खट्याळ लेखकाच्या चाणाक्ष चौकशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tirkas chaukas book

ललित विनोद हा साहित्यप्रकार आवडणाऱ्या वाचकांच्या पसंतीस सॅबी परेरा हे नाव आता चांगलेच उतरले आहे. ‘टपालकी’ हे परेरांचे पहिले पुस्तक गाजले होते.

खट्याळ लेखकाच्या चाणाक्ष चौकशा

- डॉ. रवींद्र तांबोळी

ललित विनोद हा साहित्यप्रकार आवडणाऱ्या वाचकांच्या पसंतीस सॅबी परेरा हे नाव आता चांगलेच उतरले आहे. ‘टपालकी’ हे परेरांचे पहिले पुस्तक गाजले होते. कुठल्याही घटनेतील व्यंग, विसंगती काय आहे, याचे त्यांना अचूक भान आहे. नुकतेच प्रकाशित झालेले त्यांचे ‘तिरकस चौकस’ हे पुस्तक मनोरंजनासोबतच रसिक वाचकांना विचारप्रवण करणारेही आहे.

साहित्याचा प्रधान हेतू मनोरंजन हा असल्याने कोणत्याही साहित्यिकाच्या साहित्यकृतीने वाचकांचे मनोरंजन व्हायलाच हवे, या हेतूने ‘तिरकस चौकस’ अतिशय मनोरंजन करणारे पुस्तक असून पुढे ते वाचकाला विचारप्रवण करणारेही आहे. समाजात बोकाळलेल्या दंभावर प्रहार करणारा तीक्ष्ण विनोद करण्याची सॅबी परेरा यांची क्षमता निर्विवादपणे अजोड आहे.

परेरांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही घटनेतील व्यंग, विसंगती काय आहे, याचे त्यांना अचूक भान आहे. हे भान असल्यामुळे ते अशा घटनांवर जेव्हा भाष्य करतात, तेव्हा ते कुशल सर्जनच्या कौशल्याने त्या व्यंगाचे ऑपरेशन करून आपल्याला ते व्यंग किंवा विसंगती अतिशयोक्तीच्या मायक्रोस्कोपद्वारे दाखवतात. क्वचित काही ठिकाणी राजकीय घटनावरील परेरांच्या परखड भाष्यामुळे त्यांची मते एकांगी असल्याचा आरोप होऊ शकतो; पण मानवी स्वभावातील विसंगती शोधणाऱ्या लेखकांना अशा आरोपांचा धोका सदैव भोगावा लागतोच.

मानवी स्वभावातील कोणतीही विसंगती शोधणाऱ्या लेखकाला नेहमीच खोडकर वृत्तीने लिहावे लागते. सामाजिक रुढी, परंपरा, दांभिक वर्तन, लबाडी या साऱ्या दोषांवर विनोदाचे शस्त्र वापरून प्रहार करावे लागतात. या अर्थाने पाहिले तर परेरांची लेखणी कोट्या, भाष्य, उपहास, टीका, अतिशयोक्ती अशा विनोदाच्या हत्यारांनी संपन्न आहे.

‘तिरकस चौकस’च्या संदर्भाने सदर पुस्तकाचा आस्वाद घेताना यावेळी त्यांनी वर्षभरातल्या ‘दिन-विशेष’चा आधार घेत त्यांचे अनेक लेख खुसखुशीत असे सजवले आहेत. त्यांना सुचणारा विनोद हा नैसर्गिक असल्याने हे लेख ताज्या विनोदाने रसरशीत झाले आहेत. यातील जागतिक पुरुष दिन, व्हॅलेंटाईन डे, जागतिक कासव दिन, जागतिक धावण्याचा दिवस असे लेख नव्या संदर्भाने लिहिलेले असल्याने विनोदाचा प्रसन्न शिडकावा अनुभवता येतो. अतिशयोक्तीचा मनमुराद आनंद घ्यावासा वाटला, तर निंदकाचे घर असावे शेजारी हा लेख वाचावा. एखाद्या प्रतिभासंपन्न लेखकाला कोणत्याही विषयाचे किती कंगोरे सुचू शकतात, याचा तिथे प्रत्यय घेता येतो.

परेरांचे लक्षणीय असे कौशल्य म्हणजे जुन्या प्रचलित म्हणींच्या, श्र्लोकांच्या नव्या अवतारांची निर्मिती हेही असून, थांबला तो जिंकला, कुछ भी कर और सोशल मीडिया पे डाल, जे जे इन बॉक्सी पावे, ते ते फॉर्वर्डून टाकावे, त्रस्त करून सोडावे सकळजन अशा विषयानुरूप येणाऱ्या या अवतारांनी अनेक लेखांची उंची वाढली आहे.

ललित विनोद या साहित्य प्रकारात लिहिता येणे हे अतिशय कठीण लेखन कर्म असून, या प्रकारात लिहिणाऱ्या साहित्यिकांना आजही मराठी साहित्यात गंभीरपणाने प्रोत्साहित केले जात नाही. गेल्या कित्येक दशकातील ही उदासीनता असल्याने परेरासारखे नैसर्गिक विनोद वृत्ती लाभलेले नव्या दमाचे लेखक अनुल्लेखाने बाजूला पडू शकतात. हा धोका असला, तरी रसिक वाचकांना परेरांचा विनोद आवडत असल्याने क्षीण झालेली वाचनसंस्कृती पुनर्जीवित करू शकणारा त्यांचा विनोद आहे. या कारणाने त्यांची नोंद घ्यावी लागणार आहेच.

सॅबी परेरा यांच्या ‘तिरकस चौकस’ या पुस्तकातला मजकूर म्हणजे साप्ताहिक मार्मिक या नियतकालिकातील त्यांच्या सदरातील एकोणतीस लेखांचे संकलन. सदर लेखनातील लेख वाचताना त्या त्या कालावधीतील घटना, प्रसंग, किस्से यांची माहिती असेल, तर त्यात अधिक मजा येते. अशा लेखांना वर्तमानाचा अडथळा सदैव असतो. परेरा यांना हा धोका निश्चितच ज्ञात असावा. यातील अनेक लेखांना तत्कालिन वर्तमानातील घटनांचा आधार असला, तरी लेखाचा आधार हा फक्त आरंभसूत्र म्हणून वापरून पुढे परेरांची लेखणी चौफेर नाचली आहे.

परेरांचे ‘तिरकस चौकस’ हेही पुस्तक मराठी साहित्यात उल्लेखनीय ठरेल, हा आशावाद असून ग्रंथाली प्रकाशनाची ही एक उत्कृष्ट निर्मिती आहे.

पुस्तक : तिरकस चौकस

लेखक : सॅबी परेरा

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई

मुखपृष्ठ : नीलेश जाधव

पृष्ठसंख्या : १६२

मूल्य : २५० ₹.

टॅग्स :Booksaptarang