चौफेर कामगिरीसाठीचं अकाउंटिंग

एखादी कंपनी ‘ग्रेट’ केव्हा होते, जेव्हा तिचे कर्मचारी उद्योजकाप्रमाणे काम करतात. प्रत्येकाला आपला विभाग किंवा फंक्शन हा स्वतःचा उद्योग वाटला पाहिजे.
Accounting
AccountingSakal
Summary

एखादी कंपनी ‘ग्रेट’ केव्हा होते, जेव्हा तिचे कर्मचारी उद्योजकाप्रमाणे काम करतात. प्रत्येकाला आपला विभाग किंवा फंक्शन हा स्वतःचा उद्योग वाटला पाहिजे.

- डॉ. गिरीश जाखोटिया, girishjakhotiya@gmail.com

एखादी कंपनी ‘ग्रेट’ केव्हा होते, जेव्हा तिचे कर्मचारी उद्योजकाप्रमाणे काम करतात. प्रत्येकाला आपला विभाग किंवा फंक्शन हा स्वतःचा उद्योग वाटला पाहिजे. उदाहरणार्थ - ‘रिपेअर्स आणि मेंटेनन्स डिपार्टमेंट’च्या कर्मचाऱ्यांनी कंपनीतील अन्य सर्व डिपार्टमेंट्सना आपलं ग्राहक मानलं पाहिजे, ज्यांना हे रिपेअर्सच्या विविध सेवा पुरवतात. याच उद्योजकीय संकल्पनेनुसार फॅक्टरीच्या मुख्य व्यवस्थापकाने फॅक्टरी एक स्वतंत्र उद्योग म्हणून चालवली पाहिजे.

अन्य शब्दांत, प्रत्येक फंक्शनल प्रमुखाने आपली जबाबदारी व अधिकार वाढवायला हवेत, जेणेकरून तो एक ‘उद्योजकीय कर्मचारी’ बनेल. हे होण्यासाठी मात्र विशेष अशा ‘अकाउंटिंग’ची गरज असते. व्यवस्थापकीय भाषेत यास ‘रिस्पान्सिबिलिटी अकाउंटिंग किंवा बजेटिंग’ म्हणतात. कोणत्याही फंक्शनल डिपार्टमेंटची उद्योजकीय जबाबदारी ही तीन टप्प्यांतून वाढविता येते. १. फक्त खर्च करणारं केंद्र (कॉस्ट सेंटर), २. नफा कमाविणारं केंद्र (प्रॉफिट सेंटर) आणि ३. पूर्ण गुंतवणूक अथवा उद्योजकीय केंद्र (इन्व्हेस्टमेंट सेंटर).

इथं रिपेअर्स डिपार्टमेंटचं उदाहरण पाहूयात. या विभागाच्या प्रमुखास एक मशिन दुरुस्त करण्याचा त्याने केलेला खर्च व ही दुरुस्ती बाहेरून करवून घेण्याचा खर्च, यांची तुलना करण्यास सांगितल्यास, तो खडबडून जागा होईल. त्याच्याकडे असलेली अतिरिक्त जागा, जास्तीचे कर्मचारी, त्यांचा वाढता पगार, अन्य अनावश्यक खर्च, रिपेअर्ससाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा अतिरिक्त साठा, कर्मचाऱ्यांची घटती कार्यक्षमता आदी अनेक गोष्टींची उकल होईल.

रिपेअर्सची सर्व्हिस देणारा बाहेरचा छोटा उद्योजक हा नफा कमावूनही योग्य ती फी आकारतो, म्हणजे त्याचं खर्चावरील नियंत्रण व त्याच्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता ही अधिक चांगली असली पाहिजे. कंपनीच्या सर्व अंतर्गत डिपार्टमेंट्सना ‘रिपेअर्सची सेवा पुरवठादार’ निवडण्याचं स्वातंत्र्य दिल्यास ते बहुधा बाहेरचा पुरवठादार निवडणार असतील, तर कंपनीच्या स्वतःच्या रिपेअर्स डिपार्टमेंटमध्ये सुधारणेला भरपूर वाव आहे, असा निष्कर्ष निघतो. बाजारातील असा ‘बेंचमार्क’ वापरल्याने आपलं ‘रिपेअर्स डिपार्टमेंट’ हे ‘प्रॉफिट सेंटर’ होण्याची उद्योजकीय महत्त्वाकांक्षा बाळगू शकतो.

रिपेअर्स डिपार्टमेंटमध्ये कंपनीने मशिन्स, टूल्स, फर्निचर, इमारत आदी दीर्घ मुदतीच्या मालमत्तेत व स्पेअर पार्टसच्या खेळत्या भांडवलात गुंतवणूक केलेली असते. ही गुंतवणूक नीटपणे वापरली जाते आहे की नाही, हे पाहण्यासाठी या डिपार्टमेंटकडून कागदोपत्री परताव्याची (आर.ओ.आय.) अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणजे ‘रिपेअर्स डिपार्टमेंट’ हा एक स्वतंत्र उद्योग (इन्व्हेस्टमेंट सेंटर) म्हणून जोखला जाऊ शकतो. यामुळे बाहेरील ‘रिपेअर्स सर्व्हिस प्रोव्हाइडर’सोबत योग्य अशी तुलना होऊ शकते.

उद्योगपतीच्या मोठ्या समूहातील अन्य कंपन्यांना हे ‘अंतर्गत रिपेअर्स डिपार्टमेंट’ योग्य शुल्क आकारून सर्व्हिस प्रदान करू शकतं. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विविध देशांमधील ‘सब्सिडिअरी कंपन्या’ या ‘इन्व्हेस्टमेंट सेंटर’ म्हणूनच काम करतात. एखाद्या नामांकित कंपनीच्या फ्रांचायजी या ‘प्रॉफिट सेंटर’ किंवा ‘इन्व्हेस्टमेंट सेंटर’ असतात. बऱ्याच मोठ्या कंपन्या स्वतःचं नियंत्रण राखण्यासाठी आपल्या पुरवठादारांच्या उद्योगात गुंतवणूक करतात, तेव्हा ती एक प्रकारे ‘प्रॉफिट सेंटर’चीच रचना असते.

आपल्या सर्व व्यवस्थापकांनी ‘उद्योजकीय’ कामगिरी करावी म्हणून आदित्य विक्रम बिर्लांनी ‘पडता सिस्टीम’ लागू केली. संगणक व मोबाईल नसताना ‘उद्योजकीय नियंत्रण’ राखण्यासाठीची ही अफलातून पद्धत होती. ‘पडता’ या राजस्थानी शब्दाचा अर्थ होतो ‘फलनिष्पत्ती’ किंवा ‘अंतिम परिणाम’. आजच्या व्यवस्थापकीय भाषेत यास ‘काम्पोझिट परफार्मन्स इंडेक्स’ (संयुक्त कामगिरीचा निर्देशांक) असं म्हणता येईल. तांत्रिक, वित्तीय व व्यूहात्मक अशा तिन्ही प्रकारचे परिमाण त्यांच्या महत्त्वानुसार (वेटेजेस) या ‘पडता’मध्ये गुंफलेले असतात.

उदाहरणार्थ - कारखान्याच्या दैनंदिन पडतामध्ये आजचं उत्पादन, त्याचा खर्च व गुणवत्ता, कर्मचाऱ्यांची सामुदायिक कार्यक्षमता, उपलब्ध उत्पादकीय क्षमतेचा वापर, ऊर्जा व पाण्याची बचत, नासाडीतील बचत, पर्यावरणाची काळजी इ. वीस विविध प्रकारच्या परिमाणांचा समावेश होतो. या सगळ्यांना एकत्र करून शंभरपैकी कारखान्याने आज किती अंक मिळवले याची मोजणी होते. थोडक्यात असं की, कारखान्याच्या सर्वांग कामगिरीचा हा संक्षिप्त लेखाजोखा असतो, तो प्रत्येक कारखान्यातून फॅक्स मशिनद्वारे बिर्ला साहेबांना नियमितपणे पाठवला जायचा. आज संगणकीय उत्क्रांतीमुळे प्रत्येक फंक्शनल व बिझनेस डिव्हिजनचा असा स्वतंत्र ‘पडता’ मोजता येऊ शकतो.

प्रत्येक कर्मचाऱ्याने चौफेर कामगिरी करावी म्हणून अमेरिकेत ‘बॅलन्स्ड स्कोअर कार्ड’ (बीएससी) नावाची प्रणाली विकसित केली गेली. या प्रणालीपेक्षा ‘एंत्रेप्रिनरिअल स्कोअर कार्ड’ (ईएससी) अधिक महत्त्वाचा, ज्यात कर्मचाऱ्यासाठी ‘उद्योजकीय लक्ष्यं’ ठरविता येतील. अशी लक्ष्यं ठरविताना अगदी तळातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कामगिरीला कंपनीच्या ‘वित्तीय लक्ष्यां’शी जोडता आलं पाहिजे. उदाहरणार्थ - कारखान्यात काम करणाऱ्या कनिष्ठ कामगाराने कच्च्या मालाची बचत केल्यास त्याचा कंपनीच्या ‘आर ओ आय’ किंवा परताव्याच्या दरावर काय परिणाम होईल? - हा परस्पर संबंध अधोरेखित करण्यासाठी या कर्मचाऱ्याच्या ‘गुणात्मक’ लक्ष्यांचं रूपांतरण हे ‘संख्यात्मक’ किंवा ‘वित्तीय’ लक्ष्यात करता आलं पाहिजे. यासाठी उत्पादन, वित्त व मनुष्यबळ या तिन्ही विभागांतील अधिकाऱ्यांना एकत्र येऊन असे उद्योजकीय व वित्तीय परिमाण विकसित करावे लागतील, जे सर्व पातळ्यांवरील व सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांना लागू होतील. ‘संशोधन व विकास’सारख्या विभागात मुख्यत्वे दीर्घ मुदतीचं मूलभूत संशोधन होत असेल, तर तेथील कामगिरीला ‘उद्योजकीय परिमाण’ लागू करणं अवघड असतं; परंतु अशक्य नसतं. अर्थात, यासाठी बाजारातील बेंचमार्क्सचा कठोरपणे वापर करावा लागतो.

चौफेर उद्योजकीय कामगिरीच्या अकाउंटिंगमुळे अनेक फायदे होतात. प्रत्येक कर्मचारी हा स्वतःच्या प्रक्रियेला किंवा विभागाला एक स्वतंत्र उद्योग मानत असल्याने, तो गुंतवलेल्या भांडवलाचा काळजीपूर्वक वापर करतो. यासाठी तो खर्चावर नियंत्रण ठेवतो व आपली कार्यक्षमता वाढवतो. ‘सेवा विभाग’ म्हणजे रिपेअर्स, अकाउंटिंग, संशोधन, मनुष्यबळ विकास इ. फंक्शन्स हे ‘उद्योजकीय केंद्रं’ बनल्याने या विभागांचं दुय्यमत्व नाहीसं होतं. विक्री व उत्पादन विभागांच्या बरोबरीने या सेवा विभागांना महत्त्व प्राप्त झाल्याने कर्मचाऱ्यांमध्येही समानतेची भावना निर्माण होते. उद्योजकीय स्वातंत्र्यामुळे कर्मचारी हे ‘निर्णयक्षम’ होतात व कल्पकतेचा अधिकाधिक वापर करू लागतात. अनेक तांत्रिक परिमाणांचं ‘वित्तीय परिमाणां’मध्ये रूपांतरण झाल्याने कनिष्ठ कर्मचारीसुद्धा कंपनीच्या ‘आर ओ आय’शी जोडले जातात. एखादा विभाग वाढविणं किंवा बंद करणं, असे महत्त्वाचे व्यूहात्मक निर्णय नीटपणे घेता येऊ शकतात.

कर्मचाऱ्यांच्या पगाराची रचना ही त्यांच्या उद्योजकीय कामगिरीशी निगडित करता येते. बाजारातील किमतीशी तुलना करता येत असल्याने कंपनीतील ‘अंतर्गत ग्राहक’ हे एखादी सेवा कमी खर्चात मिळावी म्हणून कंपनीतील अंतर्गत सेवा - पुरवठादारांवर दबाव आणू शकतात. एकुणातच कंपनीमधील सर्व कर्मचाऱ्यांची सामुदायिक कामगिरी ही ‘उद्योजकीय’ स्वरूपाची होते व यामुळे कंपनी बाजारातील स्पर्धेस उत्तमरीत्या तोंड देऊ शकते. मित्रांनो, पुढील लेखात आपण पाहणार आहोत, उचित ‘आर ओ आय’ हा कसा ठरवावा; अर्थात ‘परताव्याच्या दराचं बेंचमार्किंग’.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com