‘आरओआय’चं बेंचमार्किंग

बऱ्याच उद्योजकांना स्वतःच्या उद्योगाचा योग्य असा अपेक्षित ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ (आरओआय) किंवा ‘परताव्याचा दर’ हा माहीत नसतो. यासाठी हे लोक काही ठोकताळे वापरतात.
ROI
ROIsakal
Summary

बऱ्याच उद्योजकांना स्वतःच्या उद्योगाचा योग्य असा अपेक्षित ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ (आरओआय) किंवा ‘परताव्याचा दर’ हा माहीत नसतो. यासाठी हे लोक काही ठोकताळे वापरतात.

- डॉ. गिरीश जाखोटिया, girishjakhotiya@gmail.com

बऱ्याच उद्योजकांना स्वतःच्या उद्योगाचा योग्य असा अपेक्षित ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ (आरओआय) किंवा ‘परताव्याचा दर’ हा माहीत नसतो. यासाठी हे लोक काही ठोकताळे वापरतात. उदाहरणार्थ - महागाईदराच्या दीडपट किंवा बँकेच्या व्याजदराच्या दुप्पट, अथवा गुंतवणुकीची वसुली चार वर्षांत करून देणारा म्हणजे पंचवीस टक्के इत्यादी. काही उद्योजक तर आपल्या परिवारातील नातेवाइकांच्या उद्योगाने दिलेल्या ‘आरओआय’ची अपेक्षा ठेवतात, मग भलेही यांचे उद्योग अगदीच भिन्न भिन्न असले तरी. थोडक्यात असं की, बहुतेक उद्योजकांना आपला आरओआय निश्चित करण्याचा तांत्रिकदृष्ट्या योग्य असा फॉर्म्युला माहीत नसतो.

याबाबतीत यांचे वित्तीय सल्लागारसुद्धा यांना उचित असा अर्थशास्त्रीय व उद्योजकीय सल्ला देत नाहीत. योग्य आरओआय नीटपणे माहीत नसेल तर अनेक महत्त्वाचे उद्योजकीय निर्णय हे चुकीचे ठरू शकतात, उद्योगाचं व्हॅल्युएशन बिघडू शकतं, प्रॉडक्टचं कॉस्टिंग व प्राइसिंग चुकीचं ठरू शकतं, कर्जाऊ भांडवलावरील व्याजाच्या दराबाबत गोंधळ होऊ शकतो व अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे, उद्योजक हा आपल्या नफ्याच्या कमाईबाबत अनभिज्ञ राहिल्याने त्याच्या स्वतःच्या भांडवलाचा ऱ्हास होऊ शकतो. यास्तव ‘आरओआय’चं बेंचमार्किंग करणं अत्यावश्यक ठरतं.

आरओआयचं बेंचमार्किंग हे चार उतरत्या स्तरांवर करावं लागतं. पहिल्या स्तरावर ज्या देशात आपण उद्योग करतो, त्या देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणत्याही उद्योगाचा कमीतकमी आरओआय आजच्या तारखेला किती असावा, हे समजून घ्यायला हवं. हा दर ‘मूलभूत’ (जेनरिक) मानल्यास तो अर्थशास्त्रीय हिशोबानुसार आज किमान २० टक्के तरी असावा. या दराचे तीन भाग होतात - (अ) व्याजाचा किंवा महागाईचा दर - दोहोपैकी जो अधिक = १२ टक्के (ब) कुटुंबासाठीचा खर्च = हा ‘अ’च्या ४० टक्के घ्यावा म्हणजे ४.८ टक्के आणि (क) उद्योगवाढीसाठी पुनर्गुंतवणूक करण्याचा नफा = ३ टक्के - हा दर कमीत कमी घेतला आहे, जो कृषिक्षेत्राच्या वाढीचा सरासरी दर आहे. आपण इथं देशपातळीवरील आरओआय मोजतो आहोत म्हणून अर्थव्यवस्थेतील इतर क्षेत्रांच्या तुलनेत कृषिक्षेत्राचा कमी असलेला दर घेतला आहे. दुसऱ्या स्तरावर हा २० टक्के चा ‘आरओआय’ आपण ‘इंडस्ट्री’च्या पातळीवर दुरुस्त करतो.

उदाहरणार्थ - ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा गेल्या पाच वर्षांतील वृद्धीचा सरासरी दर हा जर ६ टक्के असेल, तर (क) च्या जागी असलेला तीन टक्के दर काढून तिथं आपण सहा टक्के घेतो. आता दुसऱ्या स्तरावरील म्हणजे ऑटोमोबाइल उद्योगातला अपेक्षित दर हा २३ टक्के असेल. तिसऱ्या स्तरावर कंपनीच्या कामगिरीनुसार वृद्धीचा दर आपण घेतो. चौथ्या व अंतिम स्तरावर ‘सेगमेंट’ म्हणजे प्रॉडक्ट किंवा स्थानिक बाजारक्षेत्रानुसार हा वृद्धीचा दर आपणास विचारात घ्यायला हवा. याप्रकारे ‘आरओआय’चं ढोबळ बेंचमार्किंग करायला हवं.

आरओआयचा हा बेंचमार्क उद्योगातील विविध धोक्यांचा एकत्रितपणे विचार करून वाढवावा लागतो. जेवढा धोका अधिक, तेवढी ‘ढोबळ अपेक्षा’ जास्त ठेवायला हवी. कारण धोक्याच्या परिणामाने हा ढोबळ दर ‘निव्वळ’ पातळीवर येईपर्यंत कमी झालेला असतो. बाजारातील तेजी-मंदी व आपल्या उद्योगाचं त्याच्या वाटचालीतील (लाइफ सायकलमधील) सध्याचं स्थान लक्षात घेऊन या वर्षीचा दर ठरवायला हवा. उदाहरणार्थ - ‘ टेक ऑफ’ करतानाचा दर हा ‘पूर्ण स्थैर्य’ असतानाच्या दरापेक्षा कमीच असेल.

‘मार्केट लीडरशिप’ मिळविण्यासाठी विक्री वाढवली पाहिजे आणि त्यासाठी व्यूहात्मक खेळी खेळताना एक-दोन वर्षं ‘आरओआय’मध्ये उचित अशी घट स्वीकारावीही लागते. एखादा आजारी उद्योग सुधारताना दोन-तीन वर्षं या ‘आरओआय’ची वाटचाल वेगवेगळ्या स्तरांवर तपासावी लागते. उदाहरणार्थ - फक्त ‘नगद आरओआय’ किंवा ‘व्याज व कर देण्यापूर्वीचा आरओआय’ अथवा ‘नव्या गुंतवणुकीवरील अतिरिक्त आरओआय’ इत्यादी.

‘आरओआय’वरील नियंत्रणासाठी त्याचं बेंचमार्किंग खोलात जाऊन करावं लागतं. माहितीच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक प्रॉडक्टचा आरओआय आपण मोजला पाहिजे. एखाद्या प्रक्रियेतील गुंतवणूक योग्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी त्या प्रक्रियेचा आरओआय जोखायला हवा. कारखाना, बाजारपेठ व विक्रीसमूहाचा आरओआयसुद्धा आपण तपासायला हवा. थोडक्यात असं की, विविध अंगांनी या महत्त्वाच्या परिमाणाचं विश्लेषण व्हायला हवं, जेणेकरून त्यावरील चौफेर नियंत्रण जमू शकेल.

मोठे उद्योगपती जे विविध उद्योग समांतररीत्या चालवतात, ते स्वतःच्या ‘उद्योजकीय वेळे’ला प्रचंड महत्त्व देतात, कारण ती मर्यादित मात्रेत उपलब्ध असते, तिचं अगदी किफायतशीर रेशनिंग करण्यासाठी या उद्योगपतींच्या उद्योजकीय वेळेवरचा ‘आरओआय’सुद्धा मोजला जाऊ शकतो. शेकडो कंपन्या असणाऱ्या एखाद्या महाकाय ग्रुपचा किमान ‘सामूहिक आरओआय’ बेंचमार्क म्हणून ठरलेला असतो.

ग्रुपच्या सर्वोच्च समितीला सुचवले जाणारे नवे प्रकल्प या किमान बेंचमार्कनुसार ढोबळ पद्धतीने तपासले जातात व नंतरच त्यांची विस्तृत छाननी केली जाते. अर्थात, बहुराष्ट्रीय कंपन्या असा किमान सामूहिक आरओआय ठरवताना विविध देशांच्या चलनांचं गुणोत्तर लक्षात घेतात. उदाहरणार्थ - भारताचा रुपयातील आरओआय व इंग्लंडचा पौंडामधील आरओआय यांचं गुणोत्तर काळजीपूर्वक ठरवावं लागेल.

‘आरओआय’चा वापर करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या उद्योगातील दूरगामी मालमत्ता (इमारत, यंत्रं इ.) ही दरवर्षी बदलत नसते. खेळतं भांडवल (मालाचा स्टॉक, ग्राहकांकडे अडकलेले पैसे इ.) मात्र दर आठवड्यात बदलत असतं. यास्तव खेळत्या भांडवलावरचा ‘आरओआय’ हा वेगळा मोजून वेळोवेळी तपासला पाहिजे. उद्योगाचा आरओआय व उद्योजकाचा स्वतःचा आरओआय यामधील फरक व अन्योन्य संबंध लक्षात घेऊन त्यांचं गुणोत्तर नेहमी तपासायला हवं.

कर्जावरील व्याज, कर्जाची रक्कम व आयकराचा दर यांचा गंभीर परिणाम उद्योजकाच्या स्वतःच्या ‘आरओआय’वर होत असतो. यामुळे कर्जाऊ भांडवल व स्वतःचं भांडवल यामधील गुणोत्तर हे व्यूहात्मक पद्धतीने ठरवावं लागतं. आपले पुरवठादार व वितरक हे वास्तवात किती आरओआय कमावतात, हे आपणास शक्यतो माहीत असायला हवं. कारण पुरवठादार आपल्याला किती किंमत आकारतो आणि वितरकाला आपण किती कमिशन द्यायला हवं, याचा ठोकताळा या माहितीमुळे ठरवता येऊ शकतो.

‘आरओआय’चं बेंचमार्किंग हे स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवताना पाच वर्षांसाठी खूप काळजीपूर्वक करावं लागतं. त्या पाच वर्षांतील वाटचालीनुसार आरओआयमधील चढ-उतार हे अचूकपणे टिपावे लागतात. असा दूरगामी धांडोळा घेतल्याने उद्योजकाचा आत्मविश्वास वाढतो. एखाद्या वर्षात काही कारणास्तव अपेक्षित आरओआय हा जर साधला नाही, तर त्याची वाढीव भरपाई पुढील दोन वर्षांत करण्याचं नियोजन करता येतं. यासाठी व्यूहरचना व साधन सामग्रीमधील बदलही साधता येतो. प्रत्येक इंडस्ट्रीची काही ठराविक वर्षांची एक सायकल असते, ज्यात आरओआयमधील बदलांचा अचूक वेध घेता आला, तर ‘बिझनेस व्हॅल्युएशन’चा दूरगामी अंदाज घेता येतो व भांडवल उभारणी संबंधीचे आणि अन्य करारमदारांचे योग्य निर्णय घेता येतात. म्हणूनच आरओआयचं बेंचमार्किंग हे अर्थशास्त्रीय व उद्योजकीय ठोकताळ्यांचं योग्य मिश्रण करीत सातत्याने करावंच लागतं. पुढील लेखात आपण पाहणार आहोत ‘धोका आणि अनिश्चितता’.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय, व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशात त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com