भारतीय राजकारणाच्या परिभाषेची समज

राजकीय परिभाषा म्हणून जे सांगितले जाते, ते मूळ राजकीय तत्त्वज्ञानाची व्यावहारिक मूलभूत तत्त्वे किंवा त्या तत्त्वप्रणालीची कार्यपद्धत नसते.
भारतीय राजकारणाच्या परिभाषेची समज
Summary

राजकीय परिभाषा म्हणून जे सांगितले जाते, ते मूळ राजकीय तत्त्वज्ञानाची व्यावहारिक मूलभूत तत्त्वे किंवा त्या तत्त्वप्रणालीची कार्यपद्धत नसते.

राजकीय परिभाषा म्हणून जे सांगितले जाते, ते मूळ राजकीय तत्त्वज्ञानाची व्यावहारिक मूलभूत तत्त्वे किंवा त्या तत्त्वप्रणालीची कार्यपद्धत नसते. परिभाषा म्हणजे कधी मूळ तत्त्वज्ञानाविषयी काही पूरक माहिती देणे, परिशिष्ट स्वरूपाची माहिती देणे. त्या तत्त्वज्ञानाबद्दल काही अतिरिक्त स्वरूपाचे व्याख्यान देणे; मात्र अशा परिभाषेत त्या तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे किंवा राजकीय कृती यांचा उल्लेख नसतो.

‘डिसकोर्स’ (Discourse) या इंग्रजी शब्दाला माझी मातृभाषा मराठीत समानार्थी शब्द नाही. त्याचप्रमाणे गुजराती आणि हिंदी या अन्य दोन महत्त्वाच्या भारतीय भाषांतही ‘डिसकोर्स’ या इंग्रजी शब्दाला समानार्थी शब्द असल्याचे मला तरी माहीत नाही. मराठी, गुजराती, हिंदी या भाषांत ‘डिसकोर्स’ या शब्दाचा पूर्ण अर्थ व्यक्त करायचा कोणी प्रयत्न केला तर मला खात्री आहे, की परिभाषा या संज्ञेचा वापर करणे अपरिहार्य ठरेल. परिभाषा ही संज्ञा संस्कृत भाषेपासून साधित झालेला शब्द आहे, परंतु डिसकोर्स आणि परिभाषा या दोन्ही शब्दांत शब्दार्थशास्त्राच्या बाजूने एक अर्थातील नाते दर्शवणारे साम्य जरूर आहे. ते म्हणजे परिभाषा आणि डिसकोर्स या दोन्ही शब्दांना उपसर्ग आहेत. परिभाषा या शब्दातील परि आणि डिसकोर्स शब्दातील ‘डिस’ हे दोन उपसर्ग. या उपसर्गांचा विचार केला तर हे नाते स्पष्ट होते. यापैकी परि या संस्कृत भाषेतून आलेल्या उपसर्गाचा विचार केला तर ‘परि’चा अर्थ परिघावरील- म्हणजे मुख्य, आवश्यक किंवा मध्यवर्ती नसलेला असा; तर डिसकोर्स या शब्दाचा लॅटिन भाषेतून आलेला उपसर्ग ‘डिस’ पाहा. या उपसर्गाचा एक अर्थ आहे ‘मृत्यू’ किंवा ‘अस्तित्वहीन’. याचा अर्थ कर्सस शब्दाचे धातूसाधित म्हणून त्या शब्दाचा अर्थ तसाच होईल ‘दूरचा’, ‘लांब गेलेला’, ‘दूर असलेला’.

इंग्रजी शब्दार्थ सांगणाऱ्या शब्दकोशात ‘डिसकोर्स’ या शब्दार्थाचा असा संदर्भ असा आहे, की या शब्दाचा उगम मिडल इंग्लिशमध्ये (म्हणजे सन १०६६ ते पंधराव्या शतकापर्यंत प्रचलित असलेले इंग्रजी) झाला. हा शब्द ‘कार्यकारणभाव’ व्यक्त करतो; तर ‘डिसकोर्स’ (Discourse) या मूळ फ्रेंच शब्दावरून लॅटिन भाषेत ‘डिसकर्सस’ (Discursus) असा शब्द तयार झाला. या शब्दाच्या उगमाचा हा प्रवास पाहता समानार्थी शब्दकोशात ‘डिसकोर्स’ या शब्दाचे समानार्थी शब्द म्हणून ‘गप्पा’, ‘संभाषण’, ‘संवादविषयक’, ‘वैचारिक देवाणघेवाण’ आणि ‘चर्चा’ असे विविध शब्द आढळतात, हे स्वाभाविक आहे. या सर्व शब्दांत एक मूलभूत साम्य म्हणजे हे सर्व अर्थ एक संवाद पद्धती- बोलणे, भाषा याबद्दल व्यक्त करणारे आहेत.

म्हणजे असे म्हणता येते, की डिसकोर्स किंवा परिभाषा म्हणजे मुख्य विषयातील मध्यवर्ती किंवा गाभ्याच्या मुद्द्यांशिवाय अन्य अनुषंगिक मुद्द्यांची चर्चा किंवा त्याविषयी केला जाणारा संवाद किंवा युक्तिवाद. या परिप्रेक्ष्यातून राजकीय परिभाषा (Political Discourse) हा शब्द समजून घ्यायचा तर तो अर्थ असा सांगता यईल. राजकीय परिभाषा म्हणून जे सांगितले जाते, ते मूळ राजकीय तत्त्वज्ञानाची व्यावहारिक मूलभूत तत्त्वे किंवा त्या तत्त्वप्रणालीची कार्यपद्धत नसते. एखाद्या प्रकाशकाने त्याने प्रकाशित केलेल्या पुस्तकाच्या शेवटी आपल्या प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांची यादी जोडणे मूळ पुस्तकाशी जितके संबंधित किंवा असंबंधित वाटावे तसेच राजकीय परिभाषा आणि मूळ तत्त्वज्ञानाशी संबंधित राजकीय कृती यांचे नाते असते. परिभाषा म्हणजे कधी मूळ तत्त्वज्ञानाविषयी काही पूरक माहिती देणे, परिशिष्ट स्वरूपाची माहिती देणे, त्या तत्त्वज्ञानाबद्दल काही अतिरिक्त स्वरूपाचे व्याख्यान देणे; मात्र अशा परिभाषेत त्या तत्त्वज्ञानाची मूलतत्त्वे किंवा राजकीय कृती यांचा उल्लेख नसतो.

साधारणपणे पायाभूत राजकीय मूल्यांत बदल घडतो तेव्हा तशाच प्रकारचा बदल संबंधित परिभाषेतही घडतो. हे समजून घेण्यासाठी आपल्याला वैदिक काळातील भाषा आणि वैदिक काळानंतरच्या कालखंडातील भाषा यांचे उदाहरण घेता यईल. या दोन्ही भाषा दोन वेगळ्या राजकीय संदर्भकाळात निर्माण झाल्या. भारताच्या दोन प्राचीन कालखंडांतील परिभाषितांची तुलना ती दोन राजकीय तत्त्वज्ञाने कशी उत्क्रांत होत गेली याचे निदर्शक म्हणता येईल. ईशोवास्य उपनिषद या नावाने ओळखला जाणारा उपनिषदाच्या भागाचा आरंभ पुढील प्रसिद्ध श्लोकाने होतो.

ईशावास्य इदम सर्वम यत किम च जगत्याम जगत; तेन तक्त्येन भुंजिताम मा ग्रिद्ध कश्यस्विद धनम.

‘(जाणून घ्या) हे सर्व या आजच्या जगातील सजीव ईश्वराने व्याप्त आहेत. म्हणूनच सर्वसंगपरित्याग करण्यातच तुमचे सुख सामावले आहे; दुसऱ्याच्या मालकीच्या गोष्टींची हाव धरणे उचित नाही.’

ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्रकाच्या शेवटच्या शतकात आम लोकांचे जीवन सरंजामदारी व्यवस्थेच्या पूर्णपणे प्रभावाखाली आलेले नव्हते. तसेच माणूस आणि जमीन नात्याला मालकी हक्कांच्या कल्पनेने पूर्णपणे नियंत्रित केले जात नव्हते. अशा राजकीय संदर्भात वरील श्लोक सूत्रबद्ध झाले होते. त्यानंतर शंभर वर्षांनंतर एका वेगळ्याच राजकीय पार्श्वभूमीवर मनुस्मृतीची रचना करण्यात आली. एक मानवतावादी आणि समन्यायी समाजरचना असलेला भारत निर्माण करण्यात मनुस्मृती हा अत्यंत भलामोठा असा अडथळा ठरली आहे. मनुस्मृती असे सांगते, की ‘‘या जगात अस्तित्वात असलेली प्रत्येक गोष्ट ब्राह्मणाच्या मालकीची आहे; ब्राह्मणाची निर्मिती हीच सर्वोत्तम असल्यामुळे, ब्राह्मण सर्व वस्तुमात्रांचे स्वाभाविकपणे मालक ठरतात.’

या भाष्याला ब्राह्मण्यवाद आणि बौद्ध तत्त्वज्ञातील तीव्र संघर्षाची राजकीय पार्श्वभूमी होती. प्राचीन भारतातील सामाजिक संघर्षावरील सर्वांत अधिकारी भाष्यकार डी. डी. कोसंबी हे होत. बुद्धाने सांगितलेला मध्यममार्ग हा त्या काळात अरण्यात वास्तव्य करणाऱ्या, शिकार करून उपजीविका करणाऱ्या जमाती आणि त्यांच्यापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात स्थिर जीवन जगणाऱ्या आणि यज्ञ आणि तत्सम प्रथा पाळणारे समाज या दोन्हींपेक्षा कसा वेगळा होता, यावर डी. डी. कोसंबी यांनी सखोल मांडणी केली आहे. या वेगळेपणामुळे बुद्धाने सांगितलेला ‘मध्यममार्ग’ त्या काळातील प्रस्थापित वर्ग व्यापारी आणि पुरोहित वर्गासाठी आपोआपच वादग्रस्त ठरला. परिणामी, बुद्धाने सांगितलेला मध्यममार्ग भारताबाहेर जरी फारसा विरोध न होता आणि संघर्ष करावा न लागता पसरला असला, तरी भारतात मात्र हळूहळू क्षीण होत गेला.

ईशोवास्य उपनिषद आणि मनुस्मृतीमधील कळीच्या वाक्यांशांमध्ये (वाक्प्रचारांमध्ये) भाषाशास्त्राच्या दृष्टीने आश्चर्यकारक साम्य आढळते. इश्योवास्य उपनिषदात यत किंचित (अगदी थोडा अंशही नाही) आणि ‘जगत्याम जगत’ या वाक्यांशांचा वापर झालेला आहे. हे दोन्ही वाक्यांश मनुस्मृतीतही वापरले गेलेले आढळतात; हा काही केवळ योगायोग वाटत नाही किंवा मनुस्मृतीची रचना अनुष्टुभ छंदात केलेली असल्यामुळे कवितेच्या रचनेतील सातत्य राखण्यासाठी हे वाक्यांश वापरले गेले असावेत असे वाटत नाही. बहुतेक महत्त्वाच्या उपनिषदांची रचना अनुष्टुभ छंदातच केलेली आहे. त्या काळातच रचल्या गेलेल्या अन्य महत्त्वाच्या रचना म्हणजे भरताचे नाट्यशास्त्र आणि गौतमाचे धर्मसूत्र या गद्य आणि पद्य अशा मिश्र पद्धतीच्या रचना केलेल्या आहेत. मनुस्मृतीची रचना मात्र पारंपरिक शैली आणि लयबद्धता राखणारी आहे. मनुस्मृतीतील एका ऋचेत (श्लोक ४.१२४) असे म्हटले आहे, की यजुर्वेद हे सामान्य माणसांच्या वापरासाठी आहेत; तर ऋग्वेद हे देवांसाठी रचले गेले आहेत, परंतु मनुस्मृतीत मांडण्यात आलेल्या संकल्पनांचा विचार करू लागतो तेव्हा मात्र उपनिषदे आणि मनुस्मृतीतील साम्यस्थळे संपुष्टात येतात. एक मात्र नक्की, की या दोन्हींमधील शाब्दिक आणि भाषिक साधर्म्य केवळ योगायोगाने आलेले नाही, तर ते मूळ कल्पनांचे (मनुस्मृतींमध्ये) जाणीवपूर्वक करण्यात आलेले विकृतीकरण आहे हे लक्षात घ्यायला हवे. ऐतिहासिकदृष्ट्या मनुस्मृतीच्या आधीच्या काळात रचल्या गेलेल्या उपनिषदांमधील अनेक मौलिक कल्पनांचे विकृतीकरण मनुस्मृतीत ठायीठायी पाहायला मिळते. अशा भाषिक साधर्म्याचा उपयोग वैदिक रुढी-परंपरांच्या अनुयायांवर गाजवणे या स्मृतींना शक्य झाले. एक मात्र खरे, की या स्मृतींनी समन्यायी समाजाची आकांक्षा बाळगणारे तत्त्वज्ञान विरुद्ध उतरंडीचे समर्थन करणारे तत्त्वज्ञान अशा दोन परस्परविरोधी राजकीय तत्त्वज्ञानांचा पाया घातला. या ठिकाणी राजकीय तत्त्वज्ञानांत आणि त्याच्याशी सुसंगत परिभाषेत बदल झालेला दिसतो, परंतु भाषिक अभिव्यक्तीमध्ये बदल झालेला नाही.

(लेखक भाषाशास्त्रज्ञ असून, भारतीय बोलीभाषेचे संशोधक आहेत.)

(मराठी अनुवाद : प्रमोद मुजुमदार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com