
विठ्ठल दत्तात्रय घाटे (१८९५-१९७८) या शिक्षणतज्ज्ञ साहित्यिकाचे नाव ठाऊक नसेल, असा सुजाण मराठी वाचक विरळाच म्हणावा लागेल. मराठी रसिकाला लळा लावणाऱ्या दत्तकवींचे वि. द. घाटे हे पुत्र. दत्तकवींचे वयाच्या तेविसाव्या वर्षीच निधन झाले. त्या वेळी कवी केवळ तीन-साडेतीन वर्षांचे होते. त्यानंतर वर्षभरातच कवींच्या आईचेही निधन झाले.
आई-बापाविना पोरक्या विठ्ठलाने बापाची साहित्यसेवा समर्थपणे चालविली. देश-विदेशात जाऊन अनेक पदव्या घेतल्या. शिक्षणक्षेत्रात उच्च पदे भूषविली. गद्यात सुंदर साहित्य निर्मिले. ‘दिवस असे होते’ हे त्यांचे आत्मचरित्र केवळ व्यक्तिगत चरित्रच नव्हे, तर तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचे उत्तम चित्रण आहे.
‘काही म्हातारे आणि एक म्हातारी’ हे सुंदर व्यक्तिचित्रण असून, यात वयोवृद्ध होऊन ही जे लोक तरुणाला लाजवेल, असे काम करतात त्यांचे चित्रण आहे. या पुस्तकाच्या आठ-दहा आवृत्त्या लेखकाच्या हयातीत प्रकाशित झाल्या. १९५६ मध्ये अहमदाबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वि. द. घाटे यांनी भूषविले होते. (Dr Neeraj Dev saptarang Latest Marathi Article on marathi poetry nashik news)
घाटे रविकिरण मंडळातील एक कवी होते. त्यांची पद्यरचना मोजकी असून, बहुतेक कविता ‘मधु माधव’ या काव्यसंग्रहात १९२४ मध्ये प्रकाशित झाल्या. प्रस्तुत काव्यसंग्रहात वि. द. घाटे आणि माधव ज्युलियन यांच्या निवडक कविता आहेत. घाटे ‘मधुकर’ नावाने, तर पटवर्धन ‘माधव ज्युलियन’ नावाने काव्यरचना करीत.
दोहोंची आद्याक्षरे वापरून काव्यसंग्रहाचे नाव ठेवण्यात आल्याचे लक्षात आलेच असेल. प्रस्तुत काव्य संग्रहात कवीच्या १९ कविता असून, त्यातील ‘आई’, ‘आलात ते कशाला?’ या रचना विशेष गाजल्या आहेत. त्यातीलच एक ‘आई आम्हां आठवशिल ना?’ ही कविता आपण पाहणार आहोत.
कवितेच्या पार्श्वभूमीला कवीने, ‘आज भावी अभुदयाची आशा व खात्री वाटत आहे. राजा राममोहन रॉय, दादाभाई, रानडे या महात्म्यांना निराशेत क्षुद्र स्वरूपाची कार्ये करण्यात आयुष्य वेचावे लागले! त्यांच्या आत्म्यास आज काय वाटत असेल?’ अशी पृच्छा केली आहे. ही पृच्छा आजकाल नसून, १९२१ च्या जूनमधील म्हणजे जवळपास १०१ वर्षांपूर्वीची आहे.
कवीने तो काळ अभ्युदयाचा मानला असेल, तर आजचा काळ परमभाग्याचाच मानावा लागेल. सुमारे शंभर-दोनशे वर्षांपूर्वी ज्या राष्ट्रधुरिणांनी देश घडविण्यासाठी अपार कष्ट घेतले, अगदी छोटी-छोटी कामे करण्यात आपलं आयुष्य वेचलं. त्याची आठवण स्वतंत्र नि प्रगत राष्ट्राला होणार का? हा प्रश्न कवीच्या मनात येतो. त्याचेच प्रतिध्वनी कवितेच्या शीर्षकातून व्यक्त होते. कवीला वाटणारा हा प्रश्न, ही शंका, आज तर अधिकच गहन आहे.
देशाच्या आरंभीच्या काळी; देशाचा विचार करीत सर्वस्व अर्पण करणाऱ्यांचे मोल निश्चितच अमूल्य आहे. कारण ज्यावेळी यशाची अजिबात अपेक्षा नव्हती; त्या वेळी ते सर्वस्वपणाला लावून अहोरात्र अन् आजीवन झगडले. अशा त्या ज्ञात-अज्ञात देशभक्त महात्म्यांचे हृदगत समजून घेताना; कवी त्यांच्या मनोभावनेतून भारतमातेला विचारतो-
आई! आम्हां आठवशिल ना
स्वातंत्र्याच्या हिमालयावरि
पुन्हा समाधी घेताना
येथे कवी स्वातंत्र्याचा हिमालय नि समाधी असे दोन शब्द वापरताना दिसतो. स्वातंत्र्याचा हिमालय म्हणजे कवीला पूर्ण स्वातंत्र्य म्हणायचे असून, समाधीमध्ये कवीला सुखसमाधी ज्याला आपण ‘अच्छे दिन’ म्हणतो ते अपेक्षित आहे. देशोत्थानाच्या आरंभीच्या काळी देशासाठी कष्ट उपसत उपसत झिजत झिजत मरण पावलेले ते महात्म्ये स्वातंत्र्याचा आस्वाद घेणाऱ्या भारतमातेला पुसतात,
‘‘आई ! जेव्हा तुला पूर्ण स्वातंत्र्य मिळून तू यशाच्या शिखरावर असशील, तेव्हा तुला आमची आठवण येईल ना? तुझ्या आजच्या यशात आमचा वाटा आहे म्हणून नव्हे; तर तू आमची आई आहेस म्हणून आम्ही हे पुसतोय. खरंतर कवी येथे गात असताना त्याच्या दृष्टीसमोर केवळ राजा राममोहन रॉय, दादाभाई नौरोजी वा महादेव गोविंद रानडेच असतील, असे नव्हे, तर त्या काळी ज्याचे नाव उच्चारणेही अपराध होता, ते एडनला विजनवासात तळमळत मृत्यू पावलेले वासुदेव बळवंत फडकेंसारखे अनेक देशभक्त तरळून गेले असतील.
कारण या देशात प्रजासत्ताक नांदावे, यासाठी प्रयत्नरत हा देशभक्त सुमारे १४२ वर्षांपूर्वी एडनच्या कारागृहात एकाकी नि अवश अवस्थेत मरण पावला. एखाद्या अनाथासारख्या त्याच्या पवित्र पार्थिवावर तेथे दाह कर्म झाले नि विभूती म्हणून प्रत्यक्ष शिवशंकरानेही ज्याची रक्षा माथी लावावी, अशी त्याची रक्षा बेदरकारपणे एडनच्या समुद्रात फेकली गेली. अशा त्या वासुदेव बळवंताचे बोल भारतमातेला उद्देशून कवी विचारतो तसेच असतील.
पारतंत्र्याच्या अंधाऱ्या रात्री खडा पहारा देत त्यांनी देशाचे स्वत्व जागते ठेवले. त्यासाठी आज अगदी किरकोळ नि निरर्थक वाटणाऱ्या बाबी करत संपूर्ण जीवन वेचले. स्वतःच्या जीवनाचा दीप करत त्यांनी राष्ट्रजीवन या-ना-त्या रूपात जागते ठेवले; पण शेवटी-
जीर्ण चिरगुटे यत्नें अणिलीं,
आई! लज्जा तुझी झाकिलीं,
हाय! परी तीं अपुरीं झालीं
ढाळियले मग अश्रूंना
‘आई! तुला दासी म्हणून हिणवत इंग्रज साऱ्या जगभर तुझे धिंडवडे काढीत होते. पण शेवटी ते तर परकेच ना! पण तुझे ते पुत्र? पुत्र कसले कुपुत्रच ते! ते तुझ्या छळकांना, तुला दासी बनविणाऱ्यांना मायबाप समजून तुझी हेटाळणा करीत होते. ती बाब अत्यंत लज्जास्पद होती. गुलामगिरीपेक्षाही स्वत्व विसरून गुलामगिरीला अभिमानाने मिरविणे केव्हाही अधिकच लज्जास्पद असते.
अत्याचार करणाऱ्यापेक्षाही अत्याचार करणाऱ्याला साथ देणारा आपला मुलगा आईला अधिकच वेदना देतो. आम्ही तुझी दोन्ही प्रकारची लज्जा झाकण्यासाठी मिळेल ती साधने वापरली. या साधनांनाच कवी ‘वस्त्रे’ म्हणतो. पण ती ही अपुरीच पडली, तेव्हा हताश आसूंनी आम्ही ती भरून काढली.
देश उत्थानाच्या आरंभीच्या काळी सर्वजण देश, देशाचे स्वत्व विसरून देशशत्रूलाच स्वामी समजून मायबाप इंग्रज सरकार करीत असताना, होता होईल ती देशसेवा निरलसपणे करणाऱ्यांच्या मूकभावनाच कवीने या पंक्तीत सजीव केल्या आहेत. त्यामुळेच कवीच्या या पंक्ती मराठीच नव्हे, तर भारतीय भाषातील कोणत्याही साहित्यास ललामभूत ठराव्यात, अशाच आहेत.
स्वजनांचे उपहास साहिले,
परकयांचेही कलेश भोगिले,
परि जीवनरस सदा वाहिले,
माते! तव मंगल स्नाना
कवीच्या या पंक्ती वाचताना आपसूक आठवण येते, ती वासुदेव बळवंत फडकेंच्या पत्नीच्या १९४० मधील उद्गारांची! कुणीतरी त्यांना सांगितले की, ‘वासुदेव बळवंतांचा गौरव करणारा लेख अमुक-अमुक वृत्तपत्रात छापून आला आहे.’ त्या वेळी ती वीरपत्नी उद्गारली, ‘जेव्हा ते लढत होते, तेव्हा तर लोक त्यांना वेडा म्हणत होते आणि आता मृत्यूनंतर पन्नास वर्षांनी हा गौरव काय कामाचा?’ त्या महामातेचा त्रागा हेच दाखवितो,
की देशासाठी आरंभी लढणाऱ्यांना, हुतात्मा होणाऱ्यांना नि त्यांच्या आप्तेष्टांना किती क्लेश सहन करावे लागले असतील. परकीयांनी तर पीडा दिलीच; पण ज्यांच्यासाठी आपण लढतो, त्यांनीही उपहासच केला. तरीही मातृसेवेच व्रत त्यांनी कधीच त्यागले नाही.
पुढे कवी त्यांचे हृदगत व्यक्तविताना सांगतो, ‘बालपण, तारुण्य अन् लाभले तर वार्धक्य या तीनही अवस्था त्यांनी मातृभूमीच्या सेवेत समरस केल्या. या अवस्थांत येणाऱ्या तरल कल्पना, प्रेमभावना नि धर्मभावना त्यांनी देशभावनेत मिसळून टाकल्या. हे सारे करताना कदाचित काही चुकले असेल, तर चुकू दे, पण देह मातृभूमीच्याच कारणी पडावा.
जगताना वा मरताना प्राण मातृभूमीच्या पूजनातच रमावेत.’ अशीच त्या महात्म्यांची भावना होती. हे व्यक्त करीत कवी कविता संपवतो. तेव्हा मनाला हुतात्मा रामप्रसाद बिस्मिलची ‘शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेलें।’ची आस आठवते नि त्याचवेळी आज लोकांना हुतात्म्यांविषयी वाटणारी अनास्था ध्यानी येते. या दोहोंतील अंतर साधताना ही कविता कुठेतरी हुतात्म्यांच्या मूकभावनांना अधिकच मुखरीत करीत जाते, असे वाटते.
प्रस्तुत कविता केवळ पाच कडव्यांची असली, तरी आशयघन आहे. ती अलंकारिक नसली तरी माधुर्याने भरलेली, प्रासादिक नि चित्तवेधक आहे. सुजाण वाचकाच्या हृदयाला सहज भिडणारी आहे. दत्तकवींचा समृद्ध वारसा त्यांच्या पुत्राच्या ठायी ओतप्रोत भरलेला होता, याचीच साक्ष देणारी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.