मी एक ‘मंजुश्री’

काही वर्षांपूर्वी अवघा महाराष्ट्र एका दुर्घटनेने हादरून गेला. एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना तेव्हा समोर आली होती. साहजिकच तिचा छळ होत होता का, अशी शंका घेण्यास जागा होती.
women torture
women torturesakal

काही वर्षांपूर्वी अवघा महाराष्ट्र एका दुर्घटनेने हादरून गेला. एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना तेव्हा समोर आली होती. साहजिकच तिचा छळ होत होता का, अशी शंका घेण्यास जागा होती. तिच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी, अशी आमची मागणी होती. आम्ही पुण्यात सह्यांची मोहीम सुरू केली. पोस्टरच्या धर्तीवर ‘मी एक मंजुश्री बोलतेय’ असे अभियान सुरू केले. आज समाजामधील अनेक मुलींचा जीव वाचवला हे आमच्या चळवळीचे फलित आहे, असे आम्हाला निश्चितच वाटते.

क्रांतिकारी महिला संघटना आणि स्त्री आधार केंद्राचे आमचे काम जोमाने सुरू होते. तेव्हा महाराष्ट्रात अत्याचाराच्या विविध घटना घडत होत्या. त्याबाबत विचारविनिमय सुरू असतानाच एक मोठी घटना घडली आणि अवघे पुणे शहर व महाराष्ट्र हादरून गेला. आजही ती घटना अनेकांच्या लक्षात असेल. मंजुश्री नावाच्या नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना तेव्हा समोर आली होती.

नवविवाहित असल्यामुळे साहजिकच तिचा छळ होत होता का, अशी शंका घेण्यास जागा होती. तिच्या शवविच्छेदनानंतर तिच्या पोटात विषाचा अंश सापडल्याचे समोर आले. तो विषाचा अंश तिच्या पोटात अमली पदार्थाबरोबर गेला होता. मंजुश्री उच्चभ्रू कुटुंबातील असल्यामुळे समाजाच्या एका वर्गाची पूर्ण सहानुभूती तिच्या पतीसोबत होती.

गॅसचा भडका उडून नवविवाहित स्त्री मृत्युमुखी पडली, ग्रामीण भागातील एक सून विहिरीतून पाणी काढायला गेली आणि आत पडली इत्यादी घटना आपण पाहत असतो. अगदी आजकालच्या काळातही अशा घटना समोर येतात. सून वरील मजल्यावर खिडकी साफ करायला गेली आणि पडून मृत्यू पावली, असेही घडले आहे.

थोडक्यात, जे अपघात म्हटले जाताहेत ते प्रत्यक्षात आहेत की नाही, याची शंका यावी अशी काही कारणे समोर यायला लागली आहेत. त्यामुळे त्या काळात आमची क्रांतिकारी महिला संघटना, स्त्री आधार केंद्र आणि नारी समता मंच विचार करायला लागलो, की मंजुश्री केसबाबत काय करायचे? त्याची सुरुवात म्हणून मी व विद्या बाळ यांनी एक निवेदन तयार केले आणि तत्कालीन पोलिस आयुक्तांना ते दिले.

मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही त्यात केली होती. मृत्यू संशयास्पद का नाहीत, हे कशावरून शोधावे या दृष्टीने ‘४९८ अ’ कायद्यात बदल झालेला नव्हता. आत्महत्येला भाग पाडण्याचा जो ‘३०४ ब’ हा कायदा आहे त्याच्या बाबतही बदल झालेला नव्हता. त्यामुळे आमच्या निवेदनामुळे सर्वत्र फार मोठा गदारोळ माजला.

मुंबई-पुण्यातील महिला संस्थांनी संशयास्पद मृत्यूच्या विरोधात मोर्चे काढले. चौकशीची मागणी व्हायला लागली. त्याचबरोबर आम्ही पुण्यात सह्यांची मोहीम सुरू केली. त्याच्या जोडीने पोस्टरच्या धर्तीवर ‘मी एक मंजुश्री बोलतेय’ असे एक चित्रप्रदर्शन तयार केले. त्यात मंजुश्री विचारतेय, की मी आत्महत्या का केली असे तुम्हाला वाटते? अशी संकल्पना होती.

‘मी एक मंजुश्री’ नावाच्या आत्मकथा सांगणाऱ्या पोस्टरचे प्रदर्शन आम्ही तीन संघटनांनी मिळून केले. त्याची दहा-बारे पोस्टर्स पुणे शहरभर लावायची, त्यावर जनतेशी चर्चा करायची आणि निवेदनावर त्यांच्या सह्या घ्यायच्या, अशी मोहीम सुरू झाली. जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळायला लागला. आमच्या मोहिमेची मोठी चर्चा व्हायला लागली.

अनेक जण सहानुभूती व्यक्त करत होते; पण काही प्रतिक्रिया अशाही होत्या, की आजकालच्या मुलीच बिघडलेल्या आहेत. तिनेच स्वतःहून काही काम केले असेल किंवा तिने मुद्दामहून आत्महत्या केली असेल. काही जण म्हणत होते, की हे सारे संशयास्पद आहे. ‘त्या’ कुटुंबासोबत जे होते त्यांनी अगदी स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न केला. कोणत्याही परिस्थितीत त्या मुलाचे लग्न लावून देण्याचे प्रयत्न सुरू झाले.

त्या समाजाने स्वतःच्या प्रतिष्ठेचा भाग म्हणून त्याचे पुन्हा लग्न व्हायला हवे, यासाठीही दुर्दैवाने त्या काळात काही घटकांनी काम केले. आमच्या प्रदर्शनालाही इतका मोठा प्रतिसाद मिळायला लागला, की गर्दीचे थवेच्या थवे येऊन ‘मी एक मंजुश्री बोलतेय’ मोहिमेमध्ये बोलायला लागले. मग मी रोज दवाखाना सोडून त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी जात असे. संध्याकाळी पाच ते रात्री आठपर्यंत आम्ही प्रदर्शन लावत असू.

सह्यांच्या मोहिमेला ५० हजारांपेक्षा जास्त जणांचा आम्हाला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाच्या पहिल्या टप्प्यात गुन्हा दाखल झाला व त्याची चौकशी झाली. सह्यांच्या मोहिमेचे यश आणि प्रतिक्रिया रोज वर्तमानपत्रात प्रसिद्ध होऊ लागल्या. आमचे प्रदर्शन लोकप्रिय झाले. जिल्ह्यात अनेक ते ठिकाणी झाले. लातूर, बीड, संभाजीनगर, मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण इत्यादी अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यकर्ते आम्ही घेऊन गेलो.

त्यामधून जागृतीचा एक वेगळा अंक महाराष्ट्रात सुरू झाला. महिलांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल आम्ही ज्यांना प्रश्न विचारतोय किंवा ज्यांच्या विरोधात आवाज उठवतोय त्यांना आमचा राग आलेला होता. एक दोन-तीन दिवसांमध्ये आम्हाला जाणवायला लागले, की त्यातील काही जण मुद्दामहून आमच्याशी हमरीतुमरी करायला लागलेत, वादविवाद करू लागलेत... एकदा अचानक पाच-सहा जणांचे टोळके आले आणि तुम्ही प्रश्न विचारणारे कोण?

तुम्हाला परवानगी कोणी दिली? अशी भाषा वापरू लागले. आम्ही खरे तर तत्कालीन पोलिस आयुक्तांची परवानगी घेतलेली होती. एक दिवस आम्ही तिथे थांबलेले असताना सुखद धक्का बसला. स्वतः पोलिस आयुक्त प्रदर्शन बघण्यासाठी आले होते. त्यांनी आमचे कौतुक केले. अशा गोष्टींना तुम्ही वाचा फोडता हे फार चांगले आहे, अशा पद्धतीने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा गोष्टींमुळे अर्थातच आम्हाला खूप हुरूप आला.

जनता आपल्याला इतका चांगला प्रतिसाद देयेय, याचे समाधान वाटले. मात्र, त्याच वेळी एक-दोन दिवसांत काही जणांनी धक्काबुक्की करून आमचे प्रदर्शन फाडून टाकायचा प्रयत्न केला; तरीही पुण्यामध्ये त्या काळात आम्हाला कधी भीती वाटली नाही. आम्ही फार निर्भीडपणाने काम करत होतो. आम्हाला मदत करायला बऱ्याचशा संघटना आणि आमची मित्रमंडळी आली होती. ठिकठिकाणच्या महिला कार्यकर्त्या आल्या होत्या.

कष्टकरी समाजाचे नेते डॉ. बाबा आढाव यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्या मदतीला आल्या होत्या आणि आम्ही पुन्हा जोमाने सगळीकडे प्रदर्शन सुरू केले. अंतिमतः न्यायालयात खटला उभा राहिला. काही महिन्यांमध्येच इतर समाजातील म्हणजे इतर घटकांमधील काही घटना समोर आल्या. अश्विनी पाठक, चंदा चोरडिया, भावना भार्गव इत्यादी अनेक केसेस पुढे आल्या.

संशयास्पद मृत्यूच्या आणि त्याही नवविवाहित व समाजाच्या विविध क्षेत्रांतील घटना समोर आल्या तसा समाज पूर्णपणे हादरून गेला. मग आमच्या विरोधात वातावरण हळूहळू बदलत गेले. त्या त्या समाजाचे घटक रस्त्यावर येऊन त्या त्या मुलींच्या मृत्यूची चौकशी करताहेत, असे चित्र दिसायला लागले. इतकेच नव्हे, तर त्यामधून नवीन संघटनाही जन्माला आल्या. उदाहरणार्थ, लातूरची ‘नारी प्रबोधन मंच’ संस्था आमची मैत्रीण चंद्रकला भार्गव यांनी सुरू केली.

तिच्या स्थापनेलाही आम्हाला बोलावले होते. त्यामध्ये कोल्हापूरच्या डॉ. रूपा शहा पुढे आल्या. डॉ. शैला लोहिया तर काम करतच होत्या. समाजात फक्त ठराविकच घटकांमध्ये हिंसाचार होतो, अशातला भाग नाही. केवळ अशिक्षित वर्गातच अशा घटना घडतात, असे नाही तर समाजाच्या सर्व घटकांमध्ये महिलांना असुरक्षिततेचा प्रश्न भेडसावतोय. त्या पुढच्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत समाज एका प्रबोधनाच्या गतीने पुढे जाताना आम्हाला दिसला.

इतकेच नव्हे; तर काही वेळा आम्ही संशयास्पद मृत्यूबद्दल निवेदने दिली. नंतर जेव्हा न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा तर असे झाले की शेकडो मंडळी तिथे स्वतः जात होती. त्यामुळे सातत्याने प्रश्न यायला लागला, की पुरावा कुठून आणणार?

पुरावा नाहीय आणि याच प्रश्नावर संपूर्ण भारतातील न्यायालयांसमोर चर्चा होत होती. शेवटी १९९० च्या सुमाराला सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न विचारला, की जेव्हा जेव्हा गॅस सिलिंडरचा स्फोट होतो तेव्हा प्रत्येक वेळी सूनच कशी मृत्युमुखी पडते? रॉकेलची चिमणी पेट घेते तेव्हा सुनेचाच कसा बळी जातो? मग घरातील इतर स्त्रिया म्हणजे सासू किंवा नणंदा कशा मृत्युमुखी पडत नाहीत?

याचा अर्थ नवविवाहित स्त्रियांच्या विरोधात काहीना काही कारणामुळे उघडलेले हे षड्‍यंत्र कशावरून नाही? म्हणूनच लग्नानंतर सात वर्षांच्या आत जर का नवविवाहितेचा मृत्यू झाला तर तो संशयास्पद समजून त्याची चौकशी केली जाईल, अशा प्रकारचा कायदा झाला. त्या कायद्याच्या दुरुपयोगाबद्दल खूप जण चर्चा करतात; परंतु जेव्हा पुरावे असतात, छळ होत असतो तेव्हाही ती माहेरी गेली तरी समाज तिला नाव ठेवतो.

त्यामुळे दिल्या घरी तू सुखी राहा, म्हणून गेलेली ती स्त्री शेवटी मृतावस्थेत बाहेर येत होती. असे चित्र मोठ्या प्रमाणात पूर्वी दिसत होते. आजही ते तसेच आहे. ‘मी एक मंजुश्री’मधली मंजुश्री अजूनही आपल्या मरणाचे कारण विचारते आहे... आता फक्त नाव वेगळे असेल. समाजामधील अनेक मुलींचा जीव त्यांच्या बरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर उभा राहून वाचवला हे आमच्या चळवळीचे फलित आहे, असे आम्हाला निश्चितच वाटते.

neeilamgorhe@ gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com