‘सुपरस्टार’चे दहा गुण!

उत्तम क्रिकेट खेळणारे, चित्रपटात सुंदर अभिनय करणारे व राजकारणात आपली प्रभावी छाप पाडणारे बरेच असतात; परंतु यांच्यामधील ‘सुपरस्टार’ हे तुरळक असतात.
jrd tata and aditya birla
jrd tata and aditya birlasakal
Summary

उत्तम क्रिकेट खेळणारे, चित्रपटात सुंदर अभिनय करणारे व राजकारणात आपली प्रभावी छाप पाडणारे बरेच असतात; परंतु यांच्यामधील ‘सुपरस्टार’ हे तुरळक असतात.

- डॉ. गिरीश जाखोटिया girishjakhotiya@gmail.com

उत्तम क्रिकेट खेळणारे, चित्रपटात सुंदर अभिनय करणारे व राजकारणात आपली प्रभावी छाप पाडणारे बरेच असतात; परंतु यांच्यामधील ‘सुपरस्टार’ हे तुरळक असतात. मोठे उद्योगपती हे उद्योगजगतातील सुपरस्टारच! यास्तव यांची गुणसंपदासुद्धा विशेषच असते. सर्वसाधारण उद्योजकांचे गुण व कौशल्यं यांच्याकडे असतातच; परंतु छोट्या व मध्यम आकाराच्या उद्योजकांच्या तुलनेत यांचे म्हणून खास असे दहा गुण असतात, जे यांना ‘मोठा उद्योगपती’ बनवतात. या दहा गुणांमध्ये पहिल्या क्रमांकावर असते ती यांची ‘दूरदृष्टी’ (व्हिजन). हे हिमालय चढून जाण्याची अथवा प्रशांत महासागर पोहून जाण्याची दुर्दम्य इच्छा बाळगतात नि म्हणून खूप पुढचा विचार करतात.

जेआरडी टाटा, शंतनुराव किर्लोस्कर, आदित्य विक्रम बिर्ला, अझीम प्रेमजी, बिल गेट्स अशी ‘दूरदृष्टी’ असणारी अत्युत्तम उद्योजकीय व्यक्तिमत्त्वं लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतात. व्यवस्थापकीय भाषेत ‘व्हिजन’ म्हणजे स्वतःच्या उद्योगाला एका विशेष स्थानावर वा उंचीवर पोहोचविण्याचं स्पष्ट असं स्वप्न, जे साकार करण्याची संपूर्ण क्षमता त्या उद्योगपतीमध्ये असते. अर्थात, अशी ‘मंझील’ माहीत असल्याने तिथे पोहोचणारे रस्तेही या महानुभावांस माहीत असतात. १९९० च्या पूर्वीचा काळ हा फारसा ‘उद्योग-साहाय्यक’ नसतानाही आदित्य बिर्लांनी बहुराष्ट्रीय कंपन्या उभ्या करण्याचं व्हिजन बाळगलं होतं, जे त्यांनी साकारही केलं. ‘व्हिजन’ कशी विकसित करायची हे आपण विस्ताराने नंतरच्या लेखांत पाहणार आहोतच.

दुसरा महत्त्वाचा गुण, ‘व्यूहात्मक विचार’ (स्ट्रॅटेजिक थिंकिंग) करण्याचा. आपलं मोठं स्वप्न साकार करण्यासाठी व्यूहात्मक विचार हा लागतोच. महाभारताचं महायुद्ध जिंकणारा कृष्ण हा एक अद्‍भुत व्यूहरचनाकार होता. रतन टाटांनी अनेक उत्तमोत्तम व्यूहरचना करून टाटा समूहाला असाधारण उंचीवर नेऊन ठेवलं.

मोठे उद्योगपती हे इतर जे पाहू शकत नाहीत, ते नेमकं पाहतात. मोठी आणि असामान्य संधी ते सहजपणे हेरतात, हे त्यांचं तिसरं मोठं वैशिष्ट्य. अशा जलद हेरण्यामुळे हे आपल्या स्पर्धकांच्या नेहमी पुढे असतात. अर्थात, काळाच्या पुढे असल्याने यांना सरकार नावाच्या यंत्रणेलाही ‘उद्योजकीय बदला’साठी मार्गदर्शन करावं लागतं. कुरियन साहेबांनी याबाबतीत अनेक देशांच्या सरकारांना दुग्ध आणि कृषिक्षेत्रातल्या नव्या वाटा दाखविल्या होत्या. अमेझॉन, अल्फाबेट, मेटा, मायक्रोसॉफ्ट इ. महाकाय व जगावेगळ्या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी नव्या संधी सर्वप्रथम हेरल्या. अपरिचित वाटा चोखाळताना मोठे धोके पत्करावे लागतात. ‘मोठा धोका हाताळणं’ हे मोठ्या उद्योगपतींना सहजगत्या जमतं. यासाठी हे महाकाय नेटवर्क उभं करतात, जे वापरून समांतरपणे हे अनेक धोक्यांवर मात करतात, हा यांचा चौथा मोठा गुण.

मोठा उद्योग म्हणजे शेकडो क्लिष्ट बाबींना एकमेकांशी जोडत एक उत्तम ऑर्केस्ट्रा उभा करणं व तो संचलित करणं. ही पाचवी बाब मोठ्या उद्योगपतींची अगदी खासीयत असते. बदलतं तंत्रज्ञान, विविध व्यक्तीसमूह, अनेक वित्तपुरवठादार, उद्योगांची मोठी साखळी व लाखो ग्राहकांना एकाच वेळी हाताळण्याची अवघड सर्कस हे खेळवत राहतात. बुद्धिबळाच्या खेळातील मधल्या टप्प्यावरील स्थिती ही अनेक संभाव्य खेळ्यांमुळे रोचक व तितकीच धोकादायक झालेली असते. प्रतिस्पर्धी तेवढाच तगडा असेल, तर आपलाही आत्मविश्वास बऱ्याचदा डळमळीत होतो. मोठा उद्योगपती अशावेळी आपलं मानसिक संतुलन ढळू न देता सर्वोत्तम चाल खेळतो आणि विजयाकडे आगेकूच करतो. ही विजिगिषू वृत्ती सातत्याने कार्यरत असल्याने हे पराक्रमी लोक लहान लढायांमध्ये न अडकता मोठ्या युद्धावर आपलं लक्ष, आपली ऊर्जा व आपलं शौर्य केंद्रित करीत असतात. या सहाव्या अतिविशेष वैशिष्ट्यामुळे मोठे उद्योगपती हे कसलेल्या फलंदाजाप्रमाणे मोठ्या सामन्यात आपली मोठी खेळी खेळतात.

आपसूकच हे नवं कीर्तिमान रचतात नि जुने कीर्तिमान मोडतात. मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना निडरपणे आव्हानं देणं व त्यासाठी द्वंद्वात होणाऱ्या संभाव्य जखमा सहन करण्याची तयारी ठेवणं, हे यांचं धैर्यशील वैशिष्ट्य कोणत्याही कठीण प्रसंगात यांना एखाद्या अजोड व ओजस्वी योद्ध्याप्रमाणे लढवत राहतं. या सातव्या असामान्य गुणामुळे मोठे उद्योगपती हे आयुष्यभर विविध रणांगणांवर लढत राहतात आणि जिंकत राहतात.

मोठ्या उद्योगपतींचा आठवा गुण त्यांना मोठं करण्याचं व सतत मोठं राखण्याचं गुपित आपणांस सांगतो. आपल्यापेक्षा अधिक हुशार सहकाऱ्यांना हे चतुर उद्योगपती कोणताही अहंकार न बाळगता अलगदपणे हाताळतात व ठरविलेली कामं करवून घेतात. योग्य सहकाऱ्यांची निवड, त्यांचं सबलीकरण (एम्पॉवरमेंट), त्यांच्या कामाचं नियंत्रण आणि त्यांना कायमचं जोडून ठेवण्यासाठी त्यांचं योग्य ते कौतुक (व भरणपोषण) करण्याची कुवत असेल, तरच एखादा मोठा उद्योगपती होऊ शकतो.

याबाबतीतली दोन मोठी भारतीय उदाहरणं म्हणजे जेआरडी आणि आदित्य बिर्ला. ज्याला माणसांची पारख जमली, तो ‘मनुष्यबळ व्यवस्थापन’ सहज करतो. मोठा उद्योग उभारण्यातला हा सर्वाधिक मोठा मुद्दा असतो. सुमंत मुळगावकर हे ‘टाटा मोटर्स’चे सर्वेसर्वा होते. टाटांनी त्यांचा नेहमीच यथोचित सन्मान केला होता. मुळगावकरांनी या नामांकित कंपनीला घडवलं. ‘आपण लोकांना घडवलं की लोक आपल्या उद्योगाला घडवतात’ हे चाणाक्ष उद्योगपतींना माहीत असतं. सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीने आपापले संघ घडविले आणि भारताला विजयी करत राहिले. उद्योगपतीसुद्धा मोठा होतो ते त्याच्या संघामुळे! उत्तम सरदार घडवले की, एखादा राजासुद्धा सम्राट होऊ शकतो. ‘व्यूहात्मक नेतृत्व’ (स्ट्रॅटेजिक लीडरशिप) हा मोठ्या उद्योगपतीच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू आहे.

मोठ्या उद्योगपतीचा नववा विशेष गुण असतो, तो स्वतःची अद्वितीय अशी कार्यसंस्कृती निर्माण करण्याचा. ही सामुदायिक कार्यसंस्कृती ‘मो.उ.’ला व त्याच्या उद्योगाला मोठा ब्रँड बनवते.

आस्तेकदम हा मग ‘मदर ब्रँड’ बनतो, जो ‘मो.उ.’च्या अन्य उद्योगांनाही पुढे नेतो. ‘सचोटीपूर्ण ब्रँड’ची ताकद प्रचंड असते नि म्हणून त्याचं मूल्यांकनही जबरदस्त असतं. कल्पना करा टाटा समूहातील ‘ताज’ या इंडियन हॉटेलच्या सर्वोत्तम ब्रँडची. इथं एक गोष्ट मात्र नमूद केली पाहिजे की, पाश्चिमात्य देशांतील मोठे उद्योगपती हे ब्रँड्सच्या सोबतीने अनेक बौद्धिक संपदांचे (पेटंट्स) हक्क प्राप्त करतात, जे त्यांच्या उद्योगाचं मूल्यांकन वेगाने वाढवतात. यांच्या तुलनेत मोठ्या भारतीय उद्योगपतींना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अर्थात, ‘संशोधन व विकास’ या क्षेत्रातील आमची उद्योजकीय कामगिरी जसजशी सुधारत जाईल, तसतसा आमचा कार्पोरेट बोलबालासुद्धा जगभरात वाढत जाईल. मोठा उद्योगपती स्वतःच एक मोठा ब्रँड बनण्याची अनेक जागतिक उदाहरणं आहेत. यांच्या सोबतीने अनेक कार्पोरेट व्यवस्थापकही ‘स्टार ब्रँड’ झालेले आपण पहातो, जे आपल्या कंपनीच्या प्रॉडक्ट्स, प्रोसेसेस व पॉलिसींनाही कौतुकास्पद बनवतात. मोठ्या उद्योगपतीची ही दीर्घकालीन शक्ती असते.

मोठ्या उद्योगपतीकडे लढाऊ वृत्ती, धैर्य, संयम, चिकाटी, नम्रता, उदारता, नियोजनबद्धता, कल्पनाक्षमता, प्रचंड कष्ट करण्याची तयारी इ. सर्वसाधारण प्राथमिक उद्योजकीय गुण हे असतातच. परंतु, यांना छोट्या व मध्यम आकाराच्या उद्योजकांहून वेगळं व विशेष सिद्ध करणारा यांचा दहावा मोठा गुण असतो तो ‘सामूहिक संपत्ती निर्माण’ करण्याचा. जगातील बहुतेक मोठ्या उद्योगपतींनी आपल्या लाखो छोट्या भागधारकांची संपत्ती सातत्याने वाढवली आहे.

संपत्तीचं वाटप, मालकीचं वाटप, अधिकारांचं वाटप, गौरवाचं वाटप, वृद्धीच्या संधींचं वाटप इ. गोष्टी हे मोठे लोक विनासंकोच करीत असतात. एका अर्थी ‘सचोटीपूर्ण मोठा ब्रँड’ झालेले मोठे उद्योगपती हे एखाद्या दिलदार व कणखर तत्त्ववेत्त्यासारखेच वागत असतात, जे आपसूकच लाखो छोट्या उद्योजकांचे ‘स्फूर्तिस्रोत’ बनतात. सामूहिक संपत्ती निर्माण करताना यांनी आसक्ती (अटॅचमेंट) व विरक्ती (डिटॅचमेंट) या दोन बाबींमध्ये एक उत्तम संतुलन साधलेलं असतं. यांना मनोमनी हे माहीत असतं की, यांचा जन्म हा अतिविशेष असा उद्योजकीय पराक्रम करण्यासाठीच झाला आहे! मित्रांनो, पुढील लेखात आपण पाहणार आहोत, ‘मोठा उद्योगपती बनण्याच्या वाटचालीचा मार्ग’.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com