वेध 'आनंदघना'चा (डॉ. रामचंद्र साबळे)

डॉ. रामचंद्र साबळे drrnsabale@gmail.com
रविवार, 21 एप्रिल 2019

देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता किती आदी सर्व गोष्टींचा वेध.

देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर असल्यानं अवघं शिवार भिजणार आहे, ही आनंदवार्ता आहे. या अंदाजाचा नेमका अर्थ काय, त्याचे फायदे-तोटे काय, वेगळेपण काय, अंदाज आणि प्रत्यक्ष पाऊस यांच्यात फरक असण्याची शक्‍यता किती आदी सर्व गोष्टींचा वेध.

महाराष्ट्राच्या आणि भारताच्या दृष्टीनं मॉन्सूनचा पाऊस ही एक नैसर्गिक संपत्ती आहे. मॉन्सूनच्या पावसाचं ऐंशी टक्के वितरण जून ते सप्टेंबर या कालावधीत होतं. जूनपूर्वी होणाऱ्या पावसास मॉन्सूनपूर्व, तर ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पावसास मॉन्सूनोत्तर पाऊस असं संबोधलं जातं. भारताची अर्थव्यवस्था मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. पावसाचं पाणी धरणांत साठवून ते वीजनिर्मितीसाठी, शेतीसाठी, पिण्यासाठी आणि कारखान्यांसाठी वापरलं जातं, त्यामुळंच मॉन्सूनला आपल्या देशात फार महत्त्व आहे. अन्नसुरक्षेपासून जनावरांच्या संगोपनापर्यंत आणि पिण्याच्या पाण्यापासून ते जंगली पशुपक्ष्यांपर्यंत पाण्याचं महत्त्व असून, त्यामुळंच आपण म्हणतो ः "जल है तो कल है!'

अंदाज आणि अचूकता
मॉन्सून पावसाचे अंदाज हा अत्यंत गुंतागुंतीचा, क्‍लिष्ट आणि संवेदनक्षम विषय आहे. अंदाजाची अचूकता फार महत्त्वाची असते. त्यासाठी तसं धोरण असण्याची नितांत गरज असते. गेली तीन दशकं भारतीय हवामानशास्त्र विभाग लांब पल्ल्याचे अंदाज वर्तवत आहे. पहिल्या टप्प्यातला अंदाज 15 एप्रिलच्या सुमारास वर्तवला जातो, तर दुसऱ्या टप्प्यातला फेरअंदाज 20 जूनदरम्यान वर्तवला जातो. पहिल्या टप्प्यातल्या अंदाजाला "पूर्वानुमान' म्हटलं जातं, तर दुसऱ्या टप्प्यातला अंदाज जास्त अचूकपणे वर्तवला जातो. थोडक्‍यात पहिल्या टप्प्यातल्या अंदाजाची दुसऱ्या टप्प्यात फेरतपासणी होते आणि ताजे संदर्भ तपासून अंदाज नेमका केला जातो.
पहिल्या टप्प्यातल्या अंदाजासाठी वापरले जाणारे घटक असे असतात ः
- अटलांटिक उत्तर महासागर पृष्ठभाग तापमान (डिसेंबर-जानेवारी)
- हिंदी महासागर विषववृत्तीय तापमान (फेब्रुवारी-मार्च)
- पूर्व आशियायी प्रदेशातलं तापमान आणि हवेचा दाब (फेब्रुवारी-मार्च)
- वायव्य युरोपातलं जमिनीवरचं तापमान (जानेवारी)
- प्रशांत महासागर विषववृत्तीय प्रदेशातलं तापमान (मार्च)
दुसऱ्या टप्प्यातल्या अंदाजात या पाच घटकांबरोबरच आणखीही एका घटकाचा समावेश होतो. हा घटक असा असतो ः
- प्रशांत महासागर - उष्णजल प्रभाव ः एल्‌ निनो-ला निना या घटकांचा अभ्यास करूनही मॉन्सूनचा जून ते सप्टेंबर या कालावधीचा अंदाज दिला जातो. या घटकाच्या अभ्यासासह केलेल्या अंदाजाचा "लांब पल्ल्याचा अंदाज' असं म्हटलं जातं. या अंदाजात "पाऊस सरासरीइतका', "सरासरीपेक्षा अधिक' अथवा "सरासरीपेक्षा कमी' अशा प्रकारे विश्‍लेषण केलं जातं.

सरी आणि सरा"सरी'
या वर्षी हवामानसास्त्र विभागानं मॉन्सूनचा पाऊस 96 टक्के पडेल, असं म्हटलं आहे. हा 96 टक्के अंदाज म्हणजे नेमकं काय हे आपण बघू या. भारताची मॉन्सूनच्या पावसाची सरासरी आहे 889 मिलिमीटर. या सरासरीच्या 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं या वर्षासाठी वर्तवला आहे. या अंदाजापेक्षा पाऊस 5 टक्के अधिक अथवा 5 टक्के उणे असेल, असंही गृहीत धरलं जातं. याचाच अर्थ असा, की 96+5=101 टक्के किंवा 96-5=91 टक्के या दरम्यान या वर्षी पाऊस होईल, असा हा अंदाज आहे. मॉन्सूनच्या पावसाचं जून ते सप्टेंबर या कालावधीतल्या वितरणाचं मोजमाप करून भारतात किती पाऊस झाला ते शेवटी सांगितलं जातं. पावसाची सरासरी म्हणजे नक्की काय हेही लक्षात घेतलं पाहिजे. सरासरी म्हणजे मॉन्सूनची 30 वर्षं अथवा त्याहून अधिक वर्षांमध्ये पडलेल्या पावसाची सरासरी होय. या वर्षीचा 96 टक्के वर्तवलेला अंदाज म्हणजे तो सरासरीच्या 96 टक्के पडणार, म्हणजेच 855 मिलिमीटर पाऊस होईल, असा तो अंदाज आहे. ही स्थिती असल्यानं यंदा "सर्वसाधारण मान्सून' असेल, असं हवामानशास्त्र विभागानं म्हटलं आहे. हीच खरी दिलासा देणारी बाब आहे.

एल्‌ निनो स्थिती
प्रशांत महासागराच्या विषववृत्ती भागातल्या पाण्याचे पृष्ठभागाचं तापमान मोजलं जाते. हे ठिकाण दक्षिण अमेरिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीलगत पेरू या प्रदेशाच्या जवळ आहे. तिथल्या निरीक्षणानुसार, तिथं पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान 0.5 अंश सेल्सिअसनं वाढल्याचं लक्षात येतं. त्यामुळंच या वर्षी एल-निनो स्थिती कमकुवत राहणार असून, मान्सून पावसाच्या शेवटच्या टप्प्यात ही स्थिती आणखी कमकुवत बनण्याचा अंदाज आहे. म्हणजेच तिथल्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान 0.5 अंश सेल्सिअसहून सरासरीपेक्षा कमी राहील, अशी शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळंच वर्तवलेला हा पाऊसमानाचा अंदाज खरा ठरेल, अशी शक्‍यताही वर्तवली आहे. ही बाब सर्व भारतीयांना दिलासा देणारी आहे. याचाच अर्थ असा, की चांगला पाऊस होईल आणि पाऊस सरासरीपेक्षा फार कमी निश्‍चित होणार नाही.
या अंदाजात वर्तवलेल्या शक्‍यताही आपण बघू या. या शक्‍यता खालीलप्रमाणं ः

अ. नं. पावसाची शक्‍यता टक्केवारी शक्‍यता
1) कमी पावसाची शक्‍यता 42%
2) सरासरीच्या 90 टक्‍क्‍यांहून कमी 17%
3) सरासरीच्या कमी पण 90 ते 96 टक्के 32%
4) सरासरी एवढा 96 ते 104 टक्के 35%
5) सरासरी पेक्षा अधिक 104 ते 110 टक्के 10%
6) खूप जास्त 110 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक 2%

हा पहिला अंदाज आहे. दुसऱ्या अंदाजात विभागवार किती पाऊस होईल म्हणजेच ईशान्य भारत, वायव्य भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत अशा विभागांमधल्या पावसाच्या अंदाजाची माहिती दिली जाते.

मान्सून मिशन मॉडेल
उष्णदेशीय हवामान विभागानं अमेरिकेत क्‍लायमेट फोरकास्ट सिस्टिम या नावानं मॉडेल विकसित केलेलं असून, या मॉडेलमध्ये भारतीय हवामानाला अनसरून आवश्‍यक त्या सुधारणा करून मान्सून मिशन मॉडेल विकसित करण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजाबरोबरच या मॉडेलचाही अंदाज दिला जातो. त्यानुसार, देशात 94 टक्के पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. त्यात अर्थातच 5 टक्के अधिक अथवा 5 टक्के कमी पाऊस पडण्याची शक्‍यता गृहीत धरली आहेच. या मॉडेलच्या अंदाजानुसार, 94+5 = 99 टक्के किंवा 94-5 = 89 टक्के पाऊस होईल असं गृहीत धरलं जातं. या मॉडेलनुसार, भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असाच हा अंदाज आहे.

सर्वसाधारण पाऊस
एकूणच सामान्य किंवा सर्वसाधारण मॉन्सूनची वर्तवलेली शक्‍यता लक्षात घेता भारतातला शेअर बाजार या अंदाजानंतर वधारल्याचं लक्षात आलं. सर्वत्र आनंदाचं वातावरण तयार झालं. सर्वसाधारण पाऊसमान म्हणजे सर्वत्र समाधानकारक नव्हे, त्यात काही भागांत अधिक, तर काही भागांत कमी पाऊस होणं शक्‍य आहे.

अंदाज आणि शेतीचं भवितव्य
भारतीय शेतीसाठी हा अंदाज आनंददायी आहे. या वर्षीचा खरीप चांगला असेल, असंच शेतकऱ्यांना आश्‍वासित करणारा हा अंदाज आहे. मात्र पाऊसमानानुसार पिकांची निवड आणि पीक व्यवस्थापन गरजेचं आहे. हवामान लक्षात घेऊन खरीपाचं नियोजन आता सुरू होईल. बियाणं, खतं यांची गरज आणि त्याचं वितरण मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केलं जाईल. सर्वांना पाणी कमी पडणार नाही, अशीच ही बातमी आहे. महाराष्ट्रातली बहुतांश धरणं भरतील आणि खरीप व रब्बी दोन्ही हंगामाचं नियोजन काळजीपूर्वक केलं जाईल. त्यातूनच उत्पादन आणि उत्पादकता वाढवणं शक्‍य होईल. शेतकरीवर्ग पूर्वमशागतीच्या कामांना आनंदानं सुरवात करेल. पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी राहणार नाही असंच हे अंदाज सांगतात. पावसाचा थेंबन्‌ थेंब शेतीत मुरवणं आणि जिरवणं याकडं सर्वांचं लक्ष असेल.

महाराष्ट्रातली ऐंशी टक्‍क्‍यांहून अधिक शेती कोरडवाहू आहे. कोरडवाहू शेतीला चांगल्या पावसाची जोड मिळाल्यास खरीपातली, भात, ज्वारी, मका ही तृणधान्य पिकं, तर मटकी, उडीद, चवळी, वाटाणा, तूर, हुलगा ही कडधान्य पिकं योग्य ओलीवर पेरून पुढं पाऊस व्यवस्थित झाल्यास चांगलं उत्पादन देतील. पीकवाढीच्या काळातही पावसाची गरज असते. पावसावरची शेती म्हणजे बिनभरवशाची शेती मानली जाते. मात्र, पावसाचं वितरण चांगलं झाल्यास आणि पावसातल्या खंडांचा कालावधी कमी असल्यास खरीप हंगामातही भरघोस उत्पादन मिळतं. एकूण सर्व काही मॉन्सून पावसावर अवलंबून आहे. वरुणराजाची कृपा झाल्यास सर्व वर्ष आनंदात जातं. मात्र, त्यात काही कमी राहिल्यास सर्व वर्ष चिंतेत जातं. त्यामुळंच सर्वसाधारण मान्सून हा अंदाज सर्वांनासाठी निश्‍चितच दिलासादायक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr ramchandra sable write india monsoon imd article in saptarang