
चेहरा भाजल्याने आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या सुधाकरचे आम्ही बाह्यस्वरूप सुधारण्याचे कसोशीने प्रयत्न केले.
रुग्णाचे पुनर्वसन
- डॉ. अविनाश सुपे
चेहरा भाजल्याने आमच्या रुग्णालयात दाखल झालेल्या सुधाकरचे आम्ही बाह्यस्वरूप सुधारण्याचे कसोशीने प्रयत्न केले; पण त्याच्या मनातील अंधार आम्ही दूर करून त्याला प्रकाशाची वाट दाखवू शकलो नाही, ही खंत मनात राहिली.
साधारणपणे १९८१ मध्ये ज्या वेळी मी प्लास्टिक सर्जरी कक्षात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या कक्षात एक सुधाकर नावाचा रुग्ण होता. पंधरा-सोळा वर्षांचा तो गोव्यामधला मुलगा. गॅसवर काम करताना सिलिंडरचा स्फोट होऊन त्याचे तोंड जळाले होते. त्याचे फक्त डोळे उघडे असायचे. नाक थोडेसे राहिलेले. ओठ आणि कान वाकडे झालेले. मानही जळाली होती. बाकी सगळे शरीर म्हणजे हात-पाय व्यवस्थित होते; परंतु तो अत्यंत विद्रूप दिसत होता. सुरुवातीला त्याला बघून भीतीच वाटायची, पण त्याच्याशी बोलायला लागल्यावर लक्षात आले, की तो अत्यंत चांगला मुलगा आहे. आई-वडिलांनी त्याला बहुतेक सोडून दिलं आणि तो आमच्या कक्षामध्येच काही वर्षे राहत होता. हळू हळू तो रुळला आणि नंतर आम्हाला नेहमी मदतही करत असे. आम्ही राऊंड घेत असू किंवा रुग्णांचे ड्रेसिंग करायचो, तेव्हा प्लास्टिक वॉर्डमध्ये एकेका दिवशी चाळीस चाळीस ड्रेसिंग करावी लागायची. तो अनेक छोट्या छोट्या गोष्टी करून आम्हाला मदत करत असे. कालांतराने सुधाकर कक्षाचा एक अविभाज्य भाग झाला.
आम्ही त्याच्यावर अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियासुद्धा केल्या. त्यात एक लॅटिसिमस डॉर्सी फ्लॅप होती. म्हणजे तुमच्या पाठीवरच्या स्नायू आणि त्वचा एका विशिष्ट आकारात कापून ती रक्तप्रवाहासह पूर्ण मानेवर आणि ओठाखाली ठेवून पूर्णपणे नवीन चेहरा बनवायचा. त्या वेळी भारतामधील पहिली अशी शस्त्रक्रिया होती, ती यशस्वी झाली.
सुधाकरच्या चेहऱ्यावर सगळीकडे भाजल्याचे व्रण असल्यामुळे दर दोन महिन्यांनी ऑपरेशन करावे लागायचे. पापण्या असतील तिथे कुठली तरी स्कीन काढून लावायची किंवा हाताच्या बोटांवर छोटी शस्त्रक्रिया करायला लागायची. सुधाकरही एकटा त्या सर्व शस्त्रक्रियांना न घाबरता सामोरे जायचा. आमच्या वॉर्डातील परिचारिका, कर्मचारी व डॉक्टर्स त्याची सर्व काळजी घेत असू. डॉक्टर गोलेरिया सरांनी त्याला ठीकठाक करण्यासाठी त्याच्या दुसऱ्या बाजूच्या कमरेच्या चामडीवर त्याचे नाक, कपाळ हे सगळं नव्याने तयार करून, त्याची मायक्रोवस्क्युलर सूक्ष्म रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रियाही नंतर करवली. त्याच्यावर विविध सर्जरी करून आम्ही सातत्याने त्याला एक नवीन रूप देण्याचा प्रयत्न केला. तो हळूहळू चांगला झाला. भाजल्यामुळे त्याचा चेहरा थोडासा विद्रूप दिसायचा; पण हळूहळू त्याला चांगला करायचा प्रयत्न चालला होता. सुधाकर साधारण आमच्या वॉर्डमध्ये अकरा ते बारा वर्षं त्या वेळी राहिला. नंतर मी मात्र दुसरीकडे गेलो. जेव्हा जेव्हा प्लास्टिक सर्जरी कक्षात काही कामासाठी जायचो, तेव्हा सुधाकरला भेटल्याशिवाय पुढे जात नव्हतो. सुधाकर मुळात सर्वांना मदत करणारा होता. नव्वदीच्या दरम्यान आम्ही कुठे सहलीला गेलो तर त्यालाही सोबत घेऊन जायचो. नंतर काही भेटीमध्ये मात्र तो थोडासा उदास दिसला होता. एक दिवस सकाळी बातमी आली, की आमच्या हॉस्पिटलच्या बिल्डिंगवर जाऊन त्याने आत्महत्या केली. आम्हा सर्वांना धक्का बसला.
त्याने आत्महत्या का केली? एवढे सगळे केल्यानंतरही पुढे नोकरी मिळेल का? आपले भविष्य काय? या चिंतेने त्याने आत्महत्या केली असावी का, असा प्रश्न मला पडत होता. एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारची विद्रूपता किंवा व्यंग आले तर आपला समाज त्याला मोकळ्या मनाने स्वीकारत नाही, हे वास्तव टाळता येत नाही. प्रगत देशामध्ये समाज अशा व्यक्तींना स्वीकारतात आणि सन्मानाने जगू देतात. त्या काळामध्ये तर आपला समाज इतका कठोर आणि ताठर होता, की अशा व्यक्तींचे पुनर्वसन करणे हे फार त्रासाचे होते.
एखादी व्यक्ती विद्रूप झाली किंवा त्याचा हात किंवा पाय तुटला किंवा व्यंग आले की आपल्याकडे अशा संस्था पाहिजेत, ज्या अशा व्यक्तींचे पुनर्वसन करू शकतील. त्यांचे जीवन सुरळीत करून देऊ शकतील. त्याला पुन्हा मार्गी लावू शकतील. अशा प्रकारच्या संस्था आपल्याकडे फार कमी आहेत. त्यांची संख्या वाढण्याची गरज आहे. सुधाकरचे पुनर्वसन त्या वेळी झाले असते, तर त्याला कुठे छोटीशी नोकरी मिळून, त्याचे आयुष्य मार्गी लागले असते. त्याला मानाने जगण्याचा काही स्रोत उपलब्ध झाला असता, त्याने आत्महत्या केली नसती. त्याच्यावर सगळ्यांनी एवढे कष्ट करून, अनेक सर्जरी करून त्याचा चेहरा जरा चांगल्या स्वरूपात करण्याचा प्रयत्न केला होता. आमच्या अत्यंत व्यग्र पेशात आम्ही त्याचे बाह्य स्वरूप सुधारण्याचे कसोशीने प्रयत्न केले; पण त्याच्या मनातील अंधार आम्ही दूर करून त्याला प्रकाशाची वाट दाखवू शकलो नाही ही खंत मनात राहिली. अशा या होरपळलेल्या जीवांना, त्यांचे अशांत मन शांत करण्यासाठी मानसोपचार आणि त्यांचे पुनर्वसन करणे काळाची गरज आहे. आपल्या समाजातली ही एक त्रुटी आहे आणि त्याच्यावर सेवाभावी संस्थांनी आणि आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार करायला हवा.
(लेखक मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून अलीकडेच त्यांचे ‘सर्जन’शील हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित झाले आहे.)
Web Title: Dr Avinash Supe Writes Patient Rehabilitation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..