गणरायाचा लोकोत्सव... (डॉ. रामचंद्र देखणे)

Dr Ramchandra-Dekhane
Dr Ramchandra-Dekhane

कोरोनाच्या संकटकाळात गणेशोत्सवाचं स्वरूप बदललंय. उत्सवापेक्षा गणरायाच्या पूजेच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य प्रबोधनाची भूमिका घेऊन जाणतेपणाचा एक आदर्श उभा केला आहे. गणपती ही कृषिदेवता आणि आरोग्यदेवताही आहे. गणेशोत्सवाच्या काळात सारी सृष्टी लावण्यानं बहरलेली असते. गणपतीच्या पूजेतही एकवीस पत्री आणून एकप्रकारे निसर्गपूजाच केली जाते. या २१ पत्रींमध्ये प्रभावी असे औषधी गुण आहेत, येत्या शनिवारपासून (ता. २२) गणरायाचा उत्सव सुरू होत आहे, त्यानिमित्त...

ओसंडून वाहणारा आनंद, तो आनंद साठविण्याची कृती आणि त्यातून प्रकटणारी एक सार्थ अपरोक्षानुभूती... हाच मानवी जीवनातील एक "अविनाश-योग'' आहे. उत्सव, सण, सोहळा यांसारख्या माध्यमातून प्रत्येकाला जीवनाचा हा आनंदयोग अनुभवता येतो. उत्सव म्हणजे सळसळतं चैतन्य उभी करणारी स्फूर्तीची पौर्णिमा होय. जिथं भाव-भावनांचा विलास, नावीन्याचा आणि नवरचनेचा उल्हास, तसंच चैतन्याचा प्रकाश एकवटतो, तिथंच खरा "उत्सव'' उभा राहतो. देशाचा सांस्कृतिक इतिहास बखरींच्या किंवा पुस्तकांच्या पानांत नाही, तर तो त्याच्या जीवन-उत्सवात लिहिलेला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उत्सव प्रसन्नतेचे प्रेरक, परंपरेचे संरक्षक, सहजीवनाचे पोषक, ऐक्‍याचे साधक आणि भावनांचे संवर्धक आहेत. महाकवी कालिदासानं सांगितलेलं "उत्सवप्रियः खलु मनुष्यः'' हे माणसाचं लक्षण किती यथोचित आहे, याची प्रचिती उत्सवांतून अनुभवायला मिळते.

मराठी मनाचा, मराठी जनाचा, लोकजीवनाचा एक आनंद सोहळा म्हणून गणेशोत्सवाकडं पाहावं लागेल. गणेश हे संपूर्ण भारतीय लोकविश्‍वाचं श्रद्धास्थान असलं, तरी पंढरीचा पांडुरंग आणि गणपती ही महाराष्ट्राची लोकदैवतं आहेत. मराठी माणसानं गणेशोत्सवाला आणि गणेशभक्तीला इतकं व्यापक केलं आहे, की भारताबाहेरही अनेक देशांमध्ये गणेशोत्सवाचं भव्य रूप आज पाहायला मिळतं. मराठी भावविश्‍वानं गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणरायाला मनात रुजविलंय आणि मस्तकी मिरविलं आहे.

श्रीगणराय ही विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे, सारस्वतांची देवता आहे, कृषिदेवता आहे, शौर्याची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, तशीच ती आरोग्याचीही देवता आहे. गणेश हा गणांचा ईश आहे, समूहमनाचा देव आहे, तो मानवी मनाच्या श्रद्धेला फुटलेला पहिला अंकुर आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी त्याला "आदिबीज'' म्हणून गौरवलयं, तर समर्थांनी त्याला "निगुर्णाचा मुळारंभ'' असं म्हटलंय. नवरसांचे सागर भरवीत, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवीत, विवेक वस्तीची लावणी करीत ब्रह्मरससुस्वाद घडविणाऱ्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीच्या आरंभीच गणेशाचं सारस्वतदर्शन आणि तत्त्वदर्शन उभं केलंय; तर ओंकारस्वरूपी गणेशाचं रूप मांडून, तत्त्वरूप, शब्दरूप, नादरूप आणि ब्रह्मरूप गणपतीला नमन केलंय. विश्‍वरूप वृक्षाचा नाम-रूप-रंगमय विकास आणि विस्तार ॐ या ध्वनिबीजानं होतो. परमात्म्याच्या विश्‍वात्मक सृजनशक्तीचा आविष्कार म्हणजे ओंकार होय. ओंकाराला पदार्थसृष्टीत आणण्याचं काम गणेशानं केलंय. गणपतीचं पद्मासन, त्याचं लंबोदर, चार किंवा सहा हात, सुपाएवढे कान, सूक्ष्म नेत्र हे सगुणदर्शन कशातून प्रकटतं? या सगुणाचं तत्त्वदर्शन ज्ञानेश्‍वरीत विस्तारलंय.
अकार चरण युगुल।
उकार उदर विशाल।
मकार महामंडल।
मस्तकाकारे।
हे तिन्ही एकवटले।
तेथ शब्दब्रह्म कवळले...

"अ''कार म्हणजे गणपतीनं घातलेलं पद्मासन, "उ''कार म्हणजे विशाल पोट, तर "म''कार म्हणजे मस्तक. अकार, उकार आणि मकार या तिन्हींचा एकमेळ झाला, की जो ॐकार होतो, त्यात सर्व वाङ्‌मयविश्‍व सामावतं. तिथं शब्दब्रह्मरूप वेद कवेत मावण्याजोगा होतो. वेदांची निर्मिती करणाऱ्यांनी आणि तत्त्वचिंतकांनी गणपतीला वाङ्‌मयाच्या तळाशी आणि नादाच्या मुळाशी नेऊन बसवलंय. गणेशाचं स्तुती-वर्णन करताना म्हटलं आहे, की "हे गणेशा तूच तत्त्व आहेस. तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तूच आत्मा आहेस. तूच ज्ञानमय आणि विज्ञानमय आहेस.'' ज्ञान हे स्वरूप, तर विज्ञान हे दृश्‍यरूप घेऊन गणेश ज्ञानविज्ञानमय झाला आहे. चार वेद हे त्याचं शरीर, अठरा पुराणं ही आभूषणं; तर योग, सांख्य, वैशेषिक, न्याय, मीमांसा आणि वेदांत ही षड्दर्शनं म्हणजे सहा हात होय. तर्कशास्त्र हा त्याच्या हातातील परशू आहे, न्यायशास्त्र हा अंकुश आहे; तर जीवनाला गोडी देणारा "वेदांत'' हा त्याच्या हातावरला मोदक आहे. संपूर्ण विश्‍वाचं अवलोकन करण्यासाठी त्यानं सूक्ष्म नेत्र धारण केले आहेत; तर काय ऐकावं आणि काय ऐकू नये, हे ''पाखडून'' घेण्यासाठी सुपाएवढे कान धारण केले आहेत. संवाद हा गणरायाचा विशाल दात आहे.

श्रद्धा आणि बुद्धीचं प्रतीक असणारे दोन दात दुरूनही चमकत आहेत आणि समाजात हरविलेल्या लोकसंवादाला पुन्हा उभं करीत आहेत. व्यासंगानं आणि प्रतिभेनं निर्मिलेल्या सुसंस्कृत शब्दरचना हेच त्याचं महावस्त्र आहे. शब्दालंकार आणि अर्थांच्या छटांनी त्या महावस्त्राला शोभा आणली आहे. काव्य आणि नाट्य म्हणजे गणरायाच्या पायांतील घागऱ्या असून, त्या घागऱ्यांतून उमटणारा आल्हाददायक मधुर नाद म्हणजे काव्यनाटकातील रसिकग्राह्यता होय. गणरायाचं हे अलौकिक तत्त्वदर्शन त्याच्या मूर्तिरूपात लौकिक सौंदर्यानं नटलंय. त्यानं कलेची, साहित्याची आणि पराक्रमाची विविध क्षेत्रं पादाक्रांत केलीत. महाभारताच्या लेखनासाठी तो व्यासमहर्षींचा ''लेखकु'' झाला, तर लोककलावंतांच्या आवाहनानुसार प्रत्येक लोककलेच्या अंगणी आपलं ॐकार रूप स्थिर ठेवूनही लौकिक लोकरूपात रिद्धी-सिद्धीसह तो गणात नाचला. मराठी भावविश्‍वाचं तो प्रतीक झाला आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विधायक कार्याचा प्रणेता आणि स्फूर्तिदाता बनला.

गणरायाचं हे लोकमानसातील स्थान ओळखून लोकमान्यांनी त्याला उत्सवी रूपात मांडलं आणि लोकमनाचा संवाद घडविणारा लोकोत्सव उभा केला. हा लोकोत्सव ही प्रबोधनाची चळवळ व्हावी याकडं लोकमान्यांनी सर्वतोपरी लक्ष वेधलं. १९०७ मध्ये गणेशोत्सव विसर्जनप्रसंगी लोकमान्यांनी केलेल्या भाषणातून त्यांची भूमिका स्पष्ट होते. ते म्हणाले, "गणपतीच्या उपासनेतील मंत्रपुष्पांजलीचे शब्द आठवा. स्वराज्यं, वैराज्यं, पारमेष्टराज्यं, अधिराज्यं हे शब्द नुसते उच्चारण्यासाठी नाहीत, तर स्वराज्यासाठी त्या शब्दांचा विसरलेला अर्थ पुन्हा जागविण्यासाठी आहेत. म्हणजे स्वराज्याच्या हक्काची जाणीव होईल आणि वैभवानं, उत्साहानं, स्वातंत्र्यानं गणेशोत्सव करता येईल."

स्वातंत्र्याच्या या लोकोत्सवाला लोकमान्यांनी लोकचळवळीचं रूप दिलं. स्वातंत्र्य मिळालं आणि पुढं सामाजिक भूमिकेतून प्रबोधनाचीच प्रेरणा घेऊन हा लोकोत्सव अधिकाधिक व्यापक होत गेला. उत्सवाचे "श्रेयस्‌'' आणि "प्रेयस्‌'' असे दोन भाग पडतात. श्रेयस्‌ म्हणजे त्याचं मूळ स्वरूप, तत्त्व आणि प्रयोजन; तर प्रेयस्‌ म्हणजे सजावट, मांडणी, मिरवणूक, उत्साह इत्यादी होय. गणेशोत्सवाचं आजचं उत्सवी रूप उभं राहताना त्याचं "श्रेयस्‌'' रूप हरवायला नको. अभियंते, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, लेखापाल या साऱ्यांना अभ्यासक्रमातून तयार करणारी विद्यापीठं आहेत; पण समाजाच्या अंतरंगात जाऊन कार्य करणारं, कार्यकर्ता घडविणारं विद्यापीठ नाही. गणेशोत्सव हे कार्यकर्ता घडविणारं मुक्त विद्यापीठ आहे. त्याचं मुक्त रूप हेच त्याचं स्वाभाविक दर्शन आहे.

लोकजीवनाला दिशा देणारे लोकसेवेचे अनेक उपक्रम गणेशोत्सव नावाच्या विद्यापीठातून उभे राहत आहेत. लोकसंवाद हाच गणेशोत्सवाचा आत्मा आहे.
गणेशोत्सवावर अनेक वेळा संकटं आली. लोकमान्यांच्याच काळात गणेशोत्सवावर प्लेगच्या रूपात मोठं संकट उभं राहिलं होतं. २००९ च्या सुमारास स्वाइन फ्लूची मोठी साथ पसरली. सध्या तर विश्‍वच कोरोनाच्या महामारीचं भयंकर रूप अनुभवत आहे. अशा काळात गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य प्रबोधनाची भूमिका घेऊन जाणतेपणाचा एक आदर्श उभा केला आहे.

गणपती ही कृषिदेवता आहे, आरोग्यदेवताही आहे. विनायक अवतारात देवांतकाशी युद्ध करताना किंवा गजमुख राक्षसाशी युद्ध करताना गणपतीनं आपला एक दात मोडला आणि त्या दातानं असुरांवर प्रहार केला; पण युद्ध संपल्यावर त्या दातानं जमीन नांगरून भूमीलाही संपन्न केलं, अशी लोककथा रूढ आहे. नांगराच्या फाळाची उत्पत्ती ही गणेशाच्या दातापासून झाली आहे. जेव्हा गणपती उत्सव येतो, तेव्हा भाद्रपद महिना असतो. पाऊस भरपूर पडलेला आहे. 
श्रावणसरींनी चिंब भिजून
वनश्री निरंतर
वोळगे फळभार
लावण्येशी।

सारी सृष्टी लावण्यानं बहरलेली आहे. त्या वेळी गणपतीच्या पूजेतही एकवीस पत्री आणून एक प्रकारची निसर्गपूजाच केली जाते. या २१ पत्रींमध्ये अर्जुन, हादगा, दुर्वा, शमी, बेल, आघाडा, तुळस, माका (भृंगराज), विष्णुकांत (अपराजिता), मारवा यांसारख्या औषधी वनस्पतींच्या पानांचा समावेश आहे. "दुर्वा'' ही दाह शमविणारी, "माका'' ही कफ, वातशामक, "तुळस'' ही हवेचं शुद्धीकरण करणारी, "विष्णुकांत'' ही तापशमक, "बेल'' ही दशमूलद्रव्यानं युक्त, तर "आघाडा'' ही पित्तनाशक आहे. या एकवीस पत्रींमध्ये प्रभावी असे औषधी गुण आहेत, तसंच आपल्याच परिसरात आढळणाऱ्या या वनस्पती आहेत. "पत्रं पुष्पं फलं तोयं'' या गीतेच्या नवव्या अध्यायातील वचनानुसार या पत्रींमुळं गणराय संतुष्ट होणार आहेतच; परंतु आपण या वनस्पतींचा शोध घ्यावा, पर्यावरणाशी नातं जोडावं, औषधी वनस्पतींच्या साह्यानं नैसर्गिक जीवन जगावं... हे ज्याला समजलं, त्यालाच गणेशपूजनाच्या एकवीस पत्रींचा खरा अर्थ समजला. नैसर्गिकता म्हणजे शुद्ध पर्यावरण, तर अनैसर्गिकता हेच प्रदूषण आहे. अनैसर्गिकता दूर व्हावी, निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जाता यावं आणि सांस्कृतिक संवर्धनाबरोबरच "सर्वे सन्तु निरामयः'' या भूमिकेतून निरामय जीवनाचा संपन्न उत्सवदेखील गणेशोत्सवाची प्रेरणा घेऊन नव्यानं उभा राहावा ही अपेक्षा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com