सर्व रुग्ण समान आम्हा!

केईएम रुग्णालयात काम करताना विविध स्वभावाची माणसे भेटली. एक डॉक्टर म्हणून आपण आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे, मग तो रुग्ण कोणी असो.
Hospital Patients
Hospital Patientssakal
Summary

केईएम रुग्णालयात काम करताना विविध स्वभावाची माणसे भेटली. एक डॉक्टर म्हणून आपण आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे, मग तो रुग्ण कोणी असो.

- डॉ. अविनाश सुपे

केईएम रुग्णालयात काम करताना विविध स्वभावाची माणसे भेटली. एक डॉक्टर म्हणून आपण आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे, मग तो रुग्ण कोणी असो. श्रीमंत, गरीब, सज्जन, दुर्जन. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवायची नाही किंवा त्यांना कधीही काही काम सांगायचे नाही. हा मंत्र घोळवत मी केईएममध्ये अनेक वर्षे काम केला. आज मागे वळून बघताना मला माझ्या कामाचे समाधान आहे.

महानगरपालिकेच्या मोठ्या रुग्णालयात सर्व स्तरांतील रुग्ण येत असतात. अर्थात गरीब रुग्णांची संख्या जास्त असते, कारण त्यांना दुसरीकडे उपचार घेण्याचा पर्याय नसतो. श्रीमंत येतात, कारण त्यांना सेकंड ओपिनियन म्हणजेच तज्ज्ञांकडून सल्ला किंवा दुजोरा हवा असतो. आपण फसवले जात नाही, याबाबत त्यांना मार्गदर्शन किंवा उपचार हवे असतात. केईएममध्ये तुरुंगातील कैदी, पोलिसांनी आणलेले गुन्हेगारसुद्धा येत असतात. यातलाच एक प्रकार म्हणजे टोळीयुद्धातील जखमी.

केईएम रुग्णालयाच्या परिसरातील वस्त्यांमध्ये नेहमी टोळीयुद्धे होत असत. सुरुवातीच्या काळात बल्ब, ट्युबलाईट, बाटल्या फेकून मारामाऱ्या होत आणि जखमी येत. १९८०च्या दशकात त्या लोकांनी वेगळी क्रूर पद्धत अवलंबिली. एक मोठी दोन-तीन फुटांची गुप्ती ते वापरत. माणसाला ओणवे पाडायचे आणि त्याच्या गुदद्वारातून किंवा बाजूने गुप्ती घुसवायची आणि फिरवायची. त्यामुळे त्या जागेतील अनेक महत्त्वाच्या अवयवाना इजा होत असे. असे रुग्ण बहुतांशी रुग्णालयापर्यंत पोचत नसत, कारण रक्तवाहिन्या फाटून रक्तस्राव होऊन ते मरत; पण काही पोचले तरी त्यांचे आतडे, मूत्राशय, मूत्रनलिका, किडनी, लिव्हर इतक्या गोष्टी फाटलेल्या असायच्या. आम्ही त्या शिवूनसुद्धा त्यातील एखादाच वाचायचा. त्यानंतर पिस्तुलांचा जमाना आला आणि बंदुकीच्या गोळ्यांनी जखमी झालेले रुग्ण येऊ लागले.

एकदा केईएमच्या दुसऱ्या मजल्यावर गोळीबार झाला होता. याच काळात टोळीयुद्ध संपवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम काढली होती. पोलिसांचे अधिकार वाढल्यामुळे पोलिस अशा बंदूकधारी गुन्हेगारांचा दिसेल तिथे खात्मा करत असत. ते गुन्हेगार रुग्ण आमच्या वॉर्डमध्ये दाखल झाले, की त्यांना पोलिस ताब्यात घेऊ शकत नसायचे. बऱ्याच वेळा हे रुग्ण पोटात दुखते किंवा काही जखमा घेऊन आमच्या वॉर्डात दाखल होत असत.

एक दिवस असाच टोळीयुद्धातील एक जखमी धावत-धावत रुग्णालयात आला. मार्डचा संप सुरू होता आणि आम्ही ड्युटीवर होतो. त्याने मला बघताच म्हटले, ‘‘अरे, सुपेसाहेब तुम्ही आहात? मग मी वाचलो.’’ आम्ही त्याच्या प्लिहेमधली गोळी काढली आणि मग पोलिस त्याला घेऊन गेले. पुढे तो जामिनावर सुटला. असे गंभीर रुग्ण बरेच दिवस वॉर्डमध्ये राहायचे. एकदा मी वॉर्डमध्ये असताना पोलिस आले आणि मला म्हणाले, हा टोळीयुद्धातला शूटर आहे. तुमच्याकडे दाखल झालेला आहे. याच्या सुरक्षेसाठी वेगळी खोली लागेल. आम्ही त्यांना वॉर्डमधली बाजूची खोली दिली.

अधिष्ठात्यांच्या परवानगीने त्यांनी एका दिवसात त्या साध्या खोलीची वॉलपेपर लावून आणि इतर साधनांसह हॉटेलसारखी त्यांच्या खर्चाने करून टाकली. मला वाटले असा पैसा असलेले गुन्हेगार रुग्ण त्यांना आपण वाचवायचे आणि उद्या ते कोणाच्या तरी मृत्यूचे कारण होणार, मग अशा लोकांना आपण उपचार करून वाचवायचे की सोडून द्यायचे? मनाची दोलायमान स्थिती झाली.

या वेळी माझे गुरू बापट सर, (ते आणि मी एकाच वॉर्डमध्ये काम करायचो) त्यांनी मला सांगितले, ‘‘अविनाश, आपण डॉक्टर आहोत. कुठली व्यक्ती आपल्याकडे येते हे आपण बघायचे नाही. आपण त्या व्यक्तीला काय आजार आहे, तेवढेच बघायचे आणि उपचार करायचे. मग तो रुग्ण गुन्हेगार असो, रस्त्यावरील भिकारी असो किंवा मोठे अधिकारी व मंत्री असो. त्यांच्याशी फार जवळीक नको किंवा त्यांचा तिरस्कारही नको.’’ त्यांचा उपदेश माझ्या मनाला फार भावला. मी तो पुढे कायम लक्षात ठेवला आणि आचरणात आणला.

पुढची अनेक वर्षे वेगवेगळे रुग्ण आले त्यांना उपचार देताना मी ते तत्त्व तंतोतंत पाळले. आपण त्यांच्याशी बोललो तर लक्षात येते. ही माणसे परिस्थितीची शिकार झालेली आहेत आणि त्यांना त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्य नसते. सुरुवातीस जरी काही माणसे आली तरी नंतर या रुग्णांकडे इतर कोणी फारसे येत नाहीत. फक्त त्याची आई किंवा बहीण जी अत्यंत साधी माणसे असतात. त्यांची मला फार दया येत असे. तुरुंगातील मोठ्या व्यक्तीसुद्धा आमच्या वॉर्डमध्ये येत होत्या. छोटाशा आजाराचे निमित्त करून तुरुंगाऐवजी वॉर्डमध्ये राहण्यासाठी प्रयत्न करत असत.

अनेक वेळा माजी मंत्री, मोठे धंदेवाईक, प्रसिद्ध व्यक्ती हेदेखील आमच्या वॉर्डमध्ये रुग्ण म्हणून तुरुंगातून दाखल झाले आहेत. एकदा तर एका माजी मंत्र्याला तुरुंगात असताना पंचतारांकित रुग्णालयात उपचार हवे होते. न्यायालयाने त्याला सांगितले केईएममध्ये तुमच्यावर डॉ. सुपेंच्या वॉर्डमध्ये उत्तम उपचार होतील. सुरवातीस त्यांना आमच्या वॉर्डमध्ये दाखल व्हायचे नव्हते. सर्व स्तरावरील व्यक्तीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. समाजातील या समस्यांवर आपल्याकडे उत्तर नसते; परंतु अशा वेळी खंबीरपणे रुग्णाला जे आवश्यक आहे, योग्य आहे तेच केले पाहिजे. त्यांना केईएममध्ये दाखल करून आम्ही त्यांचा जीव वाचवला.

केईएम रुग्णालयात काम करताना विविध स्वभावाची माणसे भेटली. एक डॉक्टर म्हणून आपण आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे, मग तो रुग्ण कोणी असो. श्रीमंत, गरीब, सज्जन, दुर्जन. त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेवायची नाही किंवा त्यांना कधीही काही काम सांगायचे नाही. हा मंत्र घोळवत मी केईएममध्ये अनेक वर्षे काम केला. आज मागे वळून बघताना मला माझ्या कामाचे समाधान आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com