मृत्यूची हाक!

जगामध्ये प्रतिवर्षी ८३ लाख नागरिक हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. त्यात आपल्या देशाचा वाटा तब्बल २१.८ लाखांचा आहे.
air pollution
air pollutionsakal

जगामध्ये प्रतिवर्षी ८३ लाख नागरिक हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. त्यात आपल्या देशाचा वाटा तब्बल २१.८ लाखांचा आहे. चीनचा वाटा आहे, २४.४ लाख... म्हणजे आपण दुसऱ्या स्थानावर आहोत. पण, हवा प्रदूषणाची प्रक्रिया अशीच वेगाने सुरू राहिली तर आपण नजीकच्या भविष्यात प्रथम स्थानावर केव्हा येऊ हे सांगायला कोण्या अभ्यासकाची अजिबात गरज भासणार नाही हे नक्की.

सीओपी २०२३ ची वातावरण बदलांच्या विविध समस्यांना जोडलेली आंतरराष्ट्रीय परिषद सध्या दुबईत सुरू आहे. संयुक्त राष्ट्रांचे १९७ सदस्य, त्यांचे प्रमुख आणि त्यांच्या तब्बल ९८ हजार ३७२ प्रत्यक्ष नावनोंदणी केलेल्या सदस्यांच्या या विज्ञान कुंभमेळ्यात प्रत्येक दिवशी विविध दालनांमध्ये शेकडो संशोधन लेख आणि वेगवेगळे अहवाल सादर होत असताना वातावरणामधील वाढता कर्ब वायू आणि मिथेनभोवतीच चर्चासत्रे फिरत आहेत.

विकास नावाच्या मानवनिर्मित महाभंयकर राक्षसास जबाबदार धरून त्यास कसे रोखता येईल यावर निष्फळ चर्चा सुरू आहे. प्रत्येक राष्ट्राला या राक्षसाचा वरदहस्त तर हवाच आहे; पण विकसनशील आणि गरीब राष्ट्रांना ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’ या नावाखाली या राक्षसाबरोबर खोटे खोटे दोन हात करण्यासाठी श्रीमंत राष्ट्रांकडून मजबूत आर्थिक बळसुद्धा हवे आहे.

थोडक्यात ही परिषद याच मुद्द्यावर आधारित एकखांबी तंबूवर उभी आहे म्हणूनच मंडपाच्या वातानुकूलित कक्षात बसलेल्या प्रतिनिधींना पर्यावरणाचे आणि त्या संबंधामधील घटनांचे, अहवालांचे काहीच देणे-घेणे नाही, असे धाडसाने म्हणावे लागते आणि यास मुख्य कारण आहे ते संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेचा (यूएनईपी) २०२१ साली प्रसिद्ध झालेला आणि २०२३ मध्ये सुधारित केलेला हवेच्या गुणवत्तेबद्दलचा ताजा अहवाल.

२०१२ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेबद्दल एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करून प्रदूषित हवेमुळे जगामधील सात ते आठ दशलक्ष लोक प्रतिवर्षी अकाली मृत्यू पावत असल्याचे म्हटले होते. या अहवालाचा पाठपुरावा करताना संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण सभेने एक ठराव मांडून संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) या उपसमितीस सर्व सदस्य राष्ट्रांशी संपर्क साधून या संबंधित राष्ट्रामधील हवेची गुणवत्ता, ती राखण्यासाठी काय उपाययोजना आखल्या यासंबंधीचा अहवाल ठराविक आकृतिबंधामध्ये जून २०१४ पर्यंत गोळा करून त्याचे शास्त्रीय पृथ:करणही करण्यास सांगितले.

त्यानंतर त्यावर आधारित हवा प्रदूषित करणाऱ्या सहा मुख्य मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून जगामधील सर्व राष्ट्रांचे त्यानुसार वर्गीकरण करण्यात आले. ते सहा मुख्य विभाग होते : निवासी बंदिस्त जागेमधील हवा प्रदूषण, वाहनांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन, औद्योगिक विभाग, उघड्यावर जैविक कचरा जाळणे आणि हवेचा राष्ट्रीय दर्जा व त्याचे मोजमाप हे सहा मुद्दे आणि सर्व सहभागी राष्ट्रांच्या वर्गीकरणामधून बाहेर पडलेले सत्य फारच भयानक होते.

आजही जगामध्ये अंदाजे चार दशलक्ष लोक बंदिस्त निवासी जागेमधील हवा प्रदूषणाने प्रतिवर्षी अकाली मृत्युमुखी पडतात. प्रत्येकास वाटते बाहेरच्या पेक्षा आपल्या घरामधील, कार्यालयातील हवा जास्त स्वच्छ आणि सुरक्षित आहे; पण चित्र वेगळेच असते. वाहनांच्या धुरामधून होणारे प्रदूषण मृत्यूस लवकर आमंत्रित करते, कारण त्यात सल्फर आॅक्साईड्स, कार्बन मोनाक्साईड्स, नायट्रस आॅक्साईड नेहमीच जास्त असतात.

आजही आपण युरो ४, ५, ६ पासून खूप दूर आहोत. सीएनजी, विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या गाड्या हे प्रदूषण रोखू शकतात; पण त्यांची किंमत सर्वसामान्य जनतेस परवडणारी नाही. नार्वे या देशाने यामध्ये खूप प्रगती केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर हा हवा प्रदूषणावर अतिशय प्रभावी उपाय आहे. सिंगापूर, जपानमध्ये ७२ टक्के लोक ही व्यवस्था वापरतात.

आजही विकसित राष्ट्रांचा अपवाद वगळता औद्योगिक क्षेत्रात स्वच्छ हरित ऊर्जेचा वापर अतिशय नगण्य आहे. सिंगापूर, डेन्मार्क या क्षेत्रात प्रगतिपथावर आहेत. ब्राझीलमध्ये इथेनॉलचा वापर वाढला आहे, ही निश्चितच जमेची बाजू आहे. संयुक्त राष्ट्राच्या १९७ सदस्य राष्ट्रांपैकी १६६ राष्ट्रांत आजही उघड्यावर जैविक कचरा जाळला जातो. इटलीमध्ये अशा जैविक कचऱ्याचे पुनर्निर्माण करण्यात येते. फ्रान्समध्ये प्रतिवर्षी ६०० बायोगॅस संयंत्रे कार्यान्वित होतात.

संयुक्त राष्ट्राचा हवेच्या दर्जासंबंधीचा २०२३ हा अहवाल सांगतो, की १०९ सदस्य राष्ट्रांनी त्यांच्या देशात हवेच्या कार्बन मोनाक्साईड, ओझोन, सल्फर आॅक्साईड, नायट्रिक आॅक्साईड, धूलिकण आणि जस्त या सहा मुख्य घटकांचा दर्जा निश्चित केला आहे. हे सहा घटक मानवी आरोग्याबरोबरच सभोवतालच्या परिसंस्थेससुद्धा अतिशय घातक असतात. प्रत्येक देशामध्ये तेथील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी हवेची गुणवत्ता उत्तम ठेवण्यासाठी काही कायदे आणि नियमावली असणे आवश्यक आहे; पण दुर्दैवाने अनेक राष्ट्रांत अशी नियमावली असली तरी ती सदोष आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ग्लासगो, स्कॅटलंडच्या सीओपी २६ च्या बैठकीत २१ आॅक्टोबर २०२१ रोजी हवा प्रदूषणाचा एक अहवाल सादर करून प्रत्येक मिनिटास जगामधील १३ लोकांचा त्यामुळे अकाली मृत्यू होत आहे हे जाहीर करून सर्व सदस्य राष्ट्रांना धक्काच दिला. याच अहवालात २०२० मध्ये ३,३०,००० नागरिकांचा मृत्यू एकट्या भारतात झाला आहे, असेही त्यात म्हटले आहे.

म्हणजेच प्रत्येक दोन मिनिटांस १.२ मृत्यू भारतात झाले. चीनमध्ये ३,८०,०००; तर युरोपमध्ये १,१७,००० एवढे मृत्यू होते. हवा प्रदूषणाचे हे काळवंडलेले चित्र फारच भयंकर, तेवढेच वेदनादायी आहे. जगामधील ९१ टक्के लोकसंख्या जन्मलेल्या बाळापासून वयोवृद्धापर्यंत प्रदूषित हवेत श्वासोच्छवास करून हदयविकार, कर्करोग, श्वासोच्छवासाचे विकार, मधुमेह २ यांना आमंत्रित करत आहे.

प्रत्येक अकाली मानवी मृत्यूमागे कुठेतरी हवा प्रदूषण कारणीभूत आहे, हे आजही आपण मान्य करण्यास तयार नाही. आपण प्रत्येक मिनिटास १२ ते २७ वेळा श्वासोच्छवास करतो म्हणजेच प्रदूषित हवाच आत घेतो. ती फुप्फुसातून रक्तात पाठवतो आणि तेथून सर्व अवयवांना. हवेमधील प्रदूषित कण एकदा शरीरात गेल्यावर मृत्यूपर्यंत तुमची साथ सोडत नाहीत.

भारत हे विकसनशील राष्ट्र आहे म्हणूनच आपल्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच वेगाने होत असलेल्या दिशाहीन विकासकामामुळे येथील हवेचा दर्जासुद्धा आज दोलायमान अवस्थेत आहे. बाहेरची हवा प्रदूषित असल्यामुळे निवासी घरे तरी कशी सुरक्षित राहणार? आपल्याकडे महागडी वाहने असणे हा प्रतिष्ठेचा विषय आज सर्वात जास्त जीवाश्म इंधन जाळून हवा प्रदूषित करत आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दैनंदिन प्रवासी संख्येच्या वाढत्या आलेखामुळे जीवघेणी झाली असून ती कोलमडलेल्या अवस्थेत कशी तरी रांगत आहे. जगामध्ये सर्वात जास्त जैविक कचरा आपल्या देशात आणि तोही उघड्यावर जाळला जातो. ज्वलनशील वायू हा स्वच्छ ऊर्जेमध्ये अंतर्भूत आहे; पण प्रत्येक कुटुंबास तो पाईप अथवा सिंलिंडरच्या माध्यमातून उपलब्ध आहे काय?

आजही आपल्या देशात ३० टक्के ग्रामीण गरीब लोकसंख्या लाकूड फाटा, गोवऱ्या याचा वापर इंधन म्हणून करतात. आजही अशी हजारो औद्योगिक केंद्रे आहेत, जिथे प्रदूषणकारी काळे ढग वातावरणात रात्रंदिवस सोडले जातात. इथेनॉलच्या वापराबद्दल, सौरऊर्जेबद्दल शासन आग्रही आहे; पण लोक बदलावयास तयार नाहीत. बहुमजली इमारतींचे बांधकाम, शासकीय माध्यमातून होणारे रस्ते, पूलबांधणी आणि त्यामधील दिरंगाई मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण करते.

यामुळे सार्वजनिक वाहतुकीत अडथळे, कोंडी निर्माण होऊन जीवाश्म इंधन मोठ्या प्रमाणावर जळते, जे सहज नियंत्रणात आणणे शक्य आहे. रासायनिक खतांचा मर्यादित वापर हवेमधील धूलिकण नियंत्रित करू शकतात. सेंद्रीय शेती कृषी क्षेत्राकडून होणाऱ्या हवा प्रदूषणावर जेवढे नियंत्रण ठेवू शकते तेवढेच नियंत्रण गायरान निर्मितीमधून दुभत्या जनावरांकडून होणाऱ्या मिथेन निर्मितीवरसुद्धा होऊ शकते.

जगामध्ये प्रत्येर वर्षी ८३ लाख नागरिक हवा प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत. भारताचा वाटा तब्बल २१.८ लाखांचा आहे. चीनची आकडेवारी आहे तब्बल २४.४ लाख... म्हणजे आपण दुसऱ्या स्थानावर आहोत. हवा प्रदूषणाची प्रक्रिया अशीच वेगाने सुरू राहिली तर त्यासारखे धोकायदायक काही नाही.

(लेखक पर्यावरण आणि वातावरण बदलाचे अभ्यासक आहेत.)

nstekale@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com