
एका मोठ्या उद्योगसमूहाचे अध्यक्ष माझ्याकडं एक गंभीर कौटुंबिक समस्या घेऊन आले. त्यांना चार मुलगे. सर्वांत थोरला बुद्धीनं व कर्तृत्वानं सामान्य, सर्वांत धाकटा प्रचंड हुशार व उत्तम उद्योजकीय नेतृत्व देऊ शकणारा.
सभ्यता, सशक्तता आणि शिस्त!
- डॉ. गिरीश जाखोटिया girishjakhotiya@gmail.com
एका मोठ्या उद्योगसमूहाचे अध्यक्ष माझ्याकडं एक गंभीर कौटुंबिक समस्या घेऊन आले. त्यांना चार मुलगे. सर्वांत थोरला बुद्धीनं व कर्तृत्वानं सामान्य, सर्वांत धाकटा प्रचंड हुशार व उत्तम उद्योजकीय नेतृत्व देऊ शकणारा. सांस्कृतिक परंपरेनुसार तर नेतृत्व मोठ्याला द्यायला हवं; परंतु यामुळे धाकट्यावर अन्याय होणार, समूहाचं नुकसान होणार आणि कुटुंबाचं विभाजनही होणार. थोडक्यात काय, तर ‘फॅमिली गव्हर्नन्स’ बिघडणार. मी युक्ती लढवली. मोठ्याला कामगिरी दिली सामाजिक नेटवर्क व राजकीय पुढाऱ्यांना सांभाळण्याची. म्हणजे सामाजिक - सांस्कृतिकदृष्ट्या तो फ्रंटला; परंतु उद्योजकीय नेतृत्व व निर्णयप्रक्रिया धाकट्याकडे सोपवली.
या युक्तीनं समूहाच्या अध्यक्षांचा जीव भांड्यात पडला. फॅमिली गव्हर्नन्स (कौटुंबिक सभ्यता व एकता), एंटरप्राइज गव्हर्नन्स ( उद्योजकीय कर्तृत्व, सशक्तता व स्वातंत्र्य ) आणि कार्पोरेट गव्हर्नन्स (कायदेशीर शिस्त व सचोटी) या उद्योजकीय त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत, ज्या समतुल्यपणे सांभाळायला हव्यात. शिस्त आणि स्वातंत्र्य, कुटुंब आणि कर्तृत्व, योग्यता आणि परंपरा इ.मध्ये अंतर्विरोध होता कामा नये. हा अंतर्विरोध जेव्हा खूप गंभीर होतो, तेव्हा उद्योग कोसळतात, ब्रँड दुबळे होतात, परिवार दुभंगतात व अर्थातच प्रतिस्पर्धी याचा पुरेपूर फायदा घेतात.
कोणताही उद्योग हा उत्तम उद्योजकतेमुळे सशक्त होतो. उद्योजकता म्हणजे संपत्तीची निर्मिती, धोका पत्करण्याची तयारी, निर्णयप्रक्रियेतला वेग, लोकांचं नेटवर्किंग, कल्पकता आणि नेतृत्व या सहा गोष्टींचं मिश्रण. अर्थात, या सहाही गोष्टींसाठी व्यावहारिक लवचीकता लागते. या लवचीकतेसाठी उद्योजकीय स्वातंत्र्य आवश्यक असतं.
‘अनियंत्रित’ स्वातंत्र्य हे धोकादायक असल्याने नियंत्रण करणाऱ्या ‘सिस्टीम’ची गरज असते. पाश्चिमात्यांनी या सिस्टीमला ‘कार्पोरेट गव्हर्नन्स’ असं नाव दिलंय. हे नियंत्रण कंपनीच्या आत सिस्टीमद्वारे केलं जातं आणि बाहेरून कायद्याद्वारे ते अधोरेखित होतं. जेवढे कायदे जास्त आणि क्लिष्ट, तेवढं उद्योजकीय स्वातंत्र्य कमी. इथं गमतीचा प्रकार असा की, सौदी अरेबिया या ‘धार्मिक’ देशात व चीनसारख्या ‘अधार्मिक’ देशांत उद्योजकीय स्वातंत्र्याची सारखीच गळचेपी होते. भारतातही सन १९९० पर्यंत साधारणपणे लालफितीचा वरचष्मा खूप होता नि म्हणून उद्योगपती हे राजकारण्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सारखे चुचकारत असत. प्रचंड सरकारी नियंत्रण व उद्योगपतींचं बेलगाम स्वातंत्र्य, या दोन्ही टोकाच्या गोष्टी नकोत. अर्थात कार वेगाने पळवायची असल्यास उत्तम ब्रेक्सची गरज असते, तद्वतच स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी कायदेशीर चौकट ही लागतेच. उद्योजकीय संस्कृती जर उत्तम असेल, तर कायदा आणि स्वातंत्र्य यामधील संतुलन चांगलं साधलं जातं. उत्तम उद्योजकीय संस्कृती ही कौटुंबिक संस्कारांमधून निर्माण होते. अशा संस्कारांचं ‘संस्थात्मक’ किंवा ‘सामूहिक’ स्वरूप म्हणजे ‘फॅमिली गव्हर्नन्स’. काही उद्योजकीय फॅमिली या खूप सोज्वळ असतात नि त्यामुळे चलाख प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध यांचा निभाव लागत नाही. सचोटी ही कमजोरी होता कामा नये.
काही उद्योजकीय फॅमिली या जुन्या धार्मिक व सांस्कृतिक बंधनांमध्ये अशा अडकतात की, यांचा उद्योगविस्तार हा अवघड होतो. विविध धर्म किंवा संस्कृतींमधील भागीदार, पुरवठादार, वितरक, ग्राहक इ.ना हाताळणं यांना जड जातं. एक सोज्वळ उद्योगपती पिढ्यान्पिढ्या फक्त शाकाहारी पदार्थ व मसाले विकायचे. यांचा ब्रँड खूप जुना व नामांकित. नवे प्रतिस्पर्धी हे शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ विकत असल्याने अल्पावधीत आकाराने मोठे झाले व या जुन्या ब्रँडवर मात करू लागले.
मी या सोज्वळ उद्योगपतींना सांगितलं, ‘‘महोदय, तुमच्या घरात मांसाहार भलेही करू नका; परंतु भारतात व परदेशांत ८० टक्के ग्राहक मांसाहारी असतील, तर तुम्हाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’ या उद्योगपतीच्या पुढल्या पिढीला पटलं नि ‘प्रॉडक्ट मिक्स’मध्ये मांसाहारी प्रॉडक्ट्सची भर घातली गेली. दुसऱ्या एका भल्यामोठ्या कुटुंबात सात भाऊ व त्यांची पंधरा मुलं. सर्वांत ज्येष्ठ बंधू जे ‘ग्रुप चेअरमन’ होते, स्वभावाने अत्यंत मृदू होते. यांचा दोन नंबरचा भाऊ हा खूप लबाड होता, ज्याची दोन्ही मुलं ‘ढम्म’ होती. सातवा भाऊ खूप निरागस होता; परंतु याची दोन्ही मुलं मात्र खूप हुशार व कष्टाळू होती.
लबाड काका अर्थातच या हुशार पुतण्यांना फारसं पुढे येऊ देत नसे. या ग्रुपचे एकूण पाच उद्योग होते, जे आता कुटुंबातील वाढत्या राजकारणामुळे अडचणीत येऊ लागले. चेअरमन साहेबांनी मला अंतिम तोडगा विचारला. लबाड भावाला व त्याच्या मुलांना योग्य हिस्सा देत आम्ही ग्रुपमधून बाहेर काढलं नि त्या दोन हुशार पुतण्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. गरजेनुसार ‘फॅमिली गव्हर्नन्स’ व म्हणून उद्योगाचा पसारा टिकविण्यासाठी ‘सर्जिकल ऑपरेशन’ हे वेळेवर करावं लागतंच.
माझ्या एकूण निरीक्षणानुसार जे महाराष्ट्रीय उद्योजकीय परिवार दुभंगले किंवा आकुंचले, ते फॅमिली गव्हर्नन्स व एंटरप्राइज गव्हर्नन्समधील ताळमेळ बिघडल्यामुळे. यांची ‘कार्पोरेट गव्हर्नन्स’बाबतची कामगिरी ही साधारणपणे चांगलीच राहिली आहे. उद्योजकीय कुटुंबातील सर्वच मुलांना कंपनीचा प्रमुख होण्याची महत्त्वाकांक्षा असते. यात काही गैरही नाही; परंतु टॉपची पोझिशन एकच आणि प्रतिस्पर्धी चार-पाच असतील तर ‘कौटुंबिक झगडा’ हा होणारच. यासाठी वेळच्या वेळी उद्योगाचा विस्तार करीत नव्या कंपन्या उभ्या करायला हव्यात. मुकेश अंबानींनी स्वतःच्या हयातीतच विविध उद्योगांच्या नेतृत्वाचं वाटप करून टाकलं. राहुल बजाज यांनी दूरदर्शीपणा दाखवत आपल्या दोन्ही मुलांना दोन वेगळ्या प्रकारच्या उद्योगांची जबाबदारी सोपवली.
या सर्व पार्श्वभूमीवर किर्लोस्कर, दांडेकर, गरवारे, आपटे, पेठे, गाडगीळ, घाटगे-पाटील इ. महाराष्ट्रीय परिवारांच्या उद्योजकीय वाटचालीचा अभ्यास करायला हवा. काही उद्योजकीय कुटुंबं शंभर कोटींच्या विक्रीवर विसावली. पंधरा-वीस वर्षांपूर्वी ‘शंभर कोटी’ हा आकार बऱ्यापैकी मोठा होता. आज शंभर कोटी आकारवाल्याला ‘उद्योगपती’ म्हणणं अवघड होऊ शकतं. एखाद्या ऑटोमोबाईल कंपनीचा मोठा डीलरसुद्धा आज शंभर कोटींपेक्षा अधिक टर्नओव्हर करतो. वाढलेल्या उद्योजकीय संधी, रुपयाचं अवमूल्यन व महागाई, अर्थव्यवस्थेचा वाढता आकार, जागतिकीकरण, वाढती स्पर्धा, हजारो नव्या व तरुण उद्योजकांचा बाजारातील शिरकाव आणि कमी कालावधीत ‘उद्योगपती’ बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा इ. कारणांमुळे एखाद्याला ‘उद्योगपती’ ठरविणाऱ्या उद्योगाचा आकारही वेगाने वाढतो आहे.
दीर्घकालीन भरभराटीसाठी व बाजाराच्या नेतृत्वासाठी प्रतिस्पर्ध्यांपेक्षा नेहमीच काहीतरी वेगळं करून दाखवावं लागतं. यासाठी ‘उद्योजकीय कल्पकता’ हे अत्यावश्यक ठरतं. कोणताही उद्योगपती हा कल्पकतेवर भरपूर काम करू शकतो, जर त्याचं मन थाऱ्यावर असेल तर. यासाठी उद्योगातील घडामोडी व आपल्या टीमवर उत्तम नियंत्रण ठेवणारी ‘सिस्टीम’ खूप महत्त्वाची असते. ही सिस्टीम ‘कार्पोरेट गव्हर्नन्स’चा दर्जा व उपयोगिता ठरवते. उत्तम नियंत्रणाची ग्वाही असेल तर मन स्थिर राहतं नि मग मेंदूचा उपयोग कल्पकतेसाठी नीटपणे होऊ लागतो. बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणूनच कार्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे ‘सिस्टीमिक कंट्रोल’वर खूप भर देतात.
विविध देशांमधील विविध सांस्कृतिक - राजकीय भिन्नतेचं व्यवस्थापन एका बाजूला व दुसऱ्या बाजूला त्या त्या देशात वापरावयाची कल्पकता, या दोन्ही गोष्टी अशा अजस्र कंपन्यांना साधायच्या असतात. यामुळे या कंपन्यांचं ‘कार्पोरेट गव्हर्नन्स’ हे अफलातून असतं. कल्पना करा की, इथिओपिया, ऑस्ट्रेलिया, पेरू, जर्मनी व भारत हे देश सर्वार्थाने भिन्न भिन्न आहेत; परंतु अमेझॉनसारखी कंपनी या सर्व देशांत यशस्वी तर आहेच, वाढतेही आहे. शिस्त आणि कल्पकता या दोहोंमधील उत्तम संतुलनामुळे हे शक्य होतं.
सिस्टीम नीटपणे काम करीत असेल, तर उद्योगपतीची मुलंसुद्धा बापाचा तोरा दाखवत नाहीत. मालक आणि व्यवस्थापक या दोहोंमधील मर्यादेची सीमारेषा ही या सिस्टीममुळेच अधोरेखित होते. सिस्टीम किंवा गव्हर्नन्सच्या नावावर फालतू उचापती करणारे नातेवाईक व मित्र टाळता येतात. उत्तम गव्हर्नन्समुळे पुरवठादार, वितरक व ग्राहकही शिस्तीत वागतात. यामुळे उद्योगाचं एकूणच ‘गुडविल’ सुधारतं, ज्यामुळे ‘क्रेडिट रेटिंग’ही सुधारतं. उद्योगाची व उद्योगपतीची वाटचालही एक मोठा ‘एथिकल ब्रँड’ बनण्याकडे होऊ लागते.
तिन्ही प्रकारचं गव्हर्नन्स (फॅमिली, कार्पोरेट व एंटरप्राइज) एकदा उत्तमरीत्या एकत्र साधलं की तुमची कंपनी ही ‘ग्रेट कंपनी’ होण्याकडे मार्गस्थ होते. अशा कंपनीसोबत नवनवे ग्राहक, भागीदार, पुरवठादार व बँकर्स हे व्यापार करण्यासाठी आसुसलेले असतात. कंपनीचं मूल्यांकन आपसूकच वाढत जातं नि त्यामुळे हजारो छोटे गुंतवणूकदार कंपनीचे भागधारक बनण्यासाठी प्रयत्न करू लागतात. एक उत्तम प्रतिमा तयार झालेली असल्याने कायदेशीर लढायांमध्ये, सरकारदरबारी व परदेशांतही मोठा फायदा होऊ लागतो. पेटंट्स व कॉपीराइट्स मिळणं सोपं होऊ लागतं. तरुण व हुशार युवकांना अशा कंपनीत काम करावंसं वाटतं.
थोड्याशा अधिकच्या फायद्यासाठी कर्मचारी, पुरवठादार, वितरक व ग्राहक हे अशा नामांकित कंपनीस सोडून जात नाहीत. तुमच्या कंपनीची एकूण विश्वासार्हता ही इतकी वाढते की, तुमची प्रत्येक कृती ही बाजारातील एक मोठं ‘बेंचमार्क’ बनते. स्वतःचा उद्योग वाढविण्यासाठी किंवा नव्या उद्योगाला पुढे चाल देण्यासाठी मोठ्या जाहिरातीची मग गरज भासत नाही. बघा ना, उद्या टाटा समूहाने आइस्क्रीम बनवायचं ठरवलं तर हजारो वितरक ती विकायला पुढं येतील व करोडो ग्राहक ती चाखायला पुढं सरसावतील. ‘गव्हर्नन्स’ची ही तर कमाल असते. तिन्ही प्रकारचं उत्तम गव्हर्नन्स हा म्हणूनच ‘इंडस्ट्रिअलिस्ट’ व ‘बिझनेसमन’मधला फरक ठरवतो! मित्रांनो, पुढील लेखात आपण करणार आहोत ‘बिझनेस मॉडेल’बद्दलची चर्चा.
(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)