नाहरपुरातले अहिंसक ‘सिंह’!

नाहरपुरा हे राजस्थानातल्या करौली-धौलपूर जिल्ह्यातलं सीमावर्ती गाव. उजाड झालेल्या या गावात ३० घरं आहेत. पूर्वी इथले लोक पाण्याअभावी घर सोडून जायचे. ते फक्त पावसाळ्यातच गावात राहायचे.
Naharpura Village
Naharpura VillageSakal

- डॉ. राजेंद्रसिंह, saptrang@esakal.com

नाहरपुरा हे राजस्थानातल्या करौली-धौलपूर जिल्ह्यातलं सीमावर्ती गाव. उजाड झालेल्या या गावात ३० घरं आहेत. पूर्वी इथले लोक पाण्याअभावी घर सोडून जायचे. ते फक्त पावसाळ्यातच गावात राहायचे. भुरासिंह आणि त्यांच्या वडिलांनी मिळून इथून जाणाऱ्या छोट्या नदीवर तलाव बांधला. या तलावाच्या बांधकामामुळे नऊ कुटुंबांच्या जमिनी पाण्याखाली आल्या. त्यामुळे हे लोक शेती करू लागले.

आता त्यांना मिळणारं उत्पन्न या लोकांनी त्यांच्या आयुष्यात पाहिलेल्यापेक्षा जास्त होतं. त्यामुळे स्थलांतरित होऊन फायदा नाही, असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. कारण, स्थलांतरित झालेल्या ठिकाणी राहायला जागा नाही, पिण्याचं पाणी नाही, अन्न नाही आणि सतत भीतीनं जगणं, असं जीवन का जगायचं?

तरुण भारत संघ या लोकांबरोबर पाण्यासाठी आणि शेती सुधारण्यासाठी पाइप आणि स्प्रिंकलरचं वाटप करण्याचं काम करतो. सध्या भुरासिंहांच्या शेतात पायथ्यापासून वरपर्यंत पाइप, स्प्रिंकलर बसवले आहेत. तरुण भारत संघानं पाणी वाचवण्याचं आणि पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे हा संघ पाण्याच्या कामाबरोबरच त्याचा शिस्तबद्ध वापरही शिकवत असल्याचं या लोकांना समजलं. त्यामुळे हे लोक आनंदी आहेत.

भुरासिंहनं हिंमत एकवटली आणि न्यायालयात शरणागती पत्करली; मग न्यायालयानंही उदारमतानं विचार करून त्यांची निर्दोष मुक्तता केली. तपकिरी सिंहाला पाहून जे अनेक लोक असहाय, निरुपद्रवी आणि आजारी पडले होते, त्या स्थलांतरित लोकांच्या मनात आदरणीय, श्रीमंत आणि पाणीदार होण्याचा विचार येऊ लागला. या कल्पनेनं सर्वांच्यात मोठा उत्साह निर्माण झाला आणि सर्वजण मिळून ‘जलयुक्त’च्या कामात सहभागी झाले. हळूहळू पाण्याची कामं होऊ लागली.

नाहरपुरातील भुरासिंहचे वडील खुबा हे खूप धावपळ करणारे धाडसी व्यक्ती आहेत. शेतात बांधलेल्या झोपडीत त्यांनी मला बोलावलं. इथे घनदाट जंगलात त्यांची पत्नी गुड्डीनं चहा दिला. ही झोपडी जंगलात का बांधली, असं मी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘पूर्वी आम्ही जंगलात लपून बसायचो, घाबरायचो. पण आता आम्ही घाबरत नाही. आता सगळं कुटुंब कोणत्याही भीतीशिवाय झोपडीत राहतं.

आपली ही भीती पाण्यामुळे गेली. शेतात पाणी आल्यानं आम्ही शेती करू लागलो आणि आमच्या मागं लागलेल्या पोलिसांचं भय संपलं. आमच्या कुटुंबात सुख, शांती पाण्यामुळे आली. आता आम्ही इथं मुक्तीच्या भावनेनं राहतो. आमचं गाव नाहरपुरा म्हणजे ‘सिंहांचं घर’. नाहर म्हणजे सिंह आणि पुरा म्हणजे घर. आम्ही आता अहिंसक सिंह या ठिकाणची शान आहोत.’

नाहरपुरात २०१८ मध्ये काम सुरू झाल्यावर मी गेलो होतो. त्यानंतर २०२०, २०२२ आणि एप्रिल २०२३ च्या शेवटी पुन्हा एकदा गेलो. या गावात मला आशादायक स्थिती पाहायला मिळाली. गावातील मुलांचं आरोग्य सुधारलं आहे, महिला जागरूक झाल्या आहेत, त्यांच्यात बोलण्यातला आत्मविश्वास वाढला आहे, लोकांना आता भीती नाही. हा विश्वास पाण्यामुळे आला.

इथले सर्व तरुण मनानं तरुण भारत संघात सामील झाले. ही संघटना जलकार्य शांततेत पार पाडत आहे, असं त्यांना वाटलं. संघाच्या कार्यकर्त्यांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता; कारण, संघ त्यांच्या कामाचा हिशेब सर्वांसमोर पारदर्शकपणानं देत असे. पारदर्शकतेमुळे नाहरपुरातील डझनभर तरुणांनी हिंसाचार सोडून अहिंसेचा मार्ग पत्करला. पाण्याचं हे काम हिंसेचं अहिंसेत रूपांतर करण्याचं काम आहे.

हृदय आणि मनासाठी हे काम एखाद्या मलमाप्रमाणं आहे. हे उच्च-नीचता दूर करतं. पाणी जीवनाचा प्राण आहे. त्यामुळे नाहरपुराच्या जलकार्यानं तरुणांना सदाचारी, अहिंसक बनण्यास तयार केलं. या तयारीचा सुगंध हळूहळू जगात पसरू लागल्यानं काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधून एक तरुणी त्यांना भेटायला आली आणि सात दिवस गावातील त्यांच्या घरी एका खाटेवर राहिली. ना ग्रामस्थांना तिची भीती वाटत होती, ना ती ग्रामस्थांना घाबरत होती.

जेव्हा तुमचं निसर्ग आणि मानवतेबद्दल प्रेम वाढतं, तेव्हा हे घडतं. नाहरपुरा हे दरी कमी करण्याचं उत्तम उदाहरण आहे. मी आधी नाहरपुराला गेलो होतो, तेव्हा ज्या नऊ लोकांची जमीन पाण्याखाली आली होती, त्यापैकी कोणीही एकत्र बसायला तयार नव्हतं. सगळ्यांशी आपापल्या घरी स्वतंत्रपणानं जाऊन बोलावं लागलं, ते सगळे तयार झाल्यावर मग श्रमदान करता आलं.

संयुक्त राष्ट्र संघानं हे वर्षं ‘जलशांतीचं वर्ष’ म्हणून घोषित केलं आहे. नाहरपुरा गावच्या कार्यात शहाणपण आणि ताकद आहे, जे जगाला प्रेरणा देऊ शकतं. जगात जिथं कुठं पाण्याची कमतरता किंवा मुबलकता आहे, हवामानबदलामुळे लोक निर्वासित होत आहेत अशा सर्वांनी या गावात यावं, पाहावं आणि जाणून घ्यावं, की एका छोट्याशा प्रयत्नानं इतकं मोठं काम कसं करण्यात आलं आहे.

तरुण भारत संघानं कुणालाही बंदुका सोडायला सांगितलं नाही; कारण, हे पाण्याचं काम आहे. संघानं नाहरपुरातील लोकांना भाकरी-पाणी देण्याचं काम केलं. या कामातून लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे या गावातून असहायता, बेरोजगारी, रोगराई, स्थलांतर हे जाऊन गावात शांततेचं वातावरण निर्माण झालं. शांततेच्या क्रांतीचं हे काम जगभर व्हायला हवं!

गडमंडोरा सांगतोय त्याची कथा!

करौली जिल्ह्यातलं मासलपूर तालुक्यामधलं गरमांडोरा हे गाव जंगलाच्या मध्यभागी वसलेलं आहे. हे गाव तालुका मुख्यालयाच्या उत्तरेस १५ किलोमीटर अंतरावर आहे. गावात सगळ्या जातींची मिळून १२५ कुटुंबं राहतात. पूर्वी लोक या गावात जायला घाबरायचे. जंगलातल्या लाकडाची विक्री हाच दहा वर्षांपूर्वी गावातल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत होता.

गावात पाण्याचे स्रोत होते; पण ते कोरडे अथवा पडझड झालेले होते. त्याची देखभाल केली जात नव्हती. त्यामुळे गावातील लोकांचाही जीव टांगणीला लागला होता.

गावातले काशीराम म्हणाले, की आज जी जंगलं हिरवीगार दिसताहेत; ती दहा वर्षांपूर्वी नव्हती. कारण हजारो महिला या जंगलातून लाकडं तोडून रोज इतर भागात घेऊन जात असत. रोज शेकडो उंट लाकूड घेऊन शहराकडे जात. त्यामुळे जंगलं झपाट्यानं नष्ट होत होती.

बलवीर सिंह म्हणाले, की जेव्हा जंगलं नापिक होती, तेव्हा पाऊस खूप कमी व्हायचा. ढग यायचे, पण पाऊस पडायचा नाही. ढग निघून जात असत. एकदा-दोनदा पाऊस व्हायचा. पिकं घेतली जात नव्हती. तेव्हापासून तरुण भारत संघाच्या मदतीनं गावात पाण्याचं व्यवस्थापन केलं जात आहे. आज आम्ही तीन पिकं घेत आहोत. आमचं पशुधन पूर्वी खूपच कमी होतं; परंतु आता ते वाढलं आहे. प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतचं दूध आज विकलं जातं.

मी स्वतः सव्वालाख रुपयांचं दूध, तीन लाख रुपयांची मोहरी आणि तेवढ्याच किमतीचा गहू विकला. आता आम्ही पंचायतीच्या जंगलातून लाकूड काढणं पूर्णपणानं बंद केलं आहे. तरीही आता वन्यजीव अभयारण्यासाठी सरकारला आमच्याकडून जंगल काढून घ्यायचं आहे. हे मोठं संकट आमच्यावर येणार आहे. आधी पाण्याचं आणि आता उपजीविकेचं मोठं संकट आहे.

आम्ही आज तरुण भारत संघाच्या मदतीनं गावात २० ते २५ जलसंरचना बांधल्या आहेत. त्यामुळे येथून शेरणी नदीचा एक प्रवाह वाहत आहे. याचं नाव भैरोनाथांच्या गुहेचा नाला असं आहे. तो शेरणी नदीला मिळतो. तिथं त्याला ‘रास्ताई’ म्हणतात. आज ढग येतात, पाऊस पडतो आणि हा प्रवाह बाराही महिने वाहतो. सिंचनाबरोबरच तो शेरणी नदीचंही रक्षण करतो.

मीरादेवी म्हणाल्या, की पूर्वी महिलांच्या जीवनात मोठं संकट आलं होतं. लोक दारूडे आणि दहशत पसरविणारे होते. घरातून बाहेर पडणं कठीण होतं. दूरवरून पाणी आणावं लागत असल्यानं, एकटी महिला ते आणू शकत नव्हती. दारू पिणाऱ्यांची आणि दहशत पसरवणाऱ्यांची मोठी भीती होती. जंगलात आजूबाजूला डाकू होते.

महिला समूहानं शेतात जायच्या, पाणी आणायच्या. गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. आज पाण्याच्या उपलब्धतेमुळे लोक शेती आणि पशुपालनात गुंतले आहेत. त्यामुळे चुकीच्या कामांना वेळ मिळत नाही. आता आम्ही निर्भयपणे काम करतो.

रामप्रकाश शर्मा म्हणाले, की गावात पाणी नसताना लोकांनी आपल्या जमिनी विकून बाहेर पडायला सुरुवात केली. शहरातील मोठे लोक इथं जमीन खरेदी करू लागले. करौलीच्या एकानं ५० बिघे जमीन विकत घेतली आणि एक घर उभारलं. क्रशर प्रकल्प सुरू केला. दुसऱ्यानं शेकडो बिघा जमीन विकत घेतली आणि १०० फुटांची मोठी बोअरवेल घेतली; पण पाणी लागलं नाही. आज खेड्यापाड्यांत, शेतांत लोकांना रोजगार मिळाला आहे. इथं पूर्वी सगळ्या जाती एकमेकांवर अवलंबून होत्या. आता गावात एकत्र येणं सुरू झालं आहे.

गावातल्या ९० वर्षांच्या भंवर सिंह यांनी सांगितलं, की माझ्यासमोर गावात समृद्धी होती; पण लोकांनी जंगल तोडून खाणकाम केल्यानं पाऊस कमी होऊ लागला. पशुधन कमी झालं आणि लोक नव्या पैशासाठी निराधार झाले. पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी लोक अवैध दारू बनवू लागले, हिंसक कृत्यं करू लागले.

मात्र, तरुण भारत संघाच्या सहयोगातून सर्वांच्या सहकार्यानं पाणी अडवल्यानं लोकांनी हिंसक कारवाया सोडून शेतीची कामं करण्यास सुरुवात केली. आज लोक चांगली घरं बांधत आहेत; मुलांना शिक्षण देत आहेत. प्रत्येकजण आनंदानं जगत आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय जल, पर्यावरणतज्ज्ञ अन् मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com