महाकाय दुर्बीण टाइम मशिनसह! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nasa james webb binoculars

नासाची जेम्स वेब ही दुर्बीण जगातील सर्वांत मोठी व शक्तिशाली हवाई दुर्बीण असून, तिने आकाशाच्या छोट्या भागाचे हे छायाचित्र घेतले होते.

महाकाय दुर्बीण टाइम मशिनसह!

अमेरिकन अध्यक्षांच्या व्हाइट हाउसमधील एका छोट्या दालनामध्ये गेल्या सोमवारी पत्रकारांची गर्दी उसळली होती. ‘नासा’ या अमेरिकन स्पेस एजन्सीमधील काही अधिकारी या गर्दीमध्ये दिसत होते. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हस्ते एका छायाचित्राचे अनावरण होणार होते. या कार्यक्रमास उपराष्ट्रपती कमला हॅरिस व ‘नासा’चे मुख्य संचालकदेखील उपस्थित होते. नासाच्या एका नव्या दुर्बिणीने आकाशाच्या एका भागाचे दुर्मीळ असे छायाचित्र घेतले होते. हे छायाचित्र पृथ्वीवरून घेतले नसून, पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर उंचीवर असलेल्या ‘जेम्स वेब’ नावाच्या हवाई दुर्बिणीतून ते घेतले गेले होते.

नासाची जेम्स वेब ही दुर्बीण जगातील सर्वांत मोठी व शक्तिशाली हवाई दुर्बीण असून, तिने आकाशाच्या छोट्या भागाचे हे छायाचित्र घेतले होते. वाळूचा छोटा कण हातभर अंतरावर धरल्यास जेवढा भाग दिसतो, तेवढ्या भागाच्या आकाशाचे छायाचित्र दुर्बिणीने विविध यंत्रणा वापरून १२ तासांत घेतले. या भागात कधीही न दिसलेल्या हजारो दीर्घिका (गॅलक्सी) पाहून सर्वांचीच मती गुंग झाली.

प्रथमच प्रचंड दूर अंतरावरच्या व तितक्याच पुरातन काळच्या खगोलीय वस्तूचे छायाचित्र मिळवून नासाने इतिहास घडविला होता. हे छायाचित्र पाहून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ‘विज्ञान, तंत्रज्ञान व अमेरिकेसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. या छायाचित्राला पाहून जगाला कळून चुकेल की, अमेरिका मोठमोठ्या गोष्टी करू शकतो. आपल्या मुलांना समजेल की, आपल्याला कुठलीच गोष्ट असाध्य नाही.’ नासाने हे छायाचित्र डिजिटल स्क्रीनमार्फत अमेरिका व इंग्लंडमधील अनेक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित केले. अगदी ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वरदेखील हे छायाचित्र झळकले. ‘गुगल’नेदेखील या छायाचित्राचा गौरव केला. हे छायाचित्र घेणारी १० अब्ज डॉलर्स किमतीची दुर्बीण गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी अंतराळात सोडली गेली. ती पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर असून, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आकाशाचा वेध घेत आहे.

जवळजवळ पाचशे वर्षांपासून खगोलशास्त्रज्ञ दुर्बिणी वापरून आकाशाचा वेध घेत आहेत. सर्वप्रथम गॅलिलिओने १६१० मध्ये त्याची छोटी दुर्बीण आकाशाकडे रोखून ग्रह-ताऱ्यांना दहा-वीसपट मोठं करून खगोलशास्त्रात नवं दालन उघडलं. त्यानंतर मोठमोठ्या दुर्बिणी तयार करून खगोलशास्त्रात मोठी क्रांती झाली. मात्र, दुर्बिणी जमिनीवर असल्याने त्यांच्या प्रतिमा हव्या तेवढ्या स्पष्ट किंवा रेखीव मिळत नव्हत्या.

पृथ्वीभोवतालच्या अस्थिर वातावरणामुळे दूर अंतरावरच्या ग्रह-ताऱ्‍यांचा प्रकाश दुर्बिणीत शिरताना काहीसा अस्थिर किंवा थरथरत शिरतो व त्यामुळे ग्रह-तारे स्पष्ट दिसत नाहीत. तसंच, पृथ्वीभोवतालचं वातावरण खगोलीय पिंडातून येणारे, दृश्य प्रकारचे प्रकाशकिरण सोडता इतर प्रकारचे किरण वातावरणात शोषले जातात. याचमुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या वातावरणाबाहेर ठेवता येईल अशा दुर्बिणीची गरज भासू लागली. शास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमुळे १९९० मध्ये ३.४ मीटर व्यासाची ‘हबल’ नावाची दुर्बीण अंतराळात सोडली गेली. ही दुर्बीण पृथ्वीपासून ५५७ कि.मी. उंचीवरून फिरताना ग्रह-ताऱ्यांची निरीक्षणं घेत आहे. या दुर्बिणीने घेतलेली सुंदर छायाचित्रं पाहून शास्त्रज्ञांना काहीशी मोठी व अत्याधुनिक प्रकारची दुर्बीण बांधावी असं वाटू लागलं. याचमुळे हबलची पुढची आवृत्ती म्हणून ‘नेक्स्ट जनरेशन स्पेस टेलिस्कोप’ प्रकल्प मांडला गेला. या प्रकल्पातील दुर्बीण ४ मीटर व्यासाची व इन्फ्रारेड (अवरक्त ) तरंगलांबीवर कार्य करणारी असेल असं ठरलं. या दुर्बिणीच्या प्रकल्पात अमेरिकेची नासा, युरोपियन स्पेस एजन्सी व कॅनडियन स्पेस एजन्सीने सहभाग घेतला. याशिवाय या प्रकल्पात १४ देश सहभागी झाले असून, ३०० विद्यापीठांचा संबंध या दुर्बिणीच्या प्रकल्पात येत आहे.

या दुर्बिणीचं प्रमुख वैशिष्ट्य असं की, ती हबलसारखी दृश्य तरंग लांबीवर काम न करता इन्फ्रारेड तरंगलांबीवर काम करणार आहे. यामुळे विश्वातील अतिदूरच्या दीर्घिका व ताऱ्‍यांचं निरीक्षण करता येईल. तसंच, हबलप्रमाणे या दुर्बिणीमध्ये एकच आरसा नसून, षटकोनी आकाराचे १८ आरसे असून, या सर्वांमधून येणारा प्रकाश एकत्रित करून छायाचित्र बनवलं जाईल. हे १८ भाग बेरीलीयम धातूचे बनविले असून, त्यावर सोन्याचा मुलामा दिलेला आहे. हे सर्व भाग स्वतंत्रपणे हलविण्यासाठीची यंत्रणा प्रत्येक भागाच्या मागे बसविलेली आहे. सर्व १८ भाग अत्यंत पातळ व हलके असल्याने हा सर्व आरसा एकत्रितपणे त्यांच्या यंत्रणांसहित अवघा ६२५ किलो वजनाचा आहे. वेबचा हा एकत्रित आरसा घडी करता येण्यासारखा बनवावा लागला, कारण त्याचा आकार ६.५ मीटर एवढा मोठा असल्याने दुर्बीण अंतराळात पाठवताना ते अडचणीचे ठरले असते.

दुर्बिणीमध्ये असलेल्या उपकरणांना सूर्याच्या उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून दुर्बिणीवर ‘सनशिल्ड’ बसवलं आहे. हे सनशिल्ड टेनिस कोर्टएवढं मोठं असून ते पाचपदरी आहे. या पाच थरांमुळे सूर्याची उष्णता कित्येक लाख पटीने अडविली जाते. यामुळे दुर्बिणीचा सूर्याकडचा भाग चांगलाच गरम म्हणजे ८५ अंश एवढ्या तापमानाचा असेल, तर अंधाराकडचा भाग अतिशय थंड म्हणजे उणे २३३ अंश एवढा असेल. या थंड वातावरणात नायट्रोजन वायूदेखील गोठला जाऊ शकतो. या प्रकारच्या थंड वातावरणामुळे दुर्बिणीतील चार उपकरणं पूर्ण क्षमतेने काम करू शकतात. ही दुर्बीण तिची सर्व उपकरणं, सनशिल्ड व आरशांमुळे ६ हजार ५०० किलो वजनाची व २० बाय १५ मीटर आकाराची झाली आहे. या दुर्बिणीला २००२ मध्ये नासाच्या माजी संचालकांचं नाव दिलं गेलं. जेम्स वेब हे १९६१ ते १९६८ मध्ये नासाचे संचालक होते. या काळात त्यांनी ७५ अवकाश मोहिमा आखल्या. यामध्ये चंद्राकडची अपोलो मोहीम महत्त्वाची होती. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ न्यू जनरेशन टेलिस्कोपला ‘वेब टेलिस्कोप’ म्हणून ओळखलं जात आहे.

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप अंतराळात २००७ मध्ये सोडायचं ठरलं होतं. मात्र काही तांत्रिक अडचणी व काही राजकीय अडथळ्यांमुळे दुर्बिणीचं प्रक्षेपण लांबत गेलं. सर्व काही ठीकठाक झाल्यावर कोरोनारोगाने प्रक्षेपण लांबलं व अखेरीस २५ डिसेंबर २०२१ रोजी प्रक्षेपणास मुहूर्त मिळाला. या दिवशी १२.२० वाजता दक्षिण अमेरिकेमधील फ्रेंच गियानामधून एरियन-५ रॉकेटने या दुर्बिणीस अंतराळात नेलं. काही वेळातच रॉकेटने वेब दुर्बिणीस स्वतःपासून मुक्त करून पुढील प्रवासास धाडलं. यासाठी लागणाऱ्‍या ऊर्जानिर्मितीसाठी सौरशिड (सोलर अ‍ॅरे) उघडलं गेलं. आता दुर्बीण स्वतः निर्माण केलेल्या ऊर्जेच्या जोरावर पुढील प्रवासास निघाली. सूर्यप्रकाशपासून दुर्बिणीची यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी ‘सनशिल्ड’ उघडलं गेलं व पुढील आठवड्याभरात दुर्बिणीचे १८ आरसे हवे तसे उघडले गेले. महिन्याभरात वेब दुर्बीण तिच्या नियोजित जागेवर पोचली. ही जागा म्हणजे ‘लँग्राज-२’ असून इथं दुर्बिणीवर सूर्य किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होत नसल्याने दुर्बीण स्थिर राहू शकते. आता वेब पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. अंतरावर असून, अंतराळाच्या निरीक्षणासाठी सज्ज झाली आहे.

पुढील काही महिन्यांत दुर्बिणीच्या सर्व यंत्रणांची तपासणी केली गेली व दुर्बिणीच्या मागील भागाचं तापमानदेखील कमी होत जाऊन ते निरीक्षणासाठी योग्य झालं. वेब दुर्बिणीच्या प्रकल्पामागे प्रसिद्ध नोबल पारितेाषिक विजेते ‘जॉन माथर’ यांचं मोठं योगदान आहे. अंतराळातील महास्फोटानंतर ( बिग बँग) दीर्घिका, आकाशगंगा, तारे कसे निर्माण झाले असावेत व त्यांची उत्क्रांती कशा प्रकारे झाली असावी याचा शोध घेण्यासाठी हवाई दुर्बीण हवी असं त्यांना वाटत होतं. आज दिसत असलेल्या विश्वाचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी ‘इन्फ्रारेड प्रकारची दुर्बीण हवी, की जी टाइम मशिनप्रमाणे काम करेल. आपण कुठून व कसे आलो याचादेखील शोध या दुर्बिणीने घेता येईल.’ थोडक्यात दीर्घिका, तारे व ग्रहांची निर्मिती व त्याची सध्याची स्थिती जाणून घेण्यासाठी वेब स्पेस टेलिस्कोप वापरला जाईल. यासाठी दुर्बिणीमध्ये ४ उपकरणं बसवली असून, ती ‘निअर व मीड इन्फ्रारेड’ तरंगलांबीवर निरीक्षणं घेतील. थोडक्यात, ही संयंत्रं विशिष्ट तरंगलांबीवर काम करणारे कॅमेरे व स्पेक्ट्रोग्राफ आहेत. या संयंत्रांच्या साहाय्याने १३.५ अब्ज वर्षांपूर्वीचं विश्वदर्शन आपल्याला होईल.

नासाच्या शास्त्रज्ञांनी नुकतीच ही दुर्बीण कार्यरत केली असून, तिच्या साहाय्याने आकाशाच्या छोट्या भागाचं छायाचित्र घेऊन ते सोमवारी, दि. ११ जुलै रोजी प्रसिद्ध केलं. त्यानंतर दुसऱ्‍याच दिवशी आणखी ५ छायाचित्रं त्यांनी प्रसिद्ध केली. यामधील एका छायाचित्रात करिना नेब्युला’मधील ताऱ्‍यांच्या जन्मस्थळाचा परिसर व नुकतेच जन्मलेले तारे दिसत आहेत. दुसऱ्‍या छायाचित्रात ५ दीर्घिकांच्या हालचालीमुळे आजूबाजूच्या वायूपासून ताऱ्‍यांचा जन्म कसा होतो यावर प्रकाश पडत आहे. तर, एका प्लॅनेटरी नेब्युलामध्ये ताऱ्यांच्या मृत्यूसमयी निर्माण झालेला वायू व धुळीच्या कड्याचं स्पष्ट दर्शन होत आहे. ही सर्व छायाचित्रं अतिशय स्पष्ट, रेखीव असल्याने ही दुर्बीण आपणास आकाशाचं आगळंवेगळं दर्शन घडवत आहे. महास्फोटानंतरचं विश्व म्हणजे तेरा-साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वीचं विश्व जाणून घेण्यासाठी वेब दुर्बिणीचा नक्कीच उपयोग होईल.

Web Title: Dr Prakash Tupe Writes Nasa James Webb Binoculars

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dr Prakash TupeskyNASA
go to top