अजोड सत्यनिष्ठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ravish kumar

रवीशकुमारचे अल्हाददायक व्यक्तिमत्त्व, आकर्षक चेहरा, त्याचे ते ‘ट्रेडमार्क हास्य’, त्याची विद्वत्ता आणि मुलाखतीत प्रश्न विचारण्याची वैशिष्ट्यपूर्ण हातोटी केवळ यामुळे तो अद्वितीय आणि उत्तम अँकर ठरत नाही.

अजोड सत्यनिष्ठा

रवीशकुमारचे अल्हाददायक व्यक्तिमत्त्व, आकर्षक चेहरा, त्याचे ते ‘ट्रेडमार्क हास्य’, त्याची विद्वत्ता आणि मुलाखतीत प्रश्न विचारण्याची वैशिष्ट्यपूर्ण हातोटी केवळ यामुळे तो अद्वितीय आणि उत्तम अँकर ठरत नाही. यापलीकडे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि सत्ताधारी व्यवस्थेने अभिव्यक्तिस्वातंत्र्याची उडवलेली खिल्ली याला थेट आव्हान देण्याचे धाडस त्याच्याजवळ आहे. आजही तो सत्य आणि केवळ सत्यच सांगत आहे. ही अजोड सत्यनिष्ठा आणि विलक्षण धैर्य यामुळेच रवीशकुमार एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतो.

टीव्ही माध्यमावर स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे रवीशकुमार यापुढे ‘प्राइम टाइम’ न्यूजमध्ये ऐकू येणार नाहीत आणि दिसणार नाहीत... या बातमीने त्यांच्या लाखो चाहत्यांप्रमाणेच मीसुद्धा अत्यंत निराश झालो आहे. या निराशेची वेदनादायी जातकुळी अत्यंत वेगळी आहे. महात्मा गांधींची हत्या किंवा बाबरी मशीद विध्वंसामुळे निर्माण झालेली हतबल निराशेची भावना किंवा बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडून दिल्यावर निर्माण झालेल्या तीव्र संतापाच्या भावनेच्या अनुभवाशी जुळणारी ही वेदना आहे. रवीशकुमार यांना एखाद्या दूरदर्शन वाहिनीच्या न्यूजरूमचा निरोप घ्यावा लागणे, हे निश्चितपणे भारतातील आजच्या प्रसारमाध्यमांच्या अवस्थेवरील गंभीर भाष्य आहे.

रवीशकुमारची घराघरांत इतकी लोकप्रियता आहे, की त्याचा उल्लेख रवीश अशा घरगुती संबोधनाने होतो. गेल्या काही वर्षांत चढत्या क्रमाने लोकप्रिय होत गेलेल्या रवीशकुमारने भारतीय नागरिकांच्या सदसद्विवेक बुद्धीचे प्रवक्तेपण यशस्वीपणे सांभाळले आहे. देशभरात पसरलेल्या त्याच्या लाखो चाहत्यांना रोज संध्याकाळी टीव्हीसमोर बसून नेमके आपल्याच मनातील विचार व्यक्त करणारा त्याचा ‘प्राइम टाइम’ पाहायची आणि ऐकायची जणू सवय लागली आहे. त्याने आपल्या चाहत्यांच्या हृदयात असे अढळ स्थान मिळवले आहे. आजच्या फेक न्यूजच्या जमान्यात आणि मुक्त अभिव्यक्तीचा परीघ वेगाने आकुंचित पावणाऱ्या कालखंडात तो आपल्या प्रेक्षकांच्या मनातील विचार आणि चिंता व्यक्त करत राहतो. त्याचे चाहते केवळ भारतातच नाहीत, तर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहेत. हिंदी भाषा बोलल्या जाणाऱ्या जगाच्या सर्व भागांत लोक रवीशकुमारला ऐकतात, पाहतात, त्याचे ब्लॉग डाऊनलोड करतात, टीव्हीवरील त्याचे कार्यक्रम यूट्युबवर पाहतात, आपल्या मित्रमंडळीत त्याचे सर्क्युलेशन करतात. रवीशकुमार म्हणजेच ‘दैनिक भारतीय वृत्त’ असे समीकरण तयार झाले आहे.

त्याच्या या दर्जेदार कामामुळेच त्याला रोमन मॅगसेसेसह अनेक गौरव प्राप्त झाले आहेत. २०१६ मध्ये त्याला बॉम्बे प्रेस क्लबने सर्वोत्तम पत्रकार पुरस्काराने गौरवले होते. सर्वोत्तम पत्रकारितेसाठी दिला जाणारा रामनाथ गोयंका पुरस्कार त्याला २०१३ आणि २०१७ असा दोन वेळा प्रदान करण्यात आला होता. त्याच वर्षी म्हणजे २०१७ मध्येच कुलदीप नायर फाऊंडेशन पत्रकार पुरस्कारानेही तो सन्मानित आहे. याशिवाय मानाचे समजले जाणारे अन्य अनेक पुरस्कार रवीशकुमारला मिळाले होते. गौरी ट्रस्टतर्फे पहिल्या ‘गौरी लंकेश स्मृती पुरस्कारा’साठी पात्र मानकऱ्याची निवड करणाऱ्या निवड समितीला रवीशकुमार याच्या नावावर एकमत करण्यासाठी एक क्षणाचाही वेळ लागला नव्हता. जेमतेम चाळिशीत असलेल्या या तरुण पत्रकारात असे काय वेगळे आहे? रवीशकुमारची पार्श्वभूमी अस्सल भोजपुरी आहे. त्याचे सर्व शिक्षण भारतात झालेले आहे. तो अगदी सुरुवातीपासून, कायम हिंदी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. तरीही त्याने आज संपूर्ण भारतात आपला प्रचंड चाहता वर्ग निर्माण केला आहे. आपल्या पत्रकारितेची विश्वासार्हता सर्वोच्च स्थानी पोहोचवली आहे.

रवीशकुमार हा काही आक्रमक टीव्ही अँकर नाही. संवाद साधत असलेल्या व्यक्तीवर तो कधीही ओरडताना तुम्हाला दिसणार नाही. त्याचा प्रत्येक कार्यक्रम अतिशय अभ्यासपूर्ण माहितीने सजलेला असतो. रवीशकुमार त्याच्या समकालीन अन्य काही अ‍ॅंकरप्रमाणे कोणी तरी विद्वान माणूस आहे असेही भासणार नाही. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे तो संवाद करत असलेल्या व्यक्तीचे म्हणणे अतिशय काळजीपूर्वक आणि उत्कटतेने ऐकत असतो. त्याच्यामधील अद्वितीय अशी आंतर्यामी चौकस बुद्धी आणि स्वतंत्र वैचारिक दृष्टिकोन शांत आणि त्रयस्थपणे समोर ठेवण्याची क्षमता त्याचे वैशिष्ट्य आहे. तो कधीही समोरच्या व्यक्तीला आपण अ‍ॅंकर आहोत याचे दडपण येऊ देत नाही किंवा त्या व्यक्तीचे अनावश्यक कौतुक करून मोठेपण बहाल करत नाही. रवीशकुमारच्या सर्व कार्यक्रमांत तो अलिप्त पण त्याच वेळी तटस्थ असतो. तरीही अतिशय ठाम आणि सतर्क असतो. आपल्या प्रेक्षकांशी बोलत असताना तो दोन वाक्यांमध्ये एखादे अर्थपूर्ण स्मित हास्य करतो. ही त्याची लकब त्याची ‘ओळख’ बनली आहे. त्या एका विशिष्ट स्मितहास्यातून आपल्या संवेदनशील प्रेक्षकापर्यंत तो खूप काही पोहचवत असतो. भारतीय प्रसार माध्यमाच्या खालावलेल्या स्थितीविषयी एक विषादाची भावना त्यात व्यक्त होते. तसेच एकूण भारतीय प्रसारमाध्यमे कशी पोकळ ढोल बडवणाऱ्यांचा आखाडा बनली आहेत, असेही त्या हास्यातून तो कधी ध्वनित करतो. कधी तो त्या हलक्याशा स्मितहास्यातून भोवतालच्या राजकीय परिस्थितीबद्दल एक तुच्छता, चीड, उपहास व्यक्त करत असतो, पण असे काही व्यक्त करताना त्यामागे रवीशकुमार नावाच्या माणसाचे ठाम स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जाणवत राहते. जणू तो म्हणत असतो ‘‘मला माहीत आहे तुम्ही काय विचार करता, पण तरी हे माझं म्हणणं आहे.’’

रवीश आपल्या स्टुडिओत जातो ते पूर्ण तयारीनिशी. चौफेर वाचन करणारा तो पत्रकार आहे. आपली माहिती आणि बातम्यांचे तपशील अचूक असतील याची त्याने पूर्ण खात्री केलेली असते. एकदा त्याने मला त्याच्या ‘प्राइम टाइम’ या एक तासाच्या कार्यक्रमात ‘भारतीय भाषांची विविधता’ या विषयावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्याच दिवशी सकाळी माझ्या काही पुस्तकांचे प्रकाशन दिल्लीतील एका सभागृहात होणार होते. माझ्या लक्षात आले, की रवीशकुमार त्या संपूर्ण कार्यक्रमाला हजर होता. कार्यक्रम संपल्यावर तो शांतपणे तिथून निघून गेला, पण जाताना त्याने आपला नंबर माझ्या एका मित्राजवळ देऊन ठेवला होता. मी त्या रात्री ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमात मुलाखतीसाठी एनडीटीव्ही स्टुडिओमध्ये यावे, असा निरोपही ठेवला होता. माझी अपेक्षा होती, की रवीशकुमार त्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाशी संबंधित काही प्रश्न विचारणार आहे, परंतु मी त्याला भेटलो तेव्हा त्याच्या हातात माझी दोन पुस्तके होती. त्याने ती दोन्हीही पुस्तके नीटपणे अभ्यासली होती. ती पुस्तके काही फार हलकीफुलकी नव्हती. ती पुस्तके वाचण्यासाठी त्याने नक्कीच किमान एक आठवडा खर्च केला असणार. एखाद्या टीव्ही अँकरने आपल्या कार्यक्रमासाठी इतकी मेहनत करणे अपेक्षित नव्हते. मी भेटलेल्या अनेक अँकर्समध्ये रवीशकुमार हा निश्चित सर्वोत्तम अँकर होता.

त्याचे अल्हाददायक व्यक्तिमत्त्व, आकर्षक चेहरा, त्याचे ते ‘ट्रेडमार्क हास्य’, त्याची विद्वत्ता आणि मुलाखतीत प्रश्न विचारण्याची वैशिष्ट्यपूर्ण हातोटी केवळ यामुळे तो अद्वितीय आणि उत्तम अँकर ठरत नाही; तर या सर्वांपलीकडे प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि सत्ताधारी व्यवस्थेने अभिव्यक्तिस्वातंत्र्याची उडवलेली खिल्ली याला थेट आव्हान देण्याचे धाडस त्याच्याजवळ आहे. त्याला दररोज प्रत्येक ‘प्राइम टाइम’ कार्यक्रमानंतर धमक्या दिल्या जातात. शिवीगाळ केली जाते. तरी जराही न घाबरता, विचलित न होता तो अतिशय शांतपणे आपले कार्य चालूच ठेवतो. आपला टीआरपी वाढावा म्हणून कोणत्याही पातळीवर झुकण्यासाठी, लोळण घेण्यासाठी अन्य अनेक अँकर्स सहजपणे तयार होतात, परंतु रविशकुमार मात्र आपल्या श्रोत्यांना पसंत पडले नाही, त्यांनी आपला कार्यक्रम बघितला नाही तरीही आपण आपल्याला हवे तेच आणि सत्य असेल तेच बोलणार, ही भूमिका कायम घेत आला आहे.

प्रसार माध्यमे आता सत्याची पाठराखण करत नाहीत हे आपल्या प्रेक्षकांना समजले पाहिजे, यासाठी आपल्या चॅनलचा ‘स्क्रीन काळा’ ठेवण्याचे धैर्य रवीशकुमारकडे आहे. फेक न्यूजविरुद्धची मोहीम, खोटेपणा, धाकदपटशा, वाढता भीतीचा माहोल आणि सामूहिक हिंसाचार अशा आजच्या विषाक्त वातावरणाविरुद्ध त्याचे धर्मयुद्ध अथकपणे सुरूच आहे.

बहुतेक माध्यमकर्मी प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन माध्यमांचे ऱ्हासपर्व अपरिहार्य आहे म्हणून स्वीकारू लागले आहेत; मात्र रवीशकुमार नावाच्या माणसाने आपले धैर्य गमावले नाही. आजही तो सत्य आणि केवळ सत्यच सांगत आहे. ही अजोड सत्यनिष्ठा आणि विलक्षण धैर्य यामुळेच तो एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व ठरतो. सध्याचे सत्ताधारी सत्तेवरून पायउतार झाल्यावर आणि विस्मृतीत गेल्यावर अनेक वर्षांनीसुद्धा त्याचे ‘टीव्ही प्रोग्राम्स’ स्वातंत्र्य आणि मुक्त अभिव्यक्ती या तत्त्वांची भारतीय प्रसारमाध्यमांच्या इतिहासातील प्रेरणादायी उदाहरणे म्हणून लोक परत परत आठवतील आणि पाहतील यात शंका नाही.

(लेखक प्रसिद्ध भाषातज्ज्ञ असून, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(मराठी रुपांतर : प्रमोद मुजुमदार)

टॅग्स :saptarang