esakal | महाराष्ट्राचं भाषिक स्वराज्य (सदानंद मोरे)
sakal

बोलून बातमी शोधा

dr sadanand mores article sapatarang

महाराष्ट्राचं भाषिक स्वराज्य (सदानंद मोरे)

sakal_logo
By
सदानंद मोरे

राजकीय स्वराज्यात आपले सर्व व्यवहार आपणच नियंत्रित करत असतो, त्यात परकीयांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. परकीयांची मदत घ्यायची किंवा नाही, घ्यायची असल्यास किती प्रमाणात घ्यायची, त्यांच्या कोणत्या गोष्टीचं अनुकरण करायचं, याचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. परकीयांना हाकलून देऊन आपण स्वतंत्र झालो, स्वराज्य स्थापिलं; पण या स्वराज्याचा कारभार जर परकीयांच्या भाषेतूनच करत राहिलो, तर त्या स्वराज्याला खरं स्वराज्य म्हणता येईल का?

बुद्धी, भाषा आणि कृती एकमेकांशी निगडित करूनच माणूस आपलं जीवन जगत असतो. त्याचं हे जगणं काळाच्या चौकटीतच शक्‍य होतं व त्यामुळं इतिहास ही गोष्ट सिद्ध होत असते; परंतु इतिहासकार मात्र बुद्धी (कल्पना), भाषा (साहित्य) आणि कृती यांचे इतिहास वेगवेगळे करून लिहितात. सोईसाठी असं करणं समर्थनीयच आहे. तथापि, अंतिमतः या तिन्ही इतिहासांचे धागे एकमेकांत गुंफूनच इतिहासाचं महावस्त्र सिद्ध होऊ शकतं. अर्थात अशा प्रकारचं समग्र व एकसंध इतिहासलेखन क्वचितच पाहायला मिळतं, हा भाग वेगळा.
याचा अर्थ स्पष्ट आहे. इतिहासकाराला आपण ज्या समाजाचा इतिहास लिहीत आहोत, त्याच्या भाषेचं सूक्ष्म ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण, त्या भाषेत त्या समाजाचे विचार, विकार, इच्छा, आकांक्षा, ध्येयं आणि कर्म यांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. इतिहासाच्या साधनांमध्ये भाषिक (मौखिक व लिखित) साधनांची विशेष मातब्बरी असते ती यामुळंच. भाषेतले बदल म्हणजे त्या समाजाच्या स्थिती-गतीच्या खुणा असतात. विचार किंवा कल्पना भाषेतूनच व्यक्त होत असल्यामुळं विचारांच्या इतिहासकारालाही भाषाज्ञानाची आवश्‍यकता असतेच.
इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा इतिहासकार म्हणून असलेला दबदबा आपण जाणतोच. राजवाड्यांच्या इतिहासलेखनात त्यांच्या भाषाज्ञानाला विशेष स्थान आहे, हे विसरता कामा नये. इतकं की ‘राजवाडे हे पहिल्यांदा भाषातज्ज्ञ होते व मग इतिहासकार’ असं म्हणण्याचा मोह ‘ज्ञानकोश’कार श्रीधर व्यंकटेश केतकर यांना आवरता आला नाही! भाषेच्या क्षेत्रात राजवाड्यांच्या व्युत्पत्तिज्ञानाची परंपरा चालवणारे कृ. पां. तथा नानासाहेब कुलकर्णी यांच्या भाषाज्ञानाला माणसांच्या कृतीच्या ज्ञानाची पुरेशी जोड नसल्यामुळं त्यांना राजवाड्यांची उंची गाठता आली नाही.
मराठी भाषा आणि मराठी माणसाची कृती यांच्यातल्या अन्योन्यसंबंधाची मार्मिक जाणीव एका अनपेक्षित ठिकाणी पाहायला मिळाली, तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्का बसला. ते अनपेक्षित ठिकाण म्हणजे ठाणे इथले गेल्या शतकातले लेखक-संशोधक विनायक लक्ष्मण अर्थात वि. ल. भावे. भावे प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या ‘महाराष्ट्र सारस्वत’ या प्राचीन मराठी साहित्याच्या बृहत्‌इतिहासग्रंथामुळं. परवापरवापर्यंत महाविद्यालयांमधून आणि विद्यापीठांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ अपरिहार्य असे. आता विद्यार्थी प्राचीन साहित्याच्या वाटेला जात नसल्यानं त्याची उपयुक्तता कमी झाली आहे, हा भाग वेगळा.
वि. ल. भावे हे राजवाडे-संप्रदायातलेच असल्यानं ही जाणीव त्यांच्यात संक्रमित झालेली असणं शक्‍य आहे.
भावे यांनी ठाणे शहरात ‘मराठी दफ्तर’ नावाची संस्था स्थापन केली होती. इतिहाससंशोधकांनी उपलब्ध करून दिलेली ऐतिहासिक कागदपत्रं छापून प्रसिद्ध करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट होतं.
भावे यांच्या ‘मराठी दफ्तर’ या प्रकारात संस्थेनं प्रकाशित केलेला पहिला ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे ‘श्रीमंत महाराज भोसले यांची बखर.’ ही बखर ‘शेडगावकर बखर’ या नावानंही ओळखली जाते.
बखरीच्या प्रस्तावनेत भावे यांनी नोंदवलेला मुद्दा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. भावे लिहितात ः ‘‘प्रत छापताना नकललेल्या प्रतीतली भाषा व शब्दांची रूपे आणि वाक्‍ये ही जशीच्या तशीच कायम ठेवली आहेत. कारण, असे केल्याने त्या काळी साधारणपणे भाषा कशी लिहिली जात असे व शब्दांचे कोणते उच्चार बोलणाऱ्यांच्या तोंडी असत, हेही कळण्यास मार्ग होतो. किंबहुना मराठी भाषेचे मराठ्यांच्या प्रचारात जिवंत रूप कसे होते, तेही पाहण्यास सापडते. मृत व नियमांनी जखडलेल्या संस्कृत भाषेच्या अनुरोधाने किंवा संमतीने जिवंत मराठी शब्दांची रूपे ठरवताना व त्यांचे खोटे ‘शुद्धलेखन’ बनवताना केवढी घालमेल होते, हे आपण नेहमी पाहतो. तरी संस्कृतच्या चष्म्यातून मराठीकडे न पाहता मराठी भाषेचे शुद्ध व साधे स्वरूप स्वच्छपणे पाहण्यास सापडावे, हा असे करण्यात एक हेतू आहे.’’
या विधानानंतर भावे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात. तो म्हणजे, ‘‘यायोगे मराठ्यांच्या कृतीच्या इतिहासाबरोबर मराठी भाषेचा इतिहासही सहजासहजी नोंदला जातो.’’
एकीकडं कृतीच्या कक्षा वाढताना त्यानुसार व त्याअनुषंगानं भाषेच्या कक्षाही रुंदावतात. दुसरीकडं, कृतीची कक्षा वाढवण्यासाठीही भाषेच्या कक्षा वाढवाव्या लागतात.
मराठ्यांच्या कृतीचा व भाषेचा परस्परसंबंध पाहायचा असेल तर य. न. केळकर यांनी सिद्ध केलेला ‘ऐतिहासिक शब्दकोश’ पाहावा. शिवाजीमहाराजांपासून ते दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीची समाप्ती होईपर्यंतच्या काळातल्या उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक कागदपत्रांतून सुमारे १७ हजार शब्दांचे अर्थ केळकर देतात. (मराठ्यांच्या राज्यातले लक्षावधी कागद अद्याप वाचले गेले नाहीत. त्यांच्या वाचनातून आणखी कितीतरी शब्द मिळण्याची शक्‍यता इथं विचारात घेतलेली नाही). यातले बरेच शब्द मराठ्यांच्या तत्कालीन कृतींमधून घडले असणार यात शंका नाही.
‘भाषा’ या शब्दासाठी प्रचलित असलेला एक शब्द आहे ‘वाणी’, तसंच ‘कृती’ या शब्दासाठी प्रचलित असलेला एक शब्द आहे ‘करणी.’ ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाउले’ असं एक संतवचन मराठी भाषेत म्हणीसारखं रूढ झालं आहे. त्यात ‘चाले’ या शब्दाचा अर्थ कृती किंवा करणी असाच होतो. तुकाराममहाराजांच्या एका हिंदी अभंगात ‘कथनी बदनी खांडसी, करणी विष की लोय’ असं म्हटलं गेलं आहे. ‘कथनी म्हणजे बोलणं हे खडीसाखर खाण्याइतकं सोपं असतं; पण प्रत्यक्ष कृती जणू विषाची ज्वालाच’ असा त्याचा अभिप्राय. या प्रकारच्या वचनांमधून माणसाचं बोलणं आणि करणं यांच्यातली तफावत अधोरेखित केली जाते; पण याचा अर्थ असा होतो, की वाणी आणि कृती यांच्यात संगती असावी, अशी अपेक्षा केली जाते. आणि दुसरं असं, की आपण करत आहोत, ती चर्चा एखाद्‌दुसऱ्या व्यक्तीची नसून व्यक्तींच्या समूहांची, समाजाची आहे.
हा मुद्दा नाटककार राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या एका नाटकातून हृद्यपणे उलगडला आहे. ते म्हणतात ः ‘ज्ञानोबाची मराठी वाणी...शिवबाची मराठी करणी - दिगंत उजळून दोघांनी ऐन मराठी हाकेने भूमंडळ गाजविले. मराठी मोहिनीने जीवकोटीला भारून टाकले.’
गडकरी यांच्या नाट्यलेखनाच्याही अगोदर काही दशकं विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ नावाच्या मासिक, पुस्तकामधून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा ही त्रिसूत्री मांडली होती. शास्त्रीबुवांची इतिहासाविषयीची जाणीवही तीक्ष्ण होती. महाराष्ट्रात इतिहाससंशोधनाची लाट आली, त्याची प्रेरणा चिपळूणकर हीच होती, असं म्हणण्यात वावगं नाही.
‘स्वदेश’ म्हटलं की मराठी माणसाला छत्रपती शिवाजीमहाराज यांची आठवण होते, हे वेगळं सांगायची गरज नाही. शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्राला राजकीय स्वातंत्र्य मिळवून दिलं. चिपळूणकरांनी स्वतःला ‘मराठी भाषेचे शिवाजी’ घोषित करून टाकलं होतं. त्यांच्या टीकाकारांसाठी ही बाब टीकेची संधी ठरली, ही गोष्ट वेगळी; पण शास्त्रीबोवांच्या म्हणण्याचं मर्म समजून घ्यायला हवं. शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्राला जे स्वराज्य मिळवून दिलं, ते राजकीय होतं; त्यामुळं या महाराष्ट्रातून परकीयांचं उच्चाटन होऊन स्वकीयांची सत्ता स्थापन झाली. चिपळूणकर स्वतःला ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणवतात ते कुणाला मान्य होवो न होवो, या समजण्यात भाषिक स्वराज्याची कल्पना अनुस्यूत आहे, हे लक्षात घ्यायला हवं.
राजकीय स्वराज्यात आपले सर्व व्यवहार आपणच नियंत्रित करत असतो, त्यात परकीयांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. परकीयांची मदत घ्यायची किंवा नाही, घ्यायची असल्यास किती प्रमाणात घ्यायची, त्यांच्या कोणत्या गोष्टीचं अनुकरण करायचं, याचा निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य आपल्याला असतं. परकीयांना हाकलून देऊन आपण स्वतंत्र झालो, स्वराज्य स्थापिलं; पण या स्वराज्याचा कारभार जर परकीयांच्या भाषेतूनच करत राहिलो, तर त्या स्वराज्याला खरं स्वराज्य म्हणता येईल का? राजकीय स्वराज्याला भाषिक स्वराज्याची जोड नसेल ते अर्थहीन होईल. खरंतर राजकीय पारतंत्र्य संपुष्टात आणणं ही काही सोपी गोष्ट नसते; परंतु या राजकीय पारतंत्र्याच्या किंवा परराज्याच्या काळातसुद्धा पुरेसा भाषाभिमान असेल, तर भाषिक स्वराज्य स्थापन करणं शक्‍य आहे. चिपळूणकर याच भाषिक स्वराज्याची कल्पना करत आहेत. ‘निबंधमाले’च्या माध्यमातून आपणच ते निर्माण करत असल्याची खात्री असल्यामुळं ते स्वतःला ‘मराठी भाषेचे शिवाजी’ म्हणवून घेण्यास प्रवृत्त होतात.
चिपळूणकरांना ज्ञानेश्‍वरांच्या भाषिक कर्तृत्वाचा विसर पडला, असं मात्र नाही. ‘युरोप खंडातल्या इटालियन भाषेचा ‘दांते’ याच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ या महाकाव्याच्या अगोदर लिहिली गेलेली ज्ञानेश्‍वरी,’ असा गौरवपूर्ण उल्लेख करायला ते विसरत नाहीत.
चिपळूणकरांच्या त्रिसूत्रीमधलं तिसरं सूत्र स्वधर्माचं होतं. एकोणिसाव्या शतकातल्या महाराष्ट्रात धर्मचर्चा शिगेला पोचली होती. एकीकडं ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून धर्मांतराचे प्रयत्न सुरू होते. दुसरीकडं वेगवेगळे धर्मसमाज पुढं येत होते. ब्राह्मो समाज, परमहंस समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज या नव्या धर्मपंथांनी धर्मचर्चेत खळबळ माजवून सोडली होती. या सर्व धर्मसमाजांचे पारंपरिक हिंदू धर्माशी या ना त्या मुद्द्यावर मतभेद होते. चिपळूणकरांचा स्वधर्म हा पारंपरिक हिंदू धर्म असल्यामुळं त्यांनी ख्रिस्ती मिशनरी-प्रार्थना-सत्य समाजिस्ट यांच्यावरच नव्हे, तर हिंदू धर्माच्या मूळ स्वरूपाचं पुनरुज्जीवन करू पाहणाऱ्या आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींवरही टीकास्त्र सोडलं होतं!
यासंदर्भात ज्ञानेश्‍वरमहाराज आणि शिवाजीमहाराज यांचा विचार केला असता काय आढळतं?
ज्ञानेश्‍वरीत आढळणारा ‘स्वधर्म’ हा शब्द हिंदूधर्मवाचक नसून गीतेच्या तत्त्वज्ञानातलं स्वकर्म सूचित करणारा आहे. याचा अर्थ ज्ञानेश्‍वरमहाराजांना रूढ धर्मकल्पनेत स्वारस्य नव्हतं असा नाही. व्यापक अर्थानं ते वैदिक हिंदू धर्माचीच चौकट मानणारे असले, तरी त्यांची ज्या धर्मसंप्रदायांशी जवळीक होती, ते नाथ आणि वारकरी संप्रदाय हे चिपळूणकरकालीन धर्मसमाजांप्रमाणे पारंपरिक हिंदू धर्माशी काही मुद्द्यांवर असहमती दाखवत वेगळा विचार मांडणारे होते. ज्ञानेश्‍वरमहाराजांनी नाथपंथाचा वारसा प्राप्त करून त्याचा समकालीन वारकरी पंथाशी समन्वय केला. त्यामुळं त्यांची धर्मकल्पना आपोआपच व्यापक, उदार व सर्वसमावेशक झाली. चिपळूणकरकालीन धर्मसमाजांपैकी प्रार्थना समाजानं ज्ञानेश्‍वरमहाराजांच्या भागवतधर्माशी नातं सांगत ‘आपण स्वतः नवभागवत आहोत’ अशी भूमिका घेतली, ती या साम्यामुळंच! याच भागवतधर्माला न्या. रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांनी 
‘महाराष्ट्रधर्म’ असं नाव दिलं.
महाराष्ट्रधर्मासंबंधानं इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी रामदासांना केंद्रस्थानी ठेवून उपस्थित केलेल्या वादात शिरायचं इथं काही प्रयोजन नाही. इथं मुद्दा एवढाच आहे, की महाराष्ट्रदेश, महाराष्ट्रभाषा आणि महाराष्ट्रधर्म अशी त्रयी या विवेचनातून निष्पन्न होते. मराठी भाषेसाठी ‘महाराष्ट्रभाषा’ हा शब्द पूर्वीपासून रूढ आहे, हे अनेकांना ठाऊक नसतं; पण त्याचा सगळ्यात लक्षणीय प्रयोग तुकाराममहाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांनी केलेला आहे. बहिणाबाईंचा हा अभंग तुकाराममहाराजांबद्दलचाच आहे, हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य.
तुकाराममहाराजांबाबत बहिणाबाई लिहितात ः ‘महाराष्ट्रभाषेत वेदांताचा अर्थ। बोलिला लोकांत सर्वद्रष्टा।।’
स्वतः तुकाराममहाराजांनी ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा’ असे उद्‌गार काढले होतेच. आता बहिणाबाई सांगतात, की वेदांचा हा अर्थ तुकाराममहाराजांनी आपल्या अभंगवाणीतूनही प्रकट केला आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्ञानेश्‍वरमहाराजांनी गीतेचा अर्थ मराठीत सांगून महाराष्ट्राच्या भाषिक स्वराज्याचा पाया घातला. भागवत ऊर्फ महाराष्ट्रधर्माचाही पाया त्यांनी घातल्याचं प्रतिपादन संत बहिणाबाईंनीच ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ या प्रसिद्ध उक्तीतून केलेलं आहेच. याचा धर्ममंदिराचा तुकाराममहाराज कळस झाले, असं पुढं बहिणाबाईच सांगतात.
थोडक्‍यात सांगायचं झाल्यास, ज्ञानेश्‍वरमहाराज समाधिस्थ झाल्यानंतर काही वर्षांतच महाराष्ट्राचं राजकीय स्वराज्य बुडून परकीय राजवट आली, तरी ज्ञानेश्‍वरमहाराजांनी पाया घातलेलं महाराष्ट्राचं भाषिक स्वराज्य तुकाराममहाराजांपर्यंत अबाधितच राहिलं होतं. न्या. रानडे तर असंही सूचित करतात, की या भाषिक व धार्मिक स्वराज्यामुळंच शिवाजीमहाराजांना आपलं राजकीय स्वराज्य स्थापन करणं शक्‍य झालं.

loading image
go to top