

Children's Health Books
esakal
गोष्टी या आदिकाळापासूनच आपल्या चिमुरड्यांपर्यंत आवश्यक ज्ञान पोहोचवण्याचे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्याचे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याचे प्रभावी माध्यम ठरल्या आहेत. गोष्टी सांगणारं मुलांच्या आयुष्यातील सगळ्यात प्रेमळ नातं असतं - आजी-आजोबा. त्यांच्या आवाजातला स्नेह, शब्दांतली ऊब आणि अनुभवांची शिदोरीच या कथांमध्ये जीव ओतते.
पंचतंत्र, हितोपदेश, जातककथा यांसारख्या कथांनी मानवी जीवनातील गुंतागुंत अत्यंत सोप्या शब्दांत पिढ्यान्-पिढ्या उलगडून दाखवण्याचं काम केलं व ते आजही सुरू आहे. मात्र, आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्राचे संपूर्ण आणि शास्त्रशुद्ध ज्ञान, तेही लहान मुलांना समजेल अशा पद्धतीने पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न आगळा-वेगळा आहे. हा प्रयत्न डॉ. भूषण पटवर्धन यांनी आपल्या नाती चित्रा आणि मिराया यांच्या सहकार्याने ‘आयुर्वेद फॉर किड्स’ या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे. आयुर्वेदाचे इतके सुंदर, सोपे आणि बालसुलभ रूप त्यांनी मांडले आहे की, हे ‘भूषण आजोबा’ केवळ त्यांच्या नातींचेच नव्हे, तर असंख्य मुलांचे ‘आयुर्वेदिक आजोबा’ ठरणार आहेत.