शोधांचे जनक आणि त्यांचे कष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vitamins Book

मानवजातीच्या इतिहासात विविध रोगांनी हाहाकार माजविण्याचे मोठमोठे कालखंड होऊन गेले.

शोधांचे जनक आणि त्यांचे कष्ट

- डॉ. प्रबोध चोबे

मानवजातीच्या इतिहासात विविध रोगांनी हाहाकार माजविण्याचे मोठमोठे कालखंड होऊन गेले. मुळात, रोग होतात कशाने? याबद्दल एवढ्या अंधश्रद्धा आणि त्या जोडीला वैज्ञानिक अंधश्रद्धाही होत्या, की प्रत्येक रोगाचे खरे कारण सापडून ते निश्चित होऊन त्यावर उतारा सापडायला प्रत्येक रोगागणिक निदान शंभर ते तीनशे वर्षे लागली होती. इथे वैज्ञानिक अंधश्रद्धा अशासाठी म्हटले की, सूक्ष्म जिवाणू आणि त्यावर प्रतिजैविके निघाल्यावर तर प्रत्येक रोग फक्त सूक्ष्म जिवाणुंमुळेच होतो व फक्त औषधांनीच बरा करता येतो असा अनेक वैज्ञानिकांचा गोड गैरसमज झालेला होता. आहाराचा रोगांशी संबंध असू शकतो हे त्याकाळी कोणालाच माहीत नव्हते.

आज ज्या रोगांना आपण व्हिटॅमिन्सच्या अभावामुळे होणारे रोग म्हणतो त्यातले पेलाग्रा, बेरीबेरी, मुडदूस या साऱ्या रोगांनी अगदी अलिकडच्या इतिहासातही लाखो लोकांना मारले होते. लाखो लोकांना असह्य यमयातना भोगायला लागल्या होत्या हे आज खरे नाही वाटणार! किंबहूना आज आपण खाऊन-पिऊन सुखी असलेले लोक हे मानणारच नाही की आजही दरवर्षी साधारणपणे ३० कोटी लोक व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे दृष्टी गमावतात! पण हे कटु सत्य आहे! याच वेगवेगळ्या व्हिटॅमिनच्या अभावामुळे होणाऱ्या रोगांचा एक एक करीत परामर्ष घेणारे हे पुस्तक आहे ‘व्हिटॅमिन्स.’ अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये या लेखकद्वयीने एखाद्या रहस्यकथेच्या रूपातलं हे अत्यंत रंजक पुस्तक लिहिले आहे.

हे पुस्तक म्हणजे केवळ विज्ञानच नव्हे तर त्यात आरोग्य शास्त्राचा इतिहास आहे, भूगोल आहे, समाजशास्त्रही आलेले आहे. या पुस्तकात काही रोचक संदर्भही असे आलेले आहेत की ज्यामुळे वाचकांना अधिक आनंद मिळतो. उदाहरणार्थ, बटाटा कुठून व कसा आला? मार्गारिन हा शब्द कुठून आला? त्याचा आणि नेपोलियन बोनापार्टच्या पुतण्याचा संबंध काय? रॉयल सोसायटीचा उगम कसा झाला? वगैरे, वगैरे.

मुळातच एखाद्या रसायनाच्या आहारातील अभावामुळे लाखो लोकांचे जीवन उध्वस्त करू शकणारे रोग होऊ शकतात हे मानणेच त्या काळात कठीण होते. तिथून हा प्रवास चालू होतो. उलट-सुलट रिझल्टमुळे प्रवासाचे मार्ग अनेकदा बदलले गेले. मिळालेले रिझल्टस् बरोबर आहेत का? हे काळाच्या चाचणीवर सिद्ध होईपर्यंत कित्येकदा आपले संशोधनाचे मार्ग चुकले हे समजून विषयाला वेगळी कलाटणीही मिळाली. एखाद्या घटकाच्या त्रुटीमुळे रोग होतो हे कळल्यानंतर तो घटक कोणता? तो अन्नपदार्थांपासून वेगळा कसा काढायचा? त्याची रासायनिक रचना कशी शोधायची? तो जरूरीपेक्षा जास्त खाल्ल्या गेल्यावर शरीरावर त्याचे कोणते दुष्परिणाम होतात? अशा असंख्य प्रश्नांचे रहस्य सोडविण्यासाठी शेकडो शास्त्रज्ञांनी घेतलेल्या कष्टांचा लेखाजोखा एखादी रहस्यमय कादंबरी लिहावी त्या प्रकारे लेखकद्वयीने मांडला आहे. आणि हेच या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

या पुस्तकातून आणखी एक शिकायला मिळते ते म्हणजे कोणत्याही क्लिष्ट प्रयोगांची मांडणी कशी करायची? प्रयोगांची मांडणी व व्यवस्थापन किती काटेकोरपणे करावे लागते ते ही व्हिटॅमिन्स या प्रकरणातील ''उंदीर व भांडी'' या प्रयोगातून वाचायला मिळते. उच्चशिक्षण क्षेत्रातील मराठी वाचकांना यादृष्टीने या पुस्तकातील काही प्रकरणे निश्चित मार्गदर्शक ठरतील.

व्हिटॅमिन ए च्या शोधाचे बीज रोवणारा एल्मर आधी उदरनिर्वाहासाठी रात्रभर जागून रस्त्यावरचे दिवे लावण्याचे व बंद करण्याचे काम करायचा. पपई, आंबे, गाजरे अशा केशरी रंगाच्या अन्नातील कॅरटीन हे रंगद्रव्य शरीरात गेल्यावर व्हिटॅमिन ए बनते हे शोधून काढणारा चेप्लिन एक चित्रकार होता. चित्रे काढताना रंगांबद्दल आकर्षण निर्माण झाले म्हणून ते रंग ज्या रसायनांमुळे निर्माण झाले ती रसायने शिकण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन रसायनशास्त्रज्ञ बनला. पुढे प्रयोग करताना आकर्षण वाटले म्हणून वनस्पतीशास्त्रज्ञ बनला. आणि नंतर बायोटेक्नॉलॉजीकडे वळला. शेवटी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले. मुलांमधील नैसर्गिक कल ओळखून त्यांची वाट त्यांनाच शोधायचे स्वातंत्र्य दिले तर उत्तम शास्त्रज्ञ घडू शकतो हे आपल्या सुजाण पालकांनी या व अशा अनेक उदाहरणांवरून लक्षात ठेवायला हवे.

शिक्षकांनी विद्यार्थी घडवले याची उदाहरणे तर या पुस्तकात पाना-पानांवर आढळतात. उदाहरणार्थ एल्मर शाळेत नापास झाला होता; पण प्राचार्य चांगले भेटले व त्यांनी त्याची विज्ञानाची आवड ओळखली. एल्मर नापास असूनही त्यांनी त्याला हायस्कूलमध्ये घेतले. रायबोफ्लेविनच्या शोधात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या कूनला चांगले शिक्षक भेटले व म्हणून तो विज्ञानाच्या मार्गाकडे ओढला गेला. बी कॉम्प्लेक्सच्या शोधात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या एस्मंड स्नेलला हँच हे प्राध्यापक रसायनशास्त्र शिकवायचे म्हणून त्याला त्यात रस निर्माण झाला. अॅनिमियावर सखोल संशोधन करण्याऱ्या जॉर्ज व्हिपलवर लफायेट मेंडलचा प्रभाव पडला म्हणूनच त्याच्या हातून एवढे असाधारण काम झाले. जॉन हॉपकिन्स विद्यापीठात दाखल झाल्यावर तिथलेही एकापेक्षा एक सरस शिक्षक पाहून जॉर्ज हरखून गेला होता. लेखकांच्याच शब्दात सांगायचे झाले तर या पुस्तकात वाचकांना व्हिटॅमिन्सविषयीचं ज्ञान आणि माहिती तर मिळेलच; पण त्याबरोबरच त्यांना त्या शोधामागच्या गोष्टी, शोधकथा, संशोधकांनी घेतलेले अपार कष्ट आणि गमतीजमती या सगळ्यांचा आस्वाद घेता येईल.

पुस्तकाचं नाव : व्हिटॅमिन्स

लेखक : अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये

प्रकाशक : साकेत प्रकाशन, पुणे आणि औरंगाबाद

(९४२२२२५४०७, ९८८१७४५६०५)

पृष्ठं : ४४० मूल्य : ३५०

टॅग्स :Booksaptarang