आयुष्य बदलणारा आजार

कर्करोग, स्वादुपिंडदाह, पक्षाघात किंवा मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होण्यासारखे आजार सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यावर वज्राघात करतात.
आयुष्य बदलणारा आजार
Summary

कर्करोग, स्वादुपिंडदाह, पक्षाघात किंवा मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होण्यासारखे आजार सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यावर वज्राघात करतात.

- डॉ. अविनाश सुपे

कर्करोग, स्वादुपिंडदाह, पक्षाघात किंवा मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव होण्यासारखे आजार सुरळीत सुरू असलेल्या आयुष्यावर वज्राघात करतात. अनपेक्षितपणे आयुष्यामध्ये इतके बदल होतात, की मग तुम्हाला स्वतःचीच काळजी घेणे कठीण होऊन जाते. शुश्रूषा करायलाही कुणी नसते. अशावेळी रुग्णाने हतबल न होता केलेली उपाययोजना अनेकांना प्रेरणादायी ठरते. अशाच एका रुग्णाची गोष्ट...

ही गोष्ट आहे डिसेंबर १९८४ ची. मी आणि माझा सहकारी डॉ. हिलरी नाझरेथ लखनौला एका परिषदेसाठी निघालो होतो. आम्ही सेकंड क्लास स्लीपर डब्यातून प्रवास करीत होतो. मधूनमधून आजूबाजूला जे सहप्रवासी होते, त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात झाली. त्या सहप्रवाशांमध्ये रमेश नावाचे साधारण पंचावन्न वर्षांचे गृहस्थ होते. त्यांनी सांगितले की, ते एका सर्जिकल कंपनीसाठी काम करतात. तेसुद्धा आमच्याबरोबर इंस्ट्रूमेंटस वैद्यकीय साधने घेऊन त्या परिषदेसाठी निघाले आहेत. आमची जास्त जवळीक झाली आणि त्यांना कळलं की आम्ही डॉक्टर/सर्जन आहोत. त्यांनी त्यांचा एक अनुभव सांगितला, जो मन हेलावून टाकणारा होता.

साधारण १९७२ च्या सुमारास त्यांना गुदद्वाराचा कर्करोग झाल्याचे लक्षात आले. त्या वेळी ऑपरेशन करून त्यांचे गुदद्वार काढण्यात आले. शौचाची जागा होती ती पोटावर करण्यात आली. १९७२-७३ साली अद्ययावत उपकरणे नव्हती. त्यामुळे पोटातून बाहेर येणारे शौच त्यांना पंचाने पुसावे लागले. इतर काही साधने उपलब्ध आहेत, याची कोणी त्यांना त्या वेळी माहितीसुद्धा दिली नाही. शरीराला वास येऊ लागला आणि कुटुंबीयांकडूनसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली. त्यांना इतके नैराश्य आले की, ते इंद्रायणी काठी आळंदीला जाऊन राहू लागले. जवळजवळ बारा वर्षे तिथे ते राहिले. शौच झाल्यानंतर ताबडतोब पाण्याचा वापर करून ते स्वच्छता पाळत असत.

साधारण १९८०-८२ च्या सुमारास त्यांना कोणीतरी सांगितले की, टाटा रुग्णालयात ऑस्टोमी असोसिएशन आहे, तिथे श्रीमती अंजली पटवर्धन यांनी शौचाची जागा पोटावर असते, अशा रुग्णांसाठी वेगळी उपकरणे वापरून, कॉलोस्टोमी बॅग लावून, रुग्णांना प्रशिक्षण देऊन त्यांचे आयुष्य सुरळीत करता येते. ते टाटा रुग्णालयात जाऊन सर्व शिकले; पण त्या वेळी त्या पिशव्या आणि उपकरणे फार महाग होती. बॅग्स खूप वेळा बदलाव्या लागत. हताश न होता हे काम अखंड करून त्यांनी आपले आयुष्य रुळावर आणले आणि शिकून आता ते या कंपनीत काम करीत आहेत. ते आता कुटुंबीयांबरोबर पुन्हा राहत आहेत.

ज्या माणसाला पोटावर त्याची शौचाची जागा आहे, तो एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही. त्याला शौचाची पिशवी बदलावी लागते. तो बारा-बारा तास काम करू शकत नाही. पार्टीला, समारंभात जाताना पण काळजीपूर्वक जावे लागते. अर्थात ज्यांना सर्व सुविधा उपलब्ध आहेत किंवा आर्थिक अडचण नाही, त्यांना ते थोडे सोपे जाते; पण अनेक रुग्ण शेतकरी किंवा कामगार असतात त्यांच्यावर अनेक बंधने येतात. कित्येकदा त्यांचे कुटुंबीय दुरावतात. काही आजारातून बाहेर येण्यासाठी तुम्हाला खूप आधाराची आणि आर्थिक पाठबळाची गरज असते. तेव्हा आपण या सर्वांची कल्पना रुग्णांना आणि नातेवाईकांना दिली पाहिजे. अशा प्रकारचे रुग्ण ज्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल होतो तेव्हा आपण सर्वांनी त्यांच्याबरोबर एक समाज, सामाजिक कर्तव्य म्हणून उभे राहायला पाहिजे. त्यासाठी रुग्णाची मानसिकता, कणखरपणा महत्त्वाचा असतो.

लहानपणी आमच्याकडे एक नातेवाईक गावावरून आले होते. त्यांना स्वरयंत्राच्या कॅन्सर होता. ऑपरेशन करताना त्यांचे स्वरयंत्र काढून टाकले होते. ते काढल्यानंतर मात्र त्यांना बोलता येईना. त्यांना अत्यंत त्रास व्हायला लागला. कारण ते उत्तम शिक्षक होते. बोलणे हा त्यांचा आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये व्यवसाय होता आणि स्वरयंत्र गेल्यानंतर पुढे काय करणार, असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे होता. त्यांनी त्यातून उभारी घेतली. त्यांची ट्रॅकियास्टोमी झालेली असल्यामुळे ते त्यावर बोट ठेवत आणि अन्ननलिकेतून बोलत असत. हळूहळू त्यांनी संवाद कौशल्य होतं, ते पुन्हा मिळवून आयुष्य यशस्वी केलं. मोठ्या आजारामध्ये एकदम आयुष्य बदलण्याची वेळ येते, अशा वेळी नवीन उपकरणे, त्याचा योग्य वापर, तज्ज्ञांचा सल्ला आणि जिद्द यातून बदललेले आयुष्य रुग्ण चांगल्या पद्धतीने जगू शकतात आणि इतरा रुग्णांसाठी आदर्श उभा करू शकतात.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com