esakal | एका रम्य रात्रीचे बहारदार वर्णन : स्मरणशक्तिके! जागृत होई
sakal

बोलून बातमी शोधा

Memory

एका रम्य रात्रीचे बहारदार वर्णन : स्मरणशक्तिके! जागृत होई

sakal_logo
By
- डॉ. नीरज देव


दत्त कवींची महती निसर्ग, सृष्टी नि प्रेम वर्णनात अधिकच दिसून यायची याचीच साक्ष देणारी कविता म्हणजे विश्वामित्रीच्या काठी होय बडोदा नगरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीच्या तीरावर कवीने अनुभवलेल्या एका रम्य रात्रीचे बहारदार वर्णन प्रस्तुत कवितेत आहे
कवितेच्या आरंभीच विश्वामित्रीच्या काठी त्या रात्री जे काही आपण पाहिले त्याने मनाची अवस्था कशी झाली हे सांगताना कवी ध्रुपदात सांगतो,बघुनिं मन धाले
साफल्य दृष्टिचे झालें!

असे काय घडले त्या रात्री? तर कवी सांगतो विश्वामित्रीचे निर्मळ जल, ते तारकांनी मोहरलेले आकाश पाहून वाटत होते जणू पाऊस बर्फाचा पडतो किंवा चांदीचा मेघ वितळतोय अथवा चंद्राच्या प्रकाशाने कविकल्पनांचे रत्न पाझरते आहे किंबहुना ती शीतांगी माझी प्रियाच मला आलिंगन देतेय असे भासमान होत होते.
मला असेही वाटत होते की थंडावा देणाऱ्या चंदनात रसात मी पडलो किंवा अमृताच्या डोहात बुडालो किंबहुना असे असावे की सुखस्वप्नी सापडलो मला काहीच कळत नव्हते जीव वेडावून गेला होता.

हेही वाचा: अध्यात्म : महत्त्व सर्वपित्री अमावस्येचे


देहाकार नसलेली शांतिदेवता या स्थानी वसतीला असावी असे वाटत होते किंवा चंचल बाला जणू सांगतात जगन्नाथ येथेच आहे नटलेली सृष्टिसुंदरी पाहून तिचे सौंदर्य वर्णिताना कवी गातो,
रम्य ही शोभा-हीजपुढे काय ती रंभा? खरंय रंभा तरुणालाच लोभवेल पण ही सृष्टिसुंदरी आबालवृद्ध स्त्री-पुरुष साऱ्यांनाच मोह घालते. पशुपक्ष्यांनाही वेड लावते.
आकाशातील तारांगणाचे जलात दिसणारे प्रतिबिंब पाहून हर्षित होऊन दत्त कवीची प्रतिभा गाऊ लागली.

तारांगणही स्पष्ट बिंबलें,
स्नाना जणुं हे मुनि अवतरले,
तेजोनिधि कीं ऋषी बैसले,
ध्यान धरोनि-जलसमाधिस्त होवोनी।।


हे कमी काय वाटून कवी म्हणतो शशिराज अर्थात चंद्र ही जलात उतरला, त्याची पाण्यात सरकणारी प्रतिमा पाहून चंद्र कलहंसासारखा पोहतोय असे वाटू लागते. कदाचित नीरव एकांत साधून विश्वामित्रीने आपला पती हृदयी धरला असे त्यांच्या प्रतिभेला वाटू लागते. तितक्यात स्वतःचेच पाण्यात पडलेले प्रतिबिंब पाहून विस्मयाने दत्त विचारू लागतात,

जेथे असली श्रेष्ठ मंडळी
तिथेच गरिबा जागा दिधली,
शंका सखये! परि उद्भवली,
खरी मम काया-उदकामधिं वा भूवरिं या?

जेथे थोर असतात तेथे सामान्यांना प्रवेश नसतो साधा मंत्री आला तरी रस्ते सामान्यांसाठी बंद होतात पण इथे हे काय? जेथे आकाशातील तारकारूपी ऋषिगण उतरलेले, प्रत्यक्ष गगनाधिपती चंद्र, चांदण्यासह उतरलेला तेथे माझ्या पामराची ही उपस्थिती? मला प्रवेश मिळावा याचे कवीला आश्चर्य तर वाटतेच पण यातून सृष्टिदेवता साऱ्यांनाच समानतेने वागवते हे सूत्रही ते अलगदपणे मांडतात. आपले विश्वामित्रीत पडलेले प्रतिबिंब पाहून कवीला प्रश्न पडतो की आपण खरे कोठे आहोत पृथ्वीवर की जलात?
कवीला वाटते वरती-खाली दोन्ही ठिकाणी गगनच आहे, वरती-खाली दोन्ही ठायी चंद्रच आहे, दोन्ही ठायी सौंदर्यच सौंदर्य आहे, शांतीच शांती आहे, आनंदच आनंद आहे, वर पाहावे की खाली काहीच कळत नसल्याने दृष्टी बावरून गेली आहे, अशा या अत्यद्‍भुत क्षणी कवी गातो,

स्मरणशक्तिके! जागृत होई
दर्शनदुर्लभ शोभा पाहीं,


हेही वाचा: परीक्षा घेतानाच सरकार नापास!

विसरू नको बघ यांतिल कांही, वारंवार कोठुनि असें दिसणार?

कधी काळी विश्वामित्रीच्या काठी पाहिलेले हे निसर्गसौंदर्य कवीने आपल्या कवितेत चिरस्थायी करून ठेवले. कोणीही रसिक या कवितेच्या माध्यमातून विश्वामित्रीच्या काठी आजही वावरावयास जाऊ शकतो एवढे नादमाधुर्य कवीने कवितेत अलगद भरले आहे. दत्त कवीच्या या कविता पाहताना त्यांना दीर्घायुष्य लाभले असते तर मराठीचा काव्यप्रांत अधिकच समृद्ध झाला असता असे कोणाही रसिकाला खचितच वाटेल.

loading image
go to top