
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे टिपटॉप युनिफॉर्म, बूट, इंग्लिश उच्चार करायचे. आम्ही मराठी शाळेत जायचो. इंग्रजी भाषेच्या अभावाने येणाऱ्या बुजरेपणामुळे आमच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या नजरेतला भेदभाव स्पष्ट कळायचा. आम्ही काहीकाळ गप्पगप्प असायचो; पण काही दिवसांतच आम्ही आपसात स्पष्ट, मोठ्या आवाजात मराठीत गप्पा सुरू केल्या आणि ‘येस फ्यस’ करणारे काही अंकल व आंटी आवर्जून मराठी बोलू लागले.
वरळीची निवासी वसाहत व गोरेगावची निवासी कॉलनी यात आर्थिक परिस्थितीचा फरक होता. वरळीत मध्यमवर्गापैकी थोडासा कनिष्ठ वर्ग व संपूर्ण भारताचे नमुनेदार चित्र होते. गोरेगाव पूर्वच्या आमच्या कंपनी वसाहतीत विविध भाषिक बहुसंख्येने; पण कॉलनीत परदेशातून शिकून आलेली, उच्चविद्याविभूषित व बिगर मराठी भाषिक कुटुंब मोठ्या प्रमाणात होती.
अगदी चिमुकल्या म्हणजे या ६०-७० शास्त्रज्ञांच्या या वसाहतीतील कुटुंबे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यात उल्लेख केलेल्या ‘चौकोनी चेहऱ्यांची कुटुंबे’ होती. मनाने अत्यंत सुसंस्कृत, पतीराजांच्या हुशारीबाबतचा सर्व कुटुंबांत अभिमान असे. त्याचसोबत कंपनीतील हुद्द्यानुसार प्रत्येकाचे स्थान ठरे. शास्त्रज्ञ ही जबाबदारी सारखीच असली तरी जुने व नवे हा सूक्ष्म भेदभाव प्रत्येक बाबतीत पिच्छा सोडत नसे.
कॉलनीतील २५-३० मुला-मुलींपैकी ९९% मुले-मुली इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात होती. त्यामुळे ती एकाच बसने एके ठिकाणी जात असत. काहींच्या आई मोटारीने सोडायला जायच्या. आम्ही मराठी शाळेत जायचो, तिथे वेशभूषा व पादत्राणांबाबत काही बंधने नव्हती. त्यामुळे बूट न घालता आम्ही चप्पलच वापरायचो. परिणामी मी व जेहलम या कॅालनी बसमध्ये मुला-मुलींत वेगळ्या दिसायचो.
त्यातून आम्हाला लहानपणी इंग्रजी फारसे येत नव्हते, त्यामुळे बोलायची अडचण व्हायची. विशेषतः दाक्षिणात्य लोकांचा इंग्रजीत बोलण्याचा आग्रह असे. बाकी पंजाबी, गुजराती, बंगाली आदी अठरापगड कुटुंबे मात्र आमच्याशी हिंदीत बोलायची. या अनुभवाने आमच्या मनावर आपले मराठीपण ठळकपणे उमटवले.
त्यातून एक वेगळा अनुभव, माझ्या स्वतःच्याच स्वभावाचा मी घेतला. मी नववीतून दहावीत गेले. आमच्या वर्गातील एक सहविद्यार्थिनी साडी नेसत असे. फिकट आकाशी रंगाची साडी या गणवेशाला शाळेने परवानगी दिली होती. ती साडी नेसत असे म्हणून नववीत असताना मीही एकदा साडी नेसून शाळेत गेले.
शाळकरी मुलीला साडी, ब्लाऊज हा युनिफॉर्मचा हट्ट माझ्या आई-बाबांनी पुरवला. शाळेतील एक शिक्षिका त्यावरून खोचकपणे; पण थोड्या हेटाळणीने म्हणाल्या, ‘‘काय गं नीलम, आज साडी नेसून आलीस!’’ माझाही वेडेपणा म्हणजे मी भोळसटपणे म्हणाले, ‘‘माझी मैत्रीण साडी नेसून येते ना, म्हणून मीही साडी नेसून आलेय!’
त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘एकाच दिवशी का साडी नेसलीस, रोजच नेसत जा गं मग!’’ दहावीच्या वर्गात मुलींच्या पाठीमागे साडी नेसायचे काम कशाला लावायचे, असा विचार काही बाईंच्या मनात आला नाही. मीही म्हणाले, ‘‘पुढच्या वर्षी मी एका दिवसाआड नेसेन’ व दहावीत मी नक्की आलटून-पालटून साडीचा युनिफॉर्म वापरायचे. त्याचा परिणाम असा झाला की कॉलनीच्या बसमध्ये मी वेगळीच दिसू लागले!
इतर मुलांचे टिपटॉप युनिफॉर्म, बूट, इंग्लिश उच्चार, तर माझी साडी, जेहलमचा युनिफॉर्म वेगळ्या रंगाचा. इंग्रजी भाषेच्या अभावाने येणाऱ्या बुजरेपणामुळे आमच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या नजरेतून भेदभाव कळायचा. सुरुवातीला आम्ही काहीकाळ गप्पगप्प असायचो; पण काही दिवसांतच आम्ही आपसात बसमध्ये स्पष्ट, मोठ्या आवाजात मराठीत संभाषण, गप्पा सुरू केल्या.
कॉलनीतील एक विद्यार्थी दुसऱ्या मराठी शाळेत शिकत होता. त्याच्याशी, त्याच्या आई-बाबांशी मराठीत बोलू लागले. काय आश्चर्य! बऱ्याच ‘येस फ्यस’ करणाऱ्या लोकांना व्यवस्थित मराठी येत होते! काही अंकल व आंटी आवर्जून मराठी बोलू लागले. काही हिंदी बोलू लागले.
हा अनुभव येण्याचा काळ होता, १९६६-६७ चा! एक दिवस शाळेतून येताना मी वर्तमानपत्रांच्या स्टॉलवर ‘स्वराज्य’, ‘अमृत’, ‘रसरंग’ असे अंक घेत असे, त्यावेळी एक अंक मला दिसला, त्या मराठी अंकाचे नाव होते ‘मार्मिक’!
‘मार्मिक’चा अंक वाचताच मन प्रभावित झाले. मी अवघ्या १३-१४ वर्षांची होते; परंतु मनाची कुणीतरी तारच छेडलीय असे वाटायला लागले. यापूर्वी मी तिसरी-चौथीपासूनच ‘मराठा’, पुण्यात कधी गेले तर ‘सकाळ’, ‘स्वराज्य’ तसेच ‘लोकसत्ता’ वाचत असे. थोर साहित्यिक मामा वरेरकरांची ‘धावता धोटा’ ही कादंबरी मी वाचली होती.
साने गुरुजींच्या पुस्तकातून माणुसकीची ओळख होती. अशावेळी ‘मार्मिक’च्या मी प्रेमात पडले. न चुकता शाळेच्या दप्तरातून चोरून मी ‘मार्मिक’ घरी नेत असे. त्यातील एक सदर होते- ‘वाचा व थंड बसा!’ टोच्या यांच्या नावाने हे सदर शेवटच्या पानावर प्रसिद्ध होत असे. त्यात विविध कंपन्यांतील मराठी कामगारांची संख्याही छापली जात असे.
त्यामुळे मराठी माणूस कसा बाहेर फेकला जातोय, ते कळत होते. एकदा आम्ही राहत होतो, त्या कंपनीतील आकडेवारी छापून आली व त्याची बातमी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने छापली! कंपनीत जणू भूकंपच झाला!
मी व जेहलम मात्र फार फार आनंदीत झालो, खूष झालो! ‘मार्मिक’ने मराठी माणसाच्या राजधानीत, मराठी माणसाच्या उपेक्षेला वाचा फोडायचे काम केले होते व त्या स्फुल्लिंगाचा एक कवडसा आमच्यासारख्या अनेकांपर्यंत येऊन पोचला होता.
त्यानंतर काही दिवसांतच मुंबईत शिवसेनेने मोरारजी देसाईंची गाडी फोडली व मोठाच उद्रेक झाला.
विशेष म्हणजे त्या रात्री आमच्या कॉलनीत मोठे सांस्कृतिक कार्यक्रम होते. कर्मचाऱ्यांना मुंबईत परत जाणे शक्य नव्हते. मग २५-३० जणांची व्यवस्था आमच्या घरी व इतरांच्या घरी विभागून करण्यात आली.
त्यांचे चहा, पाणी, नाष्टा आम्हीच केले. ते सगळेजण शिवसेनेच्या नावाने ‘शिमगा’ करत होते! ते गेल्यावर मी घरात ‘मार्मिक’चा गौप्यस्फोट केला. आई-बाबा चकितच झाले; पण बाबांनाही आतील परिस्थिती माहिती होती.
या मुंबईतील परिस्थितीनंतर कॉलनीच्या बसमध्ये व मुंबईत सर्वत्रच मराठी भाषिकांचा दरारा निर्माण झाला. आम्हीही बालवयातच त्यांना मोठे नेते म्हणून ओळखू लागलो, त्यांचे नाव होते- श्रीमान बाळासाहेब ठाकरे!
लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी! ही भावना मनात घट्ट रुजायला लागली.
neeilamgorhe@gmail.com
(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.