
लोकशाहीचा सारा परिवेश आधुनिक पर्यावरणाशी जोडलेला असतो आणि भूतकाळ या कल्पनेशी लोकशाहीचे नाते हे अवघडलेपणाचे किंवा तणावाचे असते.
लोकशाहीचा सारा परिवेश आधुनिक पर्यावरणाशी जोडलेला असतो आणि भूतकाळ या कल्पनेशी लोकशाहीचे नाते हे अवघडलेपणाचे किंवा तणावाचे असते. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेशी लोकशाहीचे नाते कसे असू शकते, याचे आकलन सहज सुलभ नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ‘मिथक’ कसे हाताळू शकेल? या प्रश्नावर मानवी समाजात दीर्घकाळ निरुत्तरी वाद होणार आहे.
जगभरातील विचारवंत लोकशाहीच्या भवितव्याबाबत चिंतीत आहेत. लोकशाहीची कल्पना विसाव्या शतकात जशी केली गेली होती, त्या लोकशाहीबाबत तरी आता निश्चितच शंका निर्माण झाली आहे. या प्रश्नाबरोबर आणखी एक चिंताजनक प्रश्न आहे, तो म्हणजे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर जगातील व्यापक सामाजिक आणि राजकीय प्रणालींवर आम नागरिकांचे किती नियंत्रण राहू शकेल? आजची लोकशाहीशी आणि यांत्रिक स्मृती यांचा परस्पर संबंध किंवा नाते नेमके काय आहे; याबाबत आपले नेमके आकलन काय आहे? एखादी संकल्पना नैसर्गिक स्मृती ठरण्यासाठी ती ‘भूतकालीन संकल्पना’ म्हणून मान्य व्हावी लागते. या विश्वाच्या निर्मितीची सृजन प्रक्रिया आणि त्यानंतरची उत्क्रांतीची प्रक्रिया किती अमर्याद प्रदेश आणि पोकळी ओलांडत पार पडली आहे आणि त्या प्रक्रियेचा ‘काळ’ या संकल्पनेशी मेळ घालणे शक्य आहे का, याची आपल्याला कल्पनाही नाही; परंतु एकदा काळ ही संकल्पना तयार झाली आणि काळाचे वर्तमान ‘काळ’ आणि वर्तमानेतर ‘काळ’ अशी विभागणी एकदा केल्यावर स्मृती अपरिहार्यपणे काळाशी आपले नाते स्थापित करते.
स्मृती एकदा अस्तित्वात आली की, स्मृती आपल्या अस्तित्वाची मुद्रा अमर्याद अशा भूतकाळावर आपल्या उगम बिंदूपर्यंत कोरून ठेवते. स्मृतीच्या बाबत असे घडते, कारण स्मृती ही एक र्निर्मितीक्षम प्रक्रिया असते. स्मृती म्हणजे केवळ संकलन आणि नोंद प्रक्रिया नाही. अमर्याद भूतकाळ म्हणजे सर्वकालिक मागे जात राहणारा असा ‘तो’ किंवा ‘हा’, भूत‘काळ’ होता किंवा आहे. म्हणजेच स्मृती जरी केवळ एक गृहीत प्रमेय असले, तरी उत्सुकता ती शमवणारी बाब ठरते. अशा पद्धतीच्या वर्णनापलीकडची, पूर्वग्रहविरहित आणि भूतकाळ नसणाऱ्या स्मृतीला एक शक्तीचा दर्जा प्राप्त होतो. अशा स्मृतीकडे मग एखादी दैवी किंवा भौतिक शक्तीच्या रूपात बघितले जाऊ लागते. कधी त्या शक्तीला देवत्व प्राप्त होते किंवा सरकारी शक्तीचा दर्जा दिला जातो.
अत्यंत प्राथमिक अवस्थेत असणाऱ्या मानव समाजात देवऋषींच्या शब्दातून अशी शक्ती प्रगट होते, असे मानले जाई. त्या काळातील समाजात असा समज होता की, अशी अद्भूत शक्ती केवळ देवऋषींकडेच असते. अन्य कोणाकडे अशी शक्ती असू शकत नाही. राजा आणि त्याची राजसत्ता अशा पद्धतीची व्यवस्था म्हणजे लोकांवर शासन करण्यासाठी दैवी मान्यता असलेली समाज व्यवस्था असते. या व्यवस्थेच्या आरंभापासून सर्व स्मृतींची अचूक नोंद राजाकडे असते. राजाच्या शासनाखाली असलेल्या लोकांजवळ मात्र अशी दैवी मान्यता नसते.
‘हा’, तो किंवा ‘गतकाला’ - पलिकडचा भूतकाळ अशा मानवी विवेकाच्या आकलन क्षमतांपलीकडच्या कल्पना नाकारण्याच्या प्रबळ इच्छेतून लोकशाही संकल्पनेचा उगम झाला. विचार केला तर लक्षात येते, की विविध राष्ट्रांची ऐतिहासिक पार्श्वभूमी नक्कीच वेगवेगळी होती; पण तरीही सर्व राष्ट्रातील लोकांत लोकशाही व्यवस्था स्वीकारण्याची आणि लोकशाही सरकार ही प्रशासन व्यवस्था असावी, अशी राजकीय भूमिका सार्वत्रिकरीत्या स्वीकारली गेल्याचे दिसते. वास्तविक ही एक नवी सामाजिक, राजकीय व्यवस्था होती. त्यामुळे या आधीच्या काहीशा गुढ आणि दैवी स्वरूपाच्या व्यवस्थेशी संघर्ष होणे अपरिहार्य होते. शिवाय लोकशाही व्यवस्था अशा ऐतिहासिक टप्प्यावर अस्तित्वात आली की, त्याच काळात मानवी संवेदना प्रणालींना आव्हान देणारा, विज्ञान आणि आधुनिकतेचा पाया घालणाऱ्या विवेकवादाचा उगम झाला. परिणामी स्मृती आणि लोकशाही यामध्ये अधिकच तणावाचे नाते तयार झाले.
त्यापूर्वी शेकडो वर्षे काल्पनिक अशी आदर्श व्यवस्था हे भविष्याचे धुसर मिथक चित्र रंगवले जात असे. लोकशाही युगात भवितव्याबद्दलचे गुढ संपुष्टात आले आहे. लोकशाही युगात भविष्याबद्दलच्या कल्पनांना एक कार्यशक्तीचे रूप प्राप्त झाले. लोकशाहीपूर्व युगात हेच कार्य स्मृती करत होत्या. ज्ञानाचा मूलाधार म्हणून विवेकवादाचा उदय आणि लोकशाही हा सत्तासंबंधांचा गाभा या दोन्ही संकल्पनांचा उदय एकाच वेळी होणे हा ऐतिहासिक योगायोग होता का, हे सांगणे अवघड आहे; पण एक नक्की की तंत्रज्ञान-प्रेरित, अ-नैसर्गिक स्मृतींचा उगम हा थेट प्रत्यक्षपणे लोकशाही या संकल्पनेशी जोडलेला आहे. सिंग्मॉण्ड फ्रॉईडने मांडलेले स्वप्नांचे विश्लेषण असे दर्शवते की, दडपलेल्या नैसर्गिक स्मृती ही स्वप्नांची जन्मदात्री असते; पण कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मेमरी चिप याबाबत असेच साधर्म्य सांगता यईल का, हे सांगणे अवघड आहे. लोकशाही युगाच्या भवितव्याविषयी मेमरी चिप स्वप्नांची पेरणी करण्याची क्षमता असेल का?
कृत्रिम बुद्धिमत्ता ही सुसंघटित आणि प्रणालीबद्ध असते. स्वाभाविक किंवा नैसर्गिक स्मृतीप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्ता गतकालाबद्दल कोणताही निष्कर्ष काढत नाही. किमान अतिप्राचीन भूतकाळाविषयी काही निश्चित विधाने करत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या अतिप्राचीन भूतकाळाचे काल्पनिक गुढत्वात रूपांतर करत नाही किंवा त्याला देवत्व देत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वयंमान्य असते. कृत्रिम बुद्धिमत्तेला स्वत:च्या अस्तित्वासाठी कोणत्याही निर्मात्याची वा देवाच्या अधिमान्यतेची गरज नसते. कृत्रिम बुद्धिमत्तेची निर्मिती आणि ती निर्मिती कधी झाली किंवा कोणाची निर्मिती होती, हे संदर्भही पुसट होत गेलेले असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत:चीच निर्मिती असते. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत:च देव असते! लोकशाहीचा सारा परिवेश आधुनिक पर्यावरणाशी जोडलेला असतो आणि भूतकाळ या कल्पनेशी लोकशाहीचे नाते हे अवघडलेपणाचे किंवा तणावाचे असते. या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेशी लोकशाहीचे नाते कसे असू शकते, याचे आकलन सहज सुलभ नाही. लोकशाहीसाठी भविष्य म्हणजे मिथकासारखे असते. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ‘मिथक’ कसे हाताळू शकेल? या प्रश्नावर मानवी समाजांत दीर्घकाळ निरुत्तरी वाद होणार आहे. मानवी समाजासाठी पुढील अनेक दशके चालणारा हा संघर्ष आहे.
आपल्या मूलभूत स्वरूपामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ना कधी मिथक तयार करू शकत, ना कोणत्या स्वप्नांना जन्म देऊ शकत. मग कृत्रिम बुद्धिमत्ता काय करू शकते? तर कृत्रिम बुद्धिमत्ता अफवा, भासमय वास्तव निर्माण करू शकते; परंतु लोकांना संमोहित करू शकेल, अशी स्वप्नील दुनिया तयार करू शकेल. भविष्याच्या संदर्भात अफवा आणि भास यापेक्षा स्वप्नांचा अभाव ही स्थिती वेगळी आहे. त्यामुळेच मानवाने स्वप्ने आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, यातील सांधेजोड अलग करणे आवश्यक आहे; अन्यथा लोकशाही व्यवस्था खुरटत राहील. आजच्या घडीला भारतासह जगातील सर्व देशातील सरकारे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नागरिकांना शिस्त लावण्यासाठी आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करत आहेत. या प्रक्रियेमुळे लोकशाही व्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्ता स्वार होत आहे.
अर्थात, आपण अशा ऐतिहासिक टप्प्यावर पोहचलो आहोत, की कृत्रिम बुद्धिमत्तेचे केवळ अस्तित्वच नाही, तर वर्चस्व असलेल्या ज्ञान आणि समाजाच्या अस्तित्वाची आपण कल्पनाच करू शकत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव सर्वस्पर्शी ठरला आहे. मानवी मानसिकतेवर तंत्रज्ञानाने पकड निर्माण केली आहे. या पकडीतून लोकशाहीची मुक्तता करायची असेल, तर केवळ लोकशाहीच्या ‘अंतरिक शक्तीला’ आव्हान करून ते साध्य होणार नाही. लोकशाहीची ती अंतरिक शक्ती भारतातच नाही, तर अन्य सगळ्या देशातूनही कित्येक दशकांपूर्वीच लोप पावली आहे. काही लोकांच्या समजुतीप्रमाणे इतिहास आणि भूतकाळाचे अतिसामान्य स्वरूपाचे गुढवादी उदात्तीकरण केल्याने लोकशाही व्यवस्थेची तंत्रज्ञानाच्या पकडीतून सुटका करणे शक्य आहे; परंतु ते शक्य नाही, हे समजून घ्यायला हवे.
नैसर्गिक स्मृती आणि कृत्रिम स्मृती यातील अत्यंत मूलभूत विसंगतता समजून घेतली, तरच लोकशाही व्यवस्थेची तंत्रज्ञानाच्या पकडीतून सुटका होऊ शकेल; परंतु केवळ ‘आपला महान भूतकाळ’ हाच आपल्या राजकारणाचा मुख्य मुद्दा करण्याच्या आकांक्षेने पछाडलेले राजकीय पक्ष मानवी स्मृतींत होणाऱ्या मूलभूत परिवर्तनाचे आकलन आणि त्याचा शासन रचनेवर पडणारा मोठा प्रभाव समजण्यात अपयशी ठरल्याने पूर्णत: दिशाहीन ठरणार आहेत. आपल्या राजकारणाचा मुख्य आधार पूर्णत: तंत्रज्ञानावर आधारित असा भविष्यातील मानवी समाज निर्माण करता यईल, अशी धारणा असणारे राजकीय प्रवाह लोकशाही व्यवस्थेचा पाडाव अधिक वेगाने घडवतील. एकविसाव्या शतकात लोकशाही पोषक राजकारणासाठी ईश्वर आणि यंत्रमानव (रोबो) यांना एकमेकांसमोर येणे अपरिहार्य ठरणार आहे. त्यांच्यातील संघर्षातूनच भविष्यविषयक मिथक नव्याने उभारता यईल. त्यातूनच भूतकाळाची जाणीव असलेल्या ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’चा शोध लागू शकेल. ईश्वर आणि यंत्रमानवांना एकमेकांना भेटणे अपरिहार्य ठरणार आहे. लोकशाही दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यांना स्वत:त परिवर्तन करणे अटळ आहे.
(लेखक भाषाशास्त्रज्ञ असून, भारतीय बोलीभाषेचे संशोधक आहेत.)
अनुवाद : प्रमोद मुजुमदार