्त नलिकेला इजा झाली आणि जी नलिका कापली होती त्यातून पित्त बाहेर पडू लागले. तिच्या पोटात पसरू लागले.

एक हजार शस्त्रक्रियांमध्ये एक-दोघांना अशाप्रकारे गंभीर इजा होऊ शकते. तिथे त्यांना पुढची उपचारपद्धती करता येत नसल्यामुळे तिला दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. तिच्यावर शस्त्रक्रिया व इतर उपचार करून पित्तनलिकेत नळ्या टाकल्या. पित्त बाहेर काढले. त्यानंतर अजूनही इतर उपचार व आयसीयूमध्ये दोन महिने तिला ठेवावे लागले. हे सर्व करताना त्यांचे जवळपास २५ लाख रुपये खर्च झाले. पुन:पुन्हा शस्त्रक्रिया करूनही ती मुलगी काही वाचू शकली नाही. एक-दोन वेळा ती घरी गेली, पण पुन्हा ताप येऊन ती दाखल होई. तीन महिन्यांनंतर ती दगावली.

तिचे सर्व पेपर्स घेऊन ८० वर्षांचे वडील आणि ७५ वर्षांची आई माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘‘डॉक्टर, तुम्ही मला काही मदत करू शकता का? मी मुलीला वाचविण्यासाठी माझी शेती, माझी जी काही मिळकत, साठवलेली रक्कम सर्व खर्च केलेली आहे. आता जगण्यासाठी आमच्याकडे काही नाही. तुम्ही आम्हाला कुठूनतरी काही मदत मिळवून देऊ शकाल का? या खर्चाची भरपाई होऊ शकते का?’’

आता विविध आरोग्य योजना आहेत, त्या सर्व जिवंत रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. त्यामध्ये पंतप्रधान कार्यालयातून, मुख्यमंत्री निधीतून, महात्मा फुले योजना किंवा धर्मादाय संस्थांमधून रुग्णाला जर तो आर्थिक दृष्टीने अबल असेल तर उपचारासाठी काही मदत मिळू शकते; पण रुग्ण गमावला तर त्याच्यावर झालेल्या खर्चाची भरपाई कुठलीही योजना करत नाही. या वृद्ध दाम्पत्याला थोडीफार मदत वैयक्तिक पातळीवर केली; पण त्यांना आजीवन मदत देणारी योजना नाही. मला फार असहाय वाटले.

एखादे अपत्य आजारी पडले की वृद्धांना मदतीसाठी धावपळ करणे आणि रुग्णालयाच्या खेटा घालणे अशक्यप्राय आहे. तरुण मुलगी अशी आजारी होणे म्हणजे अस्मानी संकटच आहे. त्यांच्या तुटपुंज्या शिलकेची ठिगळं कुठे पुरी पडणार? सर्वसाधारण माणसाचे पोट हातावर असते. जेव्हा अनपेक्षित, अघटित असा २५-३० लाखांचा खर्च समोर उभा राहतो तेव्हा पैसे आणायचे कुठून? सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी विमा योजना सुरू केली. बऱ्याच राज्यांनी ही योजना लागू केली; पण फक्त दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी. निम्न मध्यमवर्ग या वर्गाचे काय? अशा अचानक ठाकलेल्या संकटावेळी कागदपत्रे गोळा करणे आणि पैसे उभे करणे कठीण होते. सरकारने इन्शुरन्सचा आधार घेतला, कारण आपली आरोग्य व्यवस्था तेवढी बळकट नाही.

कोरोनाच्या काळात सरकारने ही सवलत सर्वांना लागू केली होती; पण ते तसे कायम राहणार नाही. अशा दुर्धर आजारात पैसे घेऊन कर्जबाजारी व्हावे लागते, घर विकावे लागते, शेती विकावी लागते, अनुपस्थितीमुळे नोकरी जाते, कर्जबाजारी व्हावे लागते आणि या सर्व यातायातीनंतर बऱ्याच वेळा रुग्णही जातो. कोरोना या महामारीमध्ये मृत्यू पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना काही तरी भरपाई कोर्टाच्या आदेशानुसार अनेकांना मिळाली; परंतु इतर आजारांबाबत हे आजतरी होत नाही, ही परिस्थिती दुर्दैवाने बऱ्याच कुटुंबांवर येते.

त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येऊन अशा दुर्दैवी कुटुंबांसाठी एखादा निधी उभारला पाहिजे, जिथे रुग्ण गेल्यावर कर्जात बुडालेल्या दुःखी कुटुंबाला जीवन जगण्यासाठी मदत होईल. निदान अशा वृद्धाची काळजी करणारे वृद्धाश्रम तरी समाजसेवी संस्थांनी चालवले पाहिजेत; परंतु ही एक मोठी जबाबदारी आहे. काही संस्था चांगले काम करतही आहेत; परंतु आवश्यकतेपेक्षा ते खूप कमी आहे. आरोग्यशास्त्र असे आहे की सर्व रोग नेहमी बरे होतात, असे नाही. त्यामुळे आप्त गमावून पुढे जगणे कठीण झालेल्या कुटुंबांना मदत करणे हा सामाजिक प्रश्न आपण सर्वांनी पुढे होऊन सोडविला पाहिजे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com