लांबचे आणि जवळचे

दीर्घकाळ सामाजिक जीवनाचा आपण विचार करतो, त्यात सामाजिक जीवन आणि राजकारण हे दोन्ही एकमेकांशी किती जोडले गेलेले आहेत, याचा नेहमीच अनुभव येतो.
Family Relations
Family RelationsSakal

दीर्घकाळ सामाजिक जीवनाचा आपण विचार करतो, त्यात सामाजिक जीवन आणि राजकारण हे दोन्ही एकमेकांशी किती जोडले गेलेले आहेत, याचा नेहमीच अनुभव येतो. काही वेळेला परिस्थितीमुळे, तर काही वेळेला घडलेल्या घटनेच्या अपरिहार्यतेमुळे लांबची माणसेही जवळ आलेली दिसतात. उदगीरवरून पुण्यात परत आल्यानंतर हाच अनुभव मला आला होता, त्याची ही गोष्ट...

आम्ही उदगीर सोडून पुण्याला यायचा निर्णय घेतला, त्याच्या साधारणपणे पाच-सहा महिने आधी माझी प्रसूतीची तारीख होती. त्याच्या आधी तीन-चार महिने वेगवेगळी आंदोलने चाललेलीच होती. आनंद करंदीकर युवक क्रांती दलाचे पूर्णवेळ काम करत होते. या कामातसुद्धा अनेक वैचारिक स्वरूपाच्या समस्या उभ्या राहिलेल्या होत्या. मी नेहमीच्याच विचारमंथनातून काही भूमिका घेत गेले; परंतु युवक क्रांती दलाच्या कार्यपद्धतीची एक भूमिका होती.

ज्या वेळेला आमच्याकडे असणारे काही नेते हे इतर पक्षांमध्ये गेले किंवा स्वतंत्रपणे निवडणुकीला उभे राहिले, त्या वेळेला युवक क्रांती दलाच्या सदस्याला राजकीय निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय एकमताने झाला. त्या वेळेला असंघटित क्षेत्रातल्या लोकांना संघटित करणे आणि त्याचबरोबर विविध विषमता दूर करण्यासाठी काम करण्याचे ठरले. व्यापक राजकीय भूमिकेने काम करणे शक्य असेल त्यांनी तेही करावे, अशी भूमिका होती. निवडणुकीच्या वेळी भूमिकेनुसार पाठिंबा दिला जात असे.

या कार्यासाठी काही जण पूर्ण वेळ काम करणारे होते. त्यांच्या चरितार्थासाठी त्यांना संघटना अल्पसा निधी देत असे. पूर्णवेळ काम करणारे संघटनेसाठी समर्पित असायचे. अशा परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी पाहता मला प्रसूतीसाठी पुण्यामध्ये जाणे योग्य वाटले होते. कारण एकतर आई-बाबा पुण्यात होते, त्याचबरोबर तिथे डॉक्टरांचे मोठे नेटवर्क होते.

पुण्यात अनेक जण ओळखीचे होते. त्यामुळे मी दवाखाना साधारणपणे चार महिन्यांसाठी बंद करायचा, असे ठरवून पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये स्वतःच्या तब्येतीची काळजी, बाकीच्या तपासण्या यामध्ये मी दंग होते. अर्थात काही पेशंटचे फोन यायचे. औषधे चालू ठेवायची की काय करायचे, असे ते फोनवर विचारत असत. उदगीरच्या सगळ्या जणांनाच माझी चांगली आठवण येत होती.

त्याच सुमाराला बरेचसे वैचारिक विवाद आमच्या बैठकांतून थोडेफार माझ्याही कानावर येत होते. त्यात पूर्णवेळ कार्यकर्त्यालाच संघटनेचा राज्यस्तरावरचा पदाधिकारी होता यावे का, याचे उत्तर बऱ्याचशा जणांना ‘हो’ असे वाटत होते. आनंद तोपर्यंत पूर्णवेळ कार्यकर्ता जरी प्रत्यक्षात असला, तरी त्याचे दोन वर्षे शिकावू कामाच्या संदर्भातले होते. लवकरच त्याचा शिकावूपणा पूर्ण होणार होता.

आम्ही ज्याला जाणता पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणायचो, ते स्थान त्याला मिळणार होते. दुसरा विषय होता की, पक्षात सगळ्यात मोठे असणारे सचिवपद कुणाकडे असायला पाहिजे, त्या व्यक्तीची सामाजिक पार्श्वभूमी काय असावी, हे सगळे घडत असतानाच ३ आणि ५ फेब्रुवारीदरम्यान माझी प्रसूतीची तारीख होती.

३ आणि ४ फेब्रुवारी १९८० दरम्यानच एक शिबिर मुंबईमध्ये होणार होते. त्यामुळे आनंद माझ्या प्रसूतीच्या तारखेसाठी न थांबता पूर्णवेळ कार्यकर्ता असल्यामुळे त्या शिबिराला जाणे अनिवार्य असल्याने तो निघून गेला होता.

३ फेब्रुवारीला रात्रीपासून पोटामध्ये दुखत होते; परंतु प्रमाण कमी होते. प्रचंड थंडीही होती. त्या दिवशी ड्रायव्हर होता तरी बाबा म्हणाले होते की, हॉस्पिटलला मी तुला स्वतःच घेऊन जाईल. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको आणि म्हणून बाबाही दौऱ्याला न जाता पुण्यात घरी थांबलेले होते. अशा वेळेला मध्यरात्री मला कळा वाढायला लागल्या आणि डॉ. तेलंग यांच्या हॉस्पिटलमध्ये मी दाखल झाले.

रात्रभर थोड्या कळा झाल्यावर पहाटे सहाच्या सुमाराला मुक्ताचा जन्म झाला. आनंद ५ तारखेला शिबिर संपवून भेटायला आला आणि सांगितलं की, त्याने युवक क्रांती दलाचा राजीनामा दिला. ते ऐकल्यावर मला धक्का बसला. कारण युवक क्रांती दलासाठी आम्ही आयुष्य समर्पित करायचे ठरवलेले होते.

एका बाजूला बाळंतपणातून मला सावरायचे होते. मुक्ता तान्ही होती, भेटायला लोक येत होते. डॉक्टरांकडून काही औषधपाणी चाललेले होते. दुसरीकडे आनंदने युवक क्रांती दल सोडून देणे याचा मला काही अर्थच कळेनासा झाला होता. दरम्यान आनंदने मला त्याची भूमिका सांगितली. त्यासाठी एक सविस्तर असे सात-आठ पानी पत्रही तयार केले होते. त्याचे म्हणणे होते की, युवक क्रांती दलामध्ये वेगवेगळ्या समाजातून येणारे कार्यकर्ते असतात.

वैचारिक बांधिलकी स्वीकारतात. ते सर्व प्रकारच्या विषमतांच्या विरुद्ध असतात. त्यानंतर आपण त्यांना प्रशिक्षण देतो, मदत करतो, विविध प्रश्न समजून घेण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असतो. अशा वेळेला एका काळानंतर त्या व्यक्तीची जात बघून त्याला पदाधिकारी होण्यातून वगळणे किंवा त्याला पदाधिकारी होण्यामध्ये प्राधान्य देणे या दोन्ही गोष्टींबद्दल विचार करायला पाहिजे.

त्यात जर दोन किंवा तीन पदाधिकारी असतील तर त्याच्यात विविध समाजाचे प्रतिनिधित्व असावे एवढे सगळ्यांनाच वाटत होते; परंतु सचिव किंवा वरिष्ठ स्तरावरच्या पोस्ट, सहसचिव अशा पदांसाठी काय निकष असावेत, याबद्दल मतभेद होते. त्या वेळेला मला लक्षात आले की, आनंद अतिशय दुखावले गेलेले होते.

त्यांच्यासारखी उच्च विद्याविभूषित असणारी व्यक्ती ज्या वेळेला पूर्णवेळ समाजासाठी काम करते, त्या वेळेला त्यांच्या अभ्यासाचा, त्यांच्या अनुभवाचा, ज्ञानाचा उपयोग हा कसा करून घ्यायचा, याविषयी तेवढी समज युवक क्रांती दलाकडे होती, असं वाटत नाही.

ज्याला जशी वाट सापडेल, तसे तो स्वतःच्या कौशल्यानुसार काम करत होता. त्यात काही मासबेस म्हणजे समुदाय एकत्र करणारे होते. काहींचा पिंड अभ्यासक-संशोधक असा होता. या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला जातीय निकषानुसार क्रांतिकारी विचार मांडणाऱ्या संघटनेतसुद्धा तरतमभाव होतो आहे, असे त्यांच्या लक्षात आल्यावर आनंदने राजीनामा दिला, असा माझा साधारणपणे समज आहे.

त्या संदर्भात त्याचे म्हणणे आजच्या घडीला काय आहे, यावर मी भाष्य करू शकणार नाही. पण या आनंदच्या निर्णयामुळे एका दिवसामध्ये जे अनेक जवळचे सहकारी, मित्र होते ते लगेच दुरावले गेले, असे माझ्या लक्षात आले. जे भेटायला येत होते, तेसुद्धा म्हणत होते की, तू त्याला समजव की, राजीनामा देऊ नको.

अशा वेळेला आईला व घरातल्या लोकांना काही कळेनासे झाले होते. ते प्रसूत झालेल्या एखाद्या मातेचे अभिनंदन करायला येत आहेत की आणखी काही... बाळंतपण झाल्यावर तिसऱ्या दिवसापासून सहाव्या दिवसापर्यंत ती राजकीय चर्चा कसली चालली, यामुळे आमच्या कुटुंबातले लोकसुद्धा थोडे गांगरून गेले होते; परंतु मी ते समजून घेतले.

मुक्ता तान्ही होती. तिच्याकडे एका बाजूला लक्ष देणे आवश्यक होते. चार-पाच दिवसानंतर मुक्ता थोडी आजारी पडली. तिला काही इन्फेक्शन झाले, असे वाटायला लागले. मग मात्र लक्षात आले की आता या राजकीय चर्चांना मी वेळ देणे योग्य ठरणार नाही. आनंदच्या निर्णयामुळे माझ्या डोळ्यातून तीन-चार दिवस घळाघळा पाणी वाहत होते.

आनंदने युक्रांदचा राजीनामा दिल्यावर मी पुढे काय करायचे, याचे उत्तर मला काही सापडले नव्हते. लगेच उत्तर देण्यापेक्षा मी घाईघाईने राजीनामा देण्यापेक्षा युवक क्रांती दलाचेच काम करावे, असे मला वाटले. अर्धवेळ, जसे आपला दवाखाना आणि आपल्या बाळाला सांभाळून करता येईल तसे करावे, अशा प्रकारचा निर्णय मी अगदी मुक्ताचा जन्म झाल्याबरोबर आठव्या दिवशीच घेतलेला होता.

त्यामुळे जशी बाहेर ही बातमी समजली की, आनंद करंदीकर यांनी युवक क्रांती दलाचा राजीनामा दिलेला आहे. त्याबरोबर समाजवादी चळवळीतले, कम्युनिस्ट चळवळीतले, दलित चळवळीतले स्त्रीमुक्ती चळवळीतल्या अनेक जणींनी माझी भेट घेऊन प्रत्यक्षात विचारपूस केली. आपुलकी दिली. ‘‘तू तुझं काम जरूर कर.

तू आमच्यासाठी स्वतंत्र व्यक्ती आहेस. त्यांनी राजीनामा दिला असला, तरी त्यांनी विचारांचा राजीनामा दिलेला नाहीये आणि तू आमच्याबरोबर आहेस, याची आम्हाला खात्री आहे.’’ असे उद्‌गार बळ देणारे ठरले.

मुक्ताचा जन्म झाला त्यात जवळचे लांब झाले आणि काही आमच्या जवळ झाले, असा एक मला अभूतपूर्व अनुभव आला. या सगळ्या सामाजिक-राजकीय परिस्थितीतील मी एक कार्यकर्ती असल्यामुळे वेगळेच जगायला मिळाले किंवा जगावे लागले, असे मला म्हणता येईल.

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

neeilmgorhe@gmail.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com