esakal | आम्हा डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळे हो!
sakal

बोलून बातमी शोधा

keshavsut

आम्हा डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळे हो!

sakal_logo
By
- डॉ. नीरज देव


रसिका! केशवसुतांची त्या काळी प्रसिद्ध होऊ न शकलेली व फारसे काव्यगुण नसल्याने दुर्लक्षित राहिलेली ‘एका भारतीयाचे उद्‍गार’ ही कविता आज आपण पाहणार आहोत. या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे १८८६ मध्ये त्यात व्यक्तविलेले भारतीय स्वातंत्र्याचे विचार होत.

कवी आरंभीच व्यंगोक्तीत सांगतो, की संध्याकाळी सूर्यास्ताच्या समयाला पश्चिमेला पसरलेला सूर्यप्रकाश अन् सूर्य पाहून मला वाटले की ही भारतीयांचीच सद्यःस्थिती आहे. त्याच वेळी माझ्या मनात शब्द उमटले,‘हा! हा! श्रीचा दिवस अपुल्या मावळोनी प्रतीचे
गेला! गेला!’ सहज पडती शब्द हे मन्मुखाचे

‘छत्रपतींचे श्रीचे राज्य मावळून गेले असे वाटू लागले. त्यामुळे आपल्या स्वजनाची होणारी कुदशा पाहून माझे माथे फिरून गेले. जे जे मनी वसे ते ते स्वप्नी दिसे तसे मला वाटू लागले. सकाळी सूर्य जसजसा माथ्यावर चढू लागतो तसतसे लोक आनंदी व्हायला लागतात पण माझे मात्र हृदय भंगून जाते’ असे वर्णन करीत कवी स्पष्ट शब्दात सांगतो,

‘हा जैसा का रवि चढतसे त्याप्रमाणेच मागे
स्वोत्कर्षाचा रविहि नव्हता वाढता काय - सांगे;
जावोनी तो परि इथुनिया पश्चिमेसी रमाया,
ऱ्हासाची ही निबिड रजनी पातली ना छळाया!’

मराठ्यांच्या वर वर चढणारा रवी अर्थात स्वराज्य पश्चिमेच्या म्हणजेच इंग्रजांच्या हातात गेले व न सरणारी रात्र उरली याचे कवीला वैषम्य वाटते. या विषण्णतेची तीव्रता व्यक्तविताना कवी सांगतो, की फुललेली सुंदर फुले, पक्ष्यांचे मधुर कुहुकुहु बोल माझ्या कविमनाला उल्हसित न करता विदारक, विषण्ण वाटू लागतात कारण,

आम्हां डोळे नसति बघण्या पारतंत्र्यामुळे हो!
ऐकायाला श्रुतिहि नसती पारतंत्र्यामुळे हो!केशवसुत केवळ सामाजिक सुधारणांचाच विचार करणारे नव्हते तर भारतीय राजकीय सुधारणांचासुद्धा विचार करणारे कवी होते हेच वरील ओळीवरून लक्षात येते. याच कवितेत ते पुढे अधिक स्पष्ट शब्दात पारतंत्र्यांधकार असा उच्चार करतात. जोवरी पारतंत्र्य निशा आहे तोवर आम्ही कुदशेतच आहोत, दुःखाचा हा भोग जोवर सरणार नाही तोवर सुखाचे नाव तरी कशाला घ्यावे, असा प्रश्न ते विचारतात. इतकेच नाही तर आनंदाच्या वेळी मला पारतंत्र्य आठवले की इतर वेळी होणार नाही इतके आत्यंतिक दुःख होते हेच प्रकट करताना केशवसुत उत्कटपणे म्हणतात,

‘पाहोनिया विष जरि गमे उग्र ते आपणाते,
अन्नामध्ये शतपट गमे उग्रसे पाहुनी ते!’

विष पाहताच उग्र वाटते मग अन्नामध्येच ते कालवलेले दिसले तर किती उग्र वाटेल तसे मला वाटते. न राहवून देव न मानणारे केशवसुत देवाला विनवून गातात,

देवा! केंव्हा परवशपणाची निशा ही सरुन
स्वातंत्र्याचा द्युमणि उदया यावयाचा फिरुन?
केव्हा आम्ही सुटुनि सहसा पंजरातूनि, देवा!
राष्ट्रत्वाला फिरुनि अमुचा देश येईल केव्हा?ज्या काळी काँग्रेस नुकतीच जन्मली होती अन् इंग्रजांच्या राणीचा जयघोष करण्यात धन्यता मानीत होती, लोकमान्यांची जन्मसिद्ध अधिकाराची गर्जना अद्याप झाली नव्हती त्या काळी १८८६ मध्ये केशवसुतांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्याची आस’ या काव्यातून व्यक्त केली होती हे खरोखरच विलक्षण होते. या काव्यनिर्मितीमागे वासुदेव बळवंतांची विफल कथा असावी की काय नक्की सांगता येणार नाही पण कवीचे मानस मात्र स्पष्टपणे स्वातंत्र्याची आस प्रकटवताना दिसते. कवीने त्यासाठी काय केले हा प्रश्न अलाहिदा पण कवीची स्वातंत्र्याकांक्षी मनोवृत्ती व्यक्तविण्याच्या दृष्टीने ही कविता पुरेशी आहे. त्यामुळेच मला ही कविता भावते रसिका! भारतीय स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीतही कवीने विचारलेला शेवटचा प्रश्न ‘राष्ट्रत्वाला फिरुनि अमुचा देश येईल केव्हा?’ मला कधी कधी अजूनही प्रश्नांकित करतो तुला करतो का? एकदा विचारून पाहा!!

loading image
go to top