सूक्ष्मजीवसंसर्ग-रोग (भाग १) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Microbial infection

जिवाणू-विषाणू-बुरशी इत्यादींच्या संसर्गामुळे होणारे रोग आपल्या परिचयाचे असतात. आपल्या सर्वांनाच कधी ना कधी हा संसर्ग झालेला असतो.

सूक्ष्मजीवसंसर्ग-रोग (भाग १)

- डॉ. प्रगती अभ्यंकर apragati10@gmail.com

जिवाणू-विषाणू-बुरशी इत्यादींच्या संसर्गामुळे होणारे रोग आपल्या परिचयाचे असतात. आपल्या सर्वांनाच कधी ना कधी हा संसर्ग झालेला असतो. कमी-अधिक प्रमाणात लक्षणं...त्यामुळे होणारा त्रास...विविध प्रकारचे औषधोपचार...पूर्णपणे बरं होण्यासाठी लागणारा वेळ...त्यानंतर काही काळ जाणवणारे परिणाम...आणि ऐकावे लागणारे विविध सल्ले...असं सगळं आपण सर्वजण अनुभवत असतो.

मात्र, हे संसर्ग कसे होतात, कसे पसरतात, प्रत्येक जिवाणू हा कसा वैशिष्ट्यपूर्ण असतो आणि त्यामुळेच प्रत्येकापासून होणारा रोग, त्याची लक्षणं वेगळी का असतात, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हे किती अवलंबून असतं या मुद्द्यांविषयी थोडी मूलभूत माहिती या लेखात.

एखादा जिवाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याचे प्रमुख मार्ग म्हणजे श्वासाद्वारे, तोंडाद्वारे किंवा शरीरावरच्या जखमांद्वारे. याशिवायही संसर्ग होण्याचे अन्य मार्ग आहेत; पण त्यांची शक्यता मर्यादित असते. शरीरात प्रवेश केल्यानंतर जर तो जिवाणू रोगजनक असेल तरच तो रोगाचा संसर्ग करू शकेल अन्यथा आपलं शरीर लगेच त्याच्या विरुद्ध कृती करून त्याला संपवून शरीराच्या बाहेर टाकून देतं. रोगजनक जिवाणू मात्र जरा वेगळे असतात. त्यांच्यामध्ये असे काही घटक असतात किंवा ते असे काही पदार्थ तयार करतात की, ज्यामुळे शरीरात बदल घडतात आणि रोगाची लक्षणं दिसायला लागतात. आपली रोगप्रतिकारक शक्ती या वेळीही काम करत असते आणि या जिवाणूंच्या हल्ल्यापासून आपल्याला वाचवायचा प्रयत्न करत असते; परंतु काही वेळेला ती कमी पडते आणि हे जिवाणू वरचढ ठरतात, शरीरात स्थिरावतात आणि रोगाची लक्षणं दिसायला लागतात. त्यांचंही प्रमाण व्यक्तीनुसार आणि प्रकृतीनुसार कमी-जास्त असतं.

कुठल्याही जिवाणूचा शरीरात प्रवेश झाल्या झाल्या लगेच लक्षणं दिसत नाहीत. हा जो काळ असतो त्याला इन्क्युबेशन पीरिअड (Incubation Period) असं म्हणतात. म्हणजे, जिवाणूचा शरीरात प्रवेश झाल्यापासून प्रत्यक्ष लक्षणं दिसण्यापर्यंतचा काळ. या काळात जिवाणू शरीरात स्थिरावतात, वाढतात, त्यांची संख्या वाढत जाते आणि ती प्रत्यक्ष लक्षणं निर्माण करेपर्यंत वाढल्यावरच लक्षणं दिसायला लागतात.

प्रत्येक रोगासाठी हा काळ वेगळा असतो. हा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ : जिवाणूंची सुरुवातीची संख्या, शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग, त्यांची संख्या वाढण्याचा दर, रुग्णाची प्रतिकारशक्ती आणि संवेदनशीलता. विषमज्वरासाठी (Typhoid) हा काळ सहा ते तीस दिवसांचा, तर घटसर्पासाठी (Diphtheria) दोन ते पाच दिवसांचा असतो. या दोन्ही रोगांचे जिवाणू वेगळे आहेत आणि त्यामुळे रोग निर्माण करण्यासाठी लागणारा काळही वेगळा आहे.

कुठलाही आजार निर्माण करण्यासाठी जिवाणूंमध्ये वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि क्षमता असते. यात प्रामुख्यानं विष (Toxin) निर्माण करणं, पेशींच्या आत प्रवेश करण्याची क्षमता, तिथं स्थिरावण्याची क्षमता, तसंच पेशींमधील पोषक द्रव्यांचा स्वतःसाठी उपयोग करून घेण्याची क्षमता आणि त्याचबरोबर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी करण्याची क्षमता अशा विविध क्षमता असतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे, रुग्णात जिवाणू स्वतःला व्यवस्थित स्थापित करून रोग निर्माण करतो. यालाच जिवाणूची पॅथोजेनेसिटी (Pathogenecity) असं म्हणतात.

एखादा रोगजनक जिवाणू शरीरात कसा प्रस्थापित होतो, त्याला शरीरातील कुठली स्थिती कशी मदत करते या सर्व प्रक्रियेला पॅथोजेनेसिस (Pathogenesis) असं म्हणतात. यावरून एखादा रोग हा तीव्र रोग (Acute Infection) म्हणून की दीर्घकालीन रोग (Chronic Infection) म्हणून, अथवा वारंवार होणारा आजार (Recurrent Infection) म्हणून प्रस्थापित होतो, हे पाहता येतं. या घटकांचा विचार करता, जर आपण यावर अंकुश ठेवू शकलो तर जिवाणूंच्या प्रस्थापित होण्यावर नियंत्रण आणून रोगाचा प्रतिकार यशस्वीरीत्या करू शकू.

साथीचा रोग किंवा एपिडेमिक (Epidemic) जेव्हा एखाद्या समुदायात विशिष्ट वेळेत पसरतो आणि या रोगाचे अनेक रुग्ण दिसू लागतात तेव्हा त्याला अनेक घटक व तिथली विशिष्ट परिस्थिती कारणीभूत असते. यात पर्यावरणात अचानक झालेला बदल, जिवाणूत झालेला जनुकीय बदल, नवीन जिवाणूचा या समुदायात प्रवेश, काही कारणानं त्या जिवाणूविरुद्ध लढण्यासाठीची कमी झालेली समुदायाची प्रतिकारशक्ती अशा कारणांचा समावेश असतो. सुरतमध्ये आलेली प्लेगची साथ किंवा आफ्रिकी देशांमधील इबोला विषाणूची साथ ही याचीच उदाहरणं.

जेव्हा एखादा रोग तुरळकपणे किंवा अनियमितपणे आढळतो तेव्हा त्याला तुरळक किंवा स्पोरॅडिक (Sporadic) असं म्हणतात. यात रोगाबाबत कुठलाच भौगोलिक किंवा कालावधीबाबतचा निष्कर्ष काढता येत नाही. असे रोग होण्याचीही उदाहरणं आढळून येतात. धनुर्वात किंवा रेबीज् ही अशा प्रकारची उदाहरणं होत.

एखाद्या विशिष्ट जनसमुदायात किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात होणाऱ्या रोगाला स्थानिक रोग किंवा इंडेमिक (Endemic) असं म्हणतात. त्या विशिष्ट क्षेत्रात एका रुग्णाकडून दुसऱ्याला हा संसर्ग पसरत जातो. मलेरिया किंवा कांजिण्या या प्रकारात येतात.

आणि, आपल्याला अलीकडे सर्वात परिचयाचा झालेला प्रकार म्हणजे महामारी (Pandemic). यात पूर्ण देश किंवा संपूर्ण जग या रोगाच्या तावडीत सापडतं. आपण सर्वांनी याचा अनुभव कोरोनाच्या स्वरूपात घेतला. यातली अन्य उदाहरणं म्हणजे क्षयरोग आणि एचआयव्ही.

रोगांचं संक्रमण व त्यांचा प्रसार, त्यांचे प्रकार आपण या लेखात पाहिले. काही जिवाणूंपासून व विषाणूंपासून होणाऱ्या रोगांबद्दल आणखी माहिती व विवेचन पुढील लेखात...

(लेखिका सूक्ष्मजीवशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत)

Web Title: Dr Pragati Abhyankar Writes Microbial Infection Sickness

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :saptarang