बदलते शब्द... बदलते वारे

आयुष्यातील तब्बल पाच दशके शब्दांची ताकद समजून घेण्यात व्यतित केल्यावर आज माझे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधताना मी पार गोंधळून गेलो आहे.
बदलते शब्द... बदलते वारे
Summary

आयुष्यातील तब्बल पाच दशके शब्दांची ताकद समजून घेण्यात व्यतित केल्यावर आज माझे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधताना मी पार गोंधळून गेलो आहे.

आज-काल ‘घटनात्मक अधिकार’ या शब्दांचा अर्थ निलंबित ठेवण्यात आला आहे. ‘लोकशाही’ ही संज्ञा दीर्घकाळ सुट्टीवर आहे. ‘दारिद्र्य’, ‘महागाई’ आणि ‘बेकारी’ या संज्ञा आजकाल ‘वेदना’ आणि ‘हालअपेष्टा’ व्यक्त करत नाहीत. या संज्ञांचा वापर करणे हे नकारात्मकतेचे लक्षण आणि अडथळा मानले जाते. तसेच या शब्दांचा वापर म्हणजे भारताचे वैभव आणि कीर्ती मलीन करणारा प्रचार मानला जाऊ लागला आहे.

आयुष्यातील तब्बल पाच दशके शब्दांची ताकद समजून घेण्यात व्यतित केल्यावर आज माझे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधताना मी पार गोंधळून गेलो आहे. भाषा बोलू शकणाऱ्या प्रजातीचा एक प्रतिनिधी म्हणून मला आज पार पराभूत झाल्यासारखे वाटत आहे. मी इतका गोंधळून जाण्याचे एक कारण म्हणजे आपल्या काळात वापरले जाणारे शब्द आता फार वेगाने आपले अर्थच बदलू लागले आहेत. काही नेहमीच्या वापरातील शब्द आता भाषेतून काढून टाकण्यात आले आहेत आणि प्रतिसादशून्य कानांची संख्या अगदी भयावह संख्येने वाढत चालली आहे.

गेली अनेक दशके मी असे समजत होतो, की ‘ट्रॉमा’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘तीव्र जखम’, ‘दुखापत’ किंवा ‘आघात’ आहे. हा अर्थ माझ्या मनात खूप पूर्वीपासून रुजलेला आहे. त्यामुळे आपल्या पतीला अतिशय क्रूरपणे ठार मारले जात असताना हतबलतेने पाहत असलेल्या झाकिया जाफरी यांच्या वेदनांचे वर्णन करण्यासाठी ‘ट्रॉमॅटिक’ हा शब्द वापरता येईल असे मी समजत होतो. या अन्यायाविरुद्ध न्याय मागण्यासाठी लागलेला दीर्घ विलंब म्हणजे आणखी एक ट्रॉमा... ‘आघात’; परंतु या देशातील सर्वोच्च न्यायालयाने या अर्थाविषयीचा गैरसमज दूर केला. सुनावणी करणाऱ्या विद्वान न्यायमूर्तींनी देशाला असे सांगितले, की हे प्रकरण म्हणजे देशाच्या सर्वोच्चपदी असलेल्या व्यक्तींना बदनाम करण्याचे एक कारस्थान होते आणि झाकिया जाफरी यांना मदत करणारे एका राजकीय पक्षाचे एजंट होते. या महनीय न्यायाधीशांनी असाही विचार व्यक्त केला, की अशा पद्धतीने कारस्थान रचणाऱ्यांना तुरुंगात धाडले पाहिजे आणि कठोर शासन द्यायला हवे. यावरून माझ्या असे लक्षात आले, की न्यायमूर्तींच्या मते ‘ट्रॉमा’ या शब्दाचा अर्थ शुद्ध नाटक असा आहे.

अलीकडच्या काळात ‘ट्रॉमा’ या शब्दाचा अर्थ चुकीचा ठरल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. सामूहिक बलात्काराचा अनुभव सहन करावा लागलेल्या आणि आपल्या लहान मुलीची क्रूरपणे हत्या होताना पाहिलेल्या बिल्किस बानोच्या भीषण अनुभवाचे वर्णन करण्यासाठी ‘ट्रॉमा’ हा शब्द अत्यंत अचूकपणे अर्थ व्यक्त करणारा आहे असे मला वाटत होते; परंतु मी असे बोलल्याचे ऐकले, की ‘‘या खटल्यात दोषी ठरलेले हे उच्च जातीय होते आणि चांगले संस्कार असलेले होते आणि म्हणून आरोप करण्यात आलेला गुन्हा त्यांनी केलेला नसणार; त्यामुळे त्यांना बिल्किस बानोच्या इच्छेनुसार देण्यात आलेली ‘आजीवन कारावासाची’ शिक्षा निव्वळ तर्काधारित आणि चुकीची ठरते.’

जेव्हा राजकीय पुढारी घरातील नोकरांवर वर्षानुवर्षे अत्याचार करतात किंवा माणसांच्या जमावावर गाडी घालतात किंवा देशातील अल्पसंख्यकांचे ‘रक्त शोषण्याच्या’ घोषणा देतात किंवा गरीब लोकांच्या घरावरून बुलडोझर फिरवतात, तेव्हा अशा घटनांचे वर्णन करण्यासाठी यापुढे ‘ट्रॉमा’ किंवा आघात हा शब्द वापरता येणार नाही. अशा घटनांतील बळी पडलेल्या व्यक्तींना ‘हिंदू विरोधी’ ठरवले जाते. आजकाल देशात दंगली घडवणे आणि अल्पसंख्य समाजाचे शिरकाण, स्थलांतरित मजुरांना कोणतीही पूर्वसूचना न देता शेकडो किलोमीटर पायी घराकडे जाणे भाग पाडणे, अचानक लॉकडाऊन घोषित करणे, त्यामुळे ‘अर्थव्यवस्था उद्‍ध्वस्त करणे’, अधिकृत माहितीच्या नावाखाली तद्दन खोटी माहिती प्रस्तुत करणे... अशासारख्या निर्णयांवर टीका करणे म्हणजे ‘ट्रॉमा’. हा ‘ट्रॉमा’ शब्दाचा नवा अर्थ आहे. अशारीतीने अर्थ बदललेले असे अनेक शब्द आणि वाक्यांश सांगता येतील. त्यांचे अर्थ अचानक बदललेले दिसतात.

माझ्या आयुष्यातील गेली सत्तर वर्षे मी असे ठामपणे गृहीत धरले होते, की नेहरू हे एक स्वातंत्र्यसैनिक होते. मला असेही वाटत होते, की अनेकदा दीर्घकाळ आणि काही वेळा अल्पमुदतीचा कारावास नेहरूंनी सोसला होता. त्याचप्रमाणे नेहरूंनी या देशात अनेक संस्था निर्माण केल्या आणि लोकशाही बळकट केली; मात्र १५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गौरवशाली सहभाग देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत नेहरूंचे नाव नमूद नाही. हे पाहून मला आता असे वाटू लागले आहे, की माझी नेहरूंविषयक धारणा पूर्णत: तथ्यहीन होती. मला असेही वाटत होते, की सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या विचारांत आणि कृतीत धर्मनिरपेक्षतेला सर्वाधिक महत्त्व दिले होते, परंतु आता माझ्या लक्षात आणून देण्यात येत आहे, की नेताजींनी त्यांचे सर्व आयुष्य ब्रिटिशांबरोबर संघर्ष करण्यात घालवले होते, त्यामागचा एकमेव उद्देश ते एक दिवस देशातील ‘धर्मांध शक्तींचे’ नायक ठरावेत हाच होता.

आयुष्यभर माझी अशी बालिश धारणा होती, की देशाची संसद हे असे स्थान आहे जिथे जनतेचे प्रतिनिधी जनतेच्या समस्या मांडतात, परंतु अलीकडेच संसदेच्या सभापतींनी संसदेत वापरता येण्याजोग्या शब्दांची एक नवी सुधारित यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधानांवर दुरान्वयानेसुद्धा टीका करणारे शब्द हे असंसदीय ठरवण्यात आले आहेत.

काही शब्द संसदेमध्ये उच्चारणे प्रतिबंधित केले गेले, तरी ते शब्द संसदेबाहेर उच्चारता येऊ शकतात. अशा प्रकारे पूर्वी घडत असे; परंतु आता तसे नाही. उदाहरणार्थ संविधानाच्या प्रस्तावनेत दिलेले ‘भारत हे एक संघराज्य आहे’ हे वाक्य उच्चारल्याबरोबर ‘ट्रोल आर्मी’ तुमच्यावर हल्ला सुरू करते. काही दिवसांपूर्वी एका जनसभेत भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी येथील भाषणातील नेमके हेच वाक्य उद्‍धृत केले होते. हे वाक्य उच्चारून अतिशय उपहासात्मक स्वरात अमित शहा गरजले होते, की ‘‘राहुल बाबा तू आता थोडासा इतिहासाचा अभ्यास कर.’’

माझी लहानपणापासून अशी समजूत होती, की ‘भारत हे एक संघराज्य आहे’ हे वाक्य घटना समितीच्या नेतृत्वपदी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिले होते; परंतु अमित शहा यांच्या भाषणामुळे आता असे लक्षात येत आहे, की हे वाक्य रद्दबातल ठरवण्यात आले आहे किंवा काढून टाकण्यात आले आहे. संसद हा शब्द अजूनही वापरात आहे; परंतु या शब्दातून दर्शवण्यात येणारी संस्था आता भौगोलिक स्थान बदलत आहे. ‘न्याय’ या शब्दाच्या भावार्थातील ‘करुणा’ किंवा ‘सहवेदना’ हा भाव आता अनपेक्षितरीत्या हजर आणि गैरहजर या दोन ध्रुवांमध्ये हेलकावे घेत असतो.

आजकाल ‘घटनात्मक अधिकार’ या शब्दांचा अर्थ निलंबित ठेवण्यात आला आहे. ‘लोकशाही’ ही संज्ञा दीर्घकाळ सुट्टीवर आहे. ‘दारिद्र्य’, ‘महागाई’ आणि ‘बेकारी’ या संज्ञा आजकाल ‘वेदना’ आणि ‘हालअपेष्टा’ व्यक्त करत नाहीत. या संज्ञांचा वापर करणे हे नकारात्मकतेचे लक्षण आणि अडथळा मानले जाते. तसेच या शब्दांचा वापर म्हणजे भारताचे वैभव आणि कीर्ती मलीन करणारा प्रचार मानला जाऊ लागला आहे.

या आणि अशा अनेक शब्द आणि संज्ञांचा विचार करतो आणि त्यांचे पूर्वीचे शब्दार्थ तपासतो तेव्हा मला एका ग्रीक मिथक कथेची आठवण येते. ही कथा मिडास राजाची. मिडासला जगातील सर्व सोने मिळवण्याचे वेड होते. त्याच्या आयुष्याच्या अखेरीस मिडास राजाच्या कानावर खूप केस वाढले आणि एखाद्या प्राण्याच्या कानाप्रमाणे मिडास राजाचे कान लांब लांब होत गेले. आपले कान झाकून ठेवण्यासाठी तो मोठमोठे फेटे आणि पगड्या घालू लागला. मिडास राजाचे कानांचे हे गुपित त्याचा न्हावी वगळता बाकी कुणालाही माहीत नसते. नाव्ह्याने हे गुपित उघड केल्यास त्याला कडक शिक्षेची भीती; परंतु एका टप्प्यावर हे गुपित मनात दाबून धरणे त्याला अशक्य होते. त्यामुळे न्हावी एक खड्डा खणून त्यात आपले तोंड खूपसून हे गुपित तेथे बरळतो. हळूहळू या खड्ड्यात वेळूची बने वाढू लागतात आणि वाहत्या वाऱ्याबरोबर हे गुपित हवेतून सर्वत्र पसरते.

तीन समुद्रांचा संगम होतो त्या कन्याकुमारीला मी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने गेलो होतो. तिन्ही समुद्रांच्या संगमावरून जोरदार वारा वाहत होता आणि त्या वाऱ्यासवे तेथील जनसभेत उच्चारले जाणारे ‘तिरंगा’, ‘संघराज्य’, ‘संविधान’, ‘संसद’, ‘लोकशाही’, ‘महागाई’, ‘दारिद्र्य’, ‘बेकारी’, ‘भारताचे लोक’ हे शब्द चहुदिशेला पसरत होते. तिथे होणारा टाळ्यांचा कडकडाट सर्वत्र गुंजत होता आणि त्या ऐतिहासिक क्षणी तेथे उभे असताना मला तीव्रतेने जाणवले, की भारतीय राजकारणातील वाऱ्याची दिशा बदलत आहे.

(लेखक भाषाशास्त्रज्ञ असून भारतीय बोलीभाषेचे संशोधक आहेत.)

(मराठी रूपांतर : प्रमोद मुजुमदार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com