महाराजपुरामधली अहिंसक पर्यावरणीय सेवा!

महाराजपुरानं हिंसक अर्थव्यवस्थेची जागा अहिंसक पर्यावरणीय सेवेनं घेतली. शेरणी नदीनं संस्कृतीचा आधार घेतला आहे.
Water Crisis
Water CrisisSakal

- डॉ. राजेंद्रसिंह, saptrang@esakal.com

महाराजपुरानं हिंसक अर्थव्यवस्थेची जागा अहिंसक पर्यावरणीय सेवेनं घेतली. शेरणी नदीनं संस्कृतीचा आधार घेतला आहे. जेव्हा ही नदी कोरडी पडली तेव्हा तिचा उगम असलेली महाराजपुरा, भुडखेडा, दौडपुरा, आरोंदा, बल्लापुरा, खुंदा, कोरीपुरा ही गावं असहाय्य, निरुपयोगी आणि ‘फरारी’ झाली होती. सर्वप्रथम ‘तरुण भारत संघा’नं या गावांमध्ये जलसंधारणाचं काम सुरू केलं. त्यामुळे शेती आणि पशुपालन सुरू झालं. पूर्वी लोक फक्त पावसाळ्याच्या दिवसांत गावात राहत असत.

आता इथले तरुण ‘फरारीमुक्त’ होण्यासाठी न्यायालयात जाऊ लागले. महाराजपुरा गावात वर्षभर राहून त्यांनी शेती सुरू केली. सुरुवातीला कार्यकर्त्यांना धमकावण्यात आलं. अशा वेळी आम्ही श्रवण, गोपालसिंह, चमनसिंह, छोटेलाल मीना आदींना वारंवार आमच्यासोबत घेऊन जात असू. त्यामुळे त्यांचंही प्रशिक्षण सुरूच होतं. समाजाला त्यांनी पूर्ण प्रेम आणि आदर दिला. पाण्यामुळे आणि प्रेमामुळे या भागात वेगळाच विश्वास निर्माण झाला. ‘तरुण भारत संघा’चं प्रेम आता श्रद्धा बनू लागलं आहे. त्यामुळे जलसंधारणाची भरभराट झाली, तेव्हाच शेरणीच्या हिंसक सिंहांना अहिंसक बनण्याची जाणीव झाली.

पाणी, जीवन आणि उपजीविका यांबाबतची विवेकबुद्धी जागी होताच हिंसाचाराचा त्याग केला जाऊ लागला. पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचं स्वीकारणं आणि त्वरित मुक्त होणं चांगलं आहे, अशी जाणीव झाली. एका मुक्तीमुळे संपूर्ण गाव गुन्हेगारीमुक्त झालं. अशा अनेक घटना घडल्या, ज्यात एक व्यक्ती फरारी झाल्याची शिक्षा संपूर्ण गावाला भोगावी लागली. भुडखेडा येथील लच्छूसिंह न्यायालयात गेल्यावर सर्वांची सुटका झाली. कारण, त्याच्यावर असेच ४० खटले प्रलंबित होते. त्यांतून मुक्त झाल्यावर संपूर्ण गाव मुक्त झालं आणि स्वतःची शेती, म्हैस-शेळीपालन, दूध, खाद्य आणि सर्व प्रकारचं उत्पादन सुरू केलं गेलं.

मथरामधील निर्भयसिंह म्हणतात : ‘‘उपाशीपोटी-तहानेनं मरत असताना प्रत्येक जण आपल्याला जे मिळेल ते मिळवण्याचा प्रयत्न करायचा. इथं पाण्यानं केवळ जीवन दिलं नाही तर, शेती आणि पशुपालनाद्वारे उत्पादनातून उपजीविकाही वाढवली. प्रेम, बंधुभाव या भावनांमुळे जीवनात आनंद निर्माण झाला. आता आम्ही सगळे एकमेकांची काळजी घेतो. हाणामारी विसरून प्रेम वाटायला शिकलो आहोत. आधी तलाव बांधून पाणी जमा केलं, मग सर्वांना पाणी मिळू लागले, त्यासाठी ‘तरुण भारत संघा’नं पाईप-कारंजं आणलं आणि कमी पाणी वापरून अधिक उत्पादन करायला शिकवलं.’’

जीवन समृद्ध झालंय!

महाराजपुरा येथील कुँवरपाल सिंह म्हणतात : ‘‘पाणी आल्यावर जीवन समृद्ध आणि आनंदी झालं. पूर्वी गव्हाचा दाणाही नव्हता. एक-दीड मण बाजरी व्हायची. इथं तिळाचं उत्पादन होत नव्हतं. आता घर ३०० मण गहू, बार्ली आणि मोहरीनं भरलेलं आहे.

जेव्हा घर रिकामं होतं तेव्हा आमचं हृदयही रिकामं होतं. त्यात प्रेमाला, समाधानाला जागा नव्हती. रिकामं पोट, रिकामं हृदय आणि रिकामं मन काहीही विचार करू शकत नव्हतं. पोटाला अन्न-पाणी मिळालं की आपलं हृदय आणि मनही विचार करू लागतं. आजकाल आम्ही चांगल्या-वाइटाचा हिशेब ठेवायला शिकलो आहोत.

एकूणच, मला माझं गाव जोडण्याची समजशक्ती मिळाली. काम करण्यासाठी श्रमसाधनं जमा करण्याची शक्ती मिळाली. माझं गाव पाणीदार, सन्माननीय आणि श्रीमंत झालं. ते पाहून भुडखेडा, कोरीपुरा आदी गावंही त्याच वाटेवर आली.’’

रामवीर बराना म्हणतात : ‘‘माझा तलाव पाहिल्यावर सर्वांनी पाण्याची बचत करण्यास सुरुवात केली आहे. माझ्या तलावानं माझं घर अन्न-धान्यानं व पाण्यानं भरलं आणि आता संपूर्ण गाव अन्न-धान्यानं व पाण्यानं भरलेलं आहे. सर्वजण श्रीमंत झाले आहेत. मग आता लूटमार होईलच का? जेव्हा प्रत्येकाला जगण्याइतपत असतं तेव्हा लूटमार थांबते. आमच्या भागात चोरटेही नाहीत. आम्ही गावातील विहिरीचं पाणी हातानं पितो. डिझेलवर, विजेवर खर्च न करता, गावातील तलावातून शेतात पाणी टाकून सिंचन केलं जातं.

आमच्या गावात हिरवा चारा, इंधन, पाणी असं सर्व काही उपलब्ध आहे. वेदना संपल्या आहेत. प्रत्येक जण आनंदानं जगतो. पूर्वी संपूर्ण दिवस पाणी आणण्यात जात असे. आता घरात पाणी पोहोचलं. सर्व मुलं-मुली शाळेत जात आहेत. पूर्वी शाळेत पाणी नसताना कुणीही शाळेत जात नसे. आता मुलांनाही मजा येते.’’

सरूपी सांगतात :‘‘गावात पाणी आल्यावर माझं आयुष्य सुधारलं. महाराजपुराच्या दुलैयाचं हे समाधान आहे. महाराजपुरा इथं दुलैयानं लोकांना मोठं काम करण्यासाठी राजी केलं. हे शेरणी नदीचं काम नातेवाइकांच्या जाळ्यातून पूर्ण झालं. त्यामुळे इथली अर्थव्यवस्थाही पर्यावरणीय झाली आहे.’’

घाणीचा तलाव बांधणारा सोनाबाबा ही एकमेव व्यक्ती अशी होती, जिनं गावात धरण बांधण्यास होकार दिला. हे काम कुँवरराज आणि चमनसिंह यांच्या आधी पूर्ण झालं. या कामावर झालेल्या खर्चापैकी एक चतुर्थांश रक्कम पहिल्या वर्षीच मासळी-कराराद्वारे प्राप्त झाली. गहू, जव, मोहरी, मका आणि ज्वारी यांचं भरघोस उत्पन्न होऊ लागलं. या गावातील सर्व हिंसक लोकांनी अहिंसक होण्याचं ठरवलं आहे आणि अहिंसक लोक आता शेतीत मग्न आहेत.

ज्याच्याकडे एकही म्हैस नव्हती, त्याच्याकडे आता ४० म्हशी आहेत. कोणताही खर्च न करता प्रत्येकाला गवत, चारा, पाणी मिळू लागलं. आजकाल कमी खर्च करून कमाई आणि जास्त खर्च करून कमाई करण्याचा सिद्धान्त आहे. ‘खर्च न करता कमवा’ हे तत्त्व शेरणीत प्रस्थापित झालं. इथं माशांची पैदास आणि ‘सिंघाडा’ही होऊ लागला. या पाण्याच्या जमिनीतील ओलाव्यामुळे पीक-उत्पादन सुरू झालं. त्यामुळे जनावरांचा चारा आणि इंधनामुळे महिलांच्या जीवनात सुखसोई वाढू लागल्या.

श्रीबाई म्हणतात : ‘‘जेव्हापासून गावात ‘तरुण भारत संघा’नं तलाव तयार केला आहे तेव्हापासून आम्ही खऱ्या अर्थानं जीवन जगू लागलो. त्याआधी जीवन हे नरकासारखं होतं. आता ते जणू स्वर्गासारखंच झालं आहे. आम्ही आमच्या गावातच जिवंतपणी स्वर्ग पाहत आहोत! जीवनाच्या गरजा घरातच पूर्ण होऊ लागल्या आहेत.’’

चमनसिंह आणि रणवीरसिंह यांनी गावात चांगलं काम केल्याचं सर्वांचं म्हणणं आहे.

घराघरात पोहोचलंय पाणी

मीरादेवी महाराजपुरा म्हणतात : ‘‘आता गावात सर्व काही आहे. कमतरता कसलीच नाही. ‘तरुण भारत संघा’नं घराघरात पाणी पुरवलं आणि ‘तरुण भारत’च्या तलावातून शेतं श्रीमंत झाली. पूर्वी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागायचा. आता कुठंही जाण्याची गरज नाही. महाराजपुरामध्ये भाज्या, दूध, दही यांसह सर्व खाद्यपदार्थ दिले जातील. पूर्वी गावात काहीही मिळत नसे.’’

‘‘आता घराचा प्रत्येक कोपरा भरलेला आहे. कशाचीच कमतरता नाही. दूध आहे...दही आहे,’’ असं मीनेशदेवी यांनी सांगितलं.

संतादेवी म्हणतात : ‘‘इथं भरपूर इंधन व चारा आहे आणि उन्हाळ्यातही हिरवीगार झाडी आहे. म्हैस भरपूर दूध देते. तुपाचा पैसा आमच्या बटव्यात आहे. पूर्वी पैसे पाहायलाही मिळत नसत. आता आम्ही आमच्या मुलीलाही काही देऊ शकतो. महाराजपुरा आता ‘महाराज’ झाला आहे. पूर्वी गावाचं नाव महाराजपुरा होतं, तेव्हा ते गरीब होतं. उन्हाळ्यात गावात कुणीही राहायला तयार नसे. सगळेजण गाव सोडून निघून जायचे. आता आमचं गाव वर्षभर हिरवंगार असतं. गावातील पाणी गावाला आनंदी ठेवतं.’’

लक्ष्मी म्हणतात :‘‘आता माझ्या गावात सगळीकडे ‘लक्ष्मी’ दिसते! पाणी आल्यावर गावात लक्ष्मीचा वास झाला. पाणी नसताना लक्ष्मीचं नाव नव्हतं. पूर्वी या गावातील बहुतेक तरुण मुलं अविवाहित राहायची, आता एकजणही तसा दिसत नाही. आता सर्वजण नवीन शेत तयार करण्यात व्यग्र आहेत. दगडांवर माती टाकून नवनवीन शेतं तयार करत आहेत.’’

सर्वांच्या भल्याचा भाव

रामनरेश महाराजपुरा म्हणतात : ‘‘आम्ही सदैव घाबरलेले असायचो. आता आम्ही आमच्या गावचे ‘सिंह’ झालो आहोत. आता आम्ही कुणाला घाबरवत नाही आणि घाबरतही नाही. सध्या आमच्या शेताचं-घरचं काम इतकं वाढलं आहे की आम्हाला थोडीही सवड नसते. आता आमची पोटापाण्याची भ्रांत मिटली आहे. पाणी नसताना काम नसायचं. मरमर करावी लागायची. सर्वांचं भलं करावं हा भाव पाण्यानं आमच्यात आणला.’’

हिंसामुक्त पर्यावरणीय सेवा, तलाव बांधणं, जंगलं आणि वन्य प्राणी वाचवून पृथ्वीची हिरवळ वाढवण्याचं काम या गावाला देण्यात आलं आहे. या कामामुळे महाराजपुरा केवळ समृद्धच झाला असं नव्हे तर, संपूर्ण नदीचंच पुनरुज्जीवन झालं आहे. शेरणीचा प्रवाह आटल्यावर या गावातील संस्कृतीचाही जणू अंत झाला होता. महाराजपूर गावाच्या कार्यातून जेव्हा शेरणी नदी शुद्ध व प्रवाही झाली तेव्हा हिंसा संपली आणि अहिंसा व खरी नैतिकता फुलू लागली. पाण्यानं आणि हिरवाईनं पृथ्वीचा ताप उतरवला. अनुकूल हवामानबदल सुरू झाले.

(लेखक हे आंतरराष्ट्रीय जल-पर्यावरणतज्ज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कारविजेते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com