आयुर्वेदाचे अंतरंग

अलीकडे काही ठिकाणी प्रसूतीच्या वेळी पतीलाही बोलावतात. तोही तिला धीर देतो. सुशिक्षित पांढरपेशा समाजात सरळ मुहूर्त काढून सिझरिअन शस्त्रक्रिया करतात.
Doctor Student
Doctor Studentsakal
Updated on

पहिल्यांदा आम्ही विद्यार्थी ॲप्रन घालून हॅास्पिटलच्या वॉर्डात गेलो, तो दिवस अविस्मरणीय होता. त्यानंतर अनेक निरीक्षणातून मला आयुर्वेदासोबत समाजाचे अंतरंग कळत जाऊ लागले...

अलीकडे काही ठिकाणी प्रसूतीच्या वेळी पतीलाही बोलावतात. तोही तिला धीर देतो. सुशिक्षित पांढरपेशा समाजात सरळ मुहूर्त काढून सिझरिअन शस्त्रक्रिया करतात. प्रसूती विभागातून स्त्री बाळंत होऊन घरी जाताना डिस्चार्जची वेळ ही पाहण्यासारखी असते. मुलगा झाला असेल तर सासरचे उत्साहाने पेढे, वॅार्डातील देवाला हार घेऊन येत. बाळंतिणीला खीर असे. मुलगी झाली असेल तर नातीची आजी जावयाला समजावत असे, तर सासूला जणू सूतक असे. या अशा निरीक्षणातून मला आयुर्वेदासोबत समाजाचे अंतरंग कळत जाऊ लागले.

आयुर्वेदाच्या पाच वर्षांच्या अभ्यासापैकी पहिली तीन वर्षे बहुतेक अभ्यास पुस्तकांवरून होता. पहिल्यांदा आम्ही विद्यार्थी ॲप्रन घालून सरांबरोबर हॅास्पिटलच्या वॉर्डात गेलो, तो दिवस अविस्मरणीय होता. हॉस्पिटलचे वातावरण, तिथला वास मला सवयीचा नव्हता. आरोग्य शिबिरात सिनियर्सना मदत केली होती व ते पाहून अनेक गोष्टी ओळखीच्या झाल्या होत्या. काही विद्यार्थी मेडिकल पार्श्वभूमीचे होते. त्यांना अनेक विषयांची जुजबी माहिती होती; तरीही कायाचिकित्सा, शल्यशालाक्य, कौमारभृत्य असे फरक आमचे सर व मॅडम यांच्यामुळे कळायला लागले. रोज वेगवेगळ्या ओपीडी व शस्त्रक्रियांचे दिवसही ठरलेले होते.

हॉस्पिटलमधले रुग्ण संमिश्र असायचे. गिरणगाव, वरळी, पनवेल यासोबत मराठवाडा, बिहार, उत्तर प्रदेश असे लांबून आलेले रुग्ण असत. आजही मुंबईच्या केईएम, सायन, नायर, जेजे या इस्पितळांची परिस्थिती काही निराळी नाही. पुरेसा अनुभव असल्याशिवाय शिकाऊ डॅाक्टरनी रुग्णांना तपासायची परवानगी नसते. हाऊसमन, आरएमओ, सिस्टर्स, वॉर्ड बॅाय, आया हे विद्यार्थ्यांशी साधारणपणे सर कसे वागतायत, त्याचे अनुकरण करायचे. खुप वर्षांच्या अनुभवाने सरसुद्धा पेशंटच्या डिस्चार्जची फाईल पाहून ‘काय फाईलवर आज नवे चांगले अक्षर आहे!’ असे म्हणून सिनियर्सची फिरकी घेत असत.

पोदार तसे गरीब रुग्णांचे इस्पितळ होते, तरी अनेक उच्चप्रतीचा अभ्यास व प्रॅक्टिस असलेले डॅाक्टर्स, भूलतज्ज्ञ येत असत. काहींचे खासगी रुग्णही तिथे भरती केले जात. रुग्णाच्या कथा व आठवणी भरपूर आहेत. शस्त्रक्रियेच्या आधी एखादा पेशंट पळून जाई; तर मेडिकल वॅार्डातील पेशंट क्वचित ‘डामा’ म्हणजेच डिस्चार्ज अगेंस्ट मेडिकल अॅडव्हाईस म्हणजे उपचारांची गरज असतानाही पळून जाई. हायड्रोसिलचे पेशंट क्वचित महिला डॅाक्टर गेल्या की ‘मर्द डॅाक्टर को भेजो’ असे सिस्टरना सांगत. त्यावर आमचे सर व सिस्टर त्या रुग्णाची चांगलीच खरडपट्टी काढत.

महिलांच्या प्रसूती विभागावर एक कादंबरीच होईल. एकूण वैद्यकीय क्षेत्रातील लोक बरेच लिहितात; पण त्यावर अजून खुप काही लिहिण्यासारखे आहे. प्रसूती विभागात तेव्हा तरी वातावरण मला फारच उग्र वाटले. रात्रीच्या वेळी सिनियर डॅाक्टर बोलावले तरच येतात. काही सिस्टर फार प्रेमळ व माहितगार होत्या; तर काही प्रसूतीस आलेल्या महिलांची चेष्टा करायच्या. ‘आता का रडतेस, तेव्हा मजा वाटली ना?’ असे म्हणत. काही खडबडीत स्वभावाच्या महिला प्रसूतीकळा असह्य झाल्यावर नवऱ्याला खच्चून शिव्या देत असत.

अलीकडे काही ठिकाणी प्रसूतीच्या वेळी पतीलाही बोलावतात. तोही तिला धीर देतो. सुशिक्षित पांढरपेशा समाजात सरळ मुहूर्त काढून सिझरिअन शस्त्रक्रिया करतात. प्रसूती विभागातून स्त्री बाळंत होऊन घरी जाताना डिस्चार्जची वेळ ही पाहण्यासारखी असते. मुलगा झाला असेल तर सासरचे उत्साहाने पेढे, वॅार्डातील देवाला हार घेऊन येत. बाळंतिणीला खीर असे. मुलगी झाली असेल, तर नातीची आजी जावयाला समजावत असे, तर सासूला जणू सूतक असे. या अशा निरीक्षणातून मला आयुर्वेदासोबत समाजाचे अंतरंग कळत जाऊ लागले.

पोदार हॅास्पिटलमध्ये आयुर्वेदिक उपचार व आधुनिक अॅलोपथीच्या शस्त्रक्रिया होत. त्यात हृदय, मेंदूवरील अत्याधुनिक फार मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या नाहीत, तरी छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया होत असत. पंचकर्म विभाग, फार्मसी पूर्णपणे आयुर्वेदावर चालत असे. सिद्धौषधी, काढे, काष्ठौषधे यांचाही उपयोग केला जात असे. आम्हाला एक वर्षाची इंटर्नशीप म्हणजे शिकाऊ डॅाक्टरची कामे असत.

या काळात सर्व विभागात मी काम केले. पोस्टमार्टेम केले नाही, तरी जे. जे. रुग्णालयातील शवविच्छेदनाचेही काम पाहायला मिळाले. हळुहळू प्रेत, मृतदेह, रक्त, मांस यांची भीती निघून गेली. रात्री वॉर्डात काही वेळा इमर्जन्सी काम असायचे, तर रात्री दोन-तीनलाही जावे लागे. हाऊसमनला मदतीचे काम केल्याशिवाय अनुभव वाढत नाही, आत्मविश्वास येत नाही.

मी स्वतः हाऊसमन म्हणून शल्य शालाक्य यात पोस्ट केली. पेशंट बरे होऊन जाताना पाहून खुप आनंद वाटायचा!

मला युक्रांदमधले डॉ. अरुण लिमये म्हणाले, मुली कॅज्युअल्टीला काम कमी करतात, त्यांना तिथे जनरली ड्युटी देत नाहीत; पण तू तिथे कामाचा अनुभव घे. म्हणून मी मुद्दाम विनंती केली. सरांनी व डीन यांनी ती मान्य केली.

दारू प्रचंड पिऊन जखमी झालेले पेशंट, मारामारी होऊन मेडिकल चेकपोस्ट आलेले जखमी, उंदिरांनी चावा घेतलेली तान्ही बाळे, अपघातातील जखमी, विषबाधा झालेले लोक यांना ताबडतोब काय उपचार करायचे, ते मला तिथे समजले.

या अनुभवाने माझी एकटीने परिस्थिती हाताळायची भीती निघून गेली. कॅज्युअल्टीत मेडिकल लीगल म्हणजेच न्यायवैद्यकाशी संबंधित केसेसही असतात. तिथले रजिस्टर भरायचेही काम असायचे. माझ्या एकदा लक्षात आले की, एक क्रमांकानंतर रिकामी जागा सोडून डायरेक्ट पुढील जास्तीचा क्रमांक टाकला होता. उदा. ११३ नंतर ११५ याप्रमाणे. मी विचारणा केली तेव्हा मला कोणीतरी सांगितले की, पोलिस एखादी केस फार उशिरा मेडिकलला आणतात, तेव्हा ही केस वेळेवर आणली असे दाखवले जाते. अर्थात आता सर्वत्र सीसीटीव्ही व पोलिसातील सीसीटीएनएस सिस्टीम यांनी थोडाफार आळा बसला असेल, असे वाटते.

काही कमी-जास्त दाहक वास्तवातून समजलेल्या या वस्तुस्थितीतून आयुर्वेदाचे अंतरंग कळाले तसेच त्यातील श्री धन्वंतरींच्या संजीवनीची शक्ती प्रतित झाली.

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

neeilamgorhe@ gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com