मानससूत्र : नेतृत्वाचे प्रकार

उत्तम नेतृत्व हा एका यशस्वी संस्थेचा भक्कम पाया असतो. त्याकरिता नेतृत्वगुणांची जोपासना कशी करावी हे आपण मागील लेखात पाहिले; पण म्हणतात ना, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती!’
Leadership
Leadershipsakal

- डाॅ. जयश्री फडणवीस

उत्तम नेतृत्व हा एका यशस्वी संस्थेचा भक्कम पाया असतो. त्याकरिता नेतृत्वगुणांची जोपासना कशी करावी हे आपण मागील लेखात पाहिले; पण म्हणतात ना, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती!’ तसेच नेतृत्व विविध पद्धतीने करणारे अधिकारी आहेत. संस्थांमधील नेतृत्वाच्या अनेक पद्धती आहेत.

1) स्वतःचेच म्हणणे खरे करणारे अधिकारी : भारताच्या इतिहासात आपण अनेक राजे-महाराजे पाहिले आहेत- ज्यांच्याकडे राज्याचे समस्त स्वायत्त अधिकार असत. ज्याला एकाधिकारशाही असेही म्हटले जाते. या प्रवृत्तीचे नेते कंपन्यांमध्ये, संस्थांमध्ये आजही दिसतात. असा अधिकारी संपूर्ण टीममधील कोणाचेही मत ग्राह्य न धरता स्वतःच निर्णय घेतो. तीच मते टीमवर वादत असतो. त्याच्या मताप्रमाणेच टीमला वागावे लागते. त्यासाठी कोणतीही कारणे अथवा हलगर्जीपणा खपवून घेतला जात नाही.

2) मिळून मिसळून काम करणारा : हुकूमशाहीच्या अगदी विरुद्ध लोकशाहीची पद्धत. ही पद्धत वापरणारा अधिकारी कायम इतरांच्या हिताकरीता काम करतो. सर्वांचे मत ग्राहम धरतो. टीममधील वयस्क व्यक्तीच्या अनुभवाचा लाभ घेतो. स्वतःबरोबरच टीमचीही प्रगती झाली पाहिजे, याकडे जातीने लक्ष पुरवितो.

3) परिवर्तनात्मक : हा नेता स्वतःमध्ये असलेले सर्व गुण आपल्या टीममध्येही रुजवण्याच्या प्रयत्नात असतो. टीममधील एखादी व्यक्ती वारंवार काही चुका करीत असेल, तर त्याचे मूळ कारण शोधून त्याच्या व्यक्तिमत्त्वातील न्यूनता भरून काढायला मदत करतो. हे सर्व करत असताना आपल्यानंतरही संस्थेचा अथवा टीमचा कारभार व्यवस्थित सुरू राहावा याकरीता आपल्या टीममधूनच एखाद्याची योग्य निवड करून एक नवीन नेता तयार करण्याच्या मागे तो सतत कार्यरत असतो.

4) सेवक : आपण अनेक मोठमोठ्या नेत्यांना स्वतःला सेवक म्हणून संबोधताना ऐकतो. हा नेता आपल्या संस्थेतील टीमच्या गरजांना प्रथम प्राधान्य देतो. कोणतीही गरज लागल्यास आपल्यासाठी हा सेवक रात्रंदिवस हा नेता हजर आहे हो हमी सातत्याने सर्वांना देतो.

5) व्यवहारी : जेथे व्यवहारी पद्धतीने काम करणारा नेता असतो, त्या संस्थामध्ये भावना अथवा वैयक्तिक अशा गोष्टींना मुळीच थारा नसतो. तेथे फक्त व्यवहार बघितला जातो. काम उत्तम करा, संस्थेला फायदा झाल्यास बक्षिस मिळेल; पण जर काही तोटा झाला तर शिक्षाही मिळेल. तुम्ही करीत असलेल्या कामगिरीवरच तुमचे संस्थेतील अस्तित्व अवलंबून असते.

6) करिश्मा असलेला : अनेकांना संमोहित करणारे, प्रोत्साहित करणारे व्यक्तिमत्त्व असलेला नेता. समाजप्रबोधन अथवा समाजहितासाठी जेव्हा एखादा प्रकल्प राबवला जातो, तेव्हा एखाद्या प्रसिद्ध कलाकाराला नेतृत्व देताच खूप मोठा जनसमूह त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने मोहित होऊन कामालाही प्रोत्साहित होतो. उदा. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेले ‘नाम’ फाउंडेशन; तसेच पोलिओ लसीच्या प्रसारासाठी अमिताभ बच्चन यांचा सहभाग.

7) व्यक्तिवाद (Leissez fair leadership) : Leisser हा एक फ्रेंच शब्द आहे. ज्याचा अर्थ ‘त्यांचे त्यांना करू देत’ म्हणजेच प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने शैलीने काम करू देणे. इथे नेता सर्व अधिकार त्याच्या कर्मचाऱ्यांवर सोपवत असतो. त्याचे सांगणे असते, की ‘तुमच्या पद्धतीने कामे करा, माझ्या कोणत्याही सूचनांची वाट बघण्याची आवश्यकता नाही’ यामुळे कर्मचारी अधिक जबाबदारीने कर्तव्य पार पाडतो. अनेक अधिकार त्याच्या स्वाधीन केल्याने ताकदवान बनतो; पण कधीकधी गोष्टीचा गैरफायदा घेण्याचीही शक्यता असते. तेथे नेत्याला लक्ष ठेवावे लागते.

नेतृत्वाचे विविध प्रकार आहेत. अनेक नेते यातील काही पद्धतींचा संयोजनात्मक वापर परिस्थितीनुसार करत असतात. कधी आपल्या टीमच्या कुवतीनुसार, तर कधी पदानुसार, उत्तम नेता समस्त पद्धतींचा गरजेनुसार, सामंजस्याने समतोल साधत वापर करतो, यशस्वी होतो. नेतृत्व हे सातत्याने विकसित होत जाणारे एक कौशल्य आहे त्याकरिता विचार आणि दृष्टिकोन हे विधायक असावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com